(घोषित दि. 26.09.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
अर्जदार या गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीच्या ग्राहक असून त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या वीज बिलाच्या तक्रारीची दाखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांनी नियमितपणे वीज बिलाचा भरणा केला आहे. गैरअर्जदार यांनी जून 2012 मध्ये 1690/- रुपयाचे वीज बिल आकारले व त्याचाही भरणा अर्जदाराने केला आहे. गैरअर्जदार यांनी त्यानंतर दिनांक 24.09.2012 ते 23.10.2012 या कालावधीत 184 युनिट वीज वापराचे 25,550/- रुपयाचे वीज बिल आकारले. या वीज बिलाची तक्रार केल्यानंतर त्यांना 24,028/- रुपये समायोजित रक्कम मागील थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. गैरअर्जदार यांनी सदरील वीज बिल रद्द करण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी या वाढीव वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारित करण्याची विनंती केली आहे.
अर्जदाराने मंचामध्ये गैरअर्जदार यांनी दिलेल्या वीज बिलाच्या प्रती, वीज बिल भरल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
वीज पुरवठा खंडीत करु नये याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर दिनांक 09.11.2012 रोजी सुनावणी घेण्यात आली. अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत असल्यामुळे तसेच समायोजित रकमेबाबत कोणतेही विवरण वीज बिलात देण्यात आले नसल्याचे आढळून आल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रुपये 5,000/- भरावे व गैरअर्जदार यांनी पुढील आदेशापर्यंत वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आरेश मंचाने पारित केला.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने मूलचंद घमंडीराम यांनी नायब बाजार, दाना बाजार जालना या ठिकाणी दिनांक 26.01.1963 रोजी वीज पुरवठा घेतला होता जो 2008 मध्ये कायम स्वरुपी खंडीत करण्यात आला होता. जून 2012 मध्ये अर्जदाराच्या नावे असलेले 17,918 = 93 रुपये सप्टेंबर 2012 मधील वीज बिलात समायोजित करण्यात आले जे नियमाप्रमाणे आहे. अर्जदारास आकारण्यात आलेले वीज बिल योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे असून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
- अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी श्री.गुलचंद घमंडीराम यांच्या नावे घरगुती वापरासाठी वीज पुरवठा दिलेला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510030089608 व मीटर क्रमांक 4144589 असा आहे. अर्जदार हे वीज वापर करीत असून वीज कायद्यातील तरतुदी नुसार ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत.
- गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2012 ते नोव्हेंबर 2012 या कालावधीचे सी.पी.एल दाखल केले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2012 या महिन्याचे 401 युनिट वीज वापराचे व मागील थकबाकी 1778 =20 रुपये असे एकूण 4499 =01 रुपयाचे वीज बिल आकारले आहे. सप्टेंबर 2012 या महिन्यात गैरअर्जदार यांनी अर्जदारास सरासरीवर अधारीत 184 युनिट वीज वापराचे एकूण 23660 =26 रुपयाचे वीज बिल आकारले ज्यामध्ये 17918 =69 रुपये ही समायोजित रक्कम म्हणून दाखविण्यात आलेली दिसून येते.
- गैरअर्जदार यांनी श्री.मुलचंद घमंडीराम यांच्या नावे 510030003380 या ग्राहक क्रमांकाचे जुलै 2007 ते नोव्हेंबर 2012 या कालावधीचे सी.पी.एल जोडले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केले असता जुलै 2007 ते डिसेंबर 2007 पर्यंत मागिल रिडींग व चालू रिडींग 8581 असे दर्शवून 165 युनिट वीज वापराचे बिल आकारलेले दिसून येते. जानेवारी 2008 नंतर या ग्राहक क्रमांकावर बिल आकारणी करण्यात आलेली दिसून येत नाही. दाखल सी.पी.एल वरुन या ग्राहक क्रमांकाचा वीज पुरवठा कायमस्वरुपी 2008 साली खंडीत केला असल्याचे स्पष्ट होते.
- 2008 साली ग्राहक क्रमांक 510030003380 यावर असलेली थकबाकी 17918 =13 रुपये गैरअर्जदार यांनी ग्राहक क्रमांक 510030089608 यावर सप्टेंबर 2012 मध्ये समायोजित म्हणून आकारले असल्याचे स्पष्ट होते.
- वीज कायदा 2003 मधील कलम 56 नुसार मगील दोन वर्षापासून वीज बिलामध्ये थकबाकी रक्कम दर्शविली नसल्यास ती वसूल करता येत नाही. गैरअर्जदार यांनी 2008 साली कायम स्वरुपी खंडीत करण्यात आलेल्या ग्राहक क्रमांकावरील रक्कम चार वर्षाच्या कालावधीनंतर दुस-या ग्राहक क्रमांकावर समायोजित केली असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांची ही कृती वीज कायद्याच्या तरतुदी विरुध्द असल्याचे स्पष्ट होते.
वरील विवेचनावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत निश्चित कमतरता केलेली दिसते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले सप्टेंबर 2012 व त्यापुढील वीज बिल रद्द करण्यात येत आहेत.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सप्टेंबर 2012 मध्ये आकारण्यात आलेली समायोजित रक्कम 17918 =69 रुपये रद्द करण्यात येत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे व त्यामध्ये व्याज व दंड आकरु नये.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.