ग्राहक तक्रार क्र.338/2011
अर्ज दाखल तारीख : 11/10/2011
अर्ज निकाल तारीख: 14/01/2015
कालावधी: 03 वर्षे: 03 महिने:04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मुकुंद भगवान सस्ते,
वय-42 वर्षे, धंदा –विधिज्ञ,
रा.येडशी, ता. जि.उस्मानाबाद.
ह.मु.एम.आय.डी.सी. परिसर, उस्मानाबाद. ....तक्रारकर्ता
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
1. म.रा.वि.वि. कं. लि., उस्मानाबाद.
2. उपअभियंता,
म.रा.वि.वि.कं.लि. विभाग,
तेर, ता. जि. उस्मानाबाद.
3. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि.कं. लि. विभाग,
तेर, ता.जि.उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.मुंडे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) मिटर बदलल्यानंतर अचानक जास्तीचे वीज बिल देऊन विरुध्द पक्षकार (विप) यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की तो येडशीचा रहीवाशी असून व्यवसायानिमित्त तात्पूरता उस्मानाबाद येथे राहतो. तर येडशी येथील त्याच्या घरी त्याचे आईवडील राहतात. दि.28/06/2002 रोजी येडशी येथील घरामध्ये विप यांच्याकडून विदयूत पुरवठा घेतला असून त्याचा ग्राहक क्र.591140521661 असा आहे. जुन 2010 पर्यंत तक ने नियमीत बिल भरलेले आहे. जुलै 2010 मध्ये विप ने मिटर बदलले. पुर्वीचा मिटर क्र.9000177828 असा आहे. नवीन मिटर क्र.12159444 असा आहे. मार्च 2011 पर्यंत आलेली बिले तक ने भरली. एप्रिलचे बाकी राहीले. मात्र माहे एप्रिल व मे2011 चे एकत्रित बिल रु.20,020/-देण्यात आले. सदरचे बिल काल्पनिक असून अवास्तव आहे. विप कडे संपर्क साधला असता पुढील महीन्यात बिल कमी करुन देतो असे सांगितले मात्र बिल कमी केले नाही. तक चे घरी वीज वापर कमी असतो पण विप बिलात दुरुस्ती करायला तयार नाही. तक ने दि.28/07/2011 रोजी विप ला नोटीस पाठविली पण उपयोग झाला नाही. म्हणून विप ने अवाजवी बिल दुरुस्त करावे व तक स मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- दयावे व तक्रारीचा खर्च रु.5,000/- दयावे. म्हणून ही तक्रार दाखल केली आहे.
3) तक ने तक्रारीसोबत जुलै 2011 जुन 2011, मे 2011, एप्रिल 2011, मार्च 2011, ऑक्टोबर 2010, जुन 2010 ची बिले व तारीख 18/07/2010 चा मिटर बदली अहवाल दाखल केला आहे.
4) विप ने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दि.12/01/2012 रोजी दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक ने वीजेचे बिल भरले परंतू वीज वापर जास्त असतांना कमी युनिट वापर दाखवून कमी वापराची बिले भरली असे म्हंटले आहे. तक याने तक्रार केल्यानंतर विप यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली. तेव्हा असे निदर्शनास आले की मिटर बदलल्यानंतर जुन्या मिटर वरील वापरलेल्या युनिटचे बिल देण्यात आले नाही. त्यामुळे तक ला कमी बिलाची आकारणी करण्यात आली. प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटप्रमाणे तक यास एकदम बिल देण्यात आले. नंतर सरासरी वापराप्रमाणे फेब्रूवारी 2010 ते जुलै2010 असे जुन्या मिटरचे व जुलै 2010 ते जुलै 2011 असे बारा महीन्याचे वापरामध्ये बिलाची विभागणी केली व जुलै 2011 चे बिल रु.24,980/- नियमाप्रमाणे दुरुस्त करुन दिले आहे. ते भरण्यास तक जबाबदार आहे. तक ने बिल भरल्यास विदयूत पुरवठा खंडीत करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रार देण्यास कोणतेही कारण घडले नाही. म्हणून तक्रार खर्चासह खारीज होणे योग्य आहे.
5) असे दिसते की ता.23/01/2013 रोजी ही तक्रार चालू असतांना विप यांचे मार्फत तक चा विदयूत पुरवठा खंडीत करण्यात आला. तो पुर्ववत होण्याचा अंतरीम आदेश मिळावा असा अर्ज तक तर्फे दि.04/02/2013 रोजी देण्यात आला. त्यावर दि.04/02/2013 चा अंतरिम आदेश होऊन तक ने रु.10,310/- विप कडे भरल्यास चोवीस तासाच्या आत विप ने विदयूत पुरवठा सुरु करावा असा आदेश पारीत करण्यात आला.
6) तक ची तक्रार त्याने दाखल केलेले कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन केले असता आमच्या विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2.
7) दि.07/07/2010 चे बिल जुन 2010 चे असून 105 युनिटचे असून त्यापुर्वीच्या महिन्यात 0, 40, 358, 410, 27, 736, 150, 150, 672, व 152 युनिट वापर दाखवला होता. बारा महीन्याचा सरासरी वापर 263 युनिट प्रतिमहा असा येतो त्यापुढील महीन्यात म्हणजे बिल दि.08/11/2010 चे ऑक्टोबर 2010 मध्ये 22 युनिट वापर दाखवले नंतर मार्च 11 मधे 23 युनिट वापर तर त्यापुर्वी 10, 11, 24, 18, 22, 97, 0, 97, 105, 040 युनिट वापर दाखवला आहे. जुलै 2010 मध्ये मीटर बदलल्यावर जुना मीटर नंबर घालून काल्पनिक बिल तक ला दिल्याचे दिसून येते. जुलै 2011 मध्ये एकदम 1359 युनिट वापर झाला असणे शक्य नाही तशी विप ची तक्रार पण नाही. विप चे म्हणणे आहे की 18 महीन्यात विभागणी करुन दुरुस्ती बिल रु.24,982/- दिलेले आहे. असे दिसते की माहे मे 2011 च्या बिलात समायोजीत युनिट म्हणून 2119 दाखवले आहेत त्यास काय आधार आहे हे स्पष्ट केलेले नाही. मीटर बदल अहवालाप्रमाणे रीडिंग 257189 लिहिले तेही चुकीचेच दिसते. त्यानंतरची दिलेली बिले तक ने वेळोवेळी भरल्याचे दिसते.
8) तक चे म्हणणे आहे की विप ने त्याचे मिटर जुलै 2010 मध्ये बदलले. विप चा दि.18/07/2010 चा बदली अहवाल त्यावर प्रकाश टाकतो. जुना मिटर क्र.177828 असून नवीन मिटर क्र.159444 आहे. मागिल मिटरचे रिडींग 25718 नमूद केले आहे. ता.08/11/2010 चे बिलावर मिटर नंबर जुना असून मागील व चालू रीडिंग 23440 व 23462 असे आहे. ता.08/04/2011 चे बीलावर मीटर क्रमांक जुनाच आहे. मीटर रीडींग 23548 व 23599 आहे. दि.08/06/2011 चे बीलावर मीटर क्रमांक नवा आला आहे. रिडींग 2 व 101 आहे. दि.06/07/2011 चे बीलावर रिडींग 101 व 151 आहे. दि.04/08/2011 चे बिलावर रिडींग 151 व 1410 म्हणजेच वापर 1359 युनिट असा दाखवला आहे.
9) दि.11/05/2011 चे बीलावर कालावधी दि.31/02/2011 ते 30/04/2011 दाखवला असून 51 युनिट वीज वापर दाखवला आहे. दि.08/06/2011 चे बिलावर कालावधी 30/04/2011 ते 31/05/2011 दाखवला असून वापर 97 युनिट दाखवला आहे. दि.06/07/2011 चे बिलावर कालावधी दि.31/05/2011 ते 30/06/2011 दाखवला असून वापर 50 युनिट दाखवला आहे. दि.04/08/2011 चे बिलावर कालावधी दि.30/06/2011 ते 31/07/2011 दाखवला असून वापर 1359 युनिट दाखवला आहे. विप चे म्हणणे आहे की तक चे मीटर बदलल्यानंतर त्याला जुन्या मीटरवरील वापरलेल्या युनिटचे बिल न देण्यात आले. त्यामुळे नंतर तक ला प्रत्यक्ष वापराचे बिल देण्यात आले.
10) तक ची तक्रार एप्रिल-मे 2011 चे बिलाबददल आहे. जुन 2010 पर्यंतचे बिलाबददल कोणतीही तक्रार नाही वर म्हंटल्याप्रमाणे जुन 2010 पर्यंत वर्षामध्ये सरासरी मासीक वीज वापर 263 युनिट होता मे-2011 चे बिलात समायोजीत युनिट 2199 दाखवले आहेत म्हणजेच 11 महिन्यात 2199 जादा युनिट तक ने वापरले पण त्याचे बिल दिले नाही असे विप चे म्हणणे आहे म्हणजेच दरमहा सरासरी 200 युनिट अधिकचा वापर करुन तक ने कमी वापराचे बील दिले अशी विप ची तक्रार आहे पुढे जुलै 20011 चे बिल दि.04/08/2011 चे रु.32,280/- चे दिले ते दुरुस्त करुन रु.24,980/- केले असे विप चे म्हणणे आहे. मात्र वाद हा एप्रिल – मे 2011 चे बिलासंबंधी आहे.
11) जुलै 2010 मध्ये मीटर बदलल्यावर नवीन मिटर प्रमाणे रिडींग घेणे विप ची जबाबदारी होती मात्र जुना मिटर नंबर घालून काल्पनीक रिडींगचे बिल विप ने तक ला दिलेले दिसते. मार्च 2011 चे बिलाचे अवलोकन केले असता पुर्वीचे 10 महिन्यापासून सरासरी वीज वापर 40 युनिट दाखवला आहे असा एकदम वीज वापर सुमारे 200 युनिटने कमी झाला याचे विप पैकी कोणालाही काही वाटले नाही. कोणी त्यावर लगेच अॅक्शन घेतली नाही. कदाचित तक ने वीज वापर केला ही नसेल मात्र सरासरी 40 युनिट व पुर्वी सरासरी 263 युनिट वीज वापरामध्ये कोणतीही सुसंगती नाही त्यामुळे मे 2011 चे वीज बिल दुप्पट रक्कमेचे देऊन विप ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.42 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मान्य करणेत येते.
2) एप्रिल मे.2011 चे बिल रदद करणेत यऊन त्याऐवजी अंतरिम आदेशाप्रमाणे असेलेले रु.10,310/- (रुपये दहा हजार तीनशे दहा फक्त) बील कायम करणेत येते.
3) खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.