श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 15 ऑक्टोबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने घरगुती वापरासाठी ग्राहक क्र.413890283333 प्रमाणे वि.प.कडून विज पुरवठा घेतला आहे. तो सदर विज वापराचे बिल नियमितपणे भरत होता. माहे जुलै 2015 मध्ये त्यांस वि.प.कडून 112 युनिट विज वापराचे रु.610/- चे बिल देण्यांत आले व ते त्याने भरले आहे. मात्र ऑगस्ट 2015 मध्ये विज मिटरमध्ये बिघाड झाल्याने मिटरने 2129 युनिट इतका चुकीचा विज वापर नोंदविला व त्यासाठी वि.प.ने रु.28,360/- इतके विज बिल पाठविले. सदरचा विज वापर मिटरमधील दोषामुळे चुकीचा दर्शविला असल्याने मिटरची तपासणी करुन प्रत्यक्ष विज वापराप्रमाणे विज बिलाची आकारणी करावी म्हणून तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडे अर्ज केला.
वि.प.ने सदोष मिटरचे तपासणी शुल्क रु.150/- तक्रारकर्त्याकडून घेतले आणि सदोष मिटर तपासणीसाठी काढून नेला आणि दि.27.08.2015 रोजी नविन मिटर लावून दिला. नविन मिटरप्रमाणे वाचन घेऊन विज वापर न दर्शविता वि.प.ने माहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2015 चे प्रोव्हीजनल बिल अनुक्रमे रु.2,000/- आणि रु.1360/- चे पाठविले. त्याचा तक्रारकर्त्याने वेळीच भरणा केला आहे. नोव्हेंबरमध्ये विज वापर 157 युनिट दर्शवून त्याबाबत रु.1330/- इतक्या बिलाची आकारणी करण्यांत आली. सदरचे बिलदेखील प्रोव्हीजनल म्हणून दर्शविण्यात आले. त्याचाही भरणा तक्रारकर्त्याने केला. डिसेंबर 2015 मध्ये विज वापर 117 युनिट दर्शवून रु.1300/- इतकी आकारणी करण्यांत आली. मात्र जानेवारी 2016 मध्ये प्रत्यक्षात 90 युनिट विज वापराबाबत रु.926/- इतकी आकारणी केली असतांना मागिल थकबाकी रु.25,196.52 दर्शवून रु.26,020/- चे बिल देण्यांत आले आणि थकीत रकमेसह 15 दिवसांत बिलाचा भरणा न केल्यास विज पुरवठा खंडित करण्यांत येईल अशी वि.प.ने 13.01.2016 रोजी तक्रारकर्त्यास नोटीस पाठविली. वि.प.च्या मिटरमध्ये निर्माण झालेल्या दोषामुळे मिटर जंप होऊन ऑगस्टमध्ये 2121 युनिट विज वापर दर्शविला, तो सदोष मिटर तपासणी करतांना तक्रारकर्त्यास हजर राहण्यासाठी तक्रारकर्त्यास कोणतीही नोटीस न देता त्याच्या अनुपस्थित चुकीचा व खोटा अहवाल तयार करुन चुकीच्या बिलाची थकील बिल म्हणून करण्यांत आलेली मागणी तक्रारकर्त्यास मान्य नसल्याने त्याने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- ऑगस्ट 2015 चे 2121 युनिटचे रु.28,360/- चे तसेच जानेवारी 2016 चे रु.26,020/- चे चुकीचे बिल रद्द करावे.
- वि.प.ने तक्रारकर्त्यास थकबाकीसह 15 दिवसांचे आंत बिलाचा भरणा करण्याबाबत पाठविलेली नोटीस रद्द करावी.
- मानसिक व आर्थीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.90,000/- मिळावी.
- तक्रार खर्च रु.10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत जुलै 2015 ते जानेवारी 2016 पर्यंत वि.प.ने दिलेल्या विज बिलाच्या प्रती, मिटर टेस्टींग बिल, तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडे केलेला अर्ज, नोटीस अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे पाठविलेली नोटीस तामिल होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही आणि तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन खोटे असल्याचे दाखवून दिले नाही. मंचाने वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.11.05.2016 रोजी पारित केला.
3. तक्रारीच्या निर्णीतीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र. 1 बाबत – वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन नाकारलेले नाही. तक्रारकर्त्याने जे बिल दाखल केले आहेत. त्यावरुन ऑगस्ट 2015 पूर्वीचा व नंतरचा विज वापर खालीलप्रमाणे दिसून येतो.
बिलाचा महिना | विज वापर युनिटमध्ये | दस्तऐवज क्र. |
डिसेंबर 2014 | 125 | दस्तऐवज क्र. 1 |
जानेवारी 2015 | 98 |
फेब्रुवारी 2015 | 65 |
मार्च 2015 | 77 |
एप्रिल 2015 | 102 |
मे 2015 | 149 |
जून 2015 | 178 |
जुलै 2015 | 112 |
ऑगस्ट 2015 | 2121 | दस्तऐवज क्र. 2 |
सप्टेंबर 2015 | सरासरी 108 युनिट (322 युनिट) | दस्तऐवज क्र. 3 |
ऑक्टोबर 2015 |
नोव्हेंबर 2015 |
डिसेंबर 2015 | 117 | दस्तऐवज क्र. 7 |
जानेवारी 2016 | 90 | दस्तऐवज क्र. 8 |
वरीलप्रमाणे तक्रारकर्त्याचा सरासरी मासिक विज वापर 110 युनिट असतांना एकटया ऑगस्ट 2015 या महिन्यांत त्याने 2121 युनिट विज वापर करण्याची मुळीच शक्यता नाही. तक्रारकर्त्याने मिटर तपासणीसाठी अर्ज केल्यावर सदोष मिटर वि.प.ने तपासणीसाठी काढून नेला आणि नविन मिटर बसविला. नविन मिटरने सप्टेंबर 2015 पासून जानेवारी 2015 पर्यंत नोंदविलेला विज वापरदेखिल सरासरी 110 युनिट असतांना तक्रारकर्त्यास सदोष मिटरच्या तपासणीसाठी नियमाप्रमाणे नोटीस न देता त्याच्या अनुपस्थितीत मिटरची तपासणी करुन “error are with in limit, with c-open indication” असा अहवाल (दसतऐवज क्र. 10) तयार करुन त्या भरवशावर तक्रारकर्त्याकडून ऑगस्ट 2015 चे मिटर रिडींगप्रमाणे 2121 युनिटचे बिल थकीत दाखवून त्याची मागणी जानेवारी 2016 चे बिलात दर्शविण्याची (दस्तऐवज क्र. 9) आणि बिल न भरल्यास विज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस (दस्तऐवज क्र. 11) देण्याची वि.प.ची कृती अन्यायकारक व सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्याचा मासिक विज वापर सरासरी 110 युनिट असल्यामुळे ऑगस्ट 2015 मध्ये मिटरमधील दोषामुळे मिटर जंप होऊन चुकीचा विज वापर 2121 युनिट दर्शवून त्यापोटी दस्तऐवज क्र. 2 प्रमाणे रु.28,360/- ची विज बिलाची केलेली मागणी तसेच कायदेशीर तरतुदीचे पालन न करता तक्रारकर्त्याला मिटर तपासणीचे वेळी हजर राहण्याची नोटीस न देता त्याच्या अनुपस्थितीत मिटर तपासणी अहवाल तयार करुन ऑगस्ट 2015 च्या सदोष मिटर वाचनाप्रमाणे जानेवारी 2016 मध्ये रु.25,196.52 थकबाकी दर्शवून एकूण रु.26,020/- एवढया रकमेच्या बिलाची मागणी बेकायदेशीर आहे. म्हणून तक्रारकर्ता सदर दोन्ही बिल रद्द करुन मिळण्यास आणि ऑगस्ट 2015 चे बिल आकारणी सरासरी मासिक विज वापराप्रमाणे 110 युनिट लावून मिळण्यास तसेच सप्टेंबर 2015 नंतरचे बिल नविन मिटरचे वाचनाप्रमाणे प्रत्यक्ष विज वापराप्रमाणे आकारणी करुन मिळण्यास पात्र आहे.
याशिवाय, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास दिलेले माहे ऑगस्ट 2015 चे 2121 युनिटचे रु.28,360/- चे आणि माहे जानेवारी 2016 चे रु.25,196.52 इतकी थकबाकी जोडून दिलेले विज देयक रद्द करावे आणि त्याबदली माहे ऑगस्ट 2015 चे सरासरी मासिक विज वापराप्रमाणे 110 युनिटचे विज बिल तक्रारकर्त्यास द्यावे.
2) सप्टेंबर 2015 पासून नविन मिटरप्रमाणे प्रत्यक्ष विज वापराचे बिल द्यावे.
3) तक्रारकर्त्याने सदर काळात वि.प.कडे मंचाच्या आदेशाप्रमाणे जमा केलेली विज बिलाची रक्कम ऑगस्ट 2015 पासून आकारणी करावयाच्या नविन बिलात समायोजित करावी आणि ऑक्टोबर 2016 पर्यंतचे बिल तक्रारकर्त्यास पाठवावे.
4) भरलेली रक्कम प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिक असल्यास पुढील बिलात समायोजित करावी.
5) शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.2,000/- वि.प.नी तक्रारकर्त्यास द्यावे.
6) वि.प.क्र. 1 व 2 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत संयुक्तपणे व वैयक्तीकरीत्या करावी.
7) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.