(मंचाचे निर्णयान्वये – सौ. व्ही.एन.देशमुख, अध्यक्षा)
-- आदेश --
(पारित दिनांक 01 जुन 2004)
अर्जदार नामे किसन धोटे हा फुलचूर येथे शिवाजी धाबा चालवित असून त्याने गैरअर्जदार यांचेकडून वीज कनेक्शन घेतले आहे. त्याचा मीटर क्रमांक 000346 असा असून त्याचा ग्राहक क्रमांक 433560232965 असा आहे. अर्जदार हा त्याला प्राप्त होणारी सर्व देयके नियमितपणे भरीत होता. परंतु गैरअर्जदार यांनी त्याला 20.02.2001 ते 20.03.2001 या कालावधीकरिता रु.4,418/- चे बिल अतिरिक्त देऊन दिनांक 10.05.2001 रोजी रु. 480/- चे डिमांड बिल दिले. अर्जदारास सर्वसाधारणपणे 3 महिन्यांचे बिल रु.500/- ते 600/- येत असल्यामुळे सदरची बिले त्याला मंजूर नव्हती. करिता अर्जदाराने योग्य रकमेचे बिल पाठविण्याची गैरअर्जदार यांना विनंती केली.
गैरअर्जदार डी.एस.बन्सोड यांनी दि. 10.10.2002 रोजी जुने मीटर काढून नवीन मीटर बसविले व या दोन्ही मीटरचा अहवाल आवेदकास सादर केला. जुन्या मीटरप्रमाणे अधिक युनिट न जळल्यामुळे अतिरिक्त देयकाची रक्कम भरण्याची जरुरी नाही असे गैरअर्जदार यांनी अर्जदारास सांगितले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.9,258/- चे बिल त्यानंतर पाठविले. सदरची रक्कम कमी करण्याकरिता अर्जदाराने विनंती केली असता गैरअर्जदार यांनी सदर बिलात दुरुस्ती करुन रु.2,254/- अर्जदारास भरण्यास सांगितले. अर्जदाराने दिनांक 5.12.2002 रोजी सदर देयकानुसार रकमेचा भरणा केला. गैरअर्जदार यांनी दि.17.05.2003 रोजी अर्जदारास रु.35,290/- चे बिल पाठविले. सदर देयक भरण्याची अंतिम तारीख 30.05.2003 होती. अर्जदाराने सदर देयक चुकिचे असून ते दुरुस्त करुन देण्याबाबत गैरअर्जदार यांना वारंवार विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलटपक्षी सदर देयकाचा त्वरित भरणा न केल्यास अर्जदाराचे विद्युत कनेक्शन कापण्याची ताकीद अर्जदारास देण्यांत आली. करिता सदर विवादित रकमेचे देयक दुरुस्त करुन देण्याविषयी व सदर देयकाचा भरणा न केला गेल्यास गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वीज कनेक्शन कापू नये अशी विनंती मंचास केली आहे. अर्जदार हा धाबा चालवीत असून सदरचा धाबा तो स्वयंरोजगाराकरिता गरज म्हणून चालवित आहे. करिता त्याची तक्रार ग्राहक मंचाच्या नियमानुसार असून तक्रार मंजूर करण्याची मंचास विनंती केली आहे.
निशाणी क्रं. 2 अन्वये अर्जदाराने स्वतंत्र हलफनामा दाखल केला असून आपल्या कथनापृष्ठयर्थ निशाणी क्रं. 4 अन्वये एकूण 6 कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. या कागदपत्रांमध्ये अर्जदाराच्या धाब्याचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विवादीत वीज देयके व अर्जदाराने गैरअर्जदार यांचेशी केलेला पत्रव्यवहार यांचा समावेश आहे.
अर्जदाराने निशाणी क्रं. 5 अन्वये तक्रारीचा निकाल लागेपावेतो तात्पुरता मनाई हुकूम मिळण्याबाबत शपथपत्रासहित अर्ज दाखल केला. सदर अर्जावर गैरअर्जदार यांना लेखी उत्तर देण्याकरिता नोटीस काढण्यांत आली. आपल्या कथनापृष्ठयर्थ अर्जदाराने विवादीत कालावधीपूर्वीची विद्युत देयके निशाणी क्रं. 14 अन्वये दाखल केली.
गैरअर्जदार यांनी निशाणी क्रं. 21 अन्वये आपले लेखी उत्तर मंचासमोर दाखल करुन अर्जदार हा ग्राहक असल्याबाबत प्राथमिक आक्षेप व्यक्त केला. अर्जदाराने घेतलेला वीज पुरवठा हा व्यापारी कारणाकरिता घेतला असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक ठरत नाही असे प्रतिपादन गैरअर्जदार यांनी केले. गुणवत्तेच्या आधारे गैरअर्जदार यांचे असे कथन आहे की, अर्जदाराकडे मोठया प्रमाणात वीज वापर होऊन देखील प्रत्यक्षात मात्र त्याला 50 युनिटपेक्षाही कमी युनिटचे देयक दिले जात होते ही बाब निदर्शनास आल्यामुळे लेखा तपासणी अहवाल क्रं. 2600 दिनांक 18.07.2000 प्रमाणे रु.4,418/- ची आकारणी करण्यात यावी असे लेखा अधिका-यांनी सुचविले व त्यानुसार फेब्रुवारी -2002 च्या देयकात सदर अतिरिक्त रकमेचे देयक दर्शविण्यात आले. अर्जदाराचे मीटर दि. 10.10.2002 रोजी बदलण्यात आले. त्यावेळी त्याचे अंतिम वाचन हे 4161 असून नवीन मीटरचे वाचन सुरुवातीला 005 असे होते. जुन्या मीटरच्या वाचनानुसार अर्जदारास 4161 वाचनाचे विद्युत देयक देणे आवश्यक होते. परंतु नजरचुकिने अर्जदारास 4670 युनिटचे बिल नोव्हेबरं-02 मध्ये देण्यात आले. अर्जदाराने याबाबत तक्रार करताच रु.9,075.74 चे देयक देण्यात आले. थकित मागणीची तक्रार करण्याची सूचना सहाय्यक अभियंता श्री. खैरकर यांनी अर्जदारास केली. परंतु अर्जदाराने दि. 5.7.2003 पावेतो लेखी तक्रार नोंदविली नाही. करिता तात्पुरती सवलत मागे घेऊन दिनांक 5 डिसेंबर 2002 च्या बिलात जी सवलत देण्यात आली होती ती रद्द करुन पुन्हा सदरची मागणी जुलै-2003 मध्ये करण्यांत आली. अर्जदाराकडून ब-याच कालावधीपर्यंत तक्रार न आल्यामुळे काढण्यांत आलेले जुने मीटर स्टोअरला जमा करण्यात आले. अर्जदाराने ऊर्जा मित्र बैठकीत देखील आपली तक्रार नोंदविली होती व गैरअर्जदार सहाय्यक अभियंता यांनी संयुक्तिक उत्तर देखील दिले होते. करिता अर्जदारास देण्यात आलेले देयक हे अवास्तव असल्याची बाब गैरअर्जदार यांनी अमान्य केली असून वीज वापराबाबत प्राप्त होणारी देयके ग्राहकांनी भरणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले आहे. वीज देयक न भरल्यास अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा अधिकार कायद्याने देखील वीज मंडळास दिला आहे. बिलाच्या हिशोबाबाबतचा वाद चालविण्याचा ग्राहक मंचाला अधिकार नसून याबाबतचा अधिकार वीज नियामक आयोगास देण्यात आलेला आहे व अर्जदाराने आपली तक्रार ही आयोगाकडेच दाखल करणे योग्य असल्याचे कथन आपल्या उत्तरात गैरअर्जदार यांनी केले आहे. विकलेल्या मालात अथवा सेवेत त्रुटी असल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येईल. परंतु विकलेल्या मालाची अथवा सेवेची किंमत किती ध्यावी याबाबतचा अधिकार मात्र ग्राहक मंचाला नाही. करिता अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे.
आपल्या उत्तरापृष्ठयर्थ गैरअर्जदार यांनी सहाय्यक अभियंता जगदीश माणिकराव खैरकर यांचा हलफनामा निशाणी क्रं. 22 अन्वये दाखल केला असून अर्जदाराच्या वैयक्तिक लेजरची प्रत, लेखा तपासणी अहवाल व सहाय्यक अभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांचेशी केलेला पत्रव्यवहार निशाणी क्रं. 24 अन्वये मंचासमोर दाखल केला आहे.
अर्जदाराने निशाणी क्रं. 25 अन्वये प्रतिउत्तर मंचासमोर दाखल केले असून दिनांक 17.11.2003 व 17.02.2004 ची वीज देयके मंचासमोर दाखल केली आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तिवाद मंचाने दिर्घकालपर्यंत ऐकला. आपल्या युक्तिवादात अर्जदाराच्या वकिलांनी अर्जदारास सदरच्या धाब्याव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय नसून सदर धाबा हेच त्याच्या उपजिविकेचे साधन असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तो गैरअर्जदार यांचा ग्राहक ठरतो असे मंचास स्पष्ट केले. अर्जदाराच्या वकिलांनी त्याचा वीज वापर हा नवीन मीटरच्या देयकानुसार देखील 153 युनिटच असल्याचे मंचाच्या निदर्शनास आणून दिले. गैरअर्जदाराच्या विद्यमान वकिलांनी अर्जदाराचा वीज पुरवठा हा सीएल असून त्याने आपल्या तक्रारीत मात्र तो डीएल असल्याचे दाखवून मंचाची दिशाभूल केल्याचे आपल्या युक्तिवादात सांगितले. अर्जदाराच्या सी.पी.एल. (ग्राहकाचे वैयक्तिक लेजर) कडे मंचाचे लक्ष वेधले व सदर लेजरवरील अर्जदाराचा वीज वापर व त्याला देण्यात येणारी देयके ही मंचाच्या निदर्शनास आणून दिली. सदर सी.पी.एल. वरुन अर्जदाराचा वीज वापर हा शंकास्पद असल्याचे गैरअर्जदाराच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केले.
अर्जदार व गैरअर्जदार या उभय पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद, मंचासमोर दाखल केलेली सर्व कागदपत्रे, शपथपत्रे, अर्जदाराचे वैयक्तिक लेजर व गैरअर्जदार यांचा अंतर्गत पत्रव्यवहार या सर्वांचे बारकाईने वाचन केले असता मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
गैरअर्जदार यांनी आपल्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे अर्जदारास दिनांक 18.07.2000 च्या लेखा तपासणी अहवालानुसार रु.4,418/- चे अतिरिक्त वीज देयक अर्जदाराचे मीटर बदलविल्यानंतर गैरअर्जदार यांच्या नजरचुकिमुळे अर्जदारास 4161 ऐवजी 4670 युनिटचे वीज देयक नोव्हेंबर-2002 मध्ये देण्यात आल्याचे सुध्दा दिसून येते. गैरअर्जदार यांच्या लेखा तपासणी अहवालाचे वाचन केले असता लेखा तपासणी अधिका-यांनी अर्जदाराच्या नावासमोर केवळ सस्पेक्टेड असे नमूद करुन त्याला 600 युनिटच्या सरासरीने देयक देण्याची शिफारस केल्याचे दिसून येते. परंतु अर्जदाराने वीज चोरी अथवा वीजेच्या मीटरमध्ये कोणतीही छेडछाड केल्याचे दिसून येत नाही. त्याला देण्यात आलेल्या वीज देयकानुसार सर्व विद्युत देयके अर्जदाराने भरणा केल्यानंतर केवळ सदरची वीज देयके ही कमी युनिटची असल्यामुळे ती त्याला अधिक युनिटची देण्यात यावी व ती त्यानुसार त्याला देण्यात आलेली आहेत. गैरअर्जदार यांची ही कार्यवाही संयुक्तिक व न्यायोचित वाटत नाही. अर्जदार हा त्याला प्राप्त होणारी वाजवी देयके भरण्यास तयार असून केवळ गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे त्याचे वीज देयक अधिक रकमेचे देण्यात आले. किंबहुना सदर थकित मागणीबाबत तक्रार करण्याची सूचना देखील गैरअर्जदारांच्या अधिका-यांनीच करावी व अशाप्रकारे तक्रार न केल्यास ग्राहकांना देण्यात आलेली सवलत मागे घेऊन पुन्हा थकित रकमेची मागणी करावी ही गैरअर्जदार यांची कार्यपध्दतीच चुकिची असल्याचे मंचाच्या निदर्शनास येते. अर्जदाराने त्याला देण्यात आलेल्या थकित वीज देयकाबाबत ऊर्जा मित्र बैठकीत देखील तक्रार केल्याचे गैरअर्जदारांच्या लेखी उत्तरात नमूद असतांना अर्जदाराने दि. 5.7.2003 पावेतो लेखी तक्रार न नोंदविल्यामुळे त्याला देण्यात आलेली सवलत मागे घेण्यात आल्याचे गैरअर्जदाराचे वर्तन निश्चितच निष्काळजीपणाचे असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदारास देण्यांत आलेली वीज देयके ही 50 युनिटपेक्षा कमी असल्यामुळे त्याचे विद्युत मीटर बदलविण्यात आले असे गैरअर्जदाराचे प्रतिपादन असले तरी गैरअर्जदार यांनीच दाखल केलेल्या अर्जदाराच्या वैयक्तिक लेजरवरुन प्रत्यक्षात त्याला 50 युनिटपेक्षा अधिक युनिटचेच वीज देयक प्राप्त होत असल्याचे मंचाचे निदर्शनास येते. किंबहुना अर्जदारास दि. 17.01.2003 व 17.02.2004 या दिनांकाच्या दाखल केलेल्या देयकावरुन त्याचा विद्युत वापर सर्वसाधारणपणे 155 युनिटचा असल्याचे मंचाच्या निदर्शनास येते.
अर्जदारास देण्यात आलेल्या रु.35,290/-च्या देयकाबाबत गैरअर्जदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही व सर्वसामान्य ग्राहक ज्याची उपजिविका धाब्यावर चालणारी आहे अशा ग्राहकांस रु.35,290/- इतक्या अवास्तव रकमेचे देयक केवळ 15 दिवसांच्या कालावधीत भरण्यास सांगणे व अशाप्रकारची मागणी करणे हे अयोग्य असल्याचे मान्य असून देखील केवळ अर्जदाराने तक्रार न केल्यामुळे त्याची सवलत रद्द करणे योग्य नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदाराच्या दाखल केलेल्या सी.पी.एल.वरुन त्याचे मीटर बदलल्यानंतर सदर मीटर वाचनानुसारच गैरअर्जदार यांना वीज देयके प्राप्त करता येतील. त्यापूर्वीच्या कालावधीकरिता कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय थकित रकमेची मागणी करणे हे बेकायदेशीर आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व कारणांकरिता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार यांनी दिनांक 17.05.2003 चे रु.35,290/- चे अर्जदारास दिलेले देयक रद्द करण्यांत यावे.
3 गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या बदलेल्या मीटरच्या मीटर वाचनानुसार सर्व देयके यापुढील कालावधीकरिता पाठवावीत.
4 गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चादाखल रु.500/- एक महिन्याच्या आंत द्यावेत.