निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/06/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 10/06/2013
तक्रार निकाल दिनांकः- 16/11/2013
कालावधी 05 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सौ.सुभद्राबाई भ्र.वसंतराव चिंधे. अर्जदार
वय 65 वर्षे. धंदा.शेती. अॅड.विजयानंद एल.साबळे.
रा. बोरी,ता.जिंतूर जि.परभणी.
तर्फे सर्वअधिकारपत्र
वसंत पि.लक्ष्मणराव चिंधे.
वय 70 वर्षे,धंदा शेती.
रा.बोरी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी. अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड, परभणी.
2 उप कार्यकारी अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.लि.
बोरी ता.जिंतूर जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही वयोवृध्द स्त्री असून नेहमीच आजारी असते, म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यासाठी तीने तीचे पती वसंत चिंधे यांच्या नावे सर्व अधिकारपत्र तयार करुन त्यांच्या वतीने सदरची तक्रार गैरअर्जदारां विरुध्द दाखल करीत आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार ही बोरी येथील रहिवाशी असून गट क्रमांक 71 मधील 2 हेक्टर 76 गुंठेची मालक व ताबेदार आहे. अर्जदाराने तीच्या शेतीसाठी लागणारे पाणी पुरवठ्यासाठी शेतात बोर घेतला व विद्युत पुरवठा मिळणे बाबत गैरअर्जदाराकडे अर्जदाराने रितसर अर्ज केला व गैरअर्जदाराने नियमा प्रमाणे 12/11/2007 रोजी कोटेशनची रक्कम रु.5,751/- व दिनांक 30/12/2007 रोजी 2,000/- रुपयेचा भरणा केला व अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सर्व अटींची पूर्तता केली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांच्या नियमांची पूर्ण पुर्तता करुन देखील अर्जदारास विद्युत पुरवठा दिलेला नाही व विद्युत पुरवठा दिलेला नसतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 30/06/2010 ते 30/09/2010 चे 2,266/- रुपयांचे व 31/12/2010 ते 31/03/2011 चे 2474/- रुपयांचे तसेच 30/06/2011 ते 30/09/2011 चे 4,934/- रुपयांचे आणि 21/10/2011 ते 04/11/2011 चे 1858/- रुपयांचे चुकीचे लाईट बीले दिले, व सेवेत त्रुटी दिली.
गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत पुरवठा दिलेला नसतांना देखील सदरील बिले देवुन अर्जदारास मानसिकत्रास दिला आहे, व गैरअर्जदार सदरची बिल अर्जदारास भरण्यास तगादा लावीत आहे, त्या संदर्भात अर्जदाराने दिनांक 15/06/2011 व 23/05/2011 रोजी गैरअर्जदारांना लेखी तक्रार देवुन सदचे बिले रद्द करण्यात यावे, म्हणून विनंती केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत पुरवठा न देता बिलांची मागणी करुन मानसिक व शारिरीकत्रास दिला आहे व मागील 4 वर्षां पासून विद्युत पुरवठा न मिळाल्याने अर्जदाराच्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे व त्यामुळे अर्जदारास आर्थिक नुकसान ही सहन करावे लागत आहे. शेवटी अर्जदाराने दिनांक 18/10/2012 रोजी अर्जदाराच्या शेतात विद्युत कनेक्शन बसवुन देण्याबाबत गैरअर्जदारास विनंती केली असता, त्यांनी स्पष्टपणे नकार केला, म्हणून सदरची तक्रार दाखल करणेस अर्जदारास भाग पडले. व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात यावे की, दिनांक 12/11/2007 रोजीच्या कोटेशन भरणा केलेला आहे. त्याप्रमाणे अर्जदाराच्या शेतात विद्युत कनेक्शन देण्यात यावे, व तसेच गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, 2007 पासून ते आज पर्यंत विद्युत कनेक्शन न दिल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून गैरअर्जदारांना अर्जदारास 3,00,000/- रु. देण्याचे आदेश व्हावे, व गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले खोटे बिले रद्द करण्यात यावे, अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 12 कागदपत्रांच्या यादीसह 12 कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये 12/07/2007 ची कोटेशन पावती, 18/12/2007 ची कोटेशनची पावती, 19/12/2007 ची पावती, 06/02/2006 चा विज पुरवठा मागणीचा छायांकीत अर्ज, 25/01/2011 चा 7/12 ची नक्कल, 30/09/2010 चे विज बिल, 31/03/2011 चे विज बिल, 30/09/2011 चे विज आकार देयक, 23/05/2011 चे अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले तक्रार अर्ज, 15/06/2011 चे अर्जदाराने दिलेले तक्रार अर्ज, 16/07/2011 चे सर्व अधिकारपत्र, 03/06/2013 चे पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्यावर, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी जबाब दाखल करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब न दाखल केल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द विना जबाबाचा आदेश पारीत करण्यात आला,
अर्जदाराच्या तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराने दिनांक 12/11/2007 व 30/12/2007 रोजी
कृषी पंपासाठी विज जोडणीसाठी गैरअर्जदारांकडे कोटेशन
भरुन देखील गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत कनेक्शन
न देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक 542070530438 अन्वये
दिनांक 30/06/2010 ते 30/09/2011पर्यंत चुकीचे विद्युत
बिले देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विद्युत कनेक्शन मिळणेसाठी दिनांक 12/11/2007 रोजी 5,751/- रु. व 30/12/2007 रोजी 2,000/- रु. गैरअर्जदाराकडे भरले होते, ही बाब नि.क्रमांक 4/1, 4/2 व 4/3 वरील पावती वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विज पुरवठा मिळणेसाठी 08/02/2006 रोजी अर्ज केला होता ही बाब 4/4 वरील कागदपत्रावरुन दिसून येते, अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करण्यासाठी तीच्या पतीच्या हक्कात सर्व अधिकारपत्र लिहून दिले होते ही बाब नि.क्रमांक 4/11 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, अर्जदारास मौजे बोरी येथे गट क्रमांक 71 मध्ये शेती आहे, ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन दिसून येते तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 30/06/2010 ते 30/09/2010 पर्यंतचे 1170 युनीटचे 2266 रुपये तसेच दिनांक 31/12/2010 ते 31/03/2011 पर्यंतचे 2474 रुपयांचे तसेच 30/06/2011 ते 30/09/2011 पर्यंतचे 4,934/- रुपयांचे विद्युत बिल दिले होते, ही बाब नि.क्रमांक 4/5, 4/6 व 4/7 वरील कागदपत्रावरुन दिसून येते अर्जदारास गैरअर्जदाराने त्याने भरलेल्या कोटेशन प्रमाणे अर्जदारास विद्युत पुरवठा दिला होता हे कोठेही दिसून येते नाही. व त्या बद्दलचा पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही व तसेच गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा न देता सदरील चुकीची बिले दिली होती हे सिध्द होते.अर्जदाराचे म्हणणे की, कोटेशनची रक्कम भरुन देखील गैरअर्जदाराने विज पुरवठा दिला नाही, त्यामुळे अर्जदाराचे रु.3,00,000/- चे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण त्याबद्दल अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही, म्हणून तो नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही. निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदारास कोटेशन प्रमाणे विद्युत पुरवठा न देवुन व सदरील चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिली आहे व सदरील बिले हे रद्द होणे योग्य
आहे. असे मंचास वाटते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास मौजे बोरी येथील तीच्या शेतीमध्ये गट क्रमांक 71
मध्ये दिनांक 12/11/2007 व 30/12/2007 रोजीच्या भरलेल्या कोटेशनच्या
पावत्या प्रमाणे अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत विद्युत
कनेक्शन द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक क्रमांक 542070530438 अन्वये दिनांक
30/06/2010 ते 30/09/2010, 31/12/2010 ते 31/03/2011 व 30/06/2011
ते 30/09/2011 रोजी दिलेले सर्व विद्युत बिले रद्द करण्यात येत आहे.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.