(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 30 सप्टेंबर 2013)
अर्जदार पुंडलिक अर्जुन मेश्राम यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. अर्जदार पुंडलिक अर्जुन मेश्राम यांची संक्षिप्त तक्रार अशी कि,
अर्जदार हा पेरमिली येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला असून त्याचा मीटर क्र. डी एल-190 आणि ग्राहक क्र. 506220181937 हा आहे. अर्जदार सदर मीटरच्या विज वापराप्रमाणे विज देयक नियमित भरीत असून अखेरचे विज देयक रुपये 210/- सप्टेंबर 2010 मध्ये भरले आहे.
2. अर्जदाराच्या घराच्या जागेबाबत ग्रामपंचायत पेरमिली सोबत वाद सुरु होता. दि.22 ऑक्टोंबर 2010 रोजी ग्रामपंचायत पेरमिली यांनी अर्जदाराच्या मालकीच्या घराचे अर्ध्या भागाचे कंपाऊंड वॉलचे अतिक्रमण काढून टाकले. यातील लाईनमन गैरअर्जदार क्र.3 सुरेश मुनेश्वर यांचे सांगण्यावरुन त्याचा मुलगा राहूल मुनेश्वर यांनी अर्जदारास कोणतीही पूर्व सुचना न देता अर्जदाराच्या घरातील वरील मीटर त्याचे अनुपस्थितीत काढून घेऊन गेले व विद्युत पुरवठा बंद केला. त्यावेळी अर्जदार गडचिरोली येथे त्याचे वडिलाची प्रकृती ठिक नसल्यामुळे राहत होता. अर्जदाराच्या भावाकडून त्यास माहिती मिळाल्यानंतर त्याने पेरमिली येथे जावून चौकशी केली, त्यावेळी गैरअर्जदार क्र.3 यांनी त्याने सांगितले की, तुम्हीं नोव्हेंबर 2010 चे बिल रुपये 180/- दि.25.12.2010 चा भरणा केल्यास लाईन चालू करुन देतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यास बिलाची रक्कम रुपये 180/- दिली, परंतु त्याने आतापर्यंत मीटर आणून लावून दिला नाही आणि विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु केलेला नाही.
3. अर्जदाराने सदर घटनेची तक्रार दि.27.11.2010 रोजी आणि 9.12.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे केली, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अर्जदाराच्या घरी विद्युत मीटर नसतांना देखील गैरअर्जदार क्र.1 व 2 हे त्यास विद्युत मीटरचे बिल पाठवीत आहेत. अर्जदाराकडे विद्युत बिलाची कोणतीही रक्कम थकीत नसतांना विद्युत मीटर काढून नेणे आणि विनंती करुनही ते पुर्ववत लावून न देणे आणि विद्युत पुरवठा सुरु न करणे ही गैरअर्जदाराची विद्युत ग्राहकापोटी सेवेत न्युनता आहे.
4. गैरअर्जदाराने बेकायदेशिरपणे विद्युत पुरवठा बंद केला व विज मीटर काढून नेले त्यामुळे अर्जदारास त्याच्या प्रेसच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. तसेच शारिरीक व मानसिक ञास झाला म्हणून त्यापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळावी आणि विद्युत मीटर व विज वापर चालू नसतांना गैरअर्जदारांनी त्यास दिलेले विद्युत बिल रुपये 1330/- रद्द करावे आणि विज मीटर अर्जदाराच्या घरी पुर्ववत लावून द्यावे व विज पुरवठा सुरु करावा, असा गैरअर्जदारांविरुध्द आदेश होण्याची मागणी केली आहे.
5. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी नि.क्र.16 प्रमाणे लेखी बयाण दाखल केला असून, अर्जदाराची मागणी फेटाळली आहे. त्याचे म्हणणे असे की, सदरचे विद्युत मीटर ज्या ठिकाणी लावले होते ती जागा अतिक्रमीत ठरवून बांधकाम पाडण्याचे ग्रामपंचायत पेरमिली यांनी ठरविले आणि त्याप्रमाणे तेथील विज पुरवठा बंद करण्याबाबत गैरअर्जदारास कळविले. अतिक्रमीत बांधकाम ग्रामपंचायत कडून पाडण्यात आल्यावर तेथे विज मीटर ठेवले असते तर त्यामुळे जिवीत व वित्त हानी होण्याची संभावना होती, त्यामुळे अर्जदाराला दिलेले विद्युत मीटर काढणे भाग पडले. अर्जदाराने माहे नोव्हेंबर 2010 च्या विज बिलाचा भरणा केला नाही, तसेच दुस-या ठिकाणी विज मीटर लावून पाहिजे असल्यास आवश्यक दस्ताऐवजासह अर्ज केला नाही. त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदाराकडून विज पुरवठा देणे शक्य नव्हते.
6. अर्जदाराने 45 युनीटच्या विज वापराचे माहे ऑगष्ट व सप्टेंबरचे बिल रुपये 210/- दि.30.10.2010 रोजी भरलेले आहे. त्यानंतरच्या विज वापराबाबत गैरअर्जदाराकडे रुपये 150/- ऐवढी थकीत बिलाची रक्कम आहे. त्याबाबत सुधारीत बिलाची प्रत जोडली आहे.
7. ग्रामपंचायत पेरमिली यांनी दुय्यम अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण केंन्द्र भामरागड यांनी पञ क्र.6/2010 दि.18.10.2010 अन्वये कळविले की, शालेय जमिनीवर पुंडलिक मेश्राम याचे असलेले अतिक्रमण काढण्याचे ठरविले आहे, तरी दि.18.10.2010 रोजी त्या जागेवरील विद्युत पुरवठा बंद करावा. अर्जदारातर्फे अनिल मेश्राम यांनी सहाय्यक अभियंता तत्कालीन उपविभाग एटापल्ली यांचे मार्फत वितरण केंद्र भामरागड यांना पञ देवून कळविले की, अर्जदाराचे नावावर असलेले विज मिटर सदर जागेवरील अतिक्रमण काढले असल्यामुळे विज पुरवठा बंद करावा. उप विभागीय अधिकारी यांनी तहसिलदार अहेरी यांना पाठविलेले पञ क्र.150/2008 दि.25.2.2008 तहसिलदार अहेरी यांनी सरपंच ग्रामपंचायत पेरमिली यांना पाठविलेले पञ क्र.979/2007 दि.19.7.2008 आणि अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन पेरमिली यांनी दुय्यम अभियंता भामरागड यांना दिलेले पञ गैरअर्जदारानी लेखी बयाणासोबत दाखल केलेले आहेत. तसेच, शाळेच्या जमिनी बाबतचा सात-बाराचा उतारा दाखल केला आहे. अर्जदार पुंडलिक मेश्राम याचे तर्फे अनिल मेश्राम यांनी शाळा व्यवस्थापन समिती यांना दिलेले बयाण देखील लेखी बयाणासोबत दाखल केले आहे. वरील सर्व दस्तावरुन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पेरमिली यांनी शाळेच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटावावयाचे होते व त्यासाठी त्याने उप विभागीय अधिकारी यांचे आणि तहसिलदार यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस मदत घेऊन अतिक्रमण हटविले व अतिक्रमीत जागेवर असलेल्या विद्युत मीटरचा विद्युत पुरवठा बंद करण्यास गैरअर्जदारांना विनंती केल्यामुळे सदर जागेवरील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला व सुरक्षेचा उपाय म्हणून सदर जागेवरील विद्युत मीटर काढण्यात आला, यात गैरअर्जदाराचा कोणताही दोष नाही किंवा त्यांनी ग्राहका प्रती सेवेत ञुटीपूर्ण व्यवहार केलेला नाही.
8. नोव्हेंबर 2010 मध्ये अर्जदाराने रुपये 180/- चे विज बिल भरल्याचे गैरअर्जदाराने नाकबूल केले आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदारास त्याच्या मालकीच्या जागेत विद्युत पुरवठा पाहिजे असल्यास त्याने आधीच्या ग्राहक क्रमांकावरील थकीत रक्कम भरुन विद्युत पुरवठा खंडीत केल्याच्या तारखेपासून 6 महिन्या पेक्षा अधिक काळ झाला असल्यामुळे विहीत नमुन्यात अर्ज करुन जागेच्या मालकीचा हक्का बाबत पुरावा जोडल्यास त्याला नवीन विद्युत जोडणी मंजूर करण्यास आणि विज मीटर देण्यास गैरअर्जदार तयार आहे. अर्जदाराने अतिक्रमण केलेल्या जागेवर विज पुरवठा घेतला होता, परंतु आता ते अतिक्रमण हटविल्यामुळे त्या अतिक्रमीत जागेवर मालकाच्या संमतीशिवाय किंवा अर्जदाराने स्वतःच्या मालकीच्या जागेत विज पुरवठा देण्याची मागणी केल्याशिवाय अर्जदारास विज पुरवठा करणे नियमाप्रमाणे शक्य नाही. अर्जदाराचा अर्ज चुकीच्या व खोट्या बाबींवर आधारलेला असल्याने खर्चासह खारीज करावा अशी विनंती केली आहे.
9. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर कथनावरुन खालील मुद्दे मंचापुढे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, मंचाने निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणे मिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) गैरअर्जदाराने विद्युत ग्राहक म्हणून अर्जदारास : नाही.
द्यावयायाच्या सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला
आहे काय ?
2) अर्जदार मागणी प्रमाणे नुकसान भरपाई : नाही.
तसचे विद्युत पुरवठा व विद्युत मीटरच्या
पुर्नःस्थापनेसाठी पाञ आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
तक्रार अर्ज खारीज.
- कारण मिमांसा -
10. सदरच्या प्रकरणात आपल्या तक्रारीच्या पृष्ठ्यर्थ अर्जदार पुंडलिक अर्जुन मेश्राम यांनी त्याचा पुरावा शपथपञ नि.क्र.21 प्रमाणे दिला आहे. तसेच दस्तऐवजाची यादी नि.क्र.3 सोबत एकूण 9 दस्ताऐवज दाखल केले असून, नि.क्र.25 सोबत 1 दस्ताऐवज दाखल केला आहे आणि नि.क्र.26 प्रमाणे लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. गैरअर्जदाराने शपथेवर लेखी बयाण दाखल केला आहे आणि त्यासोबत यादी नि.क्र.17 प्रमाणे एकूण 9 दस्ताऐवज दाखल केले आहे. सदर लेखी बयाण आणि दाखल केलेले दस्ताऐवज हेच त्याचा युक्तिवाद समजावा अशी पुरसीस गैरअर्जदाराने नि.क्र.23 प्रमाणे सादर केले आहे.
11. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत :- सदरच्या प्रकरणात अर्जदार पुंडलिक अर्जुन मेश्राम याने गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचेकडून विद्युत मीटर क्र. डीएल 190 मीटर ग्राहक क्र.5062220181937 अन्वये घरगुती वापरासाठी त्याच्या पेरमिली, तालुका – अहेरी, जिल्हा - गडचिरोली येथील घरी विद्युत पुरवठा मंजुर करण्यात आला होता, याबाबत उभय पक्षात वाद नाही. तसेच अर्जदाराने माहे सप्टेंबर 2010 चे विज बिल रुपये 210/- चा भरणा केला याबाबत देखील वाद नाही. सदर भरणा केलेले बिल अर्जदाराने दस्ताऐवज यादी नि.क्र.3 सोबत दस्त क्र.अ-3 वर दाखल केले आहे.
12. अर्जदाराचे म्हणणे असे की, त्यांनी माहे नोव्हेंबर 2010 चे विज बिल रुपये 180/- चा भरणा गैरअर्जदार क्र.3 लाईनमन सुरेश मुनेश्वर यांचेकडे परस्पर केला होता. सदर बिलाची झेरॉक्स प्रत दस्त क्र.अ-4 वर आहे. गैरअर्जदाराने सदरच्या बिलाची रक्कम, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 सुरेश मुनेश्वर यांचेकडे दिली व ती त्याने स्विकारली हे नाकबूल केले आहे. विज बिलाची रक्कम स्विकारण्यासाठी विज वितरण कंपनीने स्विकृती केंद्र नेमले असून लाईनमन अगर अन्य कर्मचा-याने रोखीने स्वतः रक्कम स्विकारण्याचा अधिकार नाही म्हणून कोणत्याही पावती अभावी अर्जदाराने बिलाची रक्कम रुपये 180/- गैरअर्जदार क्र.3 कडे दिले व ती त्याने स्विकारली हे अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही.
13. अर्जदाराचे म्हणणे असे की, ग्रामपंचायत पेरमिली यांनी घराच्या जागेवरुन वाद असल्याने ग्रामपंचायतकडून त्याचे अतिक्रमण दि.22 ऑक्टोंबर 2010 रोजी काढण्यात आले. त्यावेळी अर्जदारास कोणतीही पूर्व सचुना न देता त्याचे घरातील वरील विद्युत मीटर गैरअर्जदार क्र.3 सुरेश मुनेश्वर याचा मुलगा राहूल याने काढून घेऊन गेला व विज पुरवठा बंद केला. सदर विज मीटर गैरअर्जदार क्र.3 चा मुलगा राहूल यांनी काढून नेला किंवा त्याने विज पुरवठा बंद केला, ही बाब गैरअर्जदाराने नाकारली आहे. गैरअर्जदार क्र.3 चा मुलगा राहूल यांनी विद्युत मीटर काढून नेले व विज पुरवठा बंद केला याबाबत कोणताही स्वतंञ पुरावा नसल्याने प्रत्यक्ष मिटर काढण्याचे वेळी मोक्यावर हजर नसलेल्या अर्जदाराच्या तोंडी पुराव्यावर विश्वास ठेवून गैरअर्जदाराच्या मुलाने विद्युत मीटर काढून नेले व विद्युत पुरवठा बंद केला यावर विश्वास ठेवता येणार नाही.
14. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने ग्रामपंचायत पेरमिली शाळेच्या जागेवर अतिक्रमण करुन घराचे बांधकाम केले होते व त्या जागेवर गैरअर्जदाराची दिशाभुल करुन विद्युत मीटर घेतला होता. ग्रामपंचायात पेरमिली यांनी सदर अतिक्रमण हटविण्याबाबत उप विभागीय अधिकारी अहेरी यांचेकडे निवेदन दिले असता, सदर प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी उप-विभागीय अधिकारी यांनी तहसिलदार अहेरी यांना दि.25.2.2008 रोजी पञ पाठविले आणि त्याची प्रत मुख्याध्यापक जिल्हा प्राथमिक शाळा पेरमिली यांना पाठविली. सदरच्या पञाची प्रत गैरअर्जदाराने यादी नि.क्र.17 सोबत दस्त ब-3 वर दाखल केली आहे.
15. सदर पञ मिळाल्यानंतर तहसिलदार अहेरी यांनी सरपंच ग्रामपंचायत पेरमिली यांना दि.29 जुलै 2008 रोजी पञ पाठवून ग्रामपंचायत अधिनियमाखाली अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी असे कळविले व त्याची प्रत मुख्याध्यापक जिल्हा प्राथमिक शाळा पेरमिली यांना दिली. सदर पञ ब-4 वर आहे. सदर पञ प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेरमिली यांनी उप-अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सब-डिव्हीजन भामरागड यांना पञ देवून ग्रामपंचायत कडून पुंडलिक मेश्राम यांचे शाळेच्या जागेवरील अतिक्रमण दि.22.10.2010 ला काढण्यात येणार आहे, करीता दि.18.10.2010 ला अतिक्रमीत जागेवरील विद्युत पुरवठा बंद करुन द्यावा असे कळविले. सदर पञाची प्रत ब-3 वर आहे. सदर अतिक्रमण काढल्यानंतर अध्यक्ष, शाळा समिती यांनी ठाणेदार उप-पोलीस स्टेशन पेरमिली यांना कळविले कि, दि.21.10.2010 रोजी त्यांचे मार्गदर्शनाखाली गावक-यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. सदर पञाची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली, उप-विभागीय अधिकारी अहेरी आणि तहसिलदार अहेरी यांना पाठविण्यात आली आहे. सदर पञाची प्रत गैरअर्जदाराने दस्त क्र.ब-2 वर दाखल केली आहे. सरपंच ग्रामपंचायत पेरमिली यांनी उप-अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भामरागड यांनी पञ देवून 22.10.2010 रोजी पुंडलिक मेश्राम यांचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे, करीता दि.18.10.2010 ला अतिक्रमीत जागेवरील विद्युत पुरवठा बंद करुन देण्यात यावा असे कळविले. सदर पञाची प्रत दस्त क्र.ब-1 वर आहे. भूमापन क्र.211 मौजा – पेरमिली, तहसिल अहेरी क्षेञफळ 0.15 हे.आर. 7/12 चा उतारा दस्त क्र.ब-7 वर दाखल असून भोगवटदाराचे नांव ‘‘सरकार शाळा ’’ असे नमूद आहे. अतिक्रमण काढतांना अर्जदाराचे घरी हजर असलेला अनिल मेश्राम याने मोक्यावर दिलेले बयाण दस्त क्र.ब-5 वर आहे. त्यात पुंडलिक मेश्राम तर्फे अनिल मेश्राम यांनी असे लिहून दिले कि, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेरमिली यांचे मालकीच्या जागेवर (प.ह.नं.10, भूमापन क्र.211) अतिक्रमण करुन 2 कुडाचे घर बांधले होते ते आज दि.22.10.2010 ला शाळा ईमारत बांधकामाकरीता मी केलेले अतिक्रमण काढून देत आहे. सदर अतिक्रमण काढतांना माझे असलेले संपूर्ण साहित्य कवेलू, भांडे, फाटे इतर जिवनाश्यक वस्तू मला सुरक्षीत मिळाले. सदर अनिल मेश्राम यांनी अभियंता, विद्युत वितरण कंपनी एटापल्ली यांना विज पुरवठा बंद करण्याबाबत पुंडलिक मेश्राम यांचे तर्फे विनंती केली होती. सदरचे पञ दस्त क्र.ब-5 वर आहे.
16. वरील सर्व दस्तऐवजाचा विचार करता गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी त्यांना प्राप्त झालेल्या शाळा समितीच्या अध्यक्षाच्या विनंती वरुन शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यास सुविधा व्हावी म्हणून अर्जदाराच्या मीटरचा विद्युत पुरवठा बंद केला असून, सदर जागेवरील अतिक्रमण हटविल्यावर उघड्यावर असलेल्या मीटरमुळे संभाव्य हाणी टाळण्यासाठी मीटर काढून नेला आहे. सदरचा मीटर ही विद्युत कंपनीची मालमत्ता आहे हे याठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी उपविभागीय अधिकारी तसेच, तहसिलदार यांचे निर्देशावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती आणि त्यासाठी विद्युत पुरवठा बंद करणे अनिवार्य होते, म्हणून विद्युत पुरवठा बंद करण्याची आणि विद्युत मीटर हटविण्याची कृती ही अतिक्रमण करुन घराचे बांधकाम केलेल्या जागेवर विज वापर करणा-या ग्राहकाप्रती सेवेतील ञृटी ठरु शकत नाही.
17. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने दि.22 ऑक्टोंबर 2010 रोजी अर्जदाराची विज पुरवठा बंद केला आणि विद्युत मीटर काढून कार्यालयात नेले ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. त्यामुळे त्या दिवसानंतर अर्जदाराने कोणताही विद्युत वापर केलेला नाही. माञ अर्जदाराच्या नावाने विद्युत मीटर चालू राहिल्याने पुढील विज बिल गैरअर्जदार देतच राहीले आणि अर्जदाराने त्या बिलाचा भरणा केला नाही म्हणून थकबाकीसह माहे नोव्हेंबर 2011 चे बिल रुपये 1330/- दिले आहे. सदरचे विद्युत बिल दस्त क्र.अ-5 ते अ-9 वर दाखल आहे. सदर बिलापैकी माहे नोव्हेंबर 2010 ते बिल रुपये 180/- भरल्याबाबत अर्जदाराने कोणताही विधिग्राह्य पुरावा सादर केला नसल्याने केवळ त्या रक्कमे पर्यंत विज वापराचे बिल मागण्याचा गैरअर्जदारांना अधिकार असून सदर बिल देण्यास अर्जदार जबाबदार आहे. परंतु, सदर बिल हे बिलींगच्यावेळी मीटर उपलब्ध नसल्याने 34 युनीट विज वापर दर्शवून दिले आहे. गैरअर्जदाराने प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणे 33 युनीटचे बिल रुपये 150/- तयार करुन या प्रकरणात सादर केले आहे, ते दस्त ब-9 वर आहे. म्हणून वरील रुपये 180/- च्या ऐवजी प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणे 33 युनीट विज वापराचा बिल रुपये 150/- वसूल करण्याचा गैरअर्जदारास अधिकार असून ते देण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे. उर्वरीत बिल गैरअर्जदाराने स्वतः सोडून दिल्याने ते देण्याची जबाबदारी अर्जदाराची नाही, म्हणून ते रद्द करण्यासही काही शिल्लक राहिले नाही.
18. गैरअर्जदाराने आपल्या लेखी बयाणात असे नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी अर्जदाराचे जुने मीटर होते ती सरकारी जागा असून त्यावर अतिक्रमण करुन बांधकाम केले होते. शाळा समिती व ग्रामपंचायत व गावक-यांनी उप-विभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अर्जदाराने सरपंच ग्रामपंचायत पेरमिली यांचेविरुध्द दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, गडचिरोली यांचे न्यायालयात निरंतर मनाई हुकुमाबाबत दिवाणी दावा क्र.9/12 दाखल केला होता. परंतु, त्यात या प्रकरणातील गैरअर्जदारांना पार्टी केले नव्हते म्हणून त्या प्रकरणातील निर्णय गैरअर्जदारांना लागू होणार नाही. अर्जदारास जर अतिक्रमीत जागेत विद्युत पुरवठा हवा असेल तर त्याने जमीन मालकाचे नाहरकत प्रमाणपञ सादर करावे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेत विद्युत पुरवठा हवा असेल तर मालकी हक्काचा पुराव्यासह नवीन अर्ज करावा आणि थकीत असलेले विज बिल रुपये 150/- भरणा करावा म्हणजे गैरअर्जदार अर्जदारास विज पुरवठा आणि विज मीटर उपलब्ध करुन देतील हे गैरअर्जदाराचे म्हणणे अवाजवी किंवा बेकायदेशिर आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून गैरअर्जदाराने कोणतीही बेकायदेशिर कृती केली नसल्याने ते अर्जदारास मागणी प्रमाणे नुकसान भरपाई रुपये 50,000/- , या तक्रारीचा खर्च किंवा अर्जदाराने आवश्यक बाबीची पुर्तता न करता त्यास विद्युत पुरवठा व विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यास जाबाबदार नाहीत. म्हणून मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यांत येत आहे.
(2) अर्जदाराने गैरअर्जदारास या प्रकरणाच्या खर्चाबाबत रुपये 1000/- आदेशाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आंत द्यावे.
(3) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य द्यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/9/2013