जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/18 प्रकरण दाखल तारीख - 16/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 05/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्रीधरराव शामराव कदम, वय वर्षे , धंदा शेती, अर्जदार. रा. तुप्पा ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार. म.रा.वि.वि.कंपनी, विद्युत भवन, नविन मोंढा,नांदेड. 2. कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी, कार्या. वाघाळेकर पेट्रोलपंपा जवळ, देगलूर रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.डी.तुप्तेवार. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार विद्युत वितरण कंपनी अर्जदाराच्या शेतातील ऊस जळाल्यामुळे झालेली नुकसानीबद्यल रु.1,25,000/- न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे. ते आपल्या तक्रारीत म्हणतात अर्जदाराची जमीन गट क्र. 319 क्षेत्रफळ 60 आर तुप्पा येथे विद्युत मिटरची डी.पी. आहे. अर्जदाराचा भाऊ गणेश कदम यांनी गैरअर्जदाराकडुन विद्युत पुरवठा केलेला असुन त्याचे मिटर, गट क्र.345 मध्ये आहे व त्याचा वापर बोअरसाठी करण्यात येतो. दि.15/01/2009 रोजी दुपारी 3.00 वाजता शेतातील डी.पी.मधील विद्युत तारामधे स्पार्क होऊन आग लागली व अर्जदाराचे 60 आर मधील ऊस जळुन खाक झाला. गैरअर्जदार यांना दि.05/10/2009 सुचीत केले त्याची नुकसान भरपाई दिली नाही म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, नुकसानीची रक्कम तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व त्यावर व्याज मिळण्याचे हुकूम व्हावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या आपले लेखी म्हणणे दिले अर्जदाराने काल्पनिक मुद्यावर अवास्तव रक्कमेची मागणी मिळण्यासाठी कार्यवाही केली आहे, त्यांचा आक्षेप आहे की, अर्जदार हे गैरअर्जदार कंपनीचे ग्राहकच नाही कारण त्यांनी त्यांना विद्युत पुरवठा दिलेला नाही त्यामुळे अर्जदारांना हे प्रकरण दाखल करता येत नाही. अर्जदाराचे म्हणणे तो स्वतः भावासोबत एकत्रित कुटूंबात राहतात, ही बाब खोटी आहे. अर्जदाराच्या शेतात विद्युत खांब व डी.पी.बसविण्यात आले आहे व त्यावर नविन जोडणी देण्यात आली ही बाब चुकीची आहे. लोड वाढत असल्या संबंधी अर्जदार यांच्याशी संबंध केला नाही. गैरअर्जदाराचे असाही आक्षेप आहे की, त्यांच्या शेतात ऊस होते ही बाब खोटी आहे. दि.15/01/2009 रोजी स्पार्क होऊन ऊसपेट घेतला, पुर्ण ऊस जळाले ही बाब खोटी आहे. पोलिस पंचनामासाठी गैरअर्जदारांना सुचीत केले नाही व त्यांच्या समोर पंचनामा करण्यात आला नाही. सदर ठिकाणी गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली असता, तेथे वाहीनी योग्य होते ताराबाबत तक्रार आली नाही. फिडर ट्रीप झाले नव्हते तसेच विद्युत संच मांडणीमध्ये दोष नव्हता. अर्जदार स्वतःचे नुकसान झाल्याचे जे म्हणतात त्या कालावधीमध्ये शेतातील ऊस विकुन त्याची रक्कम वसुल केलेली आहे व जळालेले ऊस देखील कारखाना विकत घेते. सबब अर्जदाराची तक्रार खोटी असुन ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईन तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक होतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जात स्पष्ट म्हटलेले आहे की, त्यांचे शेत हे गट नंबर 319 तुप्पा येथे आहे व त्यांचे भावाचे शेत गट क्र.345 मध्ये आहे म्हणजे त्यांच्या शेतापासुन ब-याच अंतरावर आहे. यात अर्जदाराचा भाऊ गैरअर्जदाराकडुन विद्युत पुरवठा घेतला होता व मिटरही त्यांचेच शेतात होते. बोअर देखील त्यांच्याच शेतात होते, असे असेल तर जेंव्हा अर्जदाराच्या नांवाने विद्युत पुरवठा नाही तेंव्हा अर्जदार हे ग्राहकच होऊ शकणार नाही. अर्जदार हे स्वतः ग्राहक राहीले असते तर त्यांच्या ऊसाला आग लागली असते तर ग्राहक या नात्याने गैरअर्जदारांना काय काळजी घ्यायची या मुद्याखाली नुकसान भरपाई मागीतले असते व अर्जदार हे ग्राहकच नाही तेंव्हा नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई मागता येणार नाही फक्त हिंदु एकत्रित कुटूंब याचा आधार घेत ते लाभार्थी आहेत कारण कुटुंबासाठी विद्युत पुरवठा असा उजर घेतला आहे परंतु अर्जदाराने दाखल केलेला 7/12 पाहीले असता, हे स्पष्ट दिसुन येते की,श्रीधर कदम यांच्या नांवाने 0.33 हेक्टर जमीन आहे व त्यांचा भाऊ गणेश कदम यांच्या नांवाने 0.53 हेक्टर जमीन आहे जेंव्हा प्रत्येकाच्या नांवाने शेत जमीन वेगवेगळी आहे याचा अर्थ असा की, वाटणी होऊन प्रत्येकाला वेगवेगळा भाग आलेला आहे याची नोंद 7/12 वर आली आहे म्हणुन एकत्रित हिंदू कुटूंबाचा लाभ अर्जदारांना मिळणार नाही. अर्जदार दाखल केलेले कागदापत्र पाहीले असता, दि.16/01/2009 रोजी गणेश कदम यांनी त्यांच्या शेतातील ऊसास आग लागली असा पोलिस निरीक्षक यांना अर्ज दिला आहे. यात घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे यात श्रीधर कदम यांचे जळालेल्या ऊसाचे शेत गट क्र.319 असा उल्लेख आहे. अर्ज देणार एक ऊस जळाले दुस-या भावाचे शेतातील त्यामुळे हे स्पष्ट होते की, अर्जदार हे ग्राहकच होऊ शकत नाही. म्हणुन त्यांना नुकसान भरपाई मागता येणार नाही सबब या प्राथमीक मुद्यावर व सखोल चौकशीत न जाता अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |