(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने इंटरनेट कॅफे या व्यवसायासाठी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून दि.08.10.2008 रोजी तीन एक्साईड बॅटरीज खरेदी केल्या होत्या. त्याने चांगल्या कंपनीचे इनव्हर्टर वापरुनही वीज पुरवठा नसताना सदर एक्साईड बॅटरीज गैरअर्जदार क्र.3 ने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित काम करीत नाहीत आणि साडेतीन ते चार तासापर्यंत बॅकअप देत नाहीत. म्हणून त्याने गैरअर्जदार क्र.3 ला बॅटरीज बदलून देण्याबाबत कळवले, परंतू त्यांनी बॅटरीज बदलून देण्यास नकार दिला. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली, म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून बॅटरीज बदलून मिळाव्यात आणि व्यवसायाचे झालेले नुकसान आर्थिक व मानसिक त्रासासह मिळावे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने खरेदी केलेल्या बॅटरीज व्यवस्थित काम करीत आहेत. तक्रारदाराने बॅटरीज सोबत कोणत्या कंपनीचे इनव्हर्टर वापरले याचा उल्लेख केलेला नाही. इनव्हर्टर चांगल्या कंपनीचे चांगल्या कंपनीचे नसेल तर, बॅकअप कमी मिळतो. बॅटरीजचा बॅकअप हा त्यावर वापरत असलेल्या लोडवर अवलंबून असतो. तक्रारदाराचा इंटरनेट कॅफेचा व्यवसाय असून, तेथे किती कॉम्प्युटर, प्रिंटर आणि इतर विद्युत उपकरणे बॅटरीजला जोडलेली आहेत याचा उल्लेख केलेला नाही. तक्रारदाराने बॅटरीजमध्ये दोष असल्याचे नमूद केलेले नाही म्हणून त्यास बॅटरीज बदलून देता येत नाहीत. गैरअर्जदारांनी तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही, म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.3 हे मंचात हजर झाले परंतू त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द ‘नो से’ चा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदार आणि गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या वतीने युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 गैरहजर. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून खरेदी केलेल्या एक्साईड बॅटरीज साडेतीन ते चार तासापर्यंत बॅकअप देऊ शकत नाहीत, या तक्रारदाराच्या म्हणण्यामधे (3) त.क्र.722/09 कोणतेही तथ्य नाही. वास्तविक गैरअर्जदार क्र.3 कडून खरेदी केलेल्या बॅटरीज वीज पुरवठा नसताना साडेतीन ते चार तास बॅकअप देऊ शकतील अशा प्रकारचे आश्वासन गैरअर्जदार क्र.3 ने दिल्याचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वीज पुरवठा नसताना कॉम्प्युटर, प्रिंटर आणि इतर विद्युत उपकरणे चालू ठेवण्यासाठी केवळ बॅटरीज उपयुक्त ठरत नाहीत, तर त्यासाठी चांगल्या इनव्हर्टरची सुध्दा आवश्यकता असते. परंतू तक्रारदाराने सदर बॅटरीजवर किती कॉम्प्युटर, प्रिंटर आणि विद्युत उपकरणे वापरण्यात येतात याचा कोणतही पुरावा दिलेला नाही. तसेच तक्रारदाराने बॅटरीज सोबत चांगल्या कंपनीचा इनव्हर्टर वापरला आहे असे म्हटले आहे परंतू त्याने कोणत्या कंपनीचा इनव्हर्टर वापरला आहे याचाही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने बॅटरीजच्या बॅकअप बाबत आरोप केला असून साधारणपणे बॅटरीज खरेदी केल्यानंतर 11 महिने बॅटरीज वापरल्यानंतर त्यांच्या बॅकअप बाबत आक्षेप घेतला, यावरुन तक्रारदाराच्या म्हणण्यामधे तथ्य नसल्याचे दिसून येते. कारण तक्रारदाराचा इंटरनेट कॅफेचा व्यवसाय असून बॅटरीजच्या अतिवापरामुळे देखील 11 महिन्याच्या वापरानंतर बॅटरीजच्या बॅकअपवर निश्चितपणे परिणाम होतो. बॅटरीजचा बॅकअप टिकवून ठेवण्यासाठी बॅटरीजची नियमित तपासणी करुन योग्य काळजी घेतल्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या पुराव्यावरुन गैरअर्जदारांकडून घेतलेल्या बॅटरीजमधे दोष असल्याचे सिध्द होत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते 2) तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |