जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/82 प्रकरण दाखल तारीख - 10/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 27/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या 1. नरेंद्र पि.उकंडीजी काळबांडे, अर्जदार. वय वर्षे 50 धंदा अधिव्याख्याता, रा.पौर्णिमानगर,नांदेड. 2. सौ.छाया भ्र.नरेंद्र काळबांडे, वर्षे 42, धंदा घरकाम, पौर्णिमानगर,नांदेड. विरुध्द 1. कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं, विद्युतभवन, नविन मोंढा,नांदेड. 2. कनिष्ठ अभियंता,महाराष्ट्र राज्य विज वितरण कं, कार्यालय आनंदनगर,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - डी.के.हांडे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - व्हि.व्हि.नांदेडकर.. निकालपत्र (मार्फत - मा.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,अर्जदार हे मागील 1985 पासुन पौर्णीमानगर येथे कुटूंबासह राहत आहेत. सदरील जागा अर्जदाराची वहीनी सौ.पंचफुलाबाई काळबांडे यांचेकडुन विकत घेतली आहे. सदरील बिलावर त्यांचेच नांवाने बिल येत आहे. इ.सन.2001 मध्ये त्यांचे जुने मिटर काढुन त्या ठिकाणी नविन ईलेक्ट्रानिक विद्युत मिटर बसवीले तेंव्हा पासुन ते ऑगष्ट 2009 पर्यंतचे बिल नियमित भरले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचे घरी येऊन मिटर तपासले असता, अर्जदाराचे मिटर तपासले व अर्जदाराला असेसमेंट करुन रु.4,000/- दंड लावला. दि.03/09/2009 रोजी इंजिनीयर राठोड व काही लाईनमन घेऊन घरी आले व मिटर घेऊन गेले. रु.4,000/- ही रक्कम विद्युत कायदा 2003 नुसार कलम 126 प्रमाणे असेसमेंट केले. सदरील बिल अर्जदारास मान्य नाही. सदरील बिल दंडासह व दंड रक्कमसह वाढुन मिळत आहे. शेवटचे बिल रु.5.500/- असे दिले आहे. दंडात्मक रक्कम वजा करुन सदरील बिल भरण्यास अर्जदार तयार आहे. दि.10/03/2010 रोजी गैरअर्जदारास असे सांगीतले की, रु.5,500/- न भरल्यास तुमचा विज कनेक्शन तोडणार आहोत,अशी धमकी दिली. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारांना विज तोडणेची मनाई करावी. व दंडात्मक रक्कम रु.4,000/- रद्यबातल करावी. नुकसान भरपाई म्हणुन रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन अर्जदारास मिळावेत आणी दावा खर्चही मिळावा असे म्हटले आहे. 2. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला, त्यांचे म्हणणे असे की,सदर प्रकरणांत प्रतिवादी क्र. 2 म्हणुन अर्जदाराने सहायक अभियंता, आनंदनगर नांदेड यांना समाविष्ट केले आहे जेव्हा की, तेथे विज वितरण कंपनीचे युनिट आहे व तेथील अधिका-याचे पदनाम कनिष्ठ अभियंता असे आहे. सदर प्रतीवादीला या प्रकरणामध्ये प्रतीवादी म्हणुन समाविष्ट करण्याचे कोणतेही कारण उदभवले नसतांना विनाकारण हे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे या करीता हे प्रक्ररण खारिज करावे अशी विनंती केली आहे. विज जोडणी सौ.पंचफुला लक्ष्मण काळबांडे रा.पोर्णिमानगर,नांदेड यांच्या नांवे देण्यात आलेली आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अर्जदाराने ते स्वतः ग्राहक आहे, आणी प्रतीवादी हे विज पुरवठा करणारे व्यक्ती आहेत असा नामोल्लेख केलेला नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यअंतर्गत असे प्रकरण दाखल करण्याचा प्रसंग उदभवत नाही. या प्रकरणात ज्या विजेच्या जोडणी बाबात हे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे त्या पंचफुलाबाई या नावाच्या ग्राहकांना उपलब्ध कागदपत्राच्या आधारे कलम 126 वीज कायदा 2003 अन्वये विजेच्या गैरवापरा बाबतचे बिल देण्यात आले होते. सदर बिल दि.02/09/2009 रोजीचे आहे व मुदतीच्या आंत त्यावर कोणतेही अपील न केल्यामुळे सदर बिल विज कायदा 2003 च्या कलम 127 अन्वये आता अंतीम झालेले आहे. याकरिता त्या बिलाबाबत अर्जदाराला कोणताही उजर करता येणार नाही, या व्यतिरीक्त सदर कायद्यान्वये 126 अनुसार दिलेल्या बिलाबाबत कोणतीही तक्रार करावयाची असल्यास ती तक्रार केवळ कलम 127 च्या अपीलाद्वारे करता येते. प्रस्तुत प्रकरणा सारखे प्रकरण दाखल करुन त्यामध्ये कोणतीही मागणी मागता येत नाही अथवा मिळविता देखील येत नसल्या कारणांने ग्राहक मंचासमक्ष हे प्रकरण दाखल करता येत नाही. अर्जदाराचा अर्ज यामुळे खारिज होण्या योग्यतेचा आहे तो करावा अशी विनंती आहे. अर्जदार यांनी सदर मालमत्ता खरेदी करण्याबाबत जे निवेदन केले आहे असा कोणताही दस्तऐवज त्यांनी गैरअर्जदारांना सादर केलेला नाही किंवा ज्या विज जोडणी बाबत हे प्रकरण दाखल केले आहे त्या विज जोडणी बाबत अर्जदार आणि गैरअर्जदार यांचे कोणतेही नाते नाही. अर्जदाराचे घरी येऊन जुने मिटर काढुन त्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक्स मिटर बसविले या बाबत वाद नाही परंतु अर्जदाराने ऑगष्ट 2000 पर्यंतचे बिल नियमितपणे भरले असल्या बाबत जे प्रतीपादन केले आहे ते सिध्द करावयाची जबाबदारी अर्जदाराची आहे. अर्जदाराचे म्हणणे की, दि.03/09/2009 रोजी इंजिनीयर राठोड व व काही लाईनमनसह घरी आले व मिटर बदलायचे आहे असे सांगीतले त्यावर अर्जदार क्र. 1 यांनी हेतुपूरस्सर दुसरे मिटर पोल क्र.105 वर बसविले व अशा प्रकारे अपमान झालेला असल्या बाबत अर्जदाराचा जो ग्रह झालेला आहे तो चुकीचा आहे अशी घटना घडलेली नाही. अर्जदाराने म्हणणे की, घटनेनंतर 10 दिवसांनी बिल आणून दिले व त्यामध्ये दंडाची रक्कम रु.4,000/- लावले हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे, बिल त्याच दिवशी देण्यात आले होते. अर्जदाराने त्या बिलाची फोड कशा प्रकारे आहे याची उहापोह न करता संपुर्ण रक्कम दंडाची आहे असे गृहीत धरुन हे प्रकरण दाखल केलेले आहे जे की,चुकीचे आहे. अर्जदाराने रक्कम न भरल्या कारणाने ती रक्कम थकीत पडलेली आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये दि.02/09/2009 रोजी पंचफुलाबाई लक्ष्मण काळबांडे याच्या पौर्णिमानगर येथील निवासस्थानी विज वितरण कंपनीच्या अधिका-यानी भेट दिली व तेथील परिस्थीतीची पाहणी केली असता जोडणी क्र.550010450187 मध्ये 0.50 किलो वॅट क्षमतेची विजेची जोडणी दिलेली असतांना तेथे एकुण 0.91 म्हणजे जवळपास एक किलोवॅट क्षमतेची विजेची जोडणी अनाधिकृतपणे केलेली आढळली दिसत्या सर्व परिस्थितीचा सर्व़ पाहणी अहवाल तयार करण्यात आला तेथे असलेल्या मिटरवर लोहचुंबक लावल्याचा खुणा स्पष्ट दिसून आलेल्या होत्या. लोहचुंबकचा वापर मिटर कमी गतीने चालवीणे अथवा विज वापर करतांनाही ते स्थिर ठेवणे आणी वापरलेल्या विजेच्या एककांची नोंद न होऊ देण्यासाठी केला जातो. दिसत्या परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात आला त्यावर विज वितरण कंपनीच्या अधिका-यानी सहया केल्या. नरेंद्र उकडंजी काळबांडे नावाची व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. मात्र त्यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. सदर पाहणी अहवालाची प्रतीक्षा या जवाबासोबत दाखल करण्यात आली आहे. प्रचलित दारास अनुसरुन प्रत्यक्षात वापरलेल्या परंतू नोंद न झालेल्या विजेच्या विजेच्या एककांची नोंद करण्यासाठी जे असेसमेंट करावयाचे असते ते केल्यावर एकुण विजेचा वापर 394 युनिटचा आढळला आणि प्रचलित दरानुसार त्याचे बिल रु.3,682/- झाले बदलेल्या मिटरची किंमत रु.700/- त्या समाविष्ट केल्यावर एकुण रु.4,382/- झाले. परंतु अर्जदाराने बिल स्विकारले नाही व त्यानंतर दि.03/11/2009 रोजी रजिस्टर पत्र पोचद्वारे हे बील पाठवून देण्यात आले. विज वितरण कंपनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी असून प्रत्येक विजेच्या एककाची निर्मिती वितरण वितरण करण्यासाठी विज वितरण कंपनीस खर्च येतो. या प्रकरणांत ज्यांच्या नांवे मिटर आहे त्यांना विज वितरण कंपनी योग्य प्रकारे प्रचलित दरानुसार विजेचे बिल पाठविले आहे ते भरण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, त्यांनी हे बिल न भरता विज वितरण कपंनीचे नव्हे तर राष्ट्राचे नुकसान केले़ आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अर्जदारांना हे प्रकरण दाखल करण्याचा आणित्यामध्ये त्यांनी मागणी केलेल्या मागण्याचा आणि मिळविण्याचा कोणताही अधिकार नसतांना त्यांनी प्रकरण दाखल करुन त्यात बचाव करण्यास गैरअर्जदारांना भाग पाडल्यामुळे सर्वसाधारण आणि विशेष रु.10,000/- खर्चासह हे प्रकरण खारिज करावे, असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व म्हणणे लक्षात घेता जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदारांनी गैरअर्जदारा बरोबर ग्राहक तत्वाचे नाते सिध्द केले आहे काय ? नाही. 2. अर्जदार हे तथाकथीत देयकाची रक्कम रद्य बातल करुन मागण्यास पात्र आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 –अर्जदारांनी त्यांची फिर्यादचे कलम 1 मध्ये मोघम विधान केलेले आहे ते म्हणजे अर्जदार त्यांचे कुटूंबासह पौर्णिमानगर नांदेड येथे 1985 पासुन राहतात व सदरील जागा त्यांनी त्यांची वहीनी पंचफुलाबाई काळबांडे यांच्याकडुन विकत घेतली आहे. संपूर्ण फिर्यादीमध्ये कोणत्या तारखेला कोणती मिळकत अर्जदाराने पंचफुलाबाई काळबांडे यांच्याकडुन विकत घेतली याचा तपशील दिलेला नाही. अर्जदाराचेच म्हणण्याप्रमाणे लाईट बिलावर पंचफुलाबाई यांचेच सुरुवाती पासुन शेवटपर्यंत अर्जदार म्हणुन त्यांना या फीर्यादीत दाखस करुन घ्यावयास पाहीजे होते किंवा सदरील खरेदी खताची साक्षांकित नक्कल किंवा मुळ खरेदीखत दाखल करावयास पाहीजे होते. अर्जदाराच्याच म्हणण्याप्रमाणे अर्जदार क्र. 1 यांनी काही दिवस वकीली व्यवसाय केला नंतर ते प्राध्यापक म्हणुन काम करीत आहेत, असे जर असेल तर त्यांना कायदयाचे सखोल ज्ञान आहे असे गृहीत धरण्यास मुळीच हरकत नाही, असे असतांना देखील त्यांनी जर खरोखरच सदरील मिळकत पंचफुलाबाई काळबांडे यांच्याकडुन रजिस्टर खरेदीखताद्वारे विकत घेतली असेल तर त्यांनी ताबडतोब त्या खरेदीखताच्या आधारे त्या मिळकतीवर स्वतःचे नांव लावून घेतले असते त्याच बरोबर त्यांनी प्रतीवादीकडे अर्ज देऊन सदरील मिटर देखील त्यांच्या नांवावर करुन घेतले असते परंतु आजपर्यंत अर्जदाराने ती तसदी का घेतली नाही? याबद्यल काही खुलासा नाही. वरील विवचनावरुन सकृतदर्शनी असे दिसते की, सुरुवाती पासुन शेवटपर्यंत सदरील मिळकत व मिटर पंचफुलाबाई काळबांडे यांच्याच नांवावर आहे व तीच गैरअर्जदारांची ग्राहक आहे. 4. अर्जदारांनी ईलेक्ट्रॉनिक बिलाची मागणीचे एकुण पाच प्रती दाखल केलेले आहे, त्या बिला पोटी त्यांनी स्वतः एक तर बिलाची रक्कम भरणा केल्याची पावती दाखल केली नाही, त्यावरुन असे दिसते की, अर्जदाराने स्वतः सदरील बिलापोटी एकही रुपया अद्याप गैरअर्जदाराकडे जमा केलेले नाही. त्यामुळे सकृतदर्शनी अर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत हेच मुळात सिध्द होऊ शकत नाही. सदरील पंचफुबाई काळबांडे यांना त्यांनी स्वतः बरोबर अर्जदार म्हणुन का दाखल करुन घेतले नाही, याबद्यल काही खुलासा नाही. अर्जदाराच्याच फिर्यादीतील कथनामध्ये किंवा त्यांचे रिजॉंईडरच्या कथनामध्ये व प्रतीवादीकडे दिलेल्या तक्रारीमध्ये अनेक तफावती आहेत, यावरुन असे दिसते की, अर्जदार हे स्वच्छ हाताने या मंचापुढे आलेले नाही म्हणुन सदरील मागणी मंजुर करण्या योग्य नाही, असे वाटते. गैरअर्जदाराचे म्हणणे आल्यानंतर अर्जदारा तर्फे काही कागदपत्र नि.नं.20 प्रमाणे दाखल करण्यात आले. त्यानंतरही त्यांनी काही कागदपत्र दाखल केले आहे. परंतु एकाही नक्कलेवर साक्षांकित केल्याचे सही नाही. त्यांनी इतरही कागदपत्र दाखल करावयास पाहीजे होते किंवा साक्षांकित केलेले नक्कला दाखल करावयास पाहीजे होते. म्हणुन एकंदरीत कागदपत्रावरुन सकृतदर्शनी असे वाटते की, आजपर्यंत सदरील मिळकत व मिटर हे पंचफुलाबाई काळबांडे यांच्याच नांवाने आहे व तेच गैरअर्जदाराचे ग्राहक आहे. गैरअर्जदाराचे एकंदारीत म्हणण्यावरुन असे दिसते की, अर्जदाराने किंवा पंचफुलाबाई काळबांडे यांनी सदरील देयकाच्या विरुध्द वरिष्ठाकडे अपील केलेले नसल्यामुळे व आता त्यांची मुदत गेल्यामुळे ते सदरील देयक गैरअर्जदाराकडुन मागण्यास पात्र नाही. एकंदरीत पुराव्यावरुन अर्जदाराने त्यांचे ग्राहक तत्व सबळ पुरावे दाखल करुन सिध्द केले नाही त्यामुळे ते ख-या अर्थाने गैरअर्जदाराचे ग्राहकच होत नाही, असे सकृतदर्शनी वकीलाच्या युक्तीवाद ग्राहय धरण्यास पात्र आहे, असे आम्हाला वाटते म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर नाकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 व 3 – 5. गैरअर्जदारांनी त्यांचे म्हणणे नि.14 मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, दि.02/09/2009 रोजी पंचफुलाबाई काळबांडे यांचे पौर्णीमानगर येथे प्रतीवादीचे सक्षम अधि-यानी भेट दिली व तेथील परिस्थितीची पाहणी केली असता जोडणी क्र.550010450187 मध्य 0.50 कीलो वॅट क्षमतेचे विजेची जोडणी दिलेली असतांना तेथे एकुण 0.91 म्हणजे जवळपास एक किलो वॅट क्षमतेचे विजेची जोडणी अनाधिकृपणे केलेले आढळले ते सर्व परिस्थितीचे पाहणी अहवाल तयार करण्यात आले व तेथे मिटरवर लोहचुंबक लावल्याचे खुणा स्पष्ट दिसुन आल्या होत्या. लोहचुंबकाचा वापर मिटर कमी गतीने चालवीणे व वापरलेले विजेचे एककांची नोंद न होऊ देणेसाठी केला जातो. वरील सर्व बाबी विज कायदा 2003 च्या कलम 126 अन्वये विजेचा अनाधिकृत वापर या सदराखाली मोडतो. दिसत्या परिस्थीतीचा वरील परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात आला त्यावर विज वितरण कंपनीचे अधिका-यानी सहया केल्या. नरेंद्र उकडंजी नावाची व्यक्ति ते मात्र त्यावर सही करण्यास नकार दिला. प्रतीवादीच्या म्हणण्याप्रमाणे कलम 18 मधील हे म्हणणे पहाता असे दिसते की, अर्जदार क्र. 1 यांचे समक्ष प्रतीवादीच्या अधिका-यानी स्थळ पाहीणी केली व अहवाल तयार केला व अर्जदार क्र. 1 यांनी त्या अहवालावर सही करण्यास नकार दिला? 6. गैरअर्जदारांनी सदरील म्हणण्याचे कलम 18 मध्येच असाही उल्लेख केला की, प्रचलीत दरास अनुसरुन प्रत्यक्षात वापरलेले व नोंद न झालेले विजचे एककाची नोंद करण्यासाठी जे असेसमेंट करावयाची असते ते केल्यावर एकुणस विजेचा वापर 394 युनिटचा आढळला आणी प्रचलित दरानुसार त्याचे बिल रु.3,682/- चे झाले. बदलेल्या मिटरची किंमत रु.700/- त्यात समाविष्ट केल्यावर एकुण देय रक्कम रु.4,382/- झाली याच रक्कमेच बिल त्याच दिवसी पंचफुलाबाई काळबांडे यांना देण्यात आले परंतु त्यांनी हे बिल स्विकारले नाही व त्यानंतर दि.03/11/2009 रोजी रजिस्टर पत्राद्वारे हे बिल देण्यात आले व त्याच वेळेस कलम 126 अन्व्ये नोटीस सुध्दा त्यांना पाठवून देण्यात आली होती. दि.02/06/2009 रोजी सदरील बिल पाठविलेल्या पत्यावर पाप्त झाल्यानंतर मुदतीमध्ये त्याचा भरणाही केला नाही किंवा त्यावर कोणतेही अपील केले नाही. सदरील बिल आता अंतीम झालेले आहे म्हणुन प्रस्तुत प्रकरणातील बिलाबाबत कोणतीही तक्रार आता करता येणार नाही. म्हणुन सदरील फिर्याद खारीज करावी अशी विनंती केली आहे. 7. कागदपत्रावरुन असे दिसते की, सदरील बिलाची भरणा हा अर्जदाराने किंवा पंचफुलाबाई काळबांडे यांनी केलेले नाही व असे असतांनाही त्यांनी ही फिर्याद या मंचापुढे दाखल केलेली आहे त्या फिर्यादीबरोबर अंतरिम मनाई हुकूमाचा आदेश मिळण्यासाठी अर्जही दिलेला आहे. गैरअर्जदारांनी गैरअर्जदाराचे पर्सनल लेजरची नक्कल दाखल केलेली आहे. अर्जदाराने सदरील बिलाचा भरणा न करता मनाई हुकूम मिळवायचा प्रयत्न केला आहे, वास्तविक पहाता त्यांनी सदरील बिलाची रक्कम अंडर प्रोटेस्ट का होईना पण भरावयास पाहीजे होते व नंतर मनाई हुकूमाबद्यल अर्ज करावयास पाहीजे होता तसे न करता त्यांनी मनाई हुकूमाचा अर्ज देऊन मनाई हूकूम मिळविण्याचा प्रयत्न केला. 8. वरील विवेचनावरुन असे दिसते की, सकृतदर्शनी आज मीतीला सदरील पंचफुलाबाई काळबांडे हीच त्या मिळकतीची व मिटरची कागदोपत्री मालक आहे व अर्जदाराने सदरील मालकी हक्क त्यांच्या हक्कात हस्तांतरण करुन न घेता ही तक्रार दाखल केलेली आहे. एकंदरीत पुराव्यावरुन अर्जदार यांनी तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र नाहीत, असे सकृतदर्शनी वाटते. म्हणुन मुद्या क्र. 2 व 3 चे उत्तर नाकारात्मक देणे योग्य आहे, असे आमचे मत आहे. 9. खरेदीखताची मुळप्रत किंवा साक्षांकित प्रती व अर्जदार सदरील मालमत्ता त्यांच्या नांवावर हस्तांतरीत करुन घेण्यासाठी महानगर पालिकेकडे अर्ज करुन ती हस्तांतरीत करुन घ्यावी, त्याचप्रमाणे गैरअर्जदाराने देखील रितसर अर्ज देऊन सदरील मिटर त्यांचे नांवावर करुन घेण्यासाठी अर्ज व कागदपत्र प्रतीवादीकडे द्यावेत. सदरील बिलाची रक्कम प्रतीवादीकडे भरणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे ते बिल भरणा करुन मिटर त्यांचे नांवावर करुन घ्यावे. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार हे इतक्या दिवसापासुन गप्प का बसले? याबद्यल काही उहापोह किंवा खुलासा केलेला नाही. प्रथम त्यांनी स्वतःच्या नांवावर मिळकत व मिटर हस्तांतरीत करुन घ्यावी व नियमाप्रमाणे विज बिलाची रक्कम प्रतीवादीकडे भरत रहावे. 10. या फिर्यादी मधील मागणी सकृतदर्शनी मान्य करण्या सारखे नसल्यामुळे आम्ही ही फिर्याद खारीज करीत आहोत. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. फिर्यादीची फिर्याद खारिज करण्यात येते. 2. पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. संबंधीत पक्षकारांना निकाल कळवावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |