जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/282 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 26/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य लक्ष्मीकांत पि.गंगाधर कोत्तावार, वय वर्षे 55, धंदा नौकरी, अर्जदार. रा.उमरी ता.उमरी जि.नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म. गैरअर्जदार. तर्फे मुख्य अभियंता, विद्युत भवन,नविन मोंढा,नांदेड. अण्णाभाऊ साठे चौक,नांदेड. 2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म. तर्फे कार्यकारी अभियंता, कार्यालय, भोकर ता.भोकर जि.नांदेड. 3. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म. तर्फे सहायक अभियंता, विद्युत उपकेंद्र उमरी ता.उमरी जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.डी.जी.आडे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बि.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, ते मौजे उमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांचे घर क्र.62 आहे. गैरअर्जदार यांचेकडुन मिटर क्र.9000447083 द्वारे विद्युत पुरवठा घेऊन ग्राहक झाले आहेत. दि.17/10/2006 रोजी अर्जदारास रु.5,510/- चे प्रतिवादी तर्फे विद्युत देयक मागील थकबाकीसह देण्यात आले होते. सदरील पुर्ण बिल अर्जदाराने भरणा केलेला आहे. त्यानंतर अर्जदारास काही महिने विद्युत देयके प्राप्त झाले नाहीत. अर्जदारास दरमहा रु.150/- ते रु.200/- पर्यंत बिल येत होते. परंतु अर्जदारास काही महिने बिल न आल्यामुळे दि.03/07/2009 व दि.20/07/2009 रोजी लेखी अर्ज दिला. त्यानंतर अर्जदारास माहे डिसेंबर 2009 मध्ये रु.58,420/- चे बिल देण्यात आलेले आहे जे की, चुकीचे आहे. अर्जदाराकडे विद्युत उपकरणे फार कमी प्रमाणात असल्यामुळे एवढे मोठे बिल येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अर्जदारास अंदाजे प्रतिमहा रु.200/- असे गृहीत धरले तरी मार्च 2006 ते डिसेंबर 2009 या 45 महिन्यासाठी जास्तीत जास्त रु.9,000/- ते रु.10,000/- थकबाकी होऊ शकते. परंतु गैरअर्जदाराने रु.58,420/- चे विद्युत देयक अतशिय अयोग्य व बेकायदेशिरपणे दिलेले आहे जे की, रद्य करणे आवश्यक आहे. सदरील बिलातील मिटर क्रमांक सुध्दा चुकीचा आहे, सदरील बिल रद्य करावे व सुधारीत बिल देण्यात यावे अशी विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. गैरअर्जदारांनी चुकीचे बिल देऊन सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना देण्यात आलेले रु.58,420/- चुकीचे असल्याचे जाहीर करुन ते रद्य करण्याचे आदेश करावा. तसेच गैरअर्जदाराकडुन नुकसान भरपाई म्हणुन रु.10,000/- देण्याचे आदेश करावे. यातील गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली ते हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला, त्यांचे म्हणणे असे की, विज जोडणी हि नारायण बाबा या व्यक्तीच्या नांवे आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार नारायण बाबा ही व्यक्ती मयत आहे. वीज जोडणी ही विज देण्या बाबतचा वैयक्तिकरित्या करण्यात आलेला करार आहे. त्या करारास अनुसरुन जी विज जोडणी देण्यात येते तसा कोणताही करार अर्जदाराने विज वितरण कंपनीशी केलेला नाही. त्यामुळे मयत व्यक्तीच्या मार्फत अर्ज दाखल करणे किंवा प्रकरण दाखल करणे याचा अर्जदारास कोणताही हक्क किंवा संबंध नाही. पुर्ण तक्रारीचे अवलोकन केले असता, अर्जदाराने ते स्वतः कोणत्या प्रकारे विज वितरण कंपनीचे ग्राहक होतात याचा उल्लेख केलेला नाही आणि करार केला नसल्यामुळे कोणत्याही स्वरुपाचे नाते नसल्या कारणाने अर्जदार हे ग्राहक नाहीत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयान्वये विज वितरण कंपनी विरुध्द प्रकरण दाखल करण्याचा अर्जदाराला कोणताही हक्क नाही. दि.17/10/2006 रोजी देण्यात आलेले रु.5,510/- चे देयक थकबाकीसह होते हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराला दरमहा रु.150 ते रु.200/- एवढे विज बिल येत होते ही बाब त्यांच्या म्हणण्याच्या विपरीत आहे. त्यांना देण्यात आलेले डिसेंबर 2009 मध्ये बिल रु.58,420/- हे चुकीचे होते हे म्हणणे खोटे आहे. अर्जदारास विद्युत उपकरणे कमी असल्यामुळे त्यांना 45 महिन्याचे जास्ती जास्त रु.9,000/- ते 10,000/- थकबाकी होऊ शकते त्यांचे हे म्हणणे थकबाकी असल्याचे मान्य आहे. अर्जदाराचे विद्युत पुरवठा खंडीतो म्हणुन धमकी दिली हे म्हणणे चुकीचे आहे. सदर ग्राहकाला 1975 साली वीज पुरवठा देण्यात आला होता. विजेचा वापर होऊन देखील नियमितपणे विजेचे बिल कधीही भरण्यात आलेले नाही. दि.20/02/2004 रोजी शेवटचे विजेचे बिल भरले होते. त्यानंतर 25 महिने अखंड अनिर्बंध विजेचा वापर करण्यात आला परंतु विज बिल भरले नाही. विज जोडणीसाठी रु.58,980/- रुपयाचे बिल देण्यात आले होते ते विजेचे बिल कमी करण्यात आलेले असून सध्या ते बिल रु.20,756/- करण्यात आलेले आहे व मुळ बिलातुन रु.38,224/- कमी करण्यात आलेले आहे. सदर रिवीजन बिल दि.30/12/2009 रोजी करण्यात आलेले आहे. अर्जदाराला तक्रारीतील फोलपणा माहिती असतांना दबावतंत्राचा वापर करावा म्हणुन हे प्रकरण दाखल करुन त्याचा बचाब करण्यास गैरअर्जदारास भाग पाडल्या कारणांने हे प्रकरण रु.10,000/- खर्चासह खारीज करावे अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तपासुन खालील मुद्ये उपस्थित झाले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? सिध्द केले नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी मंचापुढे तक्रार दाखल केली व रक्कम रु.58,420/- हे बिल चुकीचे आहे ते रद्य करण्यात यावे अशी मागणी केली. तत्पुर्वी अर्जदाराने हे पाहणे आवश्यक होते की, तक्रार करते वेळी अर्जदार कोणत्या हक्काने तक्रार करीत आहे व विज मिटरसंबंधी गैरअर्जदार यांचेशी त्यांचा कोणता करार आहे हे मंचापुढे आणणे आवश्यक होते. अर्जदाराने मागणी केलेले मिटर हे नारायण बाबा या नांवाने असून अर्जदार हे लक्ष्मीकांत कोत्तावार हे आहेत. गैरअर्जदार यांचे वकीलांनी हरकत घेतली व त्यांनी आपले दिलेले लेखी जबाबात सदर हरकत मांडली त्यांचे म्हणणेनुसार विज जोडणी नारायण बाबा या व्यक्तिच्या नांवे आहे. अर्जदाराचे म्हणण्यानुसार नारायण बाबा हे व्यक्ति मयत आहेत. विज जोडणी ही विज देणे बाबातचे वैयक्तिकरित्या करण्यात आलेले करार आहे त्या करारास अनुसार जी विज जोडणी करतात त्याचा कोणताही करार या प्रकरणांत अर्जदाराने विज वितरण कंपनीशी केलेला नाही. पुर्ण तक्रारची पडताळणी केली असता, अर्जदाराने स्वतः कोणत्या प्रकारे विज वितरण कंपनीचे ग्राहक होतात याचा उल्लेख केलेला नाही तसेच वैयक्तिक करार केलेले नसल्या कारणाने त्या स्वरुपाचे कोणतीही नोंद नसल्या कारणाने अर्जदार हे विज वितरण कंपनीचे ग्राहक नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयान्वये विज वितरण कंपनी विरुध्द प्रकरण दाखल करण्याचा अर्जदारास कोणताही हक्क नाही. गैरअर्जदाराचे हे म्हणणे तपासले असता, त्यामध्ये तथ्य आहे असे मंचाचे निदर्शनास आले. अर्जदाराने कागदपत्र व तक्रार ही वकीलाकडे आणुन दिलेले आहे ती वकीलांनी दाखल केलेली आहे व त्यामध्ये अर्जदार व त्यांनी दाखल केलेल्या बिलावरील नांव यामध्ये काय संबंध आहे तसेच सदरील विज जोडणीबाबत अर्जदार जेंव्हा न्याय मंचाकडे तक्रार करणार तेंव्हा त्यांच्याशी संबंध कशे प्रस्थापीत करावयाचे किंवा त्यांचेशी नातेसंबंध अर्जदार विज जोडणी बिलावर असलेले नांव यांच्यामध्ये तो मंचासमोर कसे सिध्द करावयाचे किंवा त्याबाबत तक्रारीमध्ये माहीती कशी समोर आणावयाची हे सर्वस्वी केस चालवणारे वकीलावर अवलंबुन असते. सदरील केसमध्ये अशा प्रकारचा कुठलीही नोंद तक्रारअर्जामध्ये अर्जदार यांचे वकीलांनी मांडलेले नाही व मिटरसंबंधी अर्जदाराचे काय नाते संबंध आहे ते कसे ग्राहक आहेत हे मांडणे वकील या नात्याने आवश्यक होते व ते त्यांनी स्पष्टपणे मंचासमोर मांडले नाही. गैरअर्जदार यांनी घेतलेला आक्षेप हा मंचास मान्य करावे लागेल. म्हणुन मुद्या क्र. 1 यासाठी उत्तर नकारार्थी देण्यात येते. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे या संदर्भात कुठलीही माहीती अर्जदाराच्या वकीलांनी मंचासमोर दाखल केलेल्या तक्रारअर्ज समोर न आणल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येतो. वरील सर्व बाबींचा विचार होऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येतो. 2. संबंधीतांनी आपापला खर्च सहन करावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |