निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 30/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 18/11/2010 कालावधी 04 महिने 19 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्री.विनोदकुमार गोविंदराव जोशी. अर्जदार व्दारा.करंजीकर निवास. अड.जी.सी.नावंदर रा.गणपती चौक.जिंतूररोड. मु.पो.ता.जि.परभणी.— 431 401 विरुध्द 1) परीक्षा केंद्र. गैरअर्जदार. कै.किशनराव रामजी शिंदे बी.सी.ए.कॉलेज. अड.एस.एन.वेलणकर इनायत नगर.जिंतूर नाका. परभणी (महाराष्ट्र.) 2) डी ओ इ ए सी सी सेंटर अड.सी.पी.सेनगावकर युनिव्हर्सिटी कॅम्पस.औरंगाबाद.— 431004. 3) डी ओ इ ए सी सी सोसायटी. इलेक्ट्रॉनिक्स निकेतन 6 सी.जी.ओ.कॉम्पलेक्स. न्यु दिल्ली.110003. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्यक्ष ) केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे घेतलेल्या संगणक बेसिक कोर्स C.C.C. परीक्षेचा जाहिर केलेल्या निकालपत्रात अनुपस्थिती दाखवले बद्दल नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार अशी की, संगणक क्षेत्रामध्ये करीअर करीत पदवी घेवुन आय.ए.एस होण्याची इच्छा असलेल्या अर्जदाराच्या मुलाने गैरअर्जदारा क्रमांक 2 व 3 यांची संगणक C.C.C. परीक्षा गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून दिली असतांनाही गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी संगणमताने हेतूपुरस्सर परीक्षा उपस्थिती पटलावर मुलाने केलेल्या स्वाक्षरीच्या जागी व्हाईटनर लावुन तो परीक्षेला अनुपस्थित दाखवल्याचे निकालपत्र दिले व सेवात्रुटी केली.अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की,परीक्षेच्या तयारीसाठी त्याने 15/08/2001 रोजी रु.30,000/- चा लॅपटॉप, रु.9500/- किमतीचा स्कॅनर व प्रिंटर खरेदी केला होता.कॉम्प्युटर क्लाससाठी रु.2100/-, मोबाईल खरेदीसाठी रु.5000/-, चष्मा खरेदीसाठी रु.1000/- वगैरेसाठी केलेला खर्च वाया गेला व मुलाच्या करीअरचे गैरअर्जदारांनी नुकसान केले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार 1 ते 3 कडून मुलाच्या परीक्षेचा योग्य निकाल व केलेला खर्च व रु. 20,00000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2 ) व पुराव्यातील कागदपत्रात नि.3 लगत संगणक क्लासची पावती, लॅपटॉप मोबाईल वगैरे खरेदीच्या पावत्या वगैरे एकुण 11 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.27) तक्रार अर्जा बाबत सुरवातीलाच तीव्र आक्षेप घेवुन अर्जदाराची तक्रार शैक्षणिक क्षेत्राचा वाद असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत चालवणेस पात्र नाही. ती फेटाळण्यात यावी. तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडून मोबदला देवुन कोणत्याही प्रकारची सेवा विकत घेतलेली नाही. व अर्जदार त्याचा ग्राहक नाही.किंवा विक्रेता खेरीदीदार ही नाही याही कारणास्तव तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा.अर्जदाराने तक्रार अर्जाच्या कामी केंद्र सरकार, तसेच ज्या कॉम्प्युटर ट्रेनींग सेंटर मध्ये ट्रेनींग घेतली ते सेंटर तक्रार अर्जाचे कामी आवश्यक पार्टी असतानांही त्यांना विरुध्द पार्टी म्हणून सामिल केलेले नसल्यामुळे तक्रार नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वानुसार फेटाळण्यात यावी.तसेच ग्राहक मंचात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी गैरअर्जदारां विरुध्द अर्जदारास कायदेशिर कारण घडले होते अशा संबंधीचा कसलाही पुरावा ( नोटीस ) दिलेली नाही.सदरची बाब अत्यावश्यक असतांनाही तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तक्रार चालवण्यास कॉज ऑफ अक्शन नसल्यामुळे फेटाळण्यात यावी.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुढे असाही मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदाराने त्याच्या मुलाकरता की, जो तक्रारीचा मुळ ग्राहक आहे प्रस्तुतची तक्रार केलेली आहे.परंतु तक्रार अर्जाच्या शिर्षकामध्ये तसा स्पष्ट उल्लेख केलेला नाही मुलाच्या वतीने तक्रार करण्यास परवानगी ही मंचाची घेतली नसल्यामुळे आणि मुलाच्या वतीनेही तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्जामध्ये कोठेही उल्लेख केलेला नसल्यामुळे ग्राहक म्हणून प्रस्तुतचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.गैरअर्जदार 1 ने पुढे असाही तीव्र आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराने परभणी ग्राहक मंचात दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदाराकडून वस्तु खरेदीसाठी केलेला एकुण खर्च रु.60,000/- व नुकसान भरपाई रु 20,00000/- अशी एकुण रु.20,60,000/- ची मागणी केलेली आहे. सदरची मागणी जिल्हा ग्राहक मंचाच्या आर्थिक अधिकारीतेच्या सिमेच्या कक्षेच्या बाहेर म्हणजे 20,00000/- पेक्षा जास्त असल्यामुळे असल्यामुळे सदर तक्रार परभणी ग्राहक मंचापुढे चालवण्याचे अधिकारक्षेत्र नाही.याही कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी.असे कायदेशिर मुद्दे उपस्थित केले आहेत. तक्रार अर्जातील पॅरा क्रमांक 1 ते 3 व 6 ते 8 वैयक्तिक माहिती अभावी गैरअर्जदाराने साफ नाकारलेला आहे.गैरअर्जदारतर्फे संगणक बेसिक कोर्स C.C.C. परीक्षा ही केवळ संगणक टेक्नॉलॉजीचे प्राथमिक ज्ञान होण्यासाठी घेतली जाते त्यासाठी स्वतः लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर,मोबाईल, अँटी व्हायरस, सॉफ्टव्हेअर अशी कुठलीही वस्तू खरेदी करण्याची आवश्यकता नसते किंवा अट ही नाही अर्जदाराने मंचाकडून सहानुभूती मिळविणेसाठी तक्रार अर्जामध्ये त्याचा उल्लेख करुन खरेदीच्या पावत्या जोडलेल्या आहेत व त्याबाबत चुकीची विधाने केलेली आहेत अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या कागदपत्रातील अनुक्रम नंबर 4 व 5 वरुन असे स्पष्ट दिसते की, अर्जदाराच्या मुलाने 18/12/2009 रोजी कॉम्प्युटर ट्रेनींगसाठी प्रवेश घेतला आणि त्याची परीक्षा 09/03/2010 रोजी होणार होती अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या वस्तु खरेदीच्या पावत्या 15/08/2009 , 22/08/2009 व 14/10/2009 या तारखेच्या दिसतात म्हणजेच संगणक ट्रेनींगला प्रवेश घेण्यापूर्वीच खरेदी केल्याच्या दिसत असल्यामुळे शंकास्पद असून त्याबाबत चुकीची विधाने करुन दिशाभूल केलेली आहे.तसेच मोबाईलची खरेदी परीक्षेच्या 20 दिवस अगोदर केलेली दिसते तक्रार अर्जासोबत वस्तु खरेदीचे सर्व पुरावे अर्जदाराच्या मुलाने संगणक बेसिक ट्रेनींग लावलेल्या क्लासशी विसंगत असल्याचे स्पष्ट दिसते.गैरअर्जदाराचे पुढे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराचा मुलगा C.C.C. परीक्षेला गैरहजर राहिल्यामुळेच त्याची अनुपस्थिती रिझल्टशिटवर लावण्यात आली होती.त्यावर तसे स्पष्ट दिसते.अर्जदाराच्या मुलाने भारती विद्यापीठ जव्हार जिल्हा ठाणे या केंद्रात कोर्स केला असल्याची रिझल्टशिट वर नोंद आहे. म्हणजेच त्याने त्याच केंद्रात ट्रेनींग घेतली असेली पाहिजे, परंतु त्याला बगल देवुन अर्जदाराने वैष्णवी कॉम्प्युटर सेंटर पेडगाव जि.परभणी या ठिकाणी ट्रेनींग घेतली असल्या बद्दलची खोटी पावती पुराव्यात दाखल करुन मंचाची दिशाभूल केली आहे. C.C.C. संगणक बेसिक परीक्षा ही मुख्यतः नॅशनल लेव्हलवर घेतली जाते. सदरची परीक्षा गैरअर्जदार 3 मार्फत ऑनलाईन घेतली जाते व गैरअर्जदार 3 मार्फतच परीक्षेचे ऑनलाईन रिझल्ट दिले जातात अर्जदाराच्या मुलाने परीक्षा सेंटरवर उपस्थित राहून कॉम्प्युटर समोर परीक्षा सुरु होण्यापूर्वी सुचने प्रमाणे प्रश्नपत्रिका कॉम्प्युटर स्क्रीनवर येण्यासाठी Log on करुन प्रश्न सोडविणे गरजेचे होते त्याने प्रशनपत्रिका स्क्रीनवर येण्यासाठी Log on केले नसल्यामुळे प्रश्नपत्रिका स्क्रीनवर आली नसावी त्यामुळेच त्याची अनुपस्थिती लागली आहे.अर्जदाराच्या मुला व्यतिरिक्त केंद्रावर C.C.C. परीक्षेला इतर अनेक विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी अन्य कोणाच्याही बाबतीत अशी तक्रार नव्हती अर्जदाराने तक्रार अर्जामध्ये नमुद केले प्रमाणे उपस्थिती पटलावर अर्जदाराच्या मुलाच्या सहीच्या ठिकाणी व्हाइटनर लावुन तो अनुपस्थित केलेल्याचे खोटे दाखविले आहे हे विधान गैरअर्जदाराने साफ नाकारले आहे. गैरअर्जदाराने मुळ उपस्थिती शिट गैरअर्जदार 2 व 3 कडे नियमा प्रमाणे पाठविलेली होती संगणकावर बसून Log on केलेले नव्हते त्यामुळेच त्याला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी स्क्रीनवर उपलब्ध झाली नसावी त्यामुळे संबंधीत प्रश्नपत्रिका पुढे त्याची अनुपस्थिती दर्शविली होती त्या चुकीला अर्जदाराचा मुलगा हाच सर्वस्वी जबाबदार आहे.गैरअर्जदारावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी टाकता येणार नाही.अर्जदाराने दिशाभूल करुन खोटे पुरावे दाखल केलेले आहेत. व पुराव्यात त्याचा मुलगा परीक्षेला हजर होता या संबंधी 4 साक्षीदारांच्या नावाचा पुरावा दाखल केलेला आहे त्यापैकी 1 त्याची स्वतःची पत्नीही आहे. साक्षीदारांचे अर्जदाराशी लागेबांधे आहेत. वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार 1 चे शपथपत्र ( नि. 28 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 30 लगत 2 कागदपत्रे दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार 2 व 3 यांनी आपला लेखी जबाबा मध्ये ( नि.19) गैरअर्जदार क्र.1 प्रमाणेच अर्जदाराच्या तक्रार अर्जाबाबत कायदेशिर मुद्यावर तीव्र आक्षेप घेतलेला असून ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही तो फेटाळण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे.कायदेशिर आक्षेपा मधील पहिली बाब म्हणजे अर्जदार गैरअर्जदारांचा विद्यार्थी नव्हता अगर तो स्वतः परीक्षेला बसला नव्हता त्यामुळे त्यांच्या विरुध्दची अर्जदाराची तक्रार चालणेस पात्र नाही शैक्षणिक परीक्षा व त्याचे निकाल या संबंधीचा वाद ग्राहक संरक्षण कायद्याखाली सेवात्रुटीचा वाद होत नाही म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी.गैरअर्जदार 2 व 3 ही DOECC Society केंद्र सरकार तर्फे चालवली जाणारी स्वायत्त संस्था आहे त्यामुळे सरकार विरुध्द कायदेशिर दाद मागण्या पूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे. तशी अर्जदाराने नोटीस दिलेली नव्हती या कारणास्तव देखील तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदाराने तक्रार अर्जात त्याच्या मुलाने परभणी येथील वैष्णवी कॉम्प्युटर मध्ये संगणकाचे ट्रेनींग घेतले असे नमुद केलेले आहे त्यामुळे प्रस्तुत तक्रारीचे कामी संबंधीत ट्रेनींग सेंटर अत्यावश्यक पार्टी असतांनाही त्याने तक्रार अर्जात सामिल केलले नाही त्यामुळे तक्रार अर्जास Non Joinder of Necessary party कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी. तक्रार अर्जाबाबत पुढे असा खुलासा केला आहे की, अर्जदाराने तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदाराच्या बाबतीत त्याची नेमकी काय तक्रार आहे त्याचा कसलाही स्पष्ट खुलासा नमुद केलेला नाही फक्त खरेदी केलेल्या वस्तुचा तपशिल दिलेला आहे. सदरच्या वस्तु गैरअर्जदार तर्फे घेतलेल्या परीक्षेच्या संदर्भात घेतल्या होत्या असा तक्रार अर्जात उल्लेख केला आहे परंतु गैरअर्जदारांनी त्या वस्तु कदापीही घेण्यास सुचविले नव्हते.तशी अटही नाही. गैरअर्जदार तर्फे घेण्यात येणारी C.C.C. Computer basic knowledge परीक्षा प्रत्येक चार महिन्यातून एकदा गैरअर्जदार 3 तर्फे आयोजित केली जाते. अर्जदाराचा मुलाने संबंधीत परीक्षचा फॉर्म 31 वी C.C.C. परीक्षा जी मार्च 2010 च्या दुस-या आठवडयात ठेवली होती त्यासाठी फॉर्म भरला होता अर्जदाराने तक्रार अर्जासोबत लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, वगैरे खरेदीच्या पावत्या या परीक्षेच्या तारखे पूर्विच्या असल्याचे दिसत असल्याने मुलासाठीच त्या वस्तू खरेदी केल्या होत्या हे म्हणणे खोटे आहे.कारण कोर्स सुरु करण्यापूर्वीच्या तारखेची खरेदी बिले आहेत. अर्जदारानेच कदाचित स्वतःच्याच अन्य व्यवसायासाठी त्या वस्तु खरेदी केल्या असाव्यात मुळातच C.C.C. संगणक प्राथमिक कोर्स फक्त 58 दिवसाचा असतो आणि त्यासाठी उमेदवाराने स्वतःच लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर खरेदी करावा अशी गैरअर्जदाराकडून मुळीच अट घातलेली नाही किंवा सल्लाही दिलेला नव्हता त्यामुळे त्या खरेदीशी गैरअर्जदारांचा कोणताही संबंध नाही. ट्रेनींग सेंटर मध्ये वरील सर्व सुविधा उमेदवाराला मोफत प्राप्त होत असतात अर्जदाराने तक्रार अर्जात परिच्छेद 4 मध्ये त्याच्या मुलाने परभणी येथील वैष्णवी कॉम्प्युटर सेंटर मध्ये ट्रेनींग घेतली असल्या संबंधीची पावती व ट्रेनींग सेंटरला जाण्या येण्यासाठी केलेला ऑटो खर्चाची पावती दाखल केलेली आहे.याउलट अर्जदाराच्या मुलाने दिलेल्या परीक्षा फॉर्म मध्ये व रिझल्टशिट मध्ये त्याने भारती विद्यापीठ सेकंडरी स्कूल जव्हार जिल्हा ठाणे ( महाराष्ट्र ) या ठिकाणी ट्रेनींग घेतली असल्याचे नमुद केले आहे वरील दोन्ही बाबीमध्ये भिन्नता असल्यामुळे त्याबाबतचा परिच्छेद 4 मधील मजकूर त्याने साफ नाकारला आहे.मुळातच अर्जदाराचा मुलगा सुयश याने C.C.C. परीक्षा देण्यासाठी आवश्यक ते ट्रेनींग घेतले होते या संबंधीचा कसलाही सबळ कागदोपत्री पुरावा तक्रार अर्जासोबत दिलेला नाही त्यामुळे ही तक्रार अर्जातील कथन शंकास्पद असल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे.तक्रार अर्जात खरेदी केलेल्या वस्तूंची यादी देवुन अर्जदाराने तो संपूर्ण खर्चास गैरअर्जदार जबाबदार आहेत असे म्हंटलेले आहे.परंतु तो खर्च करण्याची मुळातच C.C.C. संगणक बेसिक परीक्षेसाठी काहीही आवश्यकता नाही त्यामुळे त्या खर्चाशी गैरअर्जदारांचा काहीही संबंध नाही परीक्षे संबंधी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यानी पुढे असा सविस्तर खुलासा दिला आहे की, संगणक बेसिक नॉलेज गैरअर्जदार 3 तर्फे घेतली जाणारी C.C.C. ची परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाते.गैरअर्जदार 2 हे त्याचे सबऑर्डीनेट आहे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांची परीक्षा सेंटरसाठी निवड केलेली होती. परीक्षार्थिंना दिलेला युनिक कोडे नंबर संगणकावर Log on केल्यानंतर परीक्षेची प्रश्नपत्रिका ऑनलाईनवर स्क्रीनवर येते व ऑनलाईनच परीक्षार्थिला उत्तरे सोडावी लागतात व परीक्षार्थीचे सोडवलेले पेपर्स थेट गैरअर्जदार नं 3 यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त होवुन त्यांच्याकडूनच परीक्षेचा निकाल दिला जातो. अर्जदाराचा मुलगा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्याला केंद्राकडून दिलेला कोड नंबर त्याने संगणकावर Log On केला नसल्यामुळेच त्याला स्क्रीनवर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली नसावी व परीक्षेची वेळ संपेपर्यंत अर्जदाराच्या मुलाने ऑनलाईन संबंधीत पेपर्स देण्याची प्रक्रीया केलेलीच नसल्यामुळे त्याची गैरहजेरी दाखवली आहे अर्जदाराने तक्रार अर्जामध्ये रिझल्टशिट वर व्हाईटनर लावुन अनुपस्थिती दाखविली असल्याचा गेरअर्जदारावर केलेला आरोप गैरअर्जदार 2 व 3 यांनी साफ नाकारलेला आहे.पुढे असा ही खुलासा केला आहे की, संगणक बेसिक कोर्सच्या परीक्षेतील नियमावली प्रमाणे देशांतर्गत सदरची परीक्षा आयोजित करीत असतांना प्रत्येक सेंटरसाठी निरीक्षकाची नेमणुक केली जाते त्यानुसार परभणी सेंटरसाठी एस.बी.सातपुते प्रिन्सीपल इंन्चार्ज महात्माफुले बी.सी.ए. कॉलेज परभणी यांना नेमलेले होते त्यानी दिलेल्या रिपोर्ट आणि गैरअर्जदार नं 3 कडे ऑनलाईन मध्ये आलेल्या रिझल्ट फाईल मधील रिपोर्ट एकसारखाच असतो दोन्ही रिपोर्टमध्ये अर्जदाराच्या मुलाने दिलेल्या कोड प्रमाणे संगणकावर Lon on करुन प्रश्नपत्रिका स्क्रीनवर उपलब्ध न करुन घेतल्यामुळे ऑनलाईन C.C.C. परीक्षा पेपर्सची प्रश्नपत्रिका त्याला उपलब्ध झाली नसली पाहिजे.परीक्षा निरीक्षक सातपुते आणि सुपरिटेंडेंट संजय मानवतकर यांच्याही निदर्शनास ते नंतर आलेले दिसले.त्यामुळे अर्जदाराच्या मुलाची संबंधीत C.C.C. परीक्षेत गैरहजेरी मार्क होण्यास त्याचा तोच वैयक्तिक कारणीभुत व जबाबदार होता त्यामध्ये गैरअर्जदार 2 व 3 यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही.गैरअर्जदारांचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराचा मुलगा परीक्षेसाठी हजर होता या संबंधी त्याने तक्रार अर्जासोबत परिच्छेद 13 मध्ये साक्षीदारांची यादी दिलेली आहे ते साक्षीदार अर्जदाराचेच निकटवर्तीय आहेत असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे त्यासंबंधीचा मजकूर साफ नाकारला आहे. C.C.C. परीक्षेसंबंधी गैरअर्जदारानी शेवटी असा ही खुलासा केला आहे की, C.C.C. (Certificate course in computer concepts) ही परीक्षा देशांतर्गत घेतली जात असून जास्तीत जास्त लोकांना संगणका विषयीचे प्राथमिकज्ञान व्हावे व संगणक वापरणे विषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी केवळ 80 तासांचा हा प्राथमिक कोर्स गैरअर्जदारांनी उपलब्ध केलेला आहे त्याचे मुख्य केंद्र दिल्ली येथे असून उपशाखा विभागवार (रिजनल ) असतात त्या प्रमाणेच औरंगाबाद ही रिजनल शाखा आहे त्याचे तर्फे घेतली जाणारी परीक्षा ही फक्त ऑनलाईन वरच घेतली जाते परीक्षेसाठी नेमलेल्या एक्झामिनेशन सुप्रिंन्टेंडेंट ( E.S.)कडून त्याचे नियंत्रण केले जाते परीक्षेचा कालावधी फक्त 90 मिनीटांचा असतो परीक्षार्थीला दिलेला कोड नंबर वरुन परीक्षार्थीने ऑनलाईन प्रश्नपत्रिका स्क्रीनवर उपलब्ध करुन घेतल्यावर त्याची उत्तरे दिलेल्या वेळेत पूर्ण करावी लागतात वेळ संपल्यावर प्रश्नपत्रिका स्क्रीनवरुन आपोआप बंद होते अर्जदाराच्या मुलाने त्याला दिलेला युनिक कोड नंबर त्याने संगणकावर Lon on करुन प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन घेण्याच्या बाबतीत तो अयशस्वी झाल्यामुळे त्याची अनुपस्थिती संगणकावर उमटली होती त्या चुकीस परीक्षार्थीच सर्वस्वी जबाबदार आहे.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार 2 चे शपथपत्र आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.25 लगत मुळ रिपोर्टींगशिट दाखल केलेले आहे. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड नावंदर, गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड.वेलणकर आणि गैरअर्जदार 2 व 3 तर्फे अड. सेनगावकर यांनी युक्तिवाद केला. मंचासमोर झालेला युक्तिवाद पक्षकारांची निवेदने व पुराव्यात दाखल केलेले कागदपत्रे विचारात घेता निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराची तक्रार जिल्हा ग्राहक मंचात चालणेस पात्र आहे काय ? नाही 2 गैरअर्जदाराचा ग्राहक म्हणून ज्या स्वरुपात प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे ती कायदेशिर तरतुदी नुसार आहे काय ? नाही. 3 गैरअर्जदारा कडून तक्रार अर्जातून मागीतलेली नुकसान भरपाई मिळणेस अर्जदार पात्र आहे काय ? नाही 4 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे. मुद्दा क्रमांक 1 ते 3 अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द दाखल केलेल्या प्रस्तुतच्या तक्रारी बाबत गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबामध्ये सुरवातीलाच वेगवेगळया कायदेशिर मुद्यावर तीव्र आक्षेप घेवुन ग्राहक मंचात तक्रार अर्ज मुळीच चालणेस पात्र नाही ते आक्षेप कायदेशिदृष्टया ग्राहय धरण्याजोगे असल्यामुळे त्याबाबत प्रथम निर्णय देणे आवश्यक आहे. 1 प्रस्तुतची तक्रार अर्जदाराच्या मुलाने दिलेल्या संगणक C.C.C. परीक्षेला हजर असतांनाही अनुपस्थिती दाखवली म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली असल्याचे तक्रार अर्जाच्या पहिल्या पानावरील विषय तपशिलापुढे नमुद केलेले आहे. मात्र त्या मुलाच्या नावाचाही उल्लेख केलेला नाही किंवा तो अज्ञान कि सज्ञान आहे हे देखील नमुद केलेले नाही मुलाने दिलेल्या परीक्षे संबंधीची ही तक्रार असतांना वास्तविक मुलाने स्वतः गैरअर्जदारा विरुध्द तक्रार सादर करायला हवी होती मुलगा अज्ञान असेलतर मुलाच्या वतीने तक्रार सादर करतांना मुलाचे नाव वय यासह शिर्षक मथळा अर्जदाराच्या नावापुढे देणेही कायदेशिररित्या गरजेचे व बंधनकारक होते. तशीही रचना केलेली नाही किंवा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी नुसार मुलाच्या वतीने तक्रार दाखल करण्याचा परवानगी अर्जही मंचाकडे सादर केलेला नाही.त्यामुळे गैरअर्जदाराचा ग्राहक म्हणून अर्जदाराला Locus standi नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही.तीला सी.प्रो.कोड.ऑर्डर 32 रुल 4 व 5 मधील तरतुदींची देखील निश्चित बाधा येते. 2 तक्रार अर्जातील विषय तपशिलामध्ये गैरअर्जदाराकडून मागितलेली नुकसान भरपाई वेगवेगळया बाबींसाठी अर्जदाराने तक्रार अर्जात नमुद केलेल्या वस्तुंची एकुण नुकसान भरपाई रु.60,000/- व इतर नुकसान भरपाई रु.20,00000/- अशी एकुण एकंदर रु.20,60,000/- ची मागणी केली आहे. परंतु जिल्हा मंचाला नुकसान भरपाईचा अनुतोष देण्याची ग्राहक संरक्षण कायद्यात दिलेली मर्यादा जास्तीत जास्त 20,00000/- (वीसलाख) असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 11 (1) मधील तरतुदीची तक्रार अर्जास आर्थिक अधिकारतेची बाधा येत असल्यामुळे तक्रार अर्ज जिल्हा ग्राहक मंचापुढे चालणेस पात्र नाही. 3 तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदारा विरुध्द तक्रार दाखल करण्यास कायदेशिर कारण ( Cause of action) घडल्या संबंधीचा कसलाही स्पष्ट उल्लेख केलेला नाही अथवा ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यापूर्वी अर्जदाराला अपेक्षीत असलेला अनुतोष व नुकसान भरपाईची त्याने गैरअर्जदाराकडे नोटीसी व्दारे / पत्राव्दारे मागणी केली होती मात्र त्याला गैरअर्जदाराकडून दिली गेली नाही. म्हणून कायदेशिर दाद मागावी लागली आहे असाही ठोस पुरावा अर्जासोबत सादर केलेला नाही. तक्रार अर्जात फक्त खरेदी केलेल्या वस्तुंची आकडेवारी फक्त नमुद केलेली असून गैरअर्जदारा विरुध्द दाद मागण्या संबंधी घडलेल्या घटने बाबत सविस्तर कसलाही स्पष्ट उल्लेख न करता केवळ नुकसान भरपाईचा एकच आशय नजरे समोर ठेवुन दाखल केलेली तक्रार संकुचित तथा प्रिमॅच्युअर असल्याने तक्रारीस कायदेशिर बाधा येते. वर नमुद केलेल्या तिन्ही कारणास्तव अर्जदाराच्या तक्रारीस कायदेशिर तरतुदींची बाधा येते असल्यामुळे ती निश्चितपणे फेटाळण्यास पात्र आहे. 4 मेरीटच्या दृष्टीकोनातून देखील निर्णय द्यावयाचा झाल्यास गैरअर्जदारा विरुध्दची तक्रार शाबीत झालेली नाही. अर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे त्याचा मुलगा सुयश जोशी याने गैरअर्जदार क्रमांक 3 केंद्र सरकारची स्वायत्त संस्था DOEACC तर्फे घेण्यात येणा-या राष्ट्रीय पातळी वरील सर्टिफाईड कोर्स ईन कॉम्प्युटर कनसेप्टस् (सी. सी. सी. ) या परीक्षेसाठी तारीख 18/12/09 रोजी वैष्णवी कॉम्प्युटर सेंटर शिवाजी नगर पेडगाव या ठिकाणी रु.21,00/- भरुन प्रवेश घेतला होता त्याचा पुरावा म्हणून नि.3/4 वर पावती दाखल केलेली आहे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 तर्फे आयोजित केलेल्या सदर सी सी सी परीक्षेचा फॉर्म भरुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या बी सी ए कॉलेज परभणी येथे तारीख 09/03/2010 रोजी झालेल्या परीक्षेला तो हजर होता व ऑन लाईन पेपर सोडवला असतांनाही गैरअर्जदाराने त्याची उपस्थिती पटलावर ( नि.3/10) हेतुपुरस्सर -- A A -- अशा पध्दतीने गैरहजेरी दाखवली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे सीसीसी ऑन लाईन परीक्षा घेण्याच्या पध्दती विषयी अड.सेनगावकर यांनी मंचापुढे या बाबत असा खुलासा केला आहे की, प्रत्येक परीक्षा सेंटरला गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडून उपस्थिती पटलाची परीक्षार्थीचा रोल नंबर, नाव व संगणकावर परीक्षा पेपर ऑन लाईन ओपन करण्यासाठी उमेदवाराचा युनिक कोड नंबर यासह फॉर्म पाठवला जातो.तसाच गैरअर्जदार क्रमांक 1 या सेंटरला पाठवला होता हे नि.3/10 वरील सदर उपस्थिती पटलाच्या फॉर्म वर वर नमुद केल्याप्रमाणे तपशिल असल्याचे दिसते.परीक्षेची वेळ सुरु झाल्यावर उमेदवाराने त्याच्या नावापुढे असलेला कोड नंबर संगणकावर Log on केल्यावर दिल्ली येथील केंद्रातून थेट संगणकाच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिसते ती 90 मिनीटात सोडवुन झाल्यावर डिसप्ले आपोआप बंद होवुन सर्व उमेदवारांची ऑन लाईन उत्तर पत्रिका थेट दिल्ली केंद्रावर एकत्रित होवुन गैरअर्जदार क्रमांक 3 कडून परीक्षेचा निकाल दिला जातो.नि.3/10 वरील उपस्थितीपटलाचे अवलोकन केले असता परीक्षार्थी अर्जदाराचा मुलगा सुयश जोशी खेरीज सुचित सुखदेवे व मिर्झा बेग या तिघांच्या नावापुढे -- A A -- असे मार्किंग केलेले दिसते म्हणजेच परीक्षेच्या वेळी ते उमेदवार अनुपस्थित होते म्हणूनच मार्किंग केले आहे हे स्पष्ट होते. याबाबत अर्जदाराचे म्हणणे असे आहे की,त्याचा मुलगा सुयश परीक्षेला हजर होता त्याने उपस्थिती पटला वर सही देखील केलेली होती परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 याने हेतुपुरस्सर त्याच्या मुलाच्या सहीच्या ठिकाणी व्हाईटनर लावुन अनुपस्थिती दाखवली आहे मुलगा हजर होता हे पुराव्यातून दाखवुन देण्यासाठी 5 साक्षीदारांची नावे व त्यांच्या सहयाचा कागद(नि. 3/11) दाखल केला आहे.परंतु पुराव्यात संदर्भ दिलेल्या नरेश श्रीरामवार सर यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कॉलेजचे प्राचार्य यांना तारीख 27/08/2010 रोजी दिलेल्या पत्रात अर्जदाराने ग्राहक मंचात सादर केलेल्या पत्रात ज्या तीन सरांनी अर्जदाराचा मुलगा परीक्षेला हजर होता म्हणून अर्जदारास ती माहिती दिली होती ती चुकीची असून विनोद कुमार जोशी यांना त्यांच्या मुलाच्या उपस्थिती बद्दलची माहिती कोणा समोरही दिलेली नाही असे स्पष्टपणे श्रीरामवार सरांनी प्राचार्याना दिलेल्या पत्रामध्ये (नि.30/2) नमुद केलेले असल्यामुळे अर्थातच अर्जदाराने दिलेल्या साक्षीदारांची यादी खोटी व त्याचेशी हीतसंबंधीत असलेल्या व्यक्तीचींच असल्याचे यातून.अनुमान निघते कारण सदर यादी मध्ये अर्जदाराच्या पत्नीचाही उल्लेख केलेला आहे. शिवाय नि.3/11 च्या यादीत ज्या तीन सरांची नावे सहया आहेत त्यांची शपथपत्रेही दाखल केलेली नाहीत. या सर्व बाबींवरुन शाबीतीच्या दृष्टीकोनातून सदर पुरावा ग्राहय धरता येणार नाही.व त्यावरुन अर्जदाराचा मुलगा हजर होता हे शाबीत झालेले नाही. अर्जदाराच्या तक्रारी प्रमाणे वादा करता अर्जदाराचा मुलगा सुयश परीक्षेला हजर होता असे क्षणभर ग्रहीत धरले तरी उमेदवारांना उपस्थितीपटलावर नमुद केलेले कोड नंबर प्रमाणे अर्जदाराच्या मुलाने त्याचा कोड नंबर 99130156 हा संगणकावर जर Log On केला असता तर स्क्रीनवर त्याला प्रश्नपत्रिका नक्कीच उपलब्ध झाली असती. युनिक कोड नंबर त्यासाठीच गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे उमेदवारांना दिले होते असे युक्तिवादातून गैरअर्जदारतर्फे अड वेलणकर व अड सेनगावकर यांनी मंचासमोर खुलासा केला होता अर्जदाराच्या मुलाला दिलेला युनिक कोड नंबर Log On करण्याचे तंत्र / पध्दती कदाचित त्याला माहिती तथा अवगत नसल्यामुळेच त्याला प्रश्नपत्रिका स्क्रीनवर उपलब्ध करुन घेता आली नसावी व त्यामुळेच परीक्षेला हजर राहूनही सहाजिकच कोड नंबर Log On केला नसल्यामुळे गैरअर्जदारांच्या रेकॉर्डला अर्जदाराच्या मुलाची अनुपस्थिती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असाही यातून निष्कर्ष निघतो. अर्जदाराच्या मुलाने सीसीसी परीक्षेची पूर्व तयारीचा वैष्णवी कॉम्प्युटर वर सेंटर पेडगाव येथे फी भरुन कोर्स केला होता त्याची पावती ( नि. 3/4) आणि येण्या जाण्यासाठी ऑटो रिक्षाचे एकत्रित भाडे पावती नि.3/5 दाखल केलेली आहे परंतु संबंधीत सेंटरचा मुलाने कोर्स पूर्ण केल्याचा दाखला ( सर्टिफीकेट ) पुराव्यात सादर केलेले नसल्यामुळे निव्वळ पावतीवरुन कोर्स केला हे शाबीत होत नाही.दुसरी गोष्ट अशी की, गैरअर्जदार क्रमांक 3 कडून अर्जदाराच्या मुलाला तारीख 16/04/2010 रोजी ऑनलाईन मिळालेल्या C.C.C. परीक्षेच्या रिझल्टशिटचे ( नि.3/8 ) अवलोकन केले असता अर्जदाराच्या मुलाने परीक्षा फॉर्ममध्ये संगणक कोर्स भारती विद्यापीठ सेकंडरी स्कुल जव्हार जिल्हा ठाणे या इन्सटीट्युटचे नाव दिल्यामुळे रिझल्टशिटमध्ये देखील त्या इन्सटीट्युटचा उल्लेख केला आहे. या विसंगती वरुन देखील अर्जदाराचा मुलगा नेमका कोणत्या इन्सटीट्युटचा विद्यार्थी होता हा प्रश्न पडतो. व नि.3/8 चा पुरावा शंकास्पद वाटतो. तिसरी गोष्ट अशी की, अर्जदाराने त्याच्या मुलासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या सीसीसी परीक्षेच्या तयारीसाठी नवीन लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, मोबाईल, चष्मा वगैरेसाठी खर्च केला होता त्याच्या खरेदीच्या पावत्या पुराव्यात ( 3/1 ते 3/16 ) दाखल केलेल्या आहेत. मुलाने सीसीसी परीक्षा देवुनही रिझल्टशिटवर त्याची अनुपस्थिती दाखवल्यामुळे आय ए एस होण्याची इच्छा असलेल्या मुलाच्या करीअरसाठी केलेला खर्च नाहक वाया गेला.असे त्याचे म्हणणे आहे.परंतु गैरअर्जदार तर्फे अड सेनगावर यांने युक्तिवादाच्या वेळी असे दाखवुन दिले आहे की, केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे घेंण्यात येणारी C.C.C. (Certificate course in computer concepts) ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर दर चार महिन्यांनी घेंतली जाते सदर परीक्षेसाठी केला जाणारा बेसिक कोर्स मध्ये संगणक हाताळणी विषयीचे प्राथमिकज्ञान मिळावे एवढाच याचा उद्देश असून जास्तीत जास्त व्यक्तींनी हे ज्ञान अवगत करावे असा माहिती तंत्रज्ञानाचा उद्देश आहे.कोर्ससाठी उमेदवाराला स्वतःचा संगणक किंवा इतर कोणत्याही बाबी खरेदी करण्याची काहीही आवश्यकता नसते.ज्या ठिकाणी कोर्स उपलब्ध असतो तेथे या सर्व बाबी पुरवल्या जातात गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनीही कोर्ससाठी स्वतःचा संगणक वगैरे नमुद केलेल्या बाबी खरेदी केल्या पाहिजेत अशी केव्हाही अट घातलेली नव्हती व नाही. अर्जदाराने तक्रार अर्जात नमुद केलेल्या वस्तू खरेदी केलेल्या असल्या तरी त्या त्याच्या वैयक्तिक हौसेखातर किंवा अर्जदाराच्या स्वतःचा इतर व्यवसायिक कारणासाठी त्याने खरेदी केल्या असाव्यात असाच यातून निष्कर्ष निघतो.कारण संगणक बेसिक कोर्सातील मुळातच स्कॅनर व प्रिंटरची आवश्यकताच नसते किंवा मोबाईल खरेदीचाही कसलाही संबंध नाही हे गैरअर्जदारा तर्फे मंचापुढे केलेल्या युक्तिवादातून उघड झाले आहे. त्यामुळे तथाकथीत वस्तु खरेदीसाठी सुमारे रु.60,000/- खर्चाचा अर्जदाराने दिलेला पुरावा मुद्याला सोडून दिला असल्याचेच यातून अनुमान निघते.व गैरअर्जदाराकडून खोटेपणाने भरमसाठ रक्कम उकळण्याच्या हेतुनेच तक्रार अर्जात त्याचा उल्लेख केला असावा.तथाकथित C.C.C. परीक्षा प्रत्येक चार महिन्यांनी आयोजित केली जाते म्हंटल्यानंतर अर्जदाराच्या मुलाला या परीक्षेची संधी पुन्हा कधीही मिळणार नव्हती अशीही परिस्थिती उदभवलेली नाही. तक्रार अर्जातून मुलाचे करीअर पूर्णपणे ढासळण्याचा आभास करुन मंचाची सहानुभूती मिळवण्यासाठीच दिशाभुलकरुन गैरअर्जदारावर आरोप केले असल्याचे खेदाने म्हणावे लागते.महत्वाची बाब म्हणजे मुलाने परीक्षा केंद्रावर हजर राहून परीक्षा दिली किंवा नाही ही वस्तुस्थिती त्या एकट्या मुलालाच माहित असतांना मंचासमोर त्या मुलाला हजरही केलेले नाही.त्यामुळे Log On बाबत सत्य परीस्थिती काय घडली होती हे अधांतरीच ठेवले आहे.अर्जदाराने तक्रार अर्जातून गैरअर्जदारावर केलेले आरोप रचनात्मक, निरर्थक असल्याचे पुराव्यातून सिध्द झाले आहे. पुराव्यातील या वस्तुस्थितीवरुन देखील मेरीटच्या दृष्टीने अर्जदाराची तक्रार कायदेशिररित्या शाबीत झालेली नसल्याने फेटाळण्यास पात्र ठरते. मुळातच शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा घेणे व रिझल्ट जाहिर करणे या संबंधीचा वाद ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक वाद होवु शकत नाही व तक्रारदाराला ग्राहक म्हणून यासंबंधी दाद मागता येत नाही.या बाबत अड सेनगावकर व अड वेलणकर यांनी मंचापुढे सादर केलेल्या रिपोर्टेड केसेस 2010(1) Mah. L.J. 882 ( सुप्रिम कोर्ट ) आणि रिपोर्टेड केस 2010 (3) सी.पी.आर.पान 137 मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, Conduct of examination and declaration of result does not constitute rendering of service as defined in consumer protection act. हे मत अर्जदाराच्या प्रस्तुत प्रकरणाला तंतोतंत लागु पडते. शिवाय अड वेलणकर यांनी आधार घेतलेली आणखी एक रिपोर्टेड केस 2010 (2) सी.पी.आर.पान 232 ( राष्ट्रीय आयोग ) मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, Where it appears from the material on record that complaint has been filed with motive to extract money from the opposite party the same would be liable to be dismissed. हे देखील अर्जदारास लागु पडते. अर्जदार तर्फे अड नावंदर याने युक्तिवादाच्या वेळी रिपोर्टेड केस 1996 STPL (CL) 702 (NC) तसेच रिपोर्टेड केस 2001 STPL (CL) 476 (NC) आणि रिपोर्टेड केस 2005 STPL (CL) 795 (NC) चा संदर्भ दिला आहे परंतु वरील सर्व रिपोर्टेड केसेस मध्य व्यक्त केलेली मते गेरअर्जदार तर्फे सादर केलेल्या रिपोर्टेड केसेस मधुन ओव्हररुल्ड झालेले असल्यामुळे त्या विचारात घेण्याचा प्रश्न उदभवत नाही. सबब मुद्दा क्रमांक 1 ते 3 ची उत्तरे नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 5 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सदस्या. सदस्या. अध्यक्ष. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |