(दिनांक 29.06.2013)
सदरचा अंमलबजावणी अर्ज (दरखास्त) अर्जदाराने या मंचाच्या तक्रार क्रमांक 07/1998 च्या दिनांक 07/10/1999 च्या आदेशाच्या अंमलबजावणी केलेली आहे. तक्रारदार म्हणतात की, त्यांनी त्या पूर्वी देखील तक्रार अर्ज क्रमांक 137/1993 दाखल केला होता व मंचाने दिनांक 19.02.1994 रोजी तक्रारदाराच्या हक्कात निकाल दिला होता.
अर्जदाराचे वकील श्री.चिटणीस व गैरअर्जदाराचे वकील श्री कड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रार क्रमांक 07/1998 च्या आदेशानुसार “अर्जदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदाराला असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी मीटर क्रमांक 6003012802 हया मीटरचे दिनांक 16.10.1997 ते 30.11.1997 या कालावधीबद्दल जे संकेत दर 4 प्रमाणे बील आकारलेले आहे, ते बेकायदेशीर असल्यामुळे दुरुस्त करुन अर्जदाराकडून औद्योगिक दर (संकेत दर 8) प्रमाणे आकरणी करुन, अर्जदाराकडून वसूल केलेली जास्तीची रक्कम रूपये 9,802/- ही त्यास द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाच्या दाराने परत करावी किंवा पुढील बिलात ती वळती करावी”.
गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यानुसार त्यांनी या मंचाच्या आदेशाचे पालन केलेले आहे. अर्जदारांच्या अर्जात देखील ते लिहीतात की वरील प्रमाणे दोन्ही निकालाच्या नंतर गैरअर्जदार विद्युत कंपनीने आज पावेतो या आदेशा प्रमाणे विद्युत बिलाची आकारणी औद्योगिक दाराने करुन वेळोवेळी बिले दिली व अर्जदाराने ती बिले भरली आहेत.
यावरुन तक्रार क्रमांक 7/1998 च्या आदेशाची पूर्तता झालेली आहे हे स्पष्ट होते.
तक्रारदारांनी सदरच्या अंमलबजावणी अर्जात (अ) दिनांक 22.06.2012 चे रक्कम रुपये 1,42,400/- चे अतिरिक्त विद्युत बिल बेकायदेशीर घोषित करावे व यापुढे अर्जदारास औद्योगिक वापर दाराने विद्युत बिलाची आकरणी करुन बिल देण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेश व्हावा.
(ब) गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रार क्रमांक 137/1993 व 07/1998 च्या मंचाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी प्रार्थना केली आहे.
त्यापैकी प्रार्थना (अ) चा विचार करता त्या विद्युत देयकाचा आणि तक्रार क्रमांक 137/1993 व 07/1998 मधील आदेशाचा काहीही संबंध नाही ते स्वतंत्रपणे दाव्याचे कारण होवू शकेल कारण तक्रार 7/1998 मधील वादग्रस्त विद्युत देयक दिनांक 16.10.1997 ते 30.11.1997 या दरम्यान होते. तर तक्रार क्रमांक 137/1993 मधील विद्युत देयक दिनांक 12.03.1991 चे होते. वर प्रार्थना केलेले विद्युत देयक दिनांक 22.06.2012 चे आहे. त्याच प्रमाणे अंमलबजावणी अर्जात तक्रारदार अशी प्रार्थना कायद्याने करु शकत नाही. प्रार्थना क्रमांक (ब) चा विचार करता तक्रारदारांचा अर्ज व गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे यावरुन गैरअर्जदारांनी तक्रार क्रमांक 137/1993 व 07/1998 या तक्रारीतील आदेशाची पूर्तता केलेली आहे असे स्पष्ट होते.
सबब मंच सदरचा अंमलबजावणी अर्ज मंचाच्या आदेशाची पूर्तता झाली आहे म्हणून निकाली काढत आहे.