जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/176 प्रकरण दाखल तारीख - 30/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 14/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. गजानन पि. प्रकाश तुप्तेवार वय 35 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा. हिमायतनगर, जि. नांदेड विरुध्द. 1. मा.अधिक्षक अभिंयता महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित, विद्युतभवन, नविन मोंढा, नांदेड. गैरअर्जदार 2. सहायक अभिंयता, महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित, हिमायत नगर विभाग, ता.हिमायतनगर,जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.जी.बारसे पाटील. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना ञुटीची सेवा दिली म्हणून तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे हिमायतनगर येथील रहीवासी असून त्यांची शेत सर्व्हे नंबर 18/2/1 मध्ये शेती आहे. अर्जदाराने स्वतःचे विहीरीवर गैरअर्जदार यांचेकडून अग्री विद्यूत मिटर क्र.1126 व मिटर क्र.2379 घेतलेले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी अर्जदार त्यांचा उपयोग घेत आहे.अर्जदारास दिलेल्या विज कनेक्शनसाठी खांबाच्या दोन्ही बाजूने तणाव दिलेला आहे. पूर्वबाजूच्या तणावास इन्सुलेटर बसलेली आहे परंतु पश्चीमेकडील बाजूस तणावास इन्सुलेटर बसवलेली नाही. त्यामुळे शॉटसर्कीट होऊन अर्जदाराच्या जीवास धोका होण्याची शक्यता आहे. त्यामूळे अर्जदाराने दि.6.11.2009 रोजी गैरअर्जदार क्र.2 कडे जाऊन त्या बाबत सांगितले. परंतु त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली नाही व इन्सुलेटर देखील बसविली नाही.दि.20.11.2009 रोजी सायकांळी 5 वाजता तारेस इन्सुलेटर नसल्यामूळे तणाव तार जमिनीपर्यत विज भारीत झाले. त्यामूळे तिचा बैलाला स्पर्श होऊन बैल जागेवरच मरण पावला. सदर बैलाची किंमत रु.50,000/- होती. गैरअर्जदाराच्या चूकीमूळे अर्जदाराचा बैल मरण पावला. त्यामूळे अर्जदाराने गैरअर्जदार यांना या बाबत कळविले. सदर घटनेची माहीती पोलिस स्टेशन हिमायतनगर यांना दिली त्यांनी घटनेची नोंद प्रकरण क्र.18/09 द्वारे दि.20.11.2009 रोजी केली व पंचनामा केला.पशुधन विकास अधिकारी हिमायतनगर यांनी बैलाचे शवविच्छेदन केले. मंडळ अधिकारी हिमायतनगर यांनी पंचनामा केला. बैल मरण पावल्यामूळे अर्जदाराचे शेती हंगामाचे रु.70,000/- चे नूकसान झाले.अर्जदाराने दि.20.11.2009 व 5.12.2009 रोजी तसेच दि.4.12.2009 रोजी विभागीय कार्यालय भोकर यांना बैलाच्या नूकसान भरपाई ची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी दि.25.3.2010 रोजी पञ पाठवून नूकसान भरपाई रु.5500/- देण्यात येईल असे सांगितले परंतु अर्जदार यांना ही रक्कम मान्य नव्हती त्यामूळे त्यांनी रक्कम घेण्यास इन्कार केला.त्यामूळे अर्जदाराने तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, बैलाचे नूकसानी बददल रु.50,000/- व शेतीच्या नूकसानीबददल रु.70,000/- असे एकूण रु.1,20,000/- मिळावेत तसेच मानसिक शारीरिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- असें एकूण रु.1,75,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारास तकार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे.अर्जदार शेत क्र.18/2/1 यावर स्वतःची व कूटूंबाची उपजीवीका करतो या बददल माहीती नाही.अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, पश्चिमेकडील तणावास इन्सुलेटर नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराचा बैल विजेच्या झटक्याने मरण पावला.त्यामूळे रु.50,000/- नूकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही.अर्जदाराने दाखल केलेली फौजदारी प्रकरण व शव विच्छेदन अहवालाबाबत त्यांना माहीती नाही.बैल मरण पावल्यामूळे त्यांचे शेतीचे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही.दि.4.12.2009 रोजी भोकर विभागीय कार्यालय यांना माहीती देऊन रु.50,000/- ची मागणी केली हे म्हणणे चूक आहे.अर्जदाराने त्यांना रु.2,000/- Ex-Gratia धर्तीवर देण्यात आल्याचे जाणीवपूर्वक नमूद केलेले नाही.अर्जदाराची तक्रार ही फॅटल अक्सीडेंट अक्टनुसारचे असून ते फक्त दिवाणी न्यायालयात चालू शकते.बैल मरण पावला ही घटना गैरअर्जदाराच्या चूकीमूळे घडलेली नाही तर ती नैसर्गिकरित्या झालेली आहे त्यांस दैवाचा प्रकोप या सदराखाली मोडू शकते.विद्यूत निरिक्षक यांनी दि.4.12.2009 रोजी दिलेल्या अहवालानुसार यामध्ये गैरअर्जदार यांचा कोणताही दोष नाही तर ही घटना पक्षाच्या कृत्यामूळे घडलेली आहे हे नमूद केले आहे.माणूसकीच्या नात्याने गैरअर्जदारांनी अर्जदारास रु.2,000/- देऊ केलेले आहे यांचा अर्थ ही घटना गैरअर्जदार यांना मान्य आहे असे होत नाही.म्हणून अर्जदाराची तक्रार ही रु.10,000/- खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञानुसार खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 01. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 02. अर्जदार यांनी मागितलेली नूकसान भरपाई रक्कम अंशतः देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? 03. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे शेतीमध्ये गैरअर्जदार यांचेकडून विज जोडणी मिळाली आहे. सदरील शेतातील विहीरीवर मोटार पंपासाठी विज जोडणी घेतलेली आहे. अर्जदाराचा मिटर क्र.1126 अग्री विज मीटर क्र.2379 असा आहे ही बाब गैरअर्जदार यांनाही मान्य असल्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे स्पष्ट होते म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- दि.20.11.2002 रोजी संध्याकाळी 5 वाजेचे सूमारास शेतीच्या कडेने बैल चरत होते व त्या बाजूला विहीर होती. शेती पंपाच्या विज जोडणी करण्याकरिता शेतीच्या धू-यावर एक सिंमेंट खांब रोवलेला होता. त्यांस दोन तणाव तार होते. अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे पश्चिमेकडील तणावाचे तारेला चिमणी नव्हती व खांबावर मध्यम दाब कट पाईट असून पश्चिम बाजूस उजवीकडील बाजूस कन्डक्टर डि. लॅम्पमध्ये इन्सूलेटर टाकून कंडक्टर जोडलेला होता व जंम्पर वायर टाकून दोन्ही बाजूनी कंडक्टर जोडलेले होते. सर्वात वरच्या टॉप भागातील जम्पर वायरवर पक्षी बसल्याने तो जम्पर उजव्या बाजूच्या डि. लॅम्पमध्ये बाहेर आलेल्या बोल्टला स्पर्श झाले व तसेच चिकटून बसले. या सर्व प्रकारामूळे तणाव तारेमध्ये विज प्रवाह आला व तारेला इन्सुलेटर नसल्यामूळे ती विज जमिनीपर्यत पोहचली व या तारेला अर्जदार यांचा बैलाचा स्पर्श झाला व विजेचे धक्क्याने बैल मरण पावला. जर पश्चिमेकडील तणाव तारेला चिमणी असती तर अर्जदाराचा बैल मरण पावला नसता. याठिकाणी अर्जदाराने गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी दाखवलेली आहे. या घटनेची नोंद अर्जदाराने अपघात क्र.18/2009 द्वारे पोलिस स्टेशन हिमायतनगर येथे दि.20.11.2009 रोजी केली व पंचनामा केला. तसेच पशूधन विकास अधिकारी, हिमायतनगर यांनी मृत बैलाचे पोस्ट मार्टम केले. अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे शॉक लागून मरण पावलेला बैल जर जिवंत असता तर या हंगामात अर्जदारास बैलामूळे रु.70,000/- शेतीचे उत्पन्न झाले असते. त्यामूळे त्यांचे कूटूंबावर आर्थिक संकट आले व अर्जदार यांचे उत्पन्न बूडाले, या अपघाताची माहीती अर्जदारानी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.20.11.2009, दि.5.12.2009 व कंपनीच्या भोकर येथील विभागीय कार्यालयास दि.4.12.2009 रोजी दिली व बैलाची नूकसान भरपाई रु.50,000/- मागणी केली. शेतक-याच्या हंगामात मिळणारे रु.70,000/- तसेच बैलाची किंमत रु.50,000/- असे एकूण रु.1,20,000/- मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे केली, पण आजतागायत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नूकसान भरपाई रक्कम दिली नाही. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे सदरचा अपघात हा नैसर्गिकरित्या झालेला आहे यात त्यांचे कोणतीही चूक नाही तसेच त्यांनी Ex-Gratia धर्तीवर रु.2000/- अर्जदारास दिलेले आहेत. पण त्यामूळे झालेल्या गोष्टीस ते जबाबदार आहेत असे नाही. बैलाचे पोस्ट मार्टम बददल किंवा शॉक लागलेला या बददल त्यांना कोणतीही माहीती नाही. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. पण या ठिकाणी अर्जदार यांनी पोलिस स्टेशन यांना दिलेला अर्ज, तसेच त्यांनी केलेला पंचनामा व हिमायतनगर येथे पशूधन विकास अधिकारी यांनी केलेले मृत बैलाचे शवविच्छेदन यावरुन बैल शॉक लागून मरण पावला ही गोष्ट समोर आलेली आहे. पश्चिमेकडील तणाव तारेस इन्सुलेटर नसल्यामूळे हा अपघात घडला हा निष्कर्ष यावरुन काढता येईल. अर्जदाराने दि.20.11.2009 रोजी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दिला होता तसेच दि.25.11.2010 रोजी अर्ज दिलेला होता. विद्यूत निरिक्षक विभाग नांदेड यांनी अर्जदारास एक पञ दि.4.12.2009 रोजी दिलेले आहे. “ “ त्यामध्ये दि.20.11.2009 रोजी सायंकाळी 5.00 च्या सुमारास गजानन प्रकाश तुपतेवारयांचा नोकर त्यांच्या बोरी रोड हिमायतनगर येथील शेतात शेताच्या कडेने बैल चारत होता. शेताच्या कडेला विहीर असून विहीरीवर शेतीपंपासाठी शेतात धु-यावर एक सिमेंट पोल आहे. त्यांस दोन तणाव तार आहेत.पश्चिमेकडील तणाव तारेला स्टे इन्सुलेटर नाही पोल वर मध्यमदाब कटपॉईट असून पश्चिमेकडील बाजूस सॉकेट आहे व उजवीकडील बाजूस कन्डंकटर डि क्लॅम्प मध्ये इन्सुलेटर टाकून कन्डकटर जोडलेला आहे व जम्पर वायर टाकून दोन्ही बाजूस कन्डेटर जोडलेले होते. त्यापैकी सर्वा वरच्या टॉप भागातील जम्परवायरवर पक्षी बसल्याने तो जम्पर उजव्या बाजूच्या डि क्लॅम्पच्या बाहेर आलेल्या बोल्टला स्पर्श झाले व तसेच चिकटून बसले त्यामूळे ब्रॅकेट व त्यामूळे तणाव तार विद्यूत भारीत झाली. तणाव तारेस इन्सुलेटर नसलयाने तणाव तार जमिनीपर्यत विद्यूत भारीत झाली. विद्यूत भारीत तणाव तारेस बैलाचा स्पर्श होताच त्यांस विजेचा जोराचा धक्का बसून तो बैल जागेवरच मरण पावला. ”” असे दिलेले आहे. बैल हा तणाव तारेस चिमणी नसल्यामूळे जो विज प्रवाह तारेमध्ये उतरला हे स्पष्ट होते. जर त्या भागाला चिमणी असती तर अर्जदाराचा बैल मरण पावला नसता व अर्जदाराचे नूकसान ही झाले नसते. पोलिस पंचनाम्यामध्ये अर्जदाराच्या बैलाची किंमत रु.45,000/- ते 50,000/- अशी लिहीलेली आहे. पूढील हंगामात किती उत्पन्न होईल यांचा अंदाज लावता येत नसल्यामूळे अर्जदाराच्या शेती उत्पन्नावर अंदाजावर नूकसान भरपाई देता येत नाही. म्हणून अर्जदारास बैलाची किंमत रु.45,000/- फक्त दयावी या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदारास गैरअर्जदार यांनी रु.45,000/- एक महिन्यात दयावेत, जर रु.2,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिले असतील तर ती रक्कम त्यातून वजा करावी व उर्वरित रक्कम दयावी. ही रक्कम एक महिन्यात न दिल्यास त्यावर रक्कम फिटेपर्यत 9 टक्के व्याज दयावे लागेल. 2. 3. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर, लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |