द्वारा : मा.सदस्य, श्री. कमलकांत ध.कुबल.
- प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवाला हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी असलेने ओढयाच्या ठिकाणी कोणतेही फलक अथवा धोक्याची सुचना दर्शविणारी माहिती न दर्शविल्याने अपघात घडून आला. सदर अपघाताला सर्वस्वी सामनेवाला हे जबाबदार असलेने त्यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे.
- तक्रारीचा थोडक्यत तपशील असा की, तक्रारदाराचे मालकीची तवेरा गाडी क्र.MH-12-CY-7403 असा होता. सदर गाडीवर श्री विजय लक्ष्मण खोत रा.थबडेवाडी ता.कवठे महांकाळ, जि.सांगली हे चालक म्हणून कार्यरत होते. दि.30/05/2011 रोजी कवठे महांकाळ येथून 10 व्यक्तींना घेऊन कोकणातील (रत्नागिरी) मार्लेश्वर येथे देवदर्शनाला गेले होते. त्याचदिवशी संध्याकाळी 4.00 वा.चे सुमारास मारळ ते मार्लेश्वर असा प्रवास करत असताना मारळ गावाचे हद्दीत खोडयाचा प-या येथे गाडी आली असताना सदरचे ओढयाच्या ठिकाणी समोरुन येणा-या गाडीला साईड देताना तक्रारदाराचे चालकाने अंदाज न आलेने तसेच ओढयाचे पुलाला कठडा नसलेने तक्रारदाराची गाडी 20 फुट खाली कोसळून अपघात झाला. त्यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. अन्य प्रवासी जखमी झाले. तक्रारदाराचे म्हणणे असे की, सदर अपघाताची जागा वळणाची तसेच रस्त्यावर झुडपे वाढलेली असून संरक्षक कठडा नाही. त्याचप्रमाणे सामनेवाला यांचे अखत्यारितील सदर रस्ता असलेने त्याची देखभाल तसेच दिशादर्शक किंवा वस्तुस्थिती दर्शक फलक/ बोर्ड तथा माहिती त्याठिकाणी लावली नव्हती. त्यामुळे सदर अपघातास शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामनेवाला क्र. 1 ते 5 जबाबदार आहेत. तक्रारदार रोड टॅक्स भरत असलेने त्याप्रमाणे सेवा देणेचे काम सामनेवाला यांचे होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरणेत येऊन गाडीतील प्रवाशांचे वारसांनी तक्रारदार यांचेवर अन्य न्यायालयाव्दारे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. ती नुकसान भरपाईसुध्दा मिळावी म्हणून एकूण रक्कम रु.18,05,000/- चा दावा सदर मंचासमोर दाखल केला आहे. सदर म्हणणेच्या पुष्टयर्थ नि. 5 वर एकूण 25 कागदपत्रे फोटोसह मंचासमोर सादर केली आहेत.
- सामनेवाला क्र. 1 ते 5 पैकी जिल्हाधिकारी, रत्नागिरी, डेप्युटी इंजिनिअर, सार्वजनिक बांधकाम, देवरुख , मुख्याधिकारी,जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी रजिस्टर पोष्टाने पाठविलेली नोटीस स्विकारलेली आहे. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते रत्नागिरी व उपअभियंता, पंचायत समिती देवरुख, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी यांनी सदरची नोटीस घेणेचे नाकारलेले आहे. पर्याप्त परिस्थितीत सामनेवाला क्र. 1 ते 5 यांनी मंचासमोर हजर राहून आपले म्हणणे लेखी अथवा तोंडी स्वरुपात मांडलेले नाही. त्यमाुळे नि.1 वर मंचाने एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.
- तक्रारदाराची लेखी तक्रार, शपथपत्र तसेच त्यांनी सादर केलेला पुरावा, फोटो. त्याचप्रमाणे नि.5/17 वर सादर केलेले तक्रारदार हे ग्राहक असलेबाबतची कागदोपत्री पुरावादेखील सादर केलेला आहे.
- उपरोक्त सर्व गोष्टींचे अवलोकन केले असता मंचासमोर तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येतात का ? | होय |
2 | सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय? | होय अंशत: |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशानुसार मंजूर |
6) मुद्दा क्र.1 ते 3
स्पष्टीकरण :- तक्रारदार यांचे मालकीचे सदर वाहन असलेने शासन नियमाप्रमाणे त्या वाहनाचा रोड टॅक्स शासन तिजोरीत भरलेला आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवादेणार असे नाते निर्माण होत असलेचे दिसून येते. त्यामुळे पर्यायाने तक्रारदार सामनेवाला क्र. 1 ते 5 यांचे ग्राहक ठरेल असे या मंचाचे मत आहे.
7) सामनेवाला क्र.1 ते 5 हे शासन प्रतिनिधी आहेत. अपघाताचे ठिकाणी ओढा असून त्या ठिकाणी संरक्षक कठडा किंवा लोखंडी रॅली बसवणे अत्यावश्यक होते. किंबहूना धोकादायक वळण ओढा इत्यादी ठिकाणी फलक लावणे संबंधीत खात्याकडून अपेक्षीत होते. तसेच फलक / माहिती संबंधीत खात्याने लावली नाही. त्यामुळे त्यांचे सेवेतील त्रुटी ठरते. मात्र फलक नव्हता म्हणून अपघात झाला असे तत्वता मान्य करता येत नाही. यामध्ये चालकाचे वाहनावरील नियंत्रण किंवा वेगही नियंत्रीत नसलेने कोकणातील वळणावळणाच्या रस्त्याचा अंदाज चालकाला न आलेनेसुध्दा अपघात होऊ शकतो असे या मंचास वाटते. मात्र सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी अपघाताचे ठिकाणी धोका दर्शविणारे किंवा वेग मर्यादेचे बोर्ड लावणे आवश्यक होते. त्यामध्ये त्यांनी कसुरता केली असलेने अपघाताचे काही प्रमाणात कारण होऊ शकते. त्यामुळे तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई अंशत: मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
8) सामनेवाला क्र. 1 ते 5 हे शासन प्रतिनिधी असून त्यांनी मंचाची नोटीस मिळालेनंतर आपले म्हणणे, लेखी पुरावा सादर करणे आवश्यक होते. मंचासमोर त्यांनी आपले कोणतेही लेखी म्हणणे सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे. शासनाचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून मंचासमोर हजर होऊन त्याबाबत आपले म्हणणे अथवा खुलासा त्यांना करता आला असता, मात्र त्यांनी न केलेने कर्तव्यात कसूर केलेचे दिसून येते. म्हणून त्या कसुरतेची दाखल हे न्यायमंच दंडनीय स्वरुपात करणेचे निर्णयाप्रत हे मंच आले आहे.
9) दाखल केलेले कागदपत्रावरुन तक्रारदाराचे विरुध्द अन्य कोर्टामध्ये संबंधीत अपघातातील मृतांचे वारसांनी नुकसान भरपाई दावा दाखल केला आहे असे दिसून येते व त्यासंदर्भात वारसांना तक्रारदाराकडून दयावी लागणारी नुकसान भरपाई ग्राहक मंचाचे माध्यमातून मिळणेचा तक्रारदाराचा हेतू योग्य वाटत नाही तसेच तो कायदयानेदेखील मान्य करता येणार नाही. त्याकरिता योग्य त्या अधिपत्याखाली असलेल्या न्यायालयाचा अवलंब तक्रारदाराने करणे आवश्यक आहे. मात्र एका न्यायालयाने दिलेली नुकसान भरपाईची मागणी ग्राहक न्यायमंचाकडून अपेक्षीत करणे सर्वथा चुकीचा व कायदयास अभिप्रेत नाही. म्हणून ती मागणी योग्य व कायदेशीर नसलेने हे मंच फेटाळत आहे.
10) उपरोक्त सर्व मु्द्दयांचा विचार करता हे मंच तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1.तक्रारदाराची तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
2.सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार फक्त) दयावेत.
3. सामनेवाला क्र. 1व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) दयावी.
4.सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी अदा करावेत.
5. अपघाताचे ठिकाणी सामनेवाला क्र. 1, 2 व 4 यांनी तात्काळ सुचना फलक लावावेत असे त्यांना निर्देश देणेत येतात.
6. सामनेवाला क्र. 3 व 5 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
7.या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात/पाठविण्यात याव्यात.