(घोषित दि. 17.12.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदार हे गैरअर्जदार वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे व नियमितपणे वीज बिलाचा भरणा केला आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 15.01.2005 रोजी त्यांना 15,300/- रुपयाचे वीज बिल आकारले या चुकीच्या बिलाबाबत त्यांनी दिनांक 11.03.2005 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर गैरअर्जदार यांनी सतत चुकीच्या बिलाची आकारणी केली. अर्जदाराच्या म्हणण्यानूसार त्यांनी वीज बिलापोटी 29,000/- रुपये भरलेले आहे. दिनांक 25.01.2012 रोजी त्यांना 1,09,310/- रुपयाचे वीज बिल दिले व दिनांक 30.01.2012 रोजी त्यांचे वीज मीटर काढून नेले. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांना सुधारीत वीज बिल देण्याची व खंडीत केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीसोबत गैरअर्जदार यांना दिलेली तक्रार, वीज बिले इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
अर्जदाराने गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याबाबत अंतरिम आदेश देण्याचा विनंती अर्ज तक्रारी सोबत दाखल केला आहे. मंचाने दिनांक 30.03.2012 रोजी या प्रकरणी सुनावणी घेऊन अर्जदाराने वीज बिला पोटी 30,000/- रुपये भरावे व गैरअर्जदार यांनी त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा असा अंतरिम आदेश पारित केला.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आलेला असल्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत बसत नाही. त्याच प्रमाणे त्यांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदाराने त्यांना देण्यात आलेली वीज बिले नियमितपणे भरलेली नाहीत. अर्जदाराकडे ऑगस्ट 2012 मध्ये 1,09,309.46 एवढी थकबाकी होती. वीज बिल न भरता वीज पुरवठा सुरु रहावा हा उद्देश ठेऊन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510030206752 असा असून मीटर क्रमांक 9000416050 असा आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबासोबत फेब्रूवारी 2004 ते ऑगस्ट 2012 या कालावधीचे सी.पी.एल. दाखल केले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केले असता अर्जदारास मीटरवरील रिडींग प्रमाणे वीज बिल देण्यात आल्याचे दिसून येते. फेब्रूवारी 2004 या महिन्यात अर्जदाराकडे 12,358.41 रुपये थकबाकी होती. एप्रिल 2004 ते फेब्रूवारी 2009 या काळात अर्जदाराने वीज बिलापोटी कोणतीही रक्कम भरलेली दिसून येते नाही. दिनांक 30.03.2009 रोजी त्यांनी 55,074.69 या वीज बिलाच्या थकाबाकी पोटी 5,000/- रुपये भरले असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर 2011 पर्यंत वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येते नाही. दिनांक 25.10.2011 रोजी 10,000/- रुपये वीज बिलापोटी भरल्यानंतर ऑगस्ट 2012 पर्यंत त्यांनी कोणतीही रक्कम भरलेली नाही. ऑगस्ट 2012 मध्ये अर्जदाराकडे 1,09,309.46 एवढी रक्कम थकबाकी असल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास योग्य बिल आकरणी केल्याचे दिसून येते. त्यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेत त्रुटी असल्याचे दिसून येत नाही.
आदेश
- अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल आदेश नाही.