ग्राहक तक्रार क्र. 152/2013
दाखल तारीख : 11/11/2013
निकाल तारीख : 24/04/2015
कालावधी: 01 वर्षे 06 महिने 14 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.गंगाधर निलप्पा जवळे,
वय - 46 वर्षे, धंदा – काही नाही, रा. बँक कॉलनी,
उस्मानाबाद, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी डिस्ट्रीब्युशन,
कं. लि. उसमानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
2) उप कार्यकारी अभियंता,
म. स्टे इ.डि. कं. लि. उस्मानाबाद.
3) कनिष्ठ अभियंता,
म. स्टे. इ. डि कं. लि. शहर शाख क्रमांक-4
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. एस.एस. तानवडे.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी, यांचे व्दारा.
अ) विरुध्द पक्षकार (विप) विद्युत कंपनीने तक्रारकर्ता (तक) ने घरामध्ये छोटेसे दुकान चालविल्याबद्दल व्यावसायिक दराने वीज बिल देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून तक याने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारी अर्जातील कथन थेाडक्यात पुढीलप्रमाणे.
1. तक याचे बँक कॉलनी उस्मानाबाद येथे घर असून घरगुती वीज वापरासाठी विप कडून वीज जोडणी घेतली त्याचा ग्राहक क्र.590010034827 (जुना क्र.3482) असा आहे. तक याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उदनिर्वाहासाठी पत्नीच्या नावाने दि.29/11/2011 पासून घरगुती किराणा दुकान चालू केले. विप यांनी तक ला कोणतीही कल्पना न देता घरगुती जोडणी ही व्यावसायिक जोडणी म्हणून धरुन ऑक्टोबर 2011 पासून चुकीचे बिल दिले व दंड लावला. दि.27/11/2012 रोजी विप यांनी विचारणा केली असता तक कडून मिटर तपासणीचे 150 रुपये भरुन घेतले त्यानंतर मिटरची गती जास्त असल्याचे सांगून दि.25/12/2012 रोजी नवीन मिटर दिले. मात्र बिलावर जुना मिटर क्र. 2155 टाकून रु.26,980/- चे चुकीचे बिल दिले. तक ने चौकशी केली असता विप यांनी दि.26/03/2013 रोजी बिल बरोबर आहे असे सांगितले. दि.19/06/2012 पर्यंत तक ने वेळोवेळी बिलापोटी रु.42,000/- भरलेले आहेत. दि.27/05/2013 रोजी तक नातेवाईकाचे अंत्यसंस्कासाठी बाहेरगावी गेला असता विप यांनी त्याचा वीज पुरवठा खंडीत केला. दि.29/05/2013 रोजी तक ने विप कडे अर्ज दिलेला आहे. त्यावर तक चा वीज पुरवठा चालू करण्यात आला. विप यांचे दि.16/07/2013 चे परिपत्रकाप्रमाणे घरातच छोटासा व्यवसाय करणा-यांना घरगुती दरानेच वीज बिल देय होते त्याप्रमाणे 01 ऑगस्ट 2012 पासून घेतलेली जादा रक्कम पुढील बिलात समायोजित करण्याची आहे. तक मधूमेहाचा रुग्ण असून त्याला अर्धांगवायूचा झटका व हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. विप च्या कृत्यामुळे त्याच्या मनावर व शरीरावर वाईट परीणाम झालेला आहे. तरी विप यांनी बेकायदेशीर दिलेले बिल रद्द करावे व दुरुस्त बिल दयावे तसेच त्रासापोटी व तक्रारी खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून ही तक्रार दि.11/11/013 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने वीज बिलांच्या प्रती, बिल भरलेल्या पावत्या, दि.29/05/2013 चे अर्जाची प्रत, दुकानाच्या नोंदणी दाखल्याची प्रत, मिटर तपासणीच्या पावतीची प्रत, दि.10/09/2013 चे दै. सकाळ या अंकाची प्रत हजर केलेली आहे.
ब) विप यांनी हजर होऊन दि.10/01/2014 रोजी मंचाच्या अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप चे म्हणणे आहे की फेब्रूवारी 2012 मध्ये तक च्या मिटरची प्रत्यक्ष तपासणी केली असता घर वापराकरीता घेतलेला विदयुत पुरवठा दुकानाकरीता वापरात असल्याचे आढळून आले. तक चे मिटर योग्य असल्यामुळे त्याचे मिटरची तपासणी करण्याचा प्रश्न उदभवत नाही. तक याला वीज चोरीचे बिल रु.1,210/- चे देण्यात आलेले होते. जूलै 2012 पासून तक बिलाची पूर्ण रक्कम न भरता कमी रक्क्म भरत आहे. तो थकबाकीत असल्यामुळे विदयुत पुरवठा खंडीत करणे भाग पडले. विप ने तक ला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. तक ला वीज चोरीचे बिल दिले असल्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार येत नाही. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. असे नमूद केले आहे.
क) तक ची तक्रार, त्याने दाखल केलेली कागदपत्रे, विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली ओहे काय ? होय.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1. तक चे म्हणणे आहे की विप ने त्याला कल्पना न देता ऑक्टोबर 2011 पासून घरगुती जोडणीचे रुपांतर व्यावसायीक जोडणीमध्ये केले व दंड रु.14,500/- लावला. जे पहिले बिल हजर करण्यात आलेले आहे ते दि.20/12/2012 ते 20/01/2013 या कालावधीचे आहे त्यामध्ये चालू रीडिंग उपलब्ध नाही, मागील रीडिंग 18,418/-, वापरलेले युनिट 208/-, चालू बिल रु.2,133/-, मागील बाकी रु.27,950/- अशा प्रकारचे बिल दिलेले आहे. मागील 11 महिन्यांचा वीज वापर युनिटमध्ये 152, 224, 223, 193, 182, 274, 733, 142, 170, 142, 225 असा दाखविलेला आहे.
2. विप चे म्हणण्याप्रमाणे फेब्रूवारी 2012 मध्ये विप तर्फे प्रत्यक्ष तपासणी केली असता तक हा दुकानासाठी अनधिकृतरित्या वीज वापरत असल्याचे आढळून आले. म्हणून त्याला वीज चोरीचे बिल रु.1,210/- देण्यात आले. जर ते वीज चोरीचे बिल असेल तर या मंचास त्याचा विचार करता येणार नाही. तक चे म्हणण्याप्रमाणे त्याचे पत्नीचे नावे घरात दि.29/11/2011 पासून घरगुती स्वरुपाचे किराण दुकान चालू केलेले आहे. मात्र विप ने त्याला त्याबद्दल रु.14,500/- दंड लावलेला आहे. तक तर्फे आता दि.05/09/2012 चे परिपत्रक क्र.175 ची प्रत हजर केलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र इलेक्ट्रीसीटी रेग्यूलेटरी कमिशन ने निर्णय केला की दि.1 ऑगस्ट 2012 पासून जे ग्राहक आपल्या घरात छोटा व्यवसाय करतात व दरमहा 300 युनिट पेक्षा कमी व दरसाल 3600 युनिट पेक्षा कमी युनिट वापरतात त्यांना घरगुती वापराप्रमाणेच बिल आकारायचे आहे.
3. तक ची अशीही तक्रार आहे की विप ने दि.25/12/2012 रोजी मिटर तपासणी केली मिटर अधीक गतीने चालत असल्यामुळे मिटर बदलले मात्र पुन्हा रु.26,980/- चे चुकीचे बिल दिले. तसेच त्याच्या अपरोक्ष दि.27/05/2013 रोजी वीज पुरवठा खंडीत केला. दि.19/06/2012 पासून तक ने वेळोवेळी रु.42,000/- भरलेले आहेत. जानेवारी 2013 चे रु.30,123/- चे बिल दुरुस्त करुन रु.5,310/- चे बिल दिल्याचे दिसते. मात्र मे, जून, जूलै, सप्टेंबर या महिन्यांच्या बिलांमध्ये पुन्हा थकबाकीची रक्कम दाखविलेली आहे पैकी जून च्या बिलामध्ये दुरुस्ती करुन रु.1,120/- चे बिल दिल्याचे दिसते. पुढच्या बिलात पुन्हा थकबाकी असल्याचे दाखविलेले आहे. तक तर्फे दि.19/06/2012 ची रु.17,000/- ची, दि.20/07/2012 ची रु.9,000/- ची, दि.19/02/2013 ची रु.5,310/- ची, दि.30/03/2013 ची रु.2,000/- ची दि.07/06/2013 ची रु.2,240/- ची दि.22/07/2013 ची रु.1,100/- ची एवढया पावत्या हजर करण्यात आलेल्या आहेत.
4. सप्टेंबर 2013 च्या बिलामध्ये पुन्हा थकबाकी रु.26,491/- ची मागणी करण्यात आलेली आहे. तक चा वीज वापर दरसाल 3,600/- पेक्षा कमी युनिट दिसून येतो तरीही त्याला विप ने व्यावसायिक बिल दिल्याचे दिसून येते. तक ने वेळोवेळी वीज बिल भरुनही विप ने परिपत्रकाच्या विपरीत व्यावसायिक दराने बिलाची मागणी केल्याचे दिसून येते म्हणजेच विप ने सेवेत त्रुटी केली आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत
1) विप ने दि.01/08/2012 पासून तक ला व्यवसायिक दराने दिलेले बिल रद्द करण्यात येते.
2) विप ने तक ला दि.05/09/2012 चे परिपत्रक क्र.175 प्रमाणे घरगूती दराने प्रत्यक्ष वापराप्रमाणे बिल द्यावे.
3) तक ने भरलेली अधीकची रक्कम पुढील बिलात समायोजीत करावी.
4) विप ने तक ला या तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.