(घोषित दि. 28.06.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांनी शेती पंपासाठी वीज पुरवठा घेतला आहे. वादळामुळे गैरअर्जदार यांनी बसविलेले पोल व तारा तुटल्यामुळे त्यांनी ते दुरुस्त करुन देण्याबाबत गैरअर्जदार यांना विनंती केली. परंतू गैरअर्जदार यांनी ते दुरुस्त करण्यासाठी अर्जदारास रक्कम मागितली. अर्जदाराने त्यापोटी भरलेली रक्कम परत मागितली असता गैरअर्जदार यांनी नकार दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची मौजे दावलवाडी येथे शेतजमिन आहे. गैरअर्जदार यांच्याकडून त्यांनी शेतीसाठी वीज पुरवठा घेतला आहे. इ.स. 2006 मध्ये आलेल्या वादळात त्यांच्या शेतीपंपासाठी वीज पुरवठा करणारी लाइन व पोल पडले व त्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार यांना वीज पुरवठा सुरु करण्याबाबत तक्रार केली आहे. दिनांक 22.09.2009 रोजी तहसिल कार्यालयामध्ये याचा पंचनामा देखील करण्यात आला. गैरअर्जदार यांनी दिनांक 26.11.2011 रोजी त्यांना 27720/- रुपयाचे वीज बिल दिले व ते भरल्यास वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी लागणारे पोल व वायर लावण्यात येतील असे सांगितले. अर्जदाराने ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्याकडे सहा पोल पाठविले पण त्याबरोबर वायर व इतर साहित्य पाठविले नाही. त्यामुळे त्यांचा वीज पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून गैरअर्जदार यांना नुकसान भरपाई देण्याबाबत तसेच काम पुर्ण करुन वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्याबाबत आदेश देण्याची विनंती अर्जदाराने मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत गैरअर्जदार यांना दिलेल्या तक्रारीच्या प्रती, तहसील कार्यालया मार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्याची प्रत, रक्कम भरल्याची पावती इत्यादी कागदपत्रे सोबत जोडली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने चुकीची तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने 27720/- रुपये वीज बिलापोटी भरलेले असून ते योग्य असल्याचे व अर्जदाराच्या वीज वापरानुसार असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन,
- अर्जदाराची मौजे दावलवाडी येथे गट नंबर 139/1/5 मध्ये शेत जमिन असल्याचे नि.क्र.2/1 वरील 7/12 च्या उता-या वरुन दिसून येते.
- अर्जदाराच्या शेतावर विहीर असून त्यांनी शेती पंपासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज जोडणी घेतली आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 510040003345 असा आहे.
- दिनांक 06.05.2006 रोजी वादळी वारे व पावसामुळे अर्जदारास वीज पुरवठा करणारे खांब व वीजेच्या तारा तुटून पडल्या त्यामुळे अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत झाला. नि.क्र.2/2 वर सी व डी फॉर्म दाखल केला आहे. त्यामध्ये सब इंजिनिअर, शेलगाव युनिट, एम.एस.इ.बी, जालना यांनी गट नंबर 139/1/5 गट नंबर मधील वीज जोडणी मध्ये काय नुकसान झाले आहे याचे विवरण दिलेले आहे. अर्जदाराने दिनांक 20.09.2009 रोजी तलाठी दावलवाडी, यांनी केलेला स्थळ पंचनामा दाखल केला असून त्यात पोल व वायर तुटलेल्या अवस्थेत असून वीज पुरवठा खंडीत असल्याचे नमूद केलेले दिसून येते.
- अर्जदाराने खंडीत वीज पुरवठा पुन्हा जोडणी करुन देण्यात यावा. याबद्दल गैरअर्जदार यांना दिनांक 02.08.2006, 15.12.2008, 20.03.2009, 21.01.2011, 13.04.2012 रोजीच्या पत्राद्वारे वेळोवेळी कळविल्याचे दिसून येते. (नि.क्र.2/3, 2/4, 2/5, 2/6) या पत्रामध्ये अर्जदाराने वीज खंडीत झाल्यामुळे शेतीला पाणी देता येत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने सदरील पत्राची पोहोच पावती मंचामध्ये दाखल केलेली आहे. (नि.क्र.2/7)
- अर्जदाराने दिनांक 26.11.2011 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे 27720/- रुपये भरले असल्याचे नि.क्र.2/13 वरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी सदरील बिल हे अर्जदाराने वापरलेल्या वीज बिलापोटी असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार सदरील वीज बिल हे त्यांनी न वापरलेल्या वीजेचे आहे. सदरील वीज बिल अर्जदाराने भरले असून ते पोल व वायर दुरुस्तीसाठी नसून वीज बिलापोटी भरले असल्याचे वीज बिलावरुन स्पष्ट होते.
- अर्जदाराने केलेल्या अनेक तक्रारीनंतर गैरअर्जदार यांनी पोल व वायर उभारणीसाठी अंदाजपत्रक दिले असून त्यास गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 21.11.2011 रोजी मान्यता दिली असल्याचे नि.क्र.2/9 च्या पत्रावरुन दिसून येते.
- पोल उभारणीसाठी मंजूरी मिळाल्यानंतर पोल येऊन पडल्याचे अर्जदाराने सुनावणी दरम्यान सांगितले. परंतू अजूनही ते उभारले गेले नाहीत व वीज पुरवठा सुरु झाला नसल्याचे सांगितले.
वरील सर्व निरीक्षणावरुन हे स्पष्ट होते की, अर्जदाराकडील वीज पुरवठा 2006 मध्ये खंडीत झाला. अर्जदाराने यासाठी स्मरणपत्रे दिलेली आहेत. त्यांनतर 2011 मध्ये म्हणजेच तब्बल 5 वर्षानंतर त्यास मान्यता मिळते परंतू आज 2013 मध्येही अर्जदाराचा वीज पुरवठा सुरु झालेला नाही. यावरुन संबंधित विभागाच्या ढसाळ व बेजवाबदार कारभाराची प्रचिती येते. महावितरण कडूनच ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांना अन्य पर्याय नसल्यामुळे दुसरीकडून वीज उपलब्ध करुन घेता येत नाही. महावितरण तर्फे त्यांना प्राप्त झालेल्या एकाधिकारशाहीमुळे वीज ग्राहकांना कसे वेठीस धरले जाते याचे ही तक्रार म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे. एखाद्या ग्राहकाचा खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी 7 वर्षाचा कालावधी लागणे ही दुर्मिळ घटना आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या रेग्युलेशनमध्ये वीज पुरवठा खंडीत राहिल्यास ग्राहकास नुकसान भरपाई देण्याचे प्राविधान आहे.
अर्जदाराच्या शेतावर विहीर असल्याचे सात बाराच्या उता-यावरुन दिसून येते. अनेक पिके पाण्याअभावी घेता येत नाही. अर्जदाराने यासंबंधी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत, परंतू सात वर्ष विद्युत पुरवठा नसल्यामुळे निश्चितच आर्थिक नुकसान झाले असेल. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा खंडीत वीज पुरवठा 10 दिवसात जोडून द्यावा.
- वरील आदेशाचे पालन न केल्यास 10 दिवसानंतर प्रतिदिन रुपये 100/- या प्रमाणे अर्जदारास गैरअर्जदार यांनी विलंब दंड द्यावा.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अर्जदारास आर्थिक नुकसान, मानसिक त्रास याबद्दल रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार 1 ते 3 यांनी अर्जदारास खर्चाबद्दल रुपये 1500/- (रुपये एक हजार पाचशे फक्त)30 दिवसात द्यावे.