(घोषित दि. 21.09.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने वीज जोडणी दिल्यापासून कधीही मिटर रिडींग प्रमाणे देयके दिली नाहीत. वीज वितरण कंपनीने नेहमीच चुकीची देयके दिली. म्हणून त्याने वीज वितरण कंपनीकडे वारंवार प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसार देयके मिळावीत अशी मागणी केली. परंतू वीज वितरण कंपनीने त्यास प्रतिसाद दिला नाही. तरी देखील त्याने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी देयकांचा भरणा केला आणि त्याच्याकडे कोणतीही थकबाकी नव्हती. परंतू वीज वितरण कंपनीने त्यास अचानक रुपये 10,490/- चे अवाजवी देयक दिले. सदर देयक दुरुस्त करावे आणि योग्य देयक द्यावे अशी त्याने वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. परंतू वीज वितरण कंपनीने योग्य देयके दिली नाही. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की त्यास वीज वितरण कंपनीने सुरुवाती पासून दिलेली चुकीची देयके दुरुस्त करावीत आणि रिडींग नुसार देयके देण्याबाबत वीज वितरण कंपनीला आदेश द्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी. वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, त्यांनी अर्जदाराला नेहमीच योग्य देयके दिलेली असून अर्जदाराने दिनांक 12.03.2010 रोजी रुपये 160/- भरले त्यावेळी त्याच्याकडे रुपये 18,229/- बाकी होते. अर्जदाराने देयकाची संपूर्ण रक्कम भरली नाही. अर्जदाराला त्याच्या वीज वापरा नुसारच देयके दिलेली आहेत. अर्जदाराने थकबाकीची रक्कम भरावी लागू नये या उद्देशाने ही तक्रार दाखल केलेली असून त्यास तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास चुकीचे देयके देवून त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.एन.के.कुहिरे आणि गैरअर्जदारांच्या वतीने अड. जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 06.05.2008 रोजी वीज जोडणी दिलेली आहे. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वीज जोडणी दिल्यानंतर जुन 2008 मध्ये त्याचा वीज वापर 955 युनिट दर्शवून रक्कम रुपये 5,451/- चे देयक दिले होते. ही बाब गैरअर्जदार वीज वितरण कंपीनीने दाखल केलेले सी.पी.एल. नि. 12/1 वरुन दिसून येते. त्यानंतर वीज वितरण कंपनीने जूलै 2008 पासून ऑगष्ट 2009 पर्यंत दरमहा सरासरी 955 युनिट वीज वापरानुसारच तक्रारदाराला देयके दिली होती आणि सप्टेबर 2009 मध्ये 1910 युनिट वीज वापरानुसार देयक दिले. तक्रारदाराच्या मीटर मधील सप्टेबर 2009 मध्ये नोंदविण्यात आलेली रिडींग 662 अशी होती. तक्रारदाराचे मीटर मे 2008 मध्ये बसविण्यात आल्यानंतर सप्टेबर 2009 मध्ये त्याच्या मीटर मधील रिडींग 662 अशी असल्यामुळे त्याचा मे 2008 ते सप्टेबर 2009 या कालावधीतील वीज वापर केवळ 661 युनिट झाल्याचे स्पष्ट दिसते. परंतू वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मे 2008 पासून ऑगष्ट 2009 पर्यंत दरमहा 955 युनिट सरासरी वीज वापरानुसार देयके दिली आणि सप्टेबर 2009 मध्ये 1910 युनिट वीज वापराचे देयक दिले. यावरुन वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वीज जोडणी दिल्यापासून सप्टेबर 2009 पर्यंत प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार देयके न देता अवाजवी वीज वापर दर्शवून देयके दिल्याचे स्पष्ट दिसून येते. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वेळोवेळी सरासरी 955 युनिट वीज वापरानुसार देयके दिल्यानंतर जुलै 2009 मध्ये त्यास देण्यात आलेल्या देयकामधून जवळपास 73,000/- रुपये कमी केले. परंतू ऑगष्ट 2009 आणि सप्टेबर 2009 मध्ये पुन्हा सरासरी नुसारच चुकीची देयके दिली आणि त्यामुळे पुढील देयकांमध्ये थकबाकीची रक्कम वाढत गेली. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वेळोवेळी मीटर रिडींग न घेता चुकीच्या सरासरीनुसार देयके दिल्याचे सी.पी.एल. नि.12/1 वरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराला प्रत्यक्ष रिडींग नुसारच देयके दिली होती या गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या म्हणण्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वीज जोडणी दिल्यापासून नेहमीच चुकीची देयके दिल्याचे वीज वितरण कंपनीनेच दाखल केलेल्या सी.पी.एल. नि.12/1 वरुन सिध्द् होते. सदर बाब वीज वितरण कंपनीच्या सेवेतील त्रुटीच आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला (ग्राहक क्रमांक 510030449337) मे 2008 ते एप्रिल 2011 पर्यंत दिलेली सर्व देयके रद्द करण्यात येतात.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास मे 2008 ते एप्रिल 2011 या कालावधीसाठी फक्त 1829 युनिट वीज वापराबद्दल दरमहा वीज वापराची योग्य विभागणी करुन स्लॅब बेनिफीटसह सुधारीत देयक निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावे आणि एप्रिल 2011 नंतर दिलेली सर्व देयके सुधारीत देयकाच्या अनुषंगाने दुरुस्त करुन द्यावीत. तसेच तक्रारदाराने मे 2008 पासून आजपर्यंत भरलेली रक्कम त्याच्या सुधारीत देयकामध्ये समायोजित करावी.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- निकाल कळाल्या पासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा सदर रक्कम त्याच्या सुधारीत देयकामध्ये समायोजित करावी.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |