जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, चंद्रपूर
ग्राहक तक्रार क्र. :- २१०/२०१५
नोंदणी दिनांक :- १६.११.२०१५
निर्णय दिनांक :- २५.०१.२०१८
निर्णय कालावधी :- २ व.२म.८ दि.
अर्जदार :- विनोद गजानन अहिरकर,
वय – ४७ धंदा – शेती,
रा. नांदगाव,
ता. मुल, जि. चंद्रपुर
:: वि रु ध्द ::
गैरअर्जदार :- १. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं. बाबुपेठ,
चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर
२. उप अभियंता,
सं व सु. उपविभाग, म.रा.वि.वि.कं.
सब डिविजन,
सावली, ता. सावली, जि. चंद्रपूर.
अर्जदार तर्फे :- श्री. सत्तार शेख, वकील
गैरअर्जदार तर्फे :- श्री. देवतळे, वकील
गणपुर्ती :- उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
१. गैरअर्जदार यांनी, अर्जदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा उपरोक्त पत्त्यावर राहात असून त्याच्या घरी विद्युत मीटर लावले असून त्याचा ग्राहक क्रमांक ४५३५५०००४८८१ असा आहे. गैरअर्जदार क्र. १ हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्या देखरेखीत संपूर्ण जिल्ह्याचे वीज वितरण प्रणालीचे तसेच वीज वितरण संबंधातील सेवा करण्याचे कार्य चालते. गैरअर्जदार क्र. १ हे उप विभाग सावली अंतर्गत येणाऱ्या परिसरात वीज वितरण व त्या संदर्भातील वसुलीचे व इतर कामे पाहतात. अर्जदार हा मीटर क्र. ६५०६५६८१२४ चे रीडिंग नुसार येणारे बिल नियमित भरणा करीत असतो व त्यानुसार बिल अदा केल्याच्या रसीदा त्याच्याकडे आहेत. अर्जदार माहे जुलै २०१५ पर्यंत सदर विद्युत मीटरचे बिल सरासरी ७३ युनिट नियमितपणे येत होते. सन २०१२ पासून अर्जदाराचे मिटर चुकीचे रीडिंग दाखवत असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक २ कडे बरेच वेळा तक्रारी केल्या. परंतु गैरअर्जदार क्रमांक २ यांनी सदर तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. सन २०१२ मध्ये मीटर बिल हे आर एन ए या नावाखाली गैरअर्जदार भरणा करीत होते. सन २०१५ पासून मीटर रीडिंग INACCESS या नावाखाली देत होते. त्यावेळेस अर्जदाराचे बील ७०० ते १००० पर्यंत येत होते. माहे जुलै २०१५ पर्यंत गैरअर्जदार हे अर्जदारास INACCESS नावाखाली देत होते. दिनांक २९.०७.२०१५ रोजी एक दस्ता अर्जदाराच्या घरी आले त्यांनी दामिनी पथक हे नाव सांगून मीटर तपासुन गेले. त्यावेळेस अर्जदार घरी नव्हते, ११.०८.२०१५ रोजी अर्जदारास आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा अर्जदाराला रुपये २,१९,५३० रुपयांचे बिल मिळाले. सदर बिलासोबत कोणतीही रीडिंग दिलेली नाही. दिनांक १२.१०.२०१५ रोजीच्या गैरअर्जदाराच्या पत्रानुसार एक दामिनी पथक अर्जदाराच्या घरी गेले होते व त्यांनी मीटरचे केले त्यावेळेस इलेक्ट्रिक मीटरची रिडींग २३९५४ अशी होती, असे सदरच्या पत्रात नमूद आहे. अर्जदाराच्या घरी अर्जदार शिवाय कोणी रहात नाही. अर्जदाराचे कुटुंब नागपूर येथे राहते. एका घरगुती मीटरचे बिल २,१९,५३० येणे अशक्य आहे. अर्जदाराने मीटर बद्दल बरेच वेळा तक्रारी केल्या परंतु, सन २०१२ पासून गैरअर्जदार हे सरासरी बिल काढत आहेत. त्यामुळे सदरील बिल हे खोटे व बनावट आहे. माहे जुलै २०१५ मध्ये अर्जदार घरात एक महिना राहीले तरीसुद्धा एकट्या माणसासाठी एवढे बिल येणे शक्य नाही. त्यांनी सदर बिल बद्दल कंपनीकडे तक्रार केल्यामुळे विज कंपन्यांचे कर्मचाऱ्यांनी टेस्टिंगसाठी आले. सदर मीटरची पडताळणी करून गैरअर्जदार यांनी पडताळणी अहवाल पाठवला आणि त्यात स्पष्ट नमूद आहे की, सदर मीटर समाधान कारक आढळला. त्यामुळे रुपये २,१९,५३० रुपयांचे बिल येणे शक्य नाही. पथकाने केलेली कारवाई ही चुकीची खोटी व बेकायदेशीर आहे. सबब, अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक ०१.१०.२०१५ रोजी नोटीस पाठवून बिल रद्द करण्यास कळविले. परंतु गैरअर्जदाराने सदर बिल रद्द केले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक १०.११.२०१६ रोजी ८४,९९० रुपयाचे तथाकथित खोटे बिल देऊन विद्युत बिलाचा भरणा करून घेतला. एवढेच नव्हे तर दिनांक ०४.०१.२०१७ रोजी पत्राद्वारे अर्जदाराला नोव्हेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ चे तथाकथित खोटे चालू बिल ७२३० भरण्यासाठी तसेच बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे सुचवले व सोबत तथाकथित खोटे चालू बिल सुद्धा पाठवण्यात आले. त्या अनुषंगाने अर्जदाराने आपले वकील मार्फत रोजी कायदेशीर नोटीस देऊन गैरसमज दिली परंतु विद्यमान मंचाने वीजपुरवठा खंडित न करण्याचे मनाईहुकूम आदेश दिले आहेत परंतु अर्जदाराने त्यांचे वकिलातर्फे दिनांक २०.०१.२०१७ रोजी नोटीस पाठवली. एवढेच नव्हे तर अर्जदाराने पुन्हा दिनांक ०८.०२.२०१७ रोजी अर्जदाराला पत्राद्वारे नोव्हेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंतचे तथाकथित खोटे चालू बिल ७१३८० रुपयांचा भरणा करावा अथवा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे कळविले. गैरअर्जदारांनी मूळ प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा खोटे रकमेचे चालू बिल देऊन रक्कम रु. ८४,९९० वसूल करून घेतली आहे. सबब, सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेलीआहे.
अर्जदारांची मागणी अशी आहे की, गैरअर्जदारांनी दिलेली सेवा हीच अनुचित प्रथा असल्याचे घोषित करावे व गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेले विद्युत बिलाचे रकमेची योग्य शहानिशा करण्यासाठी आदेश द्यावेत. अर्जदाराचे उपरोक्त मिटरचा प्रवाह खंडित न करता सुरू करण्याचा आदेश द्यावा. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे अर्जदारास झालेला मानसिक, शारीरिक त्रासापोटी रुपये ५०,००० व्याजासह देण्यात यावे. तक्रार खर्च ५००० रुपये अर्जदाराकडून देण्यात यावा. अर्जदारांकडून दिनांक १०.११.२००६ रोजी वसूल केलेली रक्कम रु. ८४,९९० बेकायदेशीर घोषित करण्याचे आदेश देण्यात यावे. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले नोव्हेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ चे तथाकथित खोटे बिल अनुचित व बेकादेशीर घोषित करण्यात यावे.
३. अर्जदाराची तक्रार दाखल करुन घेवून गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने तक्रारीतील मुद्द्याचे खंडन करुन पुढे नमूद केले की, भारताचे प्रथम पंतप्रधानांनी दिनांक ०८.१.२०१६ रोजी जुने ५०० व पाचशे रुपये व १००० च्या नोटबंदीची घोषणा केल्यामुळे व गैरअर्जदाराने जुनी ५०० व १००० ची नोट स्वीकार न करण्याची घोषणा केल्याने, जुने चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा चालवण्याच्या हेतूने अर्जदाराने जुने ५०० व १००० रुपयाची नोट देऊन सदर देयकाचा भरणा गैरअर्जदाराकडे केला. दिनांक २९.०७.२०१५ रोजी गैरअर्जदार कंपनीचे दामिनी पथकाने अर्जदाराच्या घरी भेट दिली असता, सदर पथकाने अर्जदाराकडील विद्युत मीटरच्या स्थितीची पडताळणी केली. सदर पडताळणीत अर्जदारांकडील मीटर निर्दोष आढळले परंतु अर्जदारांकडील विज बिल हे सरासरी विज वापराचे दिल्याचे दिसून आले. त्यानंतर दामिनी पथकाने अर्जदारांकडील विज मीटरची पडताळणी केली व गैरअर्जदार क्र. २ चे कार्यालयास अर्जदाराकडून वीज वापराचे योग्य Assessment करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच दामिनी पथकाने अर्जदाराकडे असलेल्या वीज मीटरचे वापराची सविस्तर पाहणी केली व मीटर निर्दोष आढळले असल्याने घरातील वापरानुसार अर्जदाराने वीज बिलाची Assessment करून अर्जदारास विज बिल देण्यात आले. अर्जदाराच्या विनंतीनुसार सदर विज मीटर गैरअर्जदारांकडील चाचणी विभागाकडे पाठवण्यात आले व सदरील विद्युत मीटरची चाचणी अर्जदाराचे समक्ष करण्यात आली. चाचणीनुसार अर्जदारांकडील मीटर निर्दोष आढळले. अर्जदाराने सदर विद्युत चाचणी समाधानकारक असून आलेले वीज बील भरण्याचे आश्वस्त केले. गैरअर्जदाराने अर्जदारास योग्य ती सेवा दिली असून कुठलाही अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला नाही. सबब, सदर तक्रार व अंतरिम आदेश अर्ज खर्चासह खारीज करण्यास पात्र आहे.
४. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी जवाब, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र. १ ते २ यांनी अर्जदारास विज पुरवठा
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास विज पुरवठा
कराराप्रमाणे सेवासुविधा न दिल्याने नुकसान भरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :
५. अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता, अर्जदार यांना माहे जुलै २०१५ पर्यंत सदर विद्युत मीटरचे बिल सरासरी ७३ युनिट नियमितपणे येत होते. सन २०१२ पासून अर्जदाराचे मिटर चुकीचे रीडिंग दाखवत असल्यामुळे मीटर बिल हे आर एन ए या नावाखाली गैरअर्जदार भरणा करीत होते. माहे जुलै २०१५ पर्यंत मीटर रीडिंग INACCESS या ७०० ते १००० पर्यंत येत होते. दिनांक २९.०७.२०१५ रोजी दामिनी पथकाने मीटर तपासणी केली असता मीटर सुस्थितीत होते. त्याबाबतचा तपासणी अहवाल मंचात दाखल आहे. तपासणी नंतर अर्जदाराला रुपये २,१९,५३० रुपयांचे बिल, अर्जदाराच्या घरातील वस्तूंच्या विज वापरावर देण्यात आले. अर्जदाराने विज वापराप्रमाणे नोंद घेऊन विज देयक द्यावे, अशी विनंती केली आहे. गैरअर्जदारानी देखील अर्जदाराच्या विज वापराप्रमाणे विज देयक दिल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सरासरी विज वापराचे देयक दिले होते व ते अर्जदाराने अदा केले आहे. त्यामुळे अर्जदाराने विज देयक दुरुस्त करुन द्यावे अशी व इतर सर्व विनंती विज मीटर दोषपूर्ण नसल्याने मान्य करणे न्यायोचीत नाही. त्यामुळे अर्जदार मानसिक, शारिरीक व आर्थिक व तक्रारीपोटी खर्च नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब, मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २१०/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)