आदेश
द्वारा श्री. आर.बी. सोमानी - मा.अध्यक्ष
(दिनांक 16/04/2012)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
1. घरगुती वापराकरीता ग्राहक क्र. 00009158969 विद्युत पुरवठा 1997 पासून तक्रारदाराने घेतलेला आहे व ती नियमित बिल भरतो. त्याला दिलेला मीटर क्र. 9002239767 असा आहे. त्यास दरमहा सरासरी रु. 310/- बिल येत असे ते त्याने भरले आहे. मे,2001 पर्यंत मीटर योग्यरित्या काम करीत नाही. परंतु ते दोषपूर्ण दाखवून जून, 2001 पासून सरासरी बिल यायला लागले. ते दोषपूर्ण मीटर जुलै, 2005 पर्यंत बदलले नाही व ऑगस्ट 2005 मध्ये नविन मीटर क्र. 90000973334 लावण्यात आले. सामनेवाले यांनी रु. 65,150/- चे बिल तक्रारदारास दिले. तक्रारदाराने आक्षेप घेतल्यावर त्याला रक्कम कमी करुन देण्यात आली. परंतु अशाच प्रकारचे बिल येत राहिले. मे, 2006 मध्ये रु. 48,930/- वे बिल देण्यात आले. त्यात रु. 47,684/- थकीत दाखविण्यात आले. परंतु तेसुध्दा कमी करुन देण्यात आले आणि डिसेंबर, 2006 मध्ये रु. 75,920/- चे बिल प्राप्त झाले. त्यात रु. 74,667.67/- थकीत दाखविण्यात आले. अशाप्रकारे चुकीचे बिल देऊन तक्रारदारास मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. शेवटी जानेवारी, 2007 मध्ये तक्रारदारास रु. 76,990/- पैकी रु. 75,751.81/- थकीत व इतर चार्ज लावून देण्यात आले. अशा प्रकारे तक्रारदारास चुकीची बिले देऊन मानसिक त्रास सहन करावा लागला आणि म्हणून सदर बिल वाचनाप्रमाणे नसल्याने तसे दुरुस्त बिल देण्यात यावे अशी विनंती केली व अतिरिक्त भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. तसेच रु. 1,00,000/- नुकसान भरपाई रु. 15,000/- खर्चाची मागणी केली. तक्रारीसोबत 6 दस्त जोडलेले आहेत. त्यात तक्रारदाराने भरलेल्या बिलाच्या पावत्या तसेच सामनेवाले यांनी दुरुस्त करुन दिलेले बिल, तक्रारदाराने पाठविलेली नोटीस व इतर दस्तांचा समावेश आहे.
2. सामनेवाले यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब प्रकरणात निशाणी 9 वर दाखल केला व त्यांनी तक्रारदाराचे सर्व आक्षेप फेटाळले व तक्रार खोटी असून ती खारीज करावी अशी विनंती केली. सामनेवाले हे विज वापराची रक्कम जमा करुन ग्रामिण व शहरी विकासाचे कामे करतात व शासनास फंड देतात. सामनेवाले यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदार हा ऐरोली डिव्हीजनचे अंतर्गत राहत होता व सदर विभाग हा कळवा डिव्हीजनअंतर्गत हस्तांतरीत झालेला आहे. मार्च 2002 ते मे 2005 या कलावधीत 10753 युनिटची विभागणी 40 महिन्यात केली असता 268 युनिट प्रतिमाह असे येते. रु. 33,303.78/- व व्याज असे एकूण रु. 49,417.78/- जानेवारी,2002 ला आकारण्यात आले आहे. वापरलेल्या फक्त विजेपोटी रक्कम देण्यात आली आहे. तक्रारदार सामनेवालेस योग्य ते हप्ते देणेस तयार आहेत. सामनेवाले यांनी कधीही कोणताही विद्युत पुरवठा खंडीत करण्याविषयी नोटीस दिली नाही व म्हणून कोणताही मानसिक अथवा शारिरीक त्रासास अथवा गैरसोयीस सामोरे जावे लागले नाही म्हणून नुकसान भरपाईचा प्रश्न येत नाही. तक्रारदाराने कोणतीही लेखी सूचना दिलेली नाही व प्रस्तत तक्रार खारीज करावी.
3. तक्रारदाराने पान 53 यादीसोबत 2009 मधील एकूण 5 बिले प्रकरणात दाखल केलेली आहेत व विनंती केली की तक्रारदारास लावण्यात आलेली आकारणी चुकीची आहे.
4. तक्रारदाराने आपला लेखी युक्तीवाद प्रकरणात दाखल केला तसेच प्रतिज्ञापत्र व प्रतिज्ञापत्रावर पुरावा दाखल आहे. सामनेवाले यांनी मंचासमोर तोंडी युक्तीवाद केला.
5. उभय पक्षांचे शपथेवरील कथन, दाखल कागदोपत्री पुरावा, तोंडी युक्तीवाद आणि इतर दस्तऐवज यांचे सुक्ष्म वाचन केलेनंतर मंचासमोर निर्णयाकरीता खालील निष्कर्ष काढलाः
निष्कर्ष व कारणेः
6. प्रस्तुत वाद हा सामनेवाले हयांनी दोषपूर्ण/फॉल्टी मिटरपोटीची सरासरीनुसार आकारणी केली व त्यावरुन 40 महिन्यांची सदर थकीत रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी सामनेवाले हयांनी केल्याने उपस्थित झालेला आहे. मंचाचेमते प्रस्तुत वाद नियमित बिलातील चुकीच्या आकारणीचा नसून कथीत फॉल्टी मिटरचे वाचन योग्य न झाल्याने आकारण्यात आलेले युनिटस् चे विभागणी दरमहा 286 युनिट 40 महिन्यांकरीता दाखवून थकीत रकमेची व व्याजाची मागणी चुकीची आहे असा तक्रारदाराचा आक्षेप आहे. सबब प्रस्तुत तक्रार निकाली काढण्याचा मंचास अधिकार आहे.
7. सामनेवाले यांनी प्रकरणात तक्रारदाराचे सी.पी.एल. ची प्रत दाखल केली नाही. यात तक्रारदाराचा मासिक विज वापर व बिल भरणा यांचा स्पष्ट बोध होतो असे दस्तऐवज दाखल केलेले नाही. सी.पी.एल. हे सामनेवाले यांचे ताब्यातील महत्त्वाचा पुरावा आहे. तक्रारदाराचे मीटर हे सामनेवालेंनी जून, 2001 मध्ये बदलून दिले आहे आणि तेव्हापासून फॉल्टी मीटर म्हणून सरासरीप्रमाणे बिल देणे सुरु केले आहे. परंतु जुलै, 2005 पर्यंत मीटर बदलले नाही. असे जरी असले तरी तक्रारदाराने सदर फॉल्टी बिलाची रक्कम सामनेवालेकडे भरलेली आहे. जुने फॉल्टी मीटर बदलून मिळावे अशी सामनेवालेकडे लेखी प्रार्थना केलेली दिसून येत नाही.
8. तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते की, तक्रारदार सामनेवालेंचा ग्राहक आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराकडील मीटर जून, 2001 मध्ये बदलले. परंतु त्यानंतर ते दोषपूर्ण होते म्हणून फॉल्टी दाखवून सरासरी वापराचे बिल दिले गेले आहे असे स्पष्ट व सिध्द होते. तक्रारदार आधी ऐरोली डिव्हीजनअंतर्गत राहत होता. नंतर हा भाग कळवा डिव्हीजलअंतर्गत झाला असे सामनेवालेंचे कथनावरुन स्पष्ट होते. परंतु या संपूर्ण कालावधीत फॉल्टी व दोषपूर्ण मीटरबद्दल बिल सामनेवालेद्वारे तक्रारदारास निर्गमित केले गेले आहे. हा कालावधी छोटा नाही. परंतु तक्रारदाराकडील विज मीटर बदलण्याची प्राथमिक जबाबदारी सामनेवाले यांची होती. सामनेवाले यांचे संगणक रेकॉर्डप्रमाणे फॉल्टी मीटरबद्दल माहिती तब्बल 40 महिन्यांपर्यंत मिळालेली नाही असे दस्तऐवजावरुन दिसून येते. परंतु ऑगस्ट, 2005 मध्ये पहिल्याचवेळी सदर मीटर बदलले गेले असेही दिसून येते. तक्रारदाराचा वीज वापर पाहता सरासरी वापर हे देयक दि. 9/1/2009 पान 54 वरील मागील 12 महिन्यांचा अभिलेख (Ex. Marked M) पाहता तक्रारदाराचा सरासरी वापर दरमहा 120 युनिट आहे आणि कमी जास्त फरकाने तेवढया वापराचे बिल सतत आलेले आहे असे दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. सामनेवाले यांनी पी.पी.एल. दाखल केले असते तर तक्रारदाराकडील वीज वापराची स्थिती स्पष्ट झाली असती आणि मंचाला याविषयी अधिक चांगल्याप्रकारे विज वापराबद्दल मुद्दा निकाली काढता आला असता. उपलब्ध दस्तऐवजांवरुन मंचाचे असे निदर्शनास येते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे सरासरी वापर 268 युनिट प्रतिमाह असा दाखवून चुकीची कारवाई केलेली आहे आणि म्हणून स्वतःच्या चुकीच्या कारवाईमुळे योग्यवेळी मीटर बदलून न दिल्याने तक्रारदारास आलेले चुकीचे बिल देऊन व त्यावर व्याज आकारुन सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे असे स्पष्ट होते.
9. सामनेवाले यांनी नमूद केले की, सामनेवालेंचा कोणताही वाईट हेतू नव्हता. 2002 मध्ये मीटर बदलून दिले होते. परंतु तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. मंचाचेमते सामनेवाले यांनी महत्त्वाचे दस्तऐवज दाखल केलेले नाहीत आणि प्रकरण जुने प्रलंबित आहे. म्हणून प्रकरण उपलब्ध दस्तऐवजांवरुन निकाली काढण्यात येत आहे. मंचाचेमते तक्रारदार याचा सामनेवालेकडे याविषयी अनेकवेळा जावे लागले आहे. परंतु त्यामुळे तक्रारदाराचे काय नुकसान झाले असे कुठेही सिध्द होत नाही अथवा त्याचे रजेचे नुकसान झाले असे कुठेही स्पष्ट होत नाही आणि म्हणून या कारणास्तव नुकसान भरपाई मंजूर करता येत नाही. तरीदेखील दरवेळी तक्रारदारास सामनेवालेकडे वाढीव बिल दुरुस्त करुन घेणेसाठी जावे लागले, ते दुरुस्तीनंतर भरलेले आहे आणि त्यासाठी त्यास वेळ व श्रम खर्च करावा लागला आहे आणि नक्कीच मानसिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून या कारणास्तव तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
9. आ दे श
9.
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास अवास्तव थकीत विज आकारणी करुन बिलाची मागणी करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे दिलेले सरासरी वापराचे थकीत बिलापोटीची रक्कम व व्याजाची मागणी योग्य नसल्याने ते रद्द करुन बिल दुरुस्त करण्याचे मंच निर्देशित करतो.
4. मीटर वाचनानुसार तक्रारदारास योग्य ते बिल दयावे व दि. 29/1/2007 नुसार केलेल्या थकीत रकमेची मागणी रास्त नसून ती फेटाळण्यात येते. तक्रारदाराने प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त युनिटची रक्कम सामनेवालेकडे भरली असल्यास उरलेली रक्कम त्यांनी पुढील बिलात समायोजित करावी.
5. सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 8,000/- (रक्कम रुपये आठ हजार) तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) देय करावे.
6. सामनेवाले यांनी तक्रारदारास उपरोक्त आदेशाचे पालन आदेश प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. आदेशाची प्रत उभय पक्षांस निःशुल्क देण्यात यावी.
|
[ HON'BLE MRS. JYOTI IYER] |
PRESIDING MEMBER |