(घोषित दि. 21.06.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीने चुकीचे देयक देऊन त्रुटीची सेवा दिली या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यांनी वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली असुन, जुन 2010 मध्ये त्यांच्या जुन्या मीटरमध्ये बिघाड असल्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार नविन मीटर बसविण्यात आले. नविन मीटर बसविल्यानंतर दिनांक 22.06.2010 ते 22.07.2010 या कालावधीसाठी त्यांना रुपये 100/- चे देयक देण्यात आले. ते देयक त्यांनी भरले. परंतू दिनांक 22.07.2010 ते 22.08.2010 या कालावधीसाठी अचानक रुपये 8,270/- चे देयक देण्यात आले. सदर देयकामध्ये दर्शविण्यात आलेला वीज वापर चुकीचा व अवाजवी दर्शविण्यात आलेला होता. म्हणून त्यांनी सदर देयकाबाबत दिनांक 13.09.2010 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे तक्रार दिली. परंतू वीज वितरण कंपनीने तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर पुन्हा दिनांक 18.10.2010 रोजी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दिनांक 27.10.2010 रोजी जुने मीटर तपासणीसाठी काढून त्या ठिकाणी दुसरे मीटर तात्पुरत्या स्वरुपात बसविले. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडून दिनांक 22.08.2010 ते 22.09.2010 या कालावधीचे रक्कम रुपये 30,027/- चे देयक देण्यात आले. सदर देयाकामध्ये त्यांचा वीज वापर 3,724 युनिट दर्शविलेला होता आणि मागील बाकीसह एकुण रुपये 39,180/- ची मागणी सदर देयकाद्वारे करण्यात आली होती. वास्तविक मीटरमध्ये दोष असुन, मीटर अतिजलद धावत असल्याचे वीज वितरण कंपनीला कळविलेले होते. परंतू त्याबाबत वीज वितरण कंपनीने कोणतीही कार्यवाही न करता अवाजवी देयक दिले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, वीज वितरण कंपनीने त्यांना दिलेले अतिरिक्त रक्कम रुपये 39,180/- चे देयक रद्द करावे आणि त्यांच्या मीटरची तपासणी करुन द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवदेन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या घरी दिनांक 19.01.2011 रोजी नविन मीटर बसविण्यात आले. तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात आलेली देयके प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणेच दिलेली असुन, त्याच्याकडील मीटरमध्ये कोणताही दोष नव्हता. तक्रारदाराच्या घरात सात खोल्या आहेत. यावरुन त्याच्या वीज वापराची कल्पना येऊ शकते. तक्रारदाराने देयकाबाबत तक्रार केल्यानंतर वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या मीटरची तपासणी केली आणि त्याचे मीटर योग्य असल्याचे निदर्शनास आले आणि तक्रारदाराला प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसारच देयके देण्यात आली. तक्रारदाराने देयक भरावे लागू नये म्हणून ही खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराला तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 22.07.2010 ते 22.09.2010 या कालावधीसाठी दिलेली देयके अवाजवी व चुकीची आहेत काय ? होय 2.वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.के.ए.नाईक आणि वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जे.सी.बडवे यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराकडील जुने मीटर जुन 2010 मध्ये बदलण्यात आले होते. जुन 2010 पर्यंत तक्रारदाराचा वीज वापर सर्वसाधारण होता. वीज वितरण कंपनीने दाखल केलेले सी.पी.एल नि.19/2 पाहता जानेवारी 2010 मध्ये 134 युनिट, फे्ब्रूवारी 2010 मध्ये 193 युनिट, मार्च 2010 मध्ये 420 युनिट, एप्रिल 2010 मध्ये 17 युनिट, मे 2010 मध्ये 169 युनिट आणि जुन 2010 मध्ये 110 युनिट या प्रमाणे तक्रारदाराचा वीज वापर होता. तक्रारदाराचे मीटर जुन 2010 मध्ये बदलल्यानंतर जुलै 2010 मध्ये त्याचा वीज वापर 20 युनिट झालेला होता आणि ऑगष्ट 2010 मध्ये अचानक 1219 युनिट व सप्टेंबर 2010 मध्ये 3724 युनिट वीज वापर दर्शवून तक्रारदाराला अनुक्रमे रुपये 8,974/- आणि रुपये 39,181/- ची देयके देण्यात आली. तक्रारदाराचा पुर्वीचा वीज वापर पाहता ऑगष्ट आणि सप्टेबर 2010 मधील वीज वापर अवाजवी असल्याचे दिसुन येते. तक्रारदाराने त्यास सदर अवाजवी देयके प्राप्त झाल्यानंतर वीज वितरण कंपनीकडे दिनांक 13.09.2010 आणि 18.10.2010 रोजी तक्रार दिली होती. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या तक्रारीनंतर त्याचे वादग्रस्त मीटर क्रमांक 7613414623 काढून घेतले. आणि ऑक्टोबर 2010 मध्ये त्याच्याकडे 7613890494 या क्रमांकाचे नविन मीटर बसविले. परंतू वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या वादग्रस्त मीटर क्रमांक 7613414623 ची योग्य प्रकारे तपासणी केली नाही. वास्तविक तक्रारदाराने सदर मीटर अधिक वेगाने धावत असल्याचे वीज वितरण कंपनीला दिलेल्या अर्जामध्ये नमूद केले होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने अत्यंत काळजीपुर्वक वादग्रस्त मीटरची तपासणी करणे आवश्यक होते. तक्रारदाराने त्याच्याकडील मीटर अतिजलद गतीने रिडींग नोंदवत असल्याबाबत तक्रार केल्यानंतर वीज वितरण कंपनीने त्याचा पुर्वीचा वीज वापर पाहता शासनाच्या विद्युत निरीक्षकाकडुन वादग्रस्त मीटरची गती योग्य आहे किंवा नाही याबाबतची शहानिशा करुन घेणे आवश्यक होते. कारण त्याने तक्रारदाराचे मीटर तपासणी करण्यासाठी काढून घेतले होते आणि ते मीटर त्यांच्याच ताब्यात होते. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे मीटर क्रमांक 7613414623 त्यांच्याच प्रयोगशाळेत तपासल्याबाबतचा अहवाल नि. 19/1 वर दाखल केला आहे. परंतू सदर अहवाल परीपुर्ण नसून सबंधित तपासणी अधिका-याने मीटरच्या स्थितीबाबत अहवालामध्ये कोणताही स्पष्ट अभिप्राय नोंदविलेला नाही. त्यामुळे मीटर मधील रिडींग योग्य होती किंवा नाही तसेच मीटरची गती सामान्य होती किंवा नाही याचा काहीही खुलासा होत नाही. परंतू तक्रारदाराचे सदर वादग्रस्त मीटर क्रमांक 7613414623 बदलल्यानंतर पुन्हा ऑक्टोबर 2010, नोव्हेबर 2010 आणि डिसेंबर 2010 मधील तक्रारदाराचा वीज वापर पाहता ऑगस्ट 2010 मधील वीज वापर 1219 युनिट आणि सप्टेबर 2010 मधील वीज वापर 3,724 युनिट हा निश्चितपणे अवाजवी असल्याचे दिसुन येते आणि मीटर क्रमांक 7613414623 हे जलद गतीने रिडींग नोंदवत असल्याचे स्पष्ट दिसुन येते. तक्रारदाराकडील मीटर क्रमांक 7613414623 बदलल्यानंतर आक्टोबर 2010 मध्ये त्याचा वीज वापर केवळ 100 युनिट झाला आणि त्यानंतर नोव्हेबर 2010 मधील वीज वापर 94 युनिट आणि डिसेंबर 2010 मधील वीज वापर 118 युनिट झालेला होता. याआधी नमुद केल्याप्रमाणे जानेवारी 2010 ते जुन 2010 या कालावधीतील तक्रारदाराचा वीज वापर प्रतिमाह 134, 193, 420, 17, 169 आणि 110 युनिट होता. तक्रारदाराकडील वादग्रस्त मीटर बदलण्यापुर्वीचा वीज वापर आणि वादग्रस्त मीटर बदलल्यानंतरचा वीज वापर पाहता निश्चितपणे वादग्रस्त मीटर सामान्यपणे रिडींग नोंदवत नसल्याचे स्पष्ट दिसुन येते. वादग्रस्त मीटर क्रमांक 7613414623 हे सामान्य असल्याचे सिध्द् करण्याची जाबाबदारी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीवरच होती. परंतू वीज वितरण कंपनीने वादग्रस्त मीटर स्वतंत्र यंत्रणेमार्फत म्हणजेच विद्युत निरीक्षकाकडून तपासून घेण्याची कोणतीही तयारी दर्शविली नाही आणि वादग्रस्त मीटर मंचासमोर सादर केले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे वादग्रस्त मीटर तपासणी केल्याबाबतचा अहवाल विश्वासपात्र ठरत नाही. तक्रारदाराचा जानेवारी ते जुन 2010 आणि ऑक्टोबर 2010 ते डिसेंबर 2010 या कालावधीतील वीज वापर पाहता निश्चितपणे तक्रारदाराला ऑगष्ट आणि सप्टेबर 2010 मध्ये अवाजवी देयके देण्यात आल्याचे दिसुन येते. वीज वितरण कंपनीने अवाजवी देयकाबाबत तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर कोणतीही कार्यवाही केली नाही ही बाब वीज वितरण कंपनीच्या सेवेतील त्रुटीच आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास ग्राहक क्रमांक 510030284371 संदर्भात दिनांक 03.09.2010 रोजी दिलेले देयक रक्कम रुपये 8,970/- आणि दिनांक 06.10.2010 रोजी दिलेले देयक रक्कम रुपये 39,180/- तसेच देयक दिनांक 09.11.2010 रक्कम रुपये 45,300/- रद्द करण्यात येतात.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 22.07.2010 ते 22.08.2010 तसेच 22.08.2010 ते 22.09.2010 या कालावधीसाठी प्रत्येकी 150 युनिट (जानेवारी 2010 ते जून 2010 आणि ऑक्टोबर 2010 ते डिसेंबर 2010 या कालावधीतील वीज वापराची सरासरी)वीज वापराची सुधारीत देयके निकाल कळाल्यापासून 2 महिन्याचे आत द्यावेत आणि 22.09.2010 ते 22.10.2010 या कालावधीसाठी मीटर क्रमांक 7613890494 मधील प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसार 99 युनिटचे देयक निकाल कळाल्यापासून 2 महिन्याचे आत द्यावे आणि ऑगष्ट 2010, सप्टेंबर 2010 व ऑक्टोबर 2010 मधील रद्द केलेल्या देयकातील रकमेच्या अनुषंगाने पुढील देयकांमध्ये दर्शविलेली थकबाकी कमी करुन तक्रारदाराला सुधारीत देयके निकाल कळाल्यापासून 2 महिन्याचे आत द्यावेत.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |