Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २६/०४/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता यांनी निवासी वापराकरिता विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक २७/३/२०१८ रोजी वीज पुरवठा घेतला. त्याचा ग्राहक क्रमांक ४५००४८५७८६४ आणि मीटर क्रमांक ५३७५२९०६०८ असा आहे. तक्रारकर्त्याने त्याच इमारतीमध्ये . आसरा ट्रस्टच्या माध्यमातून दिनांक१२/१०/२०१८ रोजी विना मोबदला मुलांना कुराण अभ्यासक्रम शिकवणी सुरु केली. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला वीज पुरवठा दिल्यानंतर एप्रिल २०१८ ते जुन २०१८ पर्यंत चालू रिडिंग २ युनिट आणि मागिल रिडिंग ० युनिट असे दर्शविलेले देयक दिले होते. जुलै २०१८ मध्ये एकूण वीज वापर १६७ दर्शविलेले देयक दिले. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये चालू रिडिंग १७९० आणि मागिल २ युनिट असे एकूण १७८८ युनिट दर्शविलेले रुपये २१,३१०/- चे देयक दिले. तक्रारकर्त्याने एप्रिल २०१८ ते जुन २०१८ पर्यंतचा वीज देयकाचा भरणा विरुध्द पक्ष यांचेकडे केला होता परंतु नंतर आलेले देयक जास्त असल्याने त्याचा भरणा केला नाही आणि त्याबाबत दिनांक ५/९/२०१८ रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे लेखी तक्रार केली. लेखी तक्रारीमध्ये सर्व्हिस वायरवर कार्बन आल्यामुळे मीटर बंद होते आणि तक्रार केल्या नंतर लाईनमनने तो पुन्हा सुरु केला असल्याचा उल्लेख केला होता. मीटर मध्ये दोष असल्याने योग्य ती चौकशी करुन योग्य देयक देण्यात यावे अशी विनंती केली होती. विरुध्द पक्ष यांनी दिनांक २८/९/२०१८ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता तक्रारकर्त्याकडील वीज पुरवठा खंडित करुन वीज मीटर घेवून गेले. तक्रारकर्त्याने चौकशी केल्या नंतर सुध्दा मीटर टेस्टींगसाठी पाठविल्याचे सांगितले. त्याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक १५/१०/२०१८ रोजी चालानची रक्कम सुध्दा विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केली. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्ष यांनी काहीही कार्यवाही केली नाही तसेच तक्रारकर्त्याकडील वीज पुरवठा पूर्ववत करुन दिला नाही. तक्रारकर्ता यांनी दिनांक १२/१०/२०१८ रोजी ईमारतीच्या चार खोल्यामध्ये वीज नसतांना शाळा/मदरसा सुरु केले आणि त्याकरिता वीज आवश्यक असल्याने विरुध्द पक्ष यांना सूचित केले. परंतु त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निरसन केले नाही. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडून वीज पुरवठा घेतल्यापासून फार थोड्या वेळाकरिता विजेचा वापर करीत होता त्यामुळे त्याला रुपये २१,३१०/- रुपयाचे देयक येणे शक्य नाही. म्हणून तक्रारकर्त्याने मीटर दुरुस्ती करुन उचित देयक देण्याची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांनी ही बाब मान्य केली नाही. तक्रारकर्ता हा मुलांना अंधारात शिक्षण देत आहे आणि ही विरुध्द पक्ष यांची तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा असल्याने तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला जुर्ले,२०१८ पासून पाठविलेले वीज देयक चुकीचे आहे असे घोषित करुन तक्रारकर्त्याच्या वापरानुसार योग्य देयक द्यावे आणि नवीन मीटर तक्रारकर्त्याला लवकरात लवकर लावून द्यावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये ३०,०००/- देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष यांना नोटीस तामील झाल्यावर ते आयोगासमक्ष हजर झाले. विरुध्द पक्ष यांनी लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन अमान्य करुन नमूद केले की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिनांक २७/३/२०१८ रोजी निवासी वापराकरिता ग्राहक क्रमांक ४५००४८५७८६४ आणि मीटर क्रमांक ५३७५२९०६०८ असलेले वीज कनेक्शन दिले, ही बाब मान्य करुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील उर्वरित कथन नाकबुल करुन आपल्या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्याने वादग्रस्त वीज कनेक्शन हे घरघुती प्रयोजनाकरिता घेतले आहे आणि तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत मान्य केले की, तक्रारकर्ता हा वादग्रस्त वीज पुरवठा जेथे घेतला आहे तेथे मदरसा चालवितो आणि ही बाब लपवून तक्रारकर्त्याने वीज पुरवठा घेतला होता. शाळेकरिता घेतलेला वीज पुरवठा हा घरगूती वापरामध्ये मोडत नाही. तक्रारकर्त्याने दिनांक २७/३/२०१८ रोजी वीज कनेक्शन घेतले आहे आणि नवीन वीज कनेक्शन असल्याने त्याची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये झाल्यानंतर तक्रारकर्त्याचे वापरानुसार ऑगस्ट २०१८ चे वीज देयक देण्यात आले आणि त्या देयकाबाबत तक्रारकर्त्याने तक्रार केल्यानंतर विरुध्द पक्षाने वीज मीटर तपासणी अहवालानुसार तो सुव्यवस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले वीज देयक हे योग्य असून तक्रारकर्ता हा सदर वीज देयक भरण्यास जबाबदार आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति अनुचित प्रथेचा अवलंब केला नाही तसेच सेवेत न्युनता दिली नाही.सबब उपरोक्त कारणाकरिता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, दस्तावेज आणि शपथपत्र तसेच तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष 1. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ नाही 2. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे मुद्दा क्रमांक १ बाबतः- - प्रस्तूत तक्रारीत जुलै, २०१८ व ऑगस्ट,२०१८ चे विजदेयकांबाबत तसेच नवीन विजमिटर लावण्याबाबत उभय पक्षांत वाद आहे. तक्रार, लेखी उत्तर व तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याने दिनांक २७/३/२०१८ रोजी विरुध्द पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता विद्यूत पुरवठा घेतला असून त्याचा ग्राहक क्रमांक ४५००१८५७८६४ आणि मीटर क्रमांक ५३७५२९०६०८ हा आहे. त्याबाबतचे विजदेयक. प्रकरणात दाखल असून त्यामध्ये विजवापर निवासी वापराकरीता दिल्याचे नमूद आहे. तक्रारकर्ता यांनी मार्च,२०१८ मध्ये नवीन विजजोडणी घेतले आहे व तक्रारकर्त्यास एप्रिल,२०१८ ते जुलै,२०१८ पर्यंत वि.प. यांनी सरासरी विजदेयक दिले व तक्रारकर्त्याच्या विजजोडणीची नोंद वि.प. यांच्या संगणकीय प्रणालीत झाल्यानंतर तक्रारकर्त्यास दिनांक ऑगस्ट,२०१८ चे त्याचे एकूण विज वापरानुसार १७८८ युनिट दर्शविलेले रुपये २१,३१०/- चे विज देयक देण्यांत आले. तक्रारकर्त्याने जुलै,२०१८ व ऑगस्ट,२०१८ चे विजदेयकांची रक्कम जास्त असल्याने त्यांचा भरणा केला नाही व मिटरमध्ये बिघाड आल्यामुळे विजदेयक जास्त रकमेचे आलेले आहे तरी मिटर तपासणी करुन योग्य विजदेयक देण्यांत यावे असा दि. ५/९/२०१८ रोजी वि.प.यांचेकडे तक्रारअर्ज केला तसेच तपासणीकरीता लागणारे शुल्क रु. २३६ /- चा सुध्दा भरणा केला. त्यानंतर वि.प. यांनी उपरोक्त विजमिटर तपासणी विभागाकडे तपासणीकरीता पाठविले. तपासणी अहवालात मिटर OK सुस्थीतीत असल्याचे नमूद असून वि.प. यांनी सदर तपासणी अहवाल व सि.पी.एल प्रकरणात दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारकर्त्याकडील विजमिटर दोषयुक्त नाही व त्याला ऑगस्ट,२०१८ करीता दिलेले विजदेयक विजवापरानुसारच दिलेले आहे हे स्पष्ट होते. याशिवाय त्यांनी आपले तक्रारीत, त्यांच इमारतीमधील ४ खोल्यांमध्ये दिनांक १२/१०/२०१८ पासून आसरा ट्रस्टच्या माध्यमातून मुलांना कुराण अभ्यासक्रम शिकवणी घेतात व त्याकरीतासुध्दा विजेचा वापर करतात हे स्वतःच मान्य केलेले आहे. अशा परिस्थितीत, तक्रारकर्त्याच्या तक्रारीनंतर विरूध्दपक्ष यांनी विजमिटरची तपासणी करुन दिलेली असून त्यात विजमिटर सुस्थितीत आढळून आले आहे, उलटपक्षी निवासी वापराकरीता विजपूरवठा घेतलेला असूनसुध्दा तक्रारकर्ता मदरसा चालविण्याकरीता देखील त्याचा वापर करीत आहे हया बाबी विचारात घेता वि.प.ने तक्रारकर्त्याला त्याच्या विजवापरानुसार योग्य विजदेयके दिलेली असून त्याच्या तक्रारीचेदेखील मीटरतपासणी करुन योग्य निराकरण केलेले आहे. सबब त्यांचे सेवेत कोणतीही न्युनता आयोगांस आढळून येत नाही. सबब मुद्दा क्र.२चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - १ च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश 1. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १७९/२०१८ खारीज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी आप आपला तक्रारखर्च सोसावा. 3. आदेशाची प्रत उभय पक्षांस विनामुल्य पुरविण्यांत यावी. (कल्पना जांगडे (कुटे)) (किर्ती वैद्य (गाडगीळ)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |