द्वारा- श्री एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 10 मे 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांच्या पार्ट टाईम Post Graduate Diploma in Wedding Planning साठी दिनांक 27/7/2010 रोजी कोर्सची संपुर्ण फी रुपये 48,878/- देऊन प्रवेश घेतला. तक्रारदारांना तीन महिन्यांचे बाळ सर्वस्वी तक्रारदारांवर अवलंबून असल्यामुळे, जाबदेणारांचे डीन व विभागप्रमुखांनी तक्रारदारांना पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदारांनी कोर्सला जाण्यासाठी सुरुवात केली असता तक्रारदारांचा कोर्स स्वतंत्र नसून दुस-या पूर्ण वेळ कोर्सशी संलग्न असल्याचे तक्रारदारांना कळले. पुर्ण वेळ कार्सचे क्लासेस आधीच सुरु झालेले होते. त्यामुळे तक्रारदारांना आधीच्या क्लास मध्ये काय झाले होते याबद्यल विचारणा करावी लागत असे, शिक्षक निट लक्ष देत नसत. यासंदर्भात शिक्षक, विभागप्रमुख श्री. शहा यांना सांगूनही उपयोग झाला नाही. दिनांक 13/8/2010 रोजी तक्रारदारांना इतर विद्यार्थ्यांसोबत प्रोजेक्ट करावयाचा होता पंरतु शिक्षक विद्यार्थ्याबरोबर टी व्ही मोठया आवाजात बघत होते. त्यामुळे तक्रारदार प्रोजेक्टवर संपुर्ण लक्ष देऊ शकले नाहीत. तक्रारदारांनी व्हाईट हाऊस, कोरेगाव पार्क येथील क्लासेस साठी प्रवेश घेतलेला असतांना देखील दिनांक 09/09/2010 रोजी कु. हेमांगी- विदयार्थी व अॅडमिनीस्ट्रेटर यांनी तक्रारदारांना प्रभात रोड कॅम्पस येथील क्लासेसला जाण्याविषयी कळविले. जाण्यास उशिर झाला व ड्रेस कोड नसल्यामुळे तक्रारदारांकडून रुपये 100/- दंड आकारण्यात आला. प्रवेशाच्या वेळी हा नियम तक्रारदारांना सांगण्यात आलेला नव्हता. तक्रार करुनही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 17/09/2010 व 22/9/2010 च्या मेलद्वारे फी परत मागितली. कोर्स चालविण्यासाठी जाबदेणारांनी आवश्यक परवानगी घेतलेली नव्हती. जाबदेणार यांचे अॅडमिनीस्ट्रेशन व फॅकल्टी योग्य नव्हते. जाबदेणार यांचे दिनांक 16/09/2010 चे पत्र तक्रारदारांना मान्य नाही. म्हणून तक्रारदारांनी नोटीस पाठवून फी परत मागूनही उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून भरलेली फी रुपये 48,878/- 12 टक्के व्याजासह परत मागतात, नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार पार्ट टाईम Post Graduate Diploma in Wedding Planning अशा प्रकारचा कोर्स नव्हता. जाबदेणार Post Graduate Diploma कोर्स [एक वर्षे, पार्ट टाईम, पोस्ट ग्रॅज्युएट] अशा प्रकारचे कोर्स चालवित होते. त्यामध्ये स्पेशलायझेशन निवडता येत होते. तक्रारदारांना तीन महिन्यांच्या बाळ असल्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे जाबदेणार यांनी खास सवलत दिली होती, हे जाबदेणार अमान्य करतात. तक्रारदारांनी दिनांक 27/7/2010 रोजी रुपये 48,878/- फी जाबदेणारांकडे भरली होती हे जाबदेणारांना मान्य नाही. तक्रारदारांनी अॅडमिशन फॉर्मवर नमूद केल्याप्रमाणे Post Graduate Diploma कोर्स [एक वर्षे, पार्ट टाईम, पोस्ट ग्रॅज्युएट] वेडिंग प्लानिंग साठी प्रवेश घेतलेला होता. कोर्स साठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय सारखेच होते. फक्त प्रत्येकाच्या स्पेशलायझेशन नुसार लेक्चर्स व प्रॅक्टीकल्स साठी विद्यार्थ्यांना वेगळे केले जात होते. सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षाचे क्लासेस दिनांक 24/7/2010 पासून सुरु झाले होते. क्लासेस आधीच सुरु झाले होते, जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार यांना मान्य नाही. श्री. शहा हे विभाग प्रमुख नव्हते तर ते केवळ वेडिंग प्लानींग हा विषय शिकवत होते. दिनांक 13/8/2010 रोजी टी व्ही च्या मोठया आवाजामुळे तक्रारदारांना त्रास झाला हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार अमान्य करतात. वस्तुत: दिनांक 13/8/2010 हा शुक्रवार होता, त्या दिवशी कुठलेही क्लासेस, प्रॅक्टीकल्स, प्रोजेक्ट व्हाईट हाऊस, कोरेगांव पार्क, पुणे येथे घेतले जाणार नव्हते. तक्रारदारांना लेन नं.11, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे येथील प्रॅक्टीकल क्लास, जो श्री. शहा घेणार होते तो, अटेन्ड करण्याबाबत सुचना देण्यात आलेली होती. अटेन्डस शिटनुसार तक्रारदारांनी प्रभात रोड येथील प्रॅक्टीकल क्लास अटेन्ड केला नव्हता. तक्रारदारांनी व्हाईट हाऊस, कोरेगाव पार्क पुणे येथील क्लासेस साठी प्रवेश घेतलेला नव्हता. दिनांक 17/07/2010 रोजीच्या अॅडमिशन फॉर्मवर कुठेही तक्रारदारांना तीन महिन्यांच्या बाळ होते याबाबत नमूद करण्यात आलेले नव्हते. उलट तक्रारदारांनीच जाबदेणार जिथे क्लासेस घेतील, ज्या वेळी घेतील त्यावेळी अटेन्ड करतील असे लिहून दिलेले होते. कु. हेमांगी- विदयार्थी व अॅडमिनीस्ट्रेटर नव्हत्या. दिनांक 10/09/2010 रोजी कुठलाही क्लास होणार नव्हता. नोटीस बोर्डवर लावलेल्या टाईम टेबल नुसार तक्रारदारांनी प्रभात रोड येथील दुपारी 2 वा. सुरु होणारे प्रॅक्टीकल क्लास अटेन्ड करणे आवश्यक होते. तक्रारदार प्रभात रोड कॅम्पस येथे दुपारी 1 वा. पोहोचल्या. त्यावेळी तेथे फुल टाईम कोर्सच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टीकल क्लास सुरु होता तेथे बसण्याची त्यांनी परवानगी मागितली. श्री. घंटा सदरहू क्लास घेत होते, त्यांनी तक्रारदारांना श्री. फराह फारुक यांची परवानगी घेण्यास सांगितले होते. प्रॅक्टीकल क्लास अटेन्ड करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म घालणे सक्तीचे होते. तक्रारदारांनी दिनांक 27/7/2010 रोजी रिसीट नं 2604 नुसार युनिफॉर्मही खरेदी केलेला होता. कॉलेजच्या नियम 6 नुसार युनिफॉर्म नसल्यास दंड भरणे सक्तीचे होते. श्री. फारुक यांनी तक्रारदारांना क्लासला बसायचेच असेल तर उशिरा आल्यामुळे व नियमानुसार रुपये 100/- दंड भरावा लागेल असे सांगितले. तकारदारांना नियम माहित नव्हता हे जाबदेणार यांना मान्य नाही. प्रवेशाच्या वेळीच जाबदेणार कॉलेजचे नियम, माहितीपत्रक, प्रॉस्पेक्टस विद्य।र्थ्यांना देतात. त्यामध्येच विद्यार्थ्यांनी/ तक्रारदारांनी सर्व नियम वाचलेले आहेत, ते त्यांना माहित आहेत, त्यांचे पालन ते करतील असे डिक्लरेशन असते. तक्रारदारांनी डिक्लरेशन वर सही केलेली होती. दिनांक 27/7/2010 रोजी घेण्यात आलेल्या इंडक्शन लेक्चर मध्ये तक्रारदारांनी कॉलेजचे रुल्स व रेग्युलेशन्स वर सही केलेली होती. तक्रारदारांनी शिस्तीचे पालन केले नाही म्हणून दिनांक 16/09/2010 रोजीचे पत्र त्यांना पाठविण्यात आले होते. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. तक्रारदार हया जाबदेणार यांचे ग्राहक नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सेवा दिलेली नाही. जाबदेणार क्र.2 यांना नाहक पक्षकार करण्यात आलेले आहे. म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी अॅडमिशन फॉर्मवर नमूद केल्याप्रमाणे सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षासाठी Post Graduate Diploma कोर्स [1 वर्षे, पार्ट टाईम, पोस्ट ग्रॅज्युएट] वेडिंग प्लानिंग साठी प्रवेश घेतलेला होता, हे दाखल अॅडमिशन फॉर्मवरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी कोर्सची पुर्ण फी रुपये 46,878/- भरली होती हे पावती क्र.1834 वरुन स्पष्ट होते. दिनांक 27/7/2010 च्या डिक्लरेशन नुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांनी त्यांच्या कुठल्याही कॅम्पसमध्ये घेतलेले क्लास व प्रॅक्टीकल्स स्वखर्चाने अटेन्ड करतील असे लिहून दिलेले आहे. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या COEM Rules & Regulations चे अवलोकन केले असता नियमामध्ये नियम क्र.6 मध्ये “b. Any student found out of uniform where prescribed maybe penalized through a fine or any other punitive action.” असे नमूद करण्यात आलेले आहे. “I have read, understood and agree to comply with the above COEM Rules & Regulations” खाली तक्रारदारांनी सही केलेली आहे व दिनांक जुलै 27, 2010 नमूद केलेला आहे. यावरुन तक्रारदारांना कॉलेजचे नियम माहित होते ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे युनिफॉर्म मध्ये नसल्यामुळे व क्लासला उशिरा गेल्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 100/- दंडापोटी आकारले याबद्यलची तक्रारदारांची तक्रार मंच अमान्य करीत आहे. कु. हेमांगी- विदयार्थी व अॅडमिनीस्ट्रेटर होत्या यासंदर्भातील पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांना तीन महिन्यांचे बाळ होते म्हणून जाबदेणार यांनी खास सवलत दिलेली होती यासंदर्भातील पुरावाही तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या तक्रारींची जाबदेणार यांनी दखल घेतली नाही यासंदर्भातील पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. जाबदेणार यांनी कोर्स चालूच ठेवलेला होता, उलट तक्रारदारांनी शिस्तीचे पालन केले नाही म्हणून जाबदेणार यांनी दिनांक 16/09/2010 च्या जाबदेणार यांनी पत्र पाठविल्यानंतर तक्रारदारांनी स्वत:च क्लास/कोर्सला गेल्या नाहीत, कोर्स पुर्ण केला नाही त्यामुळे तक्रारदार भरलेल्या फी चा परतावा मागू शकत नाहीत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द केली नाही म्हणून तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रावरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.