(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची हकिकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार युरेका फोर्बस कंपनीची अक्वागार्ड वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम दि.28.01.2010 रोजी अडव्हान्स रक्कम रु.1,000/- देऊन कंपनीच्या कर्मचा-याकडून खरेदी केली. त्याच दिवशी कर्मचा-याने अक्वागार्ड यंत्र तक्रारदाराचे घरी बसवून चालू करुन दिले आणि तक्रारदाराकडून अक्वागार्डची उर्वरीत रक्कम रु.8,999/- रोख घेतले परंतू पावती दिली नाही. अक्वागार्ड खरेदी करताना पाण्याला 100% शुध्द करते आणि यंत्राविषयी दोन वर्षाची वॉरंटी असल्याचे सांगितले. अक्वागार्ड यंत्र बसविल्यानंतर दोन महिन्यांनी खराब झाले व त्यामधून स्वच्छ पाणी येणे बंद झाले, म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार कंपनीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली त्यावेळेस कंपनीच्या कर्मचा-यांनी सदर यंत्र चालू करुन दिले. त्यानंतर पुन्हा दिड महिन्यांनी अक्वागार्ड यंत्र खराब झाले म्हणून तक्रार दिली त्यावेळेस परत कंपनीच्या कर्मचा-यांनी सदर यंत्र चालू करुन दिले. सदर यंत्र चालू करुन दिल्यावर पुन्हा वीस दिवसांनी बंद पडले, त्यावेळेस कंपनीच्या कर्मचा-याने तात्पुरते चालू करुन दिले. सदर यंत्र दुरुस्त केल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी दि.02.06.2010 रोजी बिघडले म्हणून गैरअर्जदार कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली परंतू गैरअर्जदार कंपनीने त्याची दखल घेतली नाही व यंत्र दुरुस्त करुन दिले नाही. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली. सदर यंत्र खरेदी केल्यापासून व्यवस्थित चालले नाही म्हणून त्याचे कुटूंबियांना दुषित पाणी प्यावे लागले व आजारपण आले, व औषधोपचाराचा खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदाराने मशीनची संपूर्ण रक्कम, मानसिक व शारिरिक त्रास, दवाखान्याचा खर्च, तक्रारीचा खर्च, नुकसान भरपाईसह एकूण रक्कम रु.84,999/- गैरअर्जदारांकडून मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल करुन, त्यांनी तक्रारदाराची संपूर्ण तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, वॉरंटी कार्ड नुसार मशीन दुरुस्तीसाठी युरेका फोर्बसच्या जालना रोड येथील कार्यालयात स्वतःच्या खर्चाने जावे लागते. गैरअर्जदार युरेका फोर्बस जगातील आय.एस.ओ.मिळालेली कंपनी आहे. तक्रारदाराने चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन गैरअर्जदारांकडून जास्तीचे (3) त.क्र.420/10 रुपये कसे मिळतील म्हणून हा खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. युक्तिवादाचे वेळेस तक्रारदार गैरहजर. गैरअर्जदारांच्या वतीने अड.एस.व्ही.साळवे यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार युरेका फोर्बस कंपनीचे वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम अक्वागार्ड हे यंत्र खरेदी करताना रक्कम रु.1,000/- गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-यास दिल्याचे पावतीवरुन दिसून येते. सदर यंत्राची उर्वरीत रक्कम रु.8,999/- रोख गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-यास दिली परंतू त्याने पावती दिली नाही. याबाबत गैरअर्जदार कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने यंत्राची उर्वरीत रक्कम रु.8,999/- दिलेले नाहीत. तक्रारदाराने गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-यास रोख रक्कम रु.1,000/- दिले, तर त्याची पावती घेतली परंतू रोख रक्कम रु.8,999/- एवढे दिले असताना सदर रकमेची पावती घेतली नाही या तक्रारदाराच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराने सदर अक्वागार्ड यंत्र बसविल्यानंतर दोन महिन्यानंतर वारंवार खराब झाले व गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-यांनी तात्पुरते दुरुस्त करुन दिले, याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. तसेच दि.02.06.2010 रोजी अक्वागार्ड यंत्र खराब झाले व त्यामधून पाणी येणे बंद झाले म्हणून गैरअर्जदार कंपनीचे कार्यालयात जाऊन तक्रार दिली, याबाबतचाही पुरावा दाखल केला नाही. सदर यंत्र गैरअर्जदार कंपनीने दुरुस्त करुन दिले नाही म्हणून त्याचे कुटूंबियांना आजारपण आले व त्यांना डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागले आणि औषधोपचारासाठी रु.5,000/- एवढा खर्च आला, या म्हणण्यापुष्टयर्थ तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जातील त्याच्या म्हणण्यापुष्टयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. म्हणून तक्रारदार त्याने दाखल केलेली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. (4) त.क्र.420/10 2) तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा.. 3) दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |