::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/12/2014 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्त्याने आरोग्याच्या सुविधेकरिता युरेका फोर्बस कंपनीचे पाणी फील्टर मशीन दिनांक 01/07/2012 रोजी रितसर खरेदी केले. परंतु थोडयाच दिवसात सदर मशीनमध्ये दोष उद्भवला. त्याची माहिती तक्रारकर्त्याने सर्विस सेंटरला कॉल करुन दिली. त्यानंतर कंपनीचे सेल्समॅन विरुध्द पक्ष क्र.2 हे तक्रारकर्त्याच्या घरी आले व त्यांनी मशीन उघडून तक्रारकर्त्यास सांगीतले की, मशीनमधील Membrance, Sedimend, Post व PZe हे सुटे भाग खराब झाले आहे, त्याची किंमत 4,320/- दयावी लागेल व या पार्टविषयी ए.एम.सी. करार करुन मिळेल व कराराची मुदत मशीनमध्ये पार्ट लावल्यापासून एक वर्ष राहील व सदर कालावधीत बिघाड झाल्यास नविन पार्ट विनाशुल्क मिळतील. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक 05/09/2013 ला ए.एम.सी. करार करुन मशीनमध्ये नविन पार्ट टाकून घेतले. परंतु सदर करार केल्यानंतर दिनांक 01/07/2014 पासुन मशीनच्या पाण्याची चव सामान्य पाण्याप्रमाणे लागली त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून पाण्याचे टि.डी.एस. मोजले तर ते 130 भरले व त्यांनी तक्रारकर्त्यास मशीनमधील Membrance, Sedimend, Post व PZe हे सुटे भाग खराब झाल्याचे सांगीतले. त्यामुळे तक्रारकर्त्याने करारानुसार ऊपरोक्त सुटे भाग बदलून देण्याची विनंती केली असता, ऑनलाईन तक्रार करा व त्यानंतर पार्ट बदलुन देतो असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक 07/07/2013 ला ऑनलाईन तक्रार केली. परंतु तक्रारकर्त्यास करारानुसार पार्ट बदलुन मिळाले नाहीत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी कसल्याही प्रकारची पार्ट बदलण्यासाठी कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, मशीमधील पार्ट बदलून देण्याचा आदेश विरुध्द पक्षांना दयावा, मानसिक त्रासाची भरपाई तसेच दिनांक 01/07/2014 पासून पिण्याचे पाणी विकत घेतल्याची रक्कम व विरुध्द पक्षास केलेल्या कॉलची रक्कम 2,000/- रुपये विरुध्द पक्षाकडून मिळावेत, अशी विनंती केली.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 4 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी निशाणी-4 प्रमाणे त्यांचे ऊत्तर मंचात दाखल केले. त्यामध्ये नमुद केले की, तक्रारकर्ता यांचा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट (ए.एम.सी. ) हा दि. 05/09/2013 ते 05/09/2014 पर्यंत आहे व त्याची करार पावती तक्रारीसोबत जोडलेली नाही. तक्रारकर्त्याची तक्रार सर्व्हिस सेंटरला दि. 01/07/2014 ला आल्यावर टेक्निशियनने त्यांची मशिन पाहून मेमब्रेन पार्ट खराब झाला आहे असे सांगितले. सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टवर हा पार्ट कंन्झयुमेबल असल्यामुळे तो पार्ट विनाशुल्क मिळत नाही तरीसुध्दा कंपनी तो पार्ट विनामुल्य दयायलाव तक्रारकर्त्याची मशिन सुरु करुन दयायला तयार आहे. कराराप्रमाणे तक्रारकर्त्यास दोन सर्व्हिस मिळालेल्या आहेत, त्याची प्रत तसेच कॉन्ट्रॅक्ट रिसिप्ट ची प्रत जोडलेली आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने निशाणी-7 प्रमाणे त्यांचा लेखी युक्तिवाद केला व त्यामध्ये वरील ऊत्तराव्यतिरीक्त नमुद केले की, तक्रारकर्त्याच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च 3,290/- रुपये व तक्रारीचा खर्च विरुध्द पक्ष कंपनीस मंजूर नाही.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षा चा लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय कारणे देऊन पारित केला.
तक्रारकर्त्याचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 01/07/2012 रोजी विरुध्द पक्षाकडून पाणी फील्टर आर.ओ. मशीन खरेदी केले होते. दिनांक 06/09/2013 पासुन त्या मशिनचे कार्य बंद झाल्याने विरुध्द पक्षाच्या सर्व्हिस सेंटरला कळविले असता, विरुध्द पक्षाचे कर्मचारी यांनी मशिनची पाहणी केली व मशिनमधील काही पार्ट नादुरुस्त झाले असे सांगितले. तसेच हे पार्ट नव्याने खरेदी करुन बसवावे लागतील व त्यानंतर हे पार्ट एक वर्षाच्या आत खराब झाल्यास तक्रारकर्त्याने केलेल्या ए.एम.सी. करारानुसार ते पार्ट विनामुल्य बदलले जातील असे विरुध्द पक्षाच्या कर्मचा-यांनी सांगितले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासोबत ए.एम.सी. करार केलेला आहे. दिनांक 01/07/2014 रोजी तक्रारकर्त्याची मशीन अचानक बंद पडली. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेल्समनला कळविले असता, त्याने पाहणी करुन मशीनमधील Membrance, Sedimend, Post वPZe हे पार्ट नादुरुस्त झाले आहे, व ते तक्रारकर्त्याला नव्याने खरेदी करावे लागतील असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासोबत जो करार केला आहे, त्यानुसार विरुध्द पक्षाने मशीनचे हे पार्ट विनामुल्य बदलवून देणे भाग आहे. परंतु विरुध्द पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागली व विरुध्द पक्षाच्या या सेवेतील न्युनतेबद्दल मंचात प्रकरण दाखल करावे लागले. या उलट विरुध्द पक्षाचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्त्याकडे असलेल्या मशीनचा पार्ट फ्री मिळत नाही, तो कन्झुमेबल आहे, तरीसुध्दा कंपनी तो दयायला तयार आहे व तक्रारकर्त्याची मशीन सुरु करुन देण्यास तयार आहे. परंतु तक्रारकर्त्याने जो पिण्याचा पाण्याचा खर्च मागीतला आहे तो व सदर तक्रारीचा खर्च देण्यास विरुध्द पक्षाची मंजूरी नाही. उभय पक्षांचा हा युक्तिवाद एैकल्यानंतर व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यानंतर मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या सर्व्हिस सेंटरला दिनांक 01/07/2014 रोजी त्यांनी विरुध्द पक्षाकडून घेतलेली फील्टर आर.ओ. मशीन खराब झाली असे सांगीतले होते, हे विरुध्द पक्षाला मान्य आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे तक्रार अर्ज केल्याचे दिसतात. परंतु तरीही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निरसन न केल्यामुळे तक्रारकर्त्याला मंचात तक्रार दाखल करावी लागली. विरुध्द पक्षाला मंचातर्फे सदर प्रकरणाची नोटीस मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष सदर मशिनचा पार्ट बदलून देण्यास तयार झाले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या सोबत करार करुनही मशिनचा पार्ट विनामुल्य बदलून दिला नव्हता, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील न्युनता आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागले व त्यावर त्याचा खर्च झालेला आहे. सबब विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला त्यांच्या मशीनचा पार्ट बदलुन देण्यास व विरुध्द पक्षाच्या सेवेतील न्युनतेमुळे तक्रारकर्त्याला पिण्याचे पाणी बोलवावे लागले व खर्च करावा लागला, त्यामुळे तो खर्च देण्यास विरुध्द पक्ष बाध्य आहे, असे मंचाचे मत आहे. सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या किंवा वेगवेगळेपणे तक्रारकर्त्याच्या पाणी फील्टर आर.ओ. मशीनचे पार्ट विनामुल्य बदलून दयावे.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून
रक्कम रु 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) दयावे.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 45 दिवसाचे आत करावे.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.