तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे अध्यक्ष - ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त खालील प्रमाणे आहे
1. सा.वाले हे पिण्याचे पाणी शुध्द करण्याचे सयंत्र विक्री करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेसोबत त्यांचे पाणी शुध्द करण्याचे सयंत्राबद्दल करार केला व सा.वाले यांनी तक्रारदारांच्या सयंत्राची तिन वर्ष देखभाल करण्याचे कबुल केले. त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना रू.3,000/-,अदा केले. सा.वाले यांचे प्रतिनीधीने दिनांक 28.12.2011 रोजी तक्रारदारांकडील सयंत्राची तपासणी केली व ते सयंत्र सदोष असून तक्रारदारांनी नविन संयत्र विकत घ्यावे असे सूचविले व पूर्वी अदा केलेले रू.3,000/-,नविन सयंत्राच्या किंमतीमध्ये वळती करण्यात येतील असे सूचविले. तक्रारदारांनी हा प्रस्ताव नाकारला व सा.वाले यांना अदा केलेले रू.3,000/-,परत मागीतले सा.वाले यांनी ती परत केली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तकार दाखल केली.
2. तक्रार दाखल झाल्यानंतर सा.वाले यांना नोटीस काढण्यात आली व सा.वाले यांचेवर बजावली. पोचपावती दाखल आहे. तरी देखील सा.वाले गैरहजर राहील्याने सा.वाले यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच कागदपत्र दाखल केले. तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
3. प्रस्तुत मंचाने शपथपत्र व कागदपत्र यांचे वाचन केले त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना सयंत्राची देखभाल करण्याचे संदर्भात सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हि बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारणमीमांसा
4. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रासोबत सयंत्र देखभालीच्या करारनाम्याची, करारनामा दिनांक 16.09.2011 ची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांच्या शुध्द पाणी करण्याच्या सयंत्राचे एक वर्ष देखभाल करणेबद्दल रू.3,000/-,धनादेशानी प्राप्त केले हे दिसून येते.
5. सा.वाले हेच सयंत्राचे विक्रेते होते व त्यांनीच सयंत्राचे देखभाल करण्याचे कबुल केले होते. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे सा.वाले यांचे प्रतिनिधीने दिनांक 28.12.2011 रोजी सयंत्राची तपासणी केली व सयंत्र सदोष असल्याबद्दल तक्रारदारांना कळविले त्यानंतर सयंत्राची देखभाल करण्याचा प्रश्नच नव्हता. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचेकडून वसूल केलेले रू.3,000/-,परत करण्यास नकार दिला. याप्रकारे पाणी शुध्द करण्याचे सदोष यंत्र देखभाल करण्याचे सा.वाले यांनी तक्रारदारासोबत करार केला, रू.3,000/-,वसुल केले व त्यानंतर सयंत्र सदेाष असल्याने नविन सयंत्र तक्रारदारांनी विकत घ्यावे असे तक्रारदारांना सूचविले. तक्रारदारांसोबत देखभालीचा करारनामा करणेपूर्वी सा.वाले यांनी सयंत्राची तपासणी करणे आवश्यक होते व त्यातही सयेत्र सदोष असेल तर करार करण्याची आवश्यकता नाही असे तक्रारदारांना सुचविणे आवश्यक होते. सा.वाले यांनी याप्रकारची कार्यवाही केली नसल्याने सयंत्राची देखभालीचे संदर्भात तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
6. त्यातही तक्रारीची नोटीस सा.वाले यांना प्राप्त झाल्यावर सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफियत दाखल केली नाही. परिणामतः तक्रारदारांची तक्रारीतील कथने अबाधीत राहीलेली आहेत.
7. वरील चर्चे वरून व निष्कर्षावरून पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. सा.वाले यांनी तक्रारदारांना पाणी शुध्दीकरणाचे सयंत्राचे देखभालीचे
करारनाम्याचे संदर्भात सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर
करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.3,000/-,त्यावर 9% व्याज दिनांक
16.09.2011 पासून असे एकत्रित अदा करावेत असा आदेश सा.वाले
यांना देण्यात येतो.
3. सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रू.1,000/-,अदा
करावे असाही आदेश देण्यात येतो.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.