::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष )
(पारीत दिनांक–30 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली तक्रार विरुध्दपक्षानीं सेवेत त्रृटी ठेवल्यामुळे त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई मागण्यासाठी तसेच विमानाचा प्रवास खर्च परत मिळण्यासाठी विरुध्दपक्षां विरुध्द दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) हे इथोपियन एरलाईन्सचे (ETHIOPIAN AIRLINES) कार्यालय आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) हे ट्रॅव्हलींग एजंट आहेत. तक्रारकर्त्याने मुंबई ते जोहान्सबर्ग (JOHANNESBURG) आणि जोहान्सबर्ग ते मुंबई या प्रवासाचे इथोपियन एजअरलईन्सचे जाण्याचे व परतीचे तिकीट खरेदी केले होते. त्याप्रमाणे इथोपियन एअरलाईन्सचे विमान मुंबई ते अदीसअबाबा (ADDIS ABABA) दिनांक-04 सप्टेंबर, 2011 ला निघुन ते अदीसअबाबा येथे सायंकाळी-08.00 वाजता पोहचणार होते, त्या विमानात त्याचा सिट क्रं-17-A आरक्षीत होता. अदीसअबाबा ते इथोपिया आणि तेथून पुढे जोहान्सबर्ग येथील प्रवासाचे आरक्षण पण निश्चीत (Confirmed) झाले होते व जोहान्सबर्ग येथे त्याचे विमान दुपारी 01.15 वाजता पोहचणार होते. जोहान्सबर्ग वरुन मुंबईला परतीचे विमान 11 सप्टेंबर, 2011 ला होते व त्याचे तिकीट सुध्द आरक्षीत झाले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो दिनांक-04 सप्टेंबर, 2011 रोजी मुंबई येथून विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअर लाईन्सचे विमाना मध्ये बसला परंतु त्या वेळी त्याला कुठलीही पूर्व सुचना न देता सिट क्रं-208 देण्यात आला होता, जेंव्हा की, त्याचा आरक्षीत सिट क्रं-17-A असा होता. जेंव्हा त्याचे विमान अदीसअबाबा येथे उतरले तेंव्हा त्याला असे सांगण्यात आले की, अदीसअबाबा ते जोहान्सबर्ग हे विमान त्याला न घेता निघून गेले होते कारण तक्रारकर्त्याचे विमान अदीसअबाबाला उशिरा उतरले होते. तक्रारकर्त्याची जोहान्सबर्ग विद्दापिठातील अधिका-यां सोबत 04.00 वाजता बैठक निश्चीत होती आणि विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे त्याला महत्वपूर्ण बैठकीला वंचित राहावे लागले असते. त्यावेळी त्याला अदीसअबाबा वरुन डार-इस-साला (Dar-Es-Sala) आणि तेथून जोहान्सबर्ग दक्षीण आफ्रीका एअरलाईन्सने जाण्याचा प्रस्ताव देण्यात आला, त्याचे जवळ दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने आणि नियोजित बैठकीला उपस्थित राहणे अत्यंत जरुरीचे असल्याने त्याने पर्यायी व्यवस्थेचा स्विकार केला. डार-इस-साला (Dar-Es-Sala) येथे पोहचल्यावर सुध्दा त्याला पुढील प्रवासासाठी बराच खटाटोप व त्रास सहन करावा लागला व सरतेशेवटी तो जोहान्सबर्ग येथे सायंकाळी उशिरा पोहचला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, वरील सर्व घटनाक्रमामुळे त्याची जोहान्सबर्ग विद्दापिठाच्या अधिका-यांशी असलेली नियोजित बैठक होऊ शकली नाही, त्यामुळे त्याला त्याचा नियोजित प्रवास संक्षीप्त करावा लागला, त्याप्रमाणे पूर्व नियोजित परतीचे दिनांक-11 सप्टेंबर, 2011 चे तिकिट हे दिनांक-08 सप्टेंबर, 2011 चे करुन घ्यावे लागले, त्यासाठी त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागले. नियोजित प्रवासा नुसार तो दिनांक-09 सप्टेंबर, 2011 रोजी सकाळी मुंबई विमानतळावर पोहचला, हा परतीचा प्रवास सुध्दा त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअर लाईन्स या विमानाने केला होता. मुंबईला पोहचल्यावर त्याचे असे लक्षात आले की, त्याच्या 02 बॅग्स हरविलेल्या आहेत, त्याने मुंबई येथील इथोपियन एअर लाईन्सच्या तक्रार केंद्रात तक्रार करण्यासाठी संपर्क साधला असता असे लक्षात आले की, इथोपियन एअर लाईन्सने जोहान्सबर्ग वरुन मुंबईला पोहचलेल्या ब-याच प्रवाशांच्या बॅगा हरविलेल्या होत्या. तक्रारकर्त्याने त्यावेळी तेथील कर्मचा-यांना सांगितले होते की, त्याच्या बॅग मध्ये दस्तऐवज, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तु आहेत परंतु त्याच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नाही. शेवटी 04 दिवसा नंतर त्याला एका इसमाने त्याच्या हरविलेल्या 02 बॅग्स आणून दिल्यात परंतु बॅग उघडून पाहिली असता त्याचे लक्षात आले की, त्यातील काही मौल्यवान वस्तु कमी आहेत, त्याची तक्रार त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) कडे केली परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मुंबई विमानतळा वरुन त्याला एक ई-मेल आला, ज्यात त्याच्या बॅग मधील सामान कमी झाल्याचे कबुल करण्यात आले व त्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून 140 डॉलर देण्याचे कबुल केले. ही सर्व विरुध्दपक्षांची सेवेतील त्रृटी होती, ज्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व आर्थिक त्रास झाला.
म्हणून त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन त्याचे विमानाचे तिकिट खर्चाची रक्कम रुपये-38,476/- वार्षिक-13% दराने व्याजासह परत मागितली असून गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तुची किम्मत रुपये-1,00,000/- तसेच झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये-25,000/- विरुध्दपक्षां कडून मागितलेले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअर लाईन्स तर्फे लेखी जबाब सादर करुन या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नसल्या बद्दल प्राथमिक आक्षेप घेण्यात आला. त्या शिवाय त्यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून कायद्दा नुसार 140 डॉलर देण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यासाठी त्यांनी तक्रारकर्त्या कडून ओरिजनल बिल्स आणि बगेजच्या पावत्या /tags मागितल्या होत्या. पुढे असे नमुद केले की, जर तक्रारकर्त्याच्या बॅग्स मध्ये मौल्यवान वस्तु होत्या अणि महत्वाचे दस्तऐवज तो घेऊन जात होता तर त्याने “Carriage by Air Act-1972” या मधील तरतुदी नुसार “घोषणापत्र” (Declaration) लिहून द्दावयास हवे होते, असे घोषणापत्र असल्या शिवाय विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअरलाईन्सची जबाबदारी फार अल्प प्रमाणात असते. त्याशिवाय त्याने जी मागणी केली आहे, त्या मागणीचे समर्थनार्थ कुठलेही बिल्स लावलेले नाहीत. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) ला जी नोटीस पाठविण्यात आली होती त्यामध्ये कमी रकमेची मागणी केलेली आहे परंतु तक्रारी मध्ये फार जास्त रकमेची मागणी करण्यात आलेली आहे.
विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, मुंबई येथून निघालेले विमान अदीस-अबाबा येथे उशिरा पोहचले होते कारण त्यादिवशी टर्कीश एअर लाईन्सचे (Turkish Airlines) विमान मुख्य धावपट्टीवर घसरल्यामुळे सर्व विमानांना उशिर झालेला होता आणि ही बाब विरुध्दपक्ष क्रं-1) च्या नियंत्रणा पलीकडील आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) ला तक्रारकर्त्याची जोहान्सबर्ग येथे असलेल्या बैठकी बद्दल काहीही माहिती नव्हती. अदीस-अबाबा येथे विरुध्दपक्ष क्रं-1) चे कर्मचा-यांनी त्याला अदीस-अबाबा ते डार-ईस-साला (Dar-Es-Sala) पर्यंत इथोपियन एअर लाईन्सने आणि तेथून जोहान्सबर्ग येथे साऊन आफ्रीकन एअर लाईन्सने प्रवास करण्याचा तक्रारकर्त्याला प्रस्ताव दिला होता, जो तक्रारकर्त्याने कोणताही वाद न करता मान्य केला होता. तक्रारकर्त्याने त्याचा नियोजित प्रवास संक्षीप्त करुन परतीच्या प्रवासाची तारीख अगोदरच करुन घेतली या बद्दल विरुध्दपक्ष क्रं-1) ला काहीही माहिती नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) हे मान्य केले की, मुंबई एअरपोर्टवर तक्रारकर्त्याच्या बॅग्स उशिरा पोहचल्या होत्या कारण त्या विमानातील लगेज कम्पार्टमेंट हे सामानाने पूर्ण भरल्यामुळे (Luggage compartment was full) व आणखी सामान ठेवण्यासाठी तेथे जागा नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे सामान दुस-या विमानाने पाठविण्यात आले होते आणि ते त्याच्या ताब्यात पण देण्यात आले होते. त्याच्या बॅग्स मध्ये असलेले दस्तऐवज, मौल्यवान वस्तु बद्दल विरुध्दपक्ष क्रं-1) ला काहीही माहिती नाही कारण त्या बद्दल तक्रारकर्त्याने घोषीत केले नव्हते. अशाप्रकारे त्यांच्या सेवेत त्रृटी होती किंवा निष्काळजीपणा होता हा आरोप अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) यांना मंचाची नोटीस मिळून सुध्दा त्यांचे तर्फे कोणीही हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
05. तक्रारकर्त्याचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावरील दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1) कडून मौखीक युक्तीवाद करण्यात आला नाही. उभय पक्षांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद आणि दस्तऐवजा वरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
06. तक्रारीचे वाचन केल्या नंतर पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की, ही तक्रार या मंचाला चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते किंवा नाही-
तक्रारकर्त्याने तक्रारीत ज्या काही घटना नमुद केलेल्या आहेत, त्यांचा सविस्तरपणे विचार केला तर पहिली घटना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथोपियन एअर लाईन्सचे विमानात घडली अणि ती म्हणजे तक्रारकर्त्याला त्याचा आरक्षीत सिट क्रं-17-A ऐवजी सिट क्रं-208 देण्यात आला. दुसरी घटना अदीस-अबाबा येथे घडली, जेंव्हा तेथून जोहान्सबर्गला घेऊन जाणारे विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअर लाईन्सचे विमान त्याला न घेता निघून गेले होते. तिसरी घटना ही टांझानिया विमानतळावर घडली, ज्याठिकाणी, त्याला दक्षीण आफ्रीकन एअरलाईन्स सोबत पास मिळविण्या करीता वाद करावा लागला आणि चौथी घटना आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर घडली, ज्यावेळी त्याच्या लक्षात आले की, त्याच्या 02 बॅग्स हरविलेल्या आहेत. अशाप्रकारे तक्रारकर्त्याच्या म्हणण्या प्रमाणे एकही घटना या मंचाचे अधिकारक्षेत्रात घडलेली नाही. त्याच्या चोरी गेलेल्या बॅग्स नंतर त्याला नागपूर येथे परत करण्यात आल्यात परंतु केवळ त्या कारणास्तव नागपूर येथे तक्रार करण्याचे कारण घडले असे म्हणता येणार नाही आणि काळी वेळा करीता जरी असे म्हटले की, नागपूर येथे तक्रार दाखल करण्यास कारण घडले तर त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-3) ला कुठल्याही परिस्थितीत जबाबदार धरता येणार नाही करण तो केवळ एक तिकीट एजंट आहे म्हणून केवळ या कारणास्तव या मंचाचा तक्रार दाखल करण्याचे अधिकार क्षेत्र प्राप्त होते हा युक्तीवाद पूर्णतः चुकीचा आहे. मंचाचे मते विरुध्दपक्ष क्रं-3) याला या तक्रारीत विनाकारण प्रतिपक्ष बनविल्याचे दिसून येते कारण विरुध्दपक्ष क्रं-3) हा, विरुध्दपक्ष क्रं-1 किंवा क्रं-2 चा प्रतिनिधी नाही किंवा त्यांचे शाखा कार्यालय पण नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे नमुद केले आहे की, ज्याअर्थी तो नागपूर येथील रहिवासी आहे म्हणून या मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते परंतु त्याचे हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे.
07. ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-11 नुसार मंचाचे अधिकारक्षेत्र विरुध्दपक्ष ज्या ठिकाणी राहतो किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणच्या मंचाला असते. तक्रारकर्त्याचे रहिवासी किंवा व्यवसायिक ठिकाणावर ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्र अवलंबून नसते. तक्रारकर्त्याचे वकील या तक्रारी संबधाने या मंचाला अधिकारक्षेत्र असल्या बद्दल समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत. वरील वस्तुस्थिती वरुन मंचाला हे नमुद करण्यास कुठलीही अडचण नाही की, ही तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचाला नाही.
08. ज्याअर्थी ही तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचाला नाही, त्या अर्थी या प्रकरणाच्या गुणवत्तेवर जाण्याचा प्रश्न उदभवत नाही. तरी पण थोडक्यात हे नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारकर्त्याने या तक्रारी सोबत विमान प्रवासाचे तिकिट, नोटीस आणि पासपोर्ट या व्यतिरिक्त इतर संबधित असा कुठलाही दस्तऐवज दाखल केलेला नाही.
09. तक्रारकर्त्याचा असाही आरोप आहे की, त्याच्या बॅग मधून मौल्यवान वस्तु चोरी गेल्या होत्या परंतु तसे जर असेल तर त्याने“Carriage by Air Act-1972” या मधील तरतुदी नुसार “घोषणापत्र” (Declaration) लिहून देणे आवश्यक होते आणि त्याची प्रत अभिलेखावर दाखल करणे गरजेचे होते. तक्रारकर्त्याने आंतरराष्ट्रीय विमानाने बाहेरील देशात प्रवास केला होता त्यामुळे त्याला “Custom Clearance” करणे जरुरी होते, त्यामुळे त्याच्या बॅग मध्ये असलेल्या मौल्यवान चिजवस्तुची यादी घोषणापत्रात घोषीत करणे कायद्दा नुसार आवश्यक होते, जे त्याने केलेले नाही आणि ज्याअर्थी त्याची “Custom Clearance” मध्ये त्याचे कडे असलेल्या अघोषीत मौल्यवान वस्तु बद्दल अडवणूक झाली नव्हती, त्याअर्थी त्याच्या बॅग मध्ये तो म्हणतो तशा मौल्यवान वस्तु नसाव्यात असे गृहीत धरावे लागेल.
10. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे ही तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्रा बाहेरची असल्यामुळे ती खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री रविशंकर कांतीलाल मोर यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) इथोपियन एअरलाईन्स, मुंबई आणि इतर-02 यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.