(घोषित दि. 14.02.2014 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले ट्रॅक्टर रक्कम रुपये 7,37,400/- एवढया किंमतीला विकत घेतले. सदर ट्रॅक्टर काही दिवसांनी चालू असताना अचानक बंद पडले. तक्रारदारांनी अंबड येथे वाहूळे यांचे गॅरेजमध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या सूचनेनुसार दुरुस्तीसाठी दिले. त्यावेळी ट्रॅक्टरचे इंजिन जुने फूटलेले व वापरलेले आढळून आले. अशा प्रकारे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जूने ट्रॅक्टर नवीन असल्याचे भासवून विक्री केले व तक्रारदारांची फसवणूक केली. तक्रारदारांनी या संदर्भात गैरअर्जदार क्रमांक 2 यांना वकीलामार्फत दिनांक 03.06.2011 रोजी नोटीस पाठवली. परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नोटीशीची दखल घेतली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार गैरअर्जदार कंपनीने उत्पादित केलेल्या वस्तुंची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असून बाजारपेठेत खूप मागणी आहे. गैरअर्जदार कंपनी पूर्व तपासणी करुनच ट्रॅक्टरचे वितरण करते. तक्रारदारांनी ट्रॅक्टर डिलेव्हरीची तारीख, नादुरुस्त झाल्याची तसेच नादुरुस्ती संदर्भात गैरअर्जदार क्रमांक 2 यांना माहिती दिल्या बाबतची तारीख, प्रस्तुत तक्रारीत नमूद केली नाही. तसेच गैरअर्जदार 1 यांना नादुरुस्ती बाबत कळवले नाही, कायदेशिर नोटीस पाठवलेली नाही.
तक्रारदारांना जुने व उत्पादित दोषयुक्त ट्रॅक्टरची डिलेव्हरी दिली नाही, तक्रारदारांनी ट्रॅक्टरची ट्रायल घेवूनच पूर्ण तपासणीअंती खरेदी केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीत ट्रॅक्टरच्या दोषाबाबत काहीही नमूद केले नाही, कोणताही पुरावा दाखल केला नाही. गैरअर्जदार 1 कंपनीने उत्पादित केलेल्या तारखेपासून 1 वर्षाची वॉरंटी दिली आहे. परंतु तक्रारदारांनी अनाधिकृत सर्व्हीस स्टेशनला किंवा मॅकेनिककडे दुरुस्तीसाठी दिल्यास त्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनी घेत नाही. तसेच टायर, फ्यूअल इग्निशन पंप व इलेक्ट्रीकच्या साहीत्या करिता वारंटी लागू होत नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे जूना ट्रॅक्टर रंग देवून दिला. तसेच ट्रॅक्टर डिलेव्हरी नंतर काही दिवसातच नादुरुस्त झाला ही बाब गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनी स्पष्टपणे नाकारत आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी ट्रॅक्टर खरेदी करत असताना इंजिन, चेसीज क्रमांक याची खात्री केली. तसेच ट्रॅक्टरची नोंदणी करताना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी खात्री करुनच तक्रारदारांच्या विनंती वरुनच नोंदणी केली आहे. तक्रारदार प्रस्तुत ट्रॅक्टर भाडयाने देतात व त्या ट्रॅक्टरचा व्यवसायिक वापर करतात. तक्रारदारांनी ट्रॅक्टरचा वापर माहिती पुस्तीकेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार केला नाही. सदर ट्रॅक्टरमध्ये कोणताही निर्मिती दोष नाही.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एस.बी.देशपांडे व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री.व्ही.बी.शिंदे व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला ट्रॅक्टरची नोंदणी दिनांक 03.03.2010 रोजी केल्याचे R.T.O रजिस्ट्रेशन प्रमाणे दिसून येते. प्रत्यक्षात ट्रॅक्टरची डिलेव्हरी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून केव्हा घेतली ? ट्रॅक्टर नादुरुस्त केव्हा झाला ? ट्रॅक्टरमध्ये कोणत्या प्रकारचे दोष आढळले ? सदर ट्रॅक्टर संदीप वाहूळ मेकॅनिक यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला असता ट्रॅक्टरचे इंजिन जूने असल्याचे कळाले वगैरे मजकूर पुराव्यानिशी सिध्द केला नाही. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरमध्ये उत्पादकीय दोष होता तसेच जुने ट्रॅक्टर रंग देवून नवीन असल्याचे भासवून विक्री केले ही बाब पुराव्या अभावी स्पष्ट होत नाही.
- गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीच्या म्हणण्यानुसार सदर ट्रॅक्टरला उत्पादना नंतर एक वर्षाची वॉरंटी दिली आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरची अधिकृत सर्व्हीस स्टेशनला तपासणी करुन अहवाल गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीकडे पाठवणे आवश्यक होते. तक्रारदारांनी ट्रॅक्टर दुरुस्त केल्या बाबतचा कोणताही पुरावा म्हणजेच जॉबकार्ड तक्रारीत दाखल नाही. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला मजकूर ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.