::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-17 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) विरुध्द विरुध्दपक्षाने त्याची फसवणूक केल्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ईरोज मोटर्स नावाची चार चाकी वाहनाची विक्री करणारी कंपनी आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल नावाची विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) इन्डस बँक आहे, जिचे कडून तक्रारकर्त्याने वाहन खरेदीसाठी वित्तीय सहाय्य घेतलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी कडून दिनांक-29/12/2009 ला स्वराज्य माझदा कंपनीच्या गाडीचा चेसीस विकत घेतला होता, त्याचा चेसिस क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा आहे. त्यानंतर तो चेसीस यवतमाळ येथे दिनांक-01/01/2010 ला त्यावर डिएलएक्स बस उभारण्यासाठी घेऊन गेला. चेसीसची एकूण किम्मत ही रुपये-11,20,000/- एवढी होती, त्यापैकी त्याने रुपये-1,10,000/- डाऊन पेमेंट म्हणून जमा केले आणि उर्वरीत रक्कम रुपये-10,10,000/- चे आर्थिक सहाय्य विरुध्दपक्ष क्रं-3) इन्डस बँके कडून घ्यावयाचे ठरविले, तेंव्हा विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनीने, विरुध्दपक्ष क्रं-3) इन्डस बँके कडून रुपये-8,49,878/- चे आर्थिक सहाय्य तक्रारकर्त्याला करुन दिले. त्या चेसीसचा विमा
विरुध्दपक्ष क्रं-2) चोलमंडल विमा कंपनी कडून काढण्यात आला, ज्यावेळी विमा पॉलिसी त्याला दिली त्यामध्ये चेसीस क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा नमुद होता. तक्रारकर्त्याला ज्या वेळी चेसीसची डिलेव्हरी देण्यात आली त्यावेळी चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक बदलल्याची बाब त्याचे पासून लपवून ठेवण्यात आली. यवतमाळ येथे बस तयार झाल्या नंतर ती आर.टी. ओ. नागपूर येथे नोंदणीकृत करण्यात आली व त्या बसला नोंदणीकृत क्रमांक-MH-31/CQ-6862 असा देण्यात आला मात्र त्यावेळी त्या बसचा चेसीस क्रं-MBUZT54XKCO139430 आणि इंजिन क्रमांक-SLTKC132781 असा वेगळाच देण्यात आला होता, या बाबतीत तक्रारकर्त्याने विचारले असता विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे त्याला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-21/07/2010 रोजी सदर्हू बसची चोरी झाली, त्याचा रिपोर्ट पोलीसांना दिनांक-23/07/2010 रोजी देण्यात आला, चोरी गेलेल्या बसचा शोध घेण्यात आला परंतु ती आढळून आली नाही. पोलीसानीं आपल्या रिपोर्ट मध्ये त्या बसचा चेसीस क्रं-MBUZT54XKCO139430 आणि इंजिन क्रमांक-SLTKC132781 असा लिहिला. तक्रारकर्त्याने त्या नंतर विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल विमा कंपनी कडे चोरी गेलेल्या बस संबधाने नुकसान भरपाईसाठी विमा दावा दाखल केला परंतु विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने तो विमा दावा खारीज केला. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, विरुध्दपक्षाने त्याने विकत घेतलेल्या चेसीसच्या इंजिन आणि चेसीस मध्ये बदल करुन त्याची एक प्रकारे फसवणूक केली आणि म्हणून या तक्रारीव्दारे त्याने गाडीचा विमा दावा रुपये-11,20,000/- मागितला असून त्याशिवाय विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने त्याची फसवणूक केली त्या बद्दल त्यांचे कडून प्रत्येकी रुपये-1,50,000/- नुकसान भरपाई मिळावी आणि त्याची जी आर्थिक हानी झाली त्या बद्दल रुपये-5,00,000/- असे एकूण रुपये-19,70,000/- विरुध्दपक्षानीं द्दावेत अशी मागणी केली.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनीने आपल्या लेखी जबाबा मध्ये असे नमुद केले आहे की, या प्रकरणातील वाद ह व्यवसायिक स्वरुपाचा असल्याने तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होत नाही. तसेच असा पण आरोप केला की, तक्रारकर्त्याने स्वतःचा लाभ करुन घेण्यासाठी बेकायदेशिररित्या काही खोटे दस्तऐवज तयार केले आहेत. तक्रारकर्ता हा ट्रॉन्सपोर्टच्या व्यवसाया मध्ये असून बसेस चालवून तो त्या पासून कमाई करतो. या व्यवसायात येण्यापूर्वी तो विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी मध्ये सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून डिसेंबर-2009 पर्यंत नौकरीवर होता, ती नौकरी सोडल्या नंतर त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी कडून एक चेसीस विकत घेतले ज्यावर ते एका लक्झरी बसची उभारणी करणार होता, त्या चेसीसची किम्मत रुपये-6,60,000/- एवढी होती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्याला असे सांगितले की, ती संपूर्ण किम्मत तो विरुध्दपक्ष क्रं-3 बँके कडून आर्थिक सहाय्य घेऊन भरणार आहे, त्यासाठी तक्रारकर्त्याल चेसीसचे शो-रुम प्राईसचे अंदाजपत्रक देण्यात आले होते, त्यानंतर तो स्वतः विरुध्दपक्ष क्रं-3) बँके कडे आर्थिक सहाय्य घेण्यासठी गेला होता, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनीचा काहीही संबध नव्हता. विरुध्दपक्ष क्रं-3) बँकेनी त्याला रुपये-8,49,750/- रुपयाचे कर्ज मंजूर केले व ते विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनीला दिले. वाहनाचा विमा, नोंदणी फी, टॅक्स इत्यादीची रक्कम तक्रारकर्त्याला भरावयाची होती.
विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने त्या बसचा विमा चेसीस आणि इंजिन नंबरवर काढला. तक्रारकर्ता म्हणतो त्या प्रमाणे गाडीचा चेसीस नंबर आणि इंजीन क्रमांक वेगळा होता ही गोष्ट नाकबुल केली. गाडीची किम्मत मिळाल्या नंतर चेसीस तक्रारकर्त्याला देण्यात आली, त्याची एकूण किम्मत व्हॅटसहीत रुपये-6,60,000/- एवढी होती परंतु तक्रारकर्त्या कडे रुपये-29,400/- थकीत होते या बद्दल तक्रारकर्त्याने पोस्टे-डेटेड धनादेश दिल होता परंतु तो पुढे अनादरीत झाला होता, त्या बद्दल तक्रारकर्त्या विरुध्द भारतीय पराक्रम्य विलेख कायद्दाचे (Negotiable Instrument Act) कलम-138 खाली न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. तक्रारकर्त्याने स्वतःहून नोंदणी न झालेला चेसीस
ताब्यात घेतला होता व त्याला याची पूर्ण कल्पना होती की, त्याचा बसचा चेसीस क्रं-MBUZT54XKCO139430 आणि इंजिन क्रमांक-SLTKC132781 असा होता. तक्रारीतील इतर सर्व मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल विमा कंपनी तर्फे आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले केले की, रेकॉर्ड प्रमाणे तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या चेसिसचा क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा आहे, ज्याचा विमा त्यांचे कडून काढण्यात आला होता. त्यांनी हे नाकबुल केले की, जो चेसीस तक्रारकर्त्याला दिला होता त्याचा चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक हा वेगळा होता. त्यांनी हे पण नाकबुल केले की, ज्या वेळी बसची नोंदणी आर.टी.ओ. कडे झाली त्यावेळी तक्रारकर्त्याला माहिती पडले की, त्याचा चेसीस आणि इंजिन नंबर विमा काढलेल्या इंजीन आणि चेसीस क्रमांक पेक्षा वेगळा होता. बसची चोरी झाली या बद्दल एफ.आय.आर. नोंदविण्यात आला होता ही बाब कबुल केली आहे. चोरी गेलेल्या बसचा विमा दावा हा इतर विरुध्दपक्षांशी संगनमत करुन फेटाळण्यात आला हे नाकबुल करुन पुढे असे नमुद केले की, ज्या बसचा विमा काढण्यात आला होता त्याचा चेसिस क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा आहे. ज्या गाडीचा अपघात झाला होता आणि ज्या बद्दल विमा दावा केला होता त्याचा चेसीस क्रं-MBUZT54XKCO139430 आणि इंजिन क्रमांक-SLTKC132781 असा होता. अशाप्रकारे ज्या गाडीचा त्यांनी विमा काढला होता, त्याचा विमा दावा त्यांचेकडे करण्यात आला नाही आणि ज्या गाडीचा विमा दावा करण्यात आला त्याचा विमा त्यांनी काढलेला नाही म्हणून त्यांचेवर विमा दावा मंजूर करण्याची जबाबदारी येत नाही. इतर सर्व मजकूर अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) इन्डस बँक या वाहन कर्ज पुरवठा करणा-या बँके तर्फे लेखी जबाबा मध्ये असे नमुद करण्यात अले की, गाडीची किम्मत ही इन्वॉईस प्रमाणे रुपये-11,86,880/- एवढी होती आणि तक्रारकर्त्याने रुपये-10,10,000/- रुपयाचे कर्ज काढण्याचे ठरविले होते. त्यांनी त्याला रुपये-8,59,878/- एवढे कर्ज मंजूर केले. बसची चोरी झाली हे नाकबुल करुन त्याचा विमा दावा केल्या संबधीची सुचना त्यांना दिल्याचे नाकबुल केले. त्यांचे इतर विरुध्दपक्षांशी कुठल्या प्रकारचे संगनमत होते हे नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी तक्रारीचे अनुषंगाने सादर केलेली उत्तरे, उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारीचे स्वरुप पाहता असे दिसते की, तक्रारकर्त्याची ही तक्रार विरुध्दपक्षाच्या सेवेतील कमतरता या मुद्दावर अवलंबून नसून विरुध्दपक्षानीं संगनमत करुन त्याची फसवणूक केली आहे या आरोपा वरुन दाखल केली आहे आणि म्हणून विरुध्दपक्षां कडून सेवेतील कमतरता दुर करुन मागण्या ऐवजी त्यांचे कडून फसवणूक केल्या बद्दल केवळ नुकसान भरपाई मागितली आहे, या शिवाय त्याने तक्रारीत दुसरी कुठलीही मागणी केलेली नाही. जर एखाद्दा ग्राहक विरुध्दपक्षा विरुध्द त्याची फसवणूक केल्या बद्दल तक्रार करीत असेल तर तक्रारकर्त्याने त्यासाठी योग्य ती दाद मागण्यासाठी फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयात जावे असे मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ब-याच प्रकरणात नमुद केलेले आहे कारण ज्यावेळी तक्रारकर्ता विरुध्दपक्षा विरुध्द फसवणूक व धोखाघडीचा आरोप करतो त्यावेळी त्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी सखोल तपास होणे गरजेचे असते, जे ग्राहक मंचा समोर होऊ शकत नाही.
08. तक्रारी प्रमाणे तक्रारकर्त्याला ताब्यात देण्यात आलेली बस आणि ज्या बसची नोंदणी आर.टी.ओ.कडे झाली त्यांच्या चेसीस आणि इंजिन नंबर मध्ये फरक होता. जी गाडी त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी कडून विकत घेतली होती आणि विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल विमा कंपनी कडून विमाकृत केली होती आणि जी यवतमाळला तो घेऊन गेला होता, त्याचा चेसिस क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा आहे, त्याचे म्हणण्या प्रमाणे गाडीची एकूण किम्मत रुपये-11,20,000/- एवढी होती, त्या बद्दल टॅक्स इन्व्हाईस त्याने दाखल केले आहे परंतु ते पाहिले असता गाडीची एकूण किम्मत रुपये-11,86,880/- एवढे असल्याचे दिसून येते, ज्यामध्ये व्हॅटच्या रुपये-1,31,875/- एवढया रकमेचा सुध्दा समावेश आहे. म्हणजेच गाडीची व्हॅटचे मुल्य सोडून मूळ किम्मत ही रुपये-10,55,005/- एवढी होती, त्यामुळे आम्हाला हे समजून येत नाही की, कोणत्या आधारावर तक्ररकर्ता असे म्हणतो की, गाडीची किम्मत रुपये-11,20,000/- एवढी आहे.
09. विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे तिचे वकीलानीं आपल्या युक्तीवादात असे सांगितले की, जो टॅक्स इन्व्हाईस तक्रारकत्याने दाखल केला आहे तो बनावटी आहे कारण तो विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे कधीच जारी केलेला नव्हता परंतु त्या टॅक्स इन्व्हाईसवर तक्रारकर्त्याने नोंदणी न झालेल्या गाडीचा विमा विरुध्दपक्ष क्रं-2) चोलामंडल विमा कंपनी कडून काढला होता. विरुध्दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेता कंपनीच्या वकीलानीं आणखी एक बाब आमचे निदर्शनास आणून दिली की, त्या टॅक्स इन्व्हाईसवर ग्राहकाची स्वाक्षरी नाही आणि विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता कंपनी तर्फे जी स्वाक्षरी त्यावर करण्यात आलेली आहे ती तक्रारकर्त्यानेच दाखल केलेल्या दुस-या ख-या टॅक्स इन्व्हाईस वरील स्वाक्षरी पेक्षा भिन्न आहे, तो टॅक्स इन्व्हाईस दस्तऐवज क्रं-2 म्हणून अभिलेखावर दाखल केला आहे, त्यावर ग्राहकाची स्वाक्षरी असून गाडीची किम्मत रुपये-6,60,000/- एवढी दाखविलेली आहे. आम्ही हे म्हणू शकत नाही की, रुपये-11,86,880/- रुपयाचा पहिला टॅक्स इन्व्हाईस हा बनावटी आहे किंवा नाही परंतु त्यावर नमुद केलेला चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांक हा रुपये-6,60,000/- रुपयाच्या टॅक्स इन्व्हाईस मध्ये दिलेल्या इंजिन आणि चेसीस नंबर पेक्षा वेगळा आहे, त्या शिवाय दोन्ही टॅक्स इन्व्हाईस मध्ये नमुद केलेली तारीख ही भिन्न भिन्न आहे. अशाप्रकारे आमचे समोर तक्रारकर्त्याने 02 टॅक्स इन्व्हाईसेस दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये गाडीची किम्मत तसेच चेसीस आणि इंजिन क्रमांक हे भिन्न भिन्न आहेत.
10. आता या ठिकाणी हे पाहणे महत्वाचे आहे की, कोणता चेसीस आर.टी.ओ. कडे MH-31/CQ-6862 म्हणून नोंदणीकृत करण्यात आला होता आणि कोणता चेसीस विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीकडे विमाकृत करण्यात आला होता. दस्तऐवज क्रं-2) वरील टॅक्स इन्व्हाईस प्रमाणे गाडीचा चेसीस नोंदणी केल्या शिवाय तक्रारकर्त्याने घेतला होता असे त्यात नमुद केलेले आहे. विमा पॅलिसीच्या प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमा काढलेल्या गाडीचा चेसिस क्रं-MBUZT54XCO 135050 आणि इंजिन क्रं-SLTEC 128594 असा नमुद आहे. विमा पॉलिसीच्या प्रतीवर गाडीचा नोंदणी क्रमांक नमुद नाही परंतु ज्या गाडीची चोरी झाली त्याचा इंजीन आणि चेसीस नंबर मात्र वेगळा होता. तक्रारकर्त्याने गाडी क्रं- MH-31/CQ-6862 या गाडीचा विमा दावा केला होता. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने त्याला कळविले होते की, या क्रमांकाची गाडी त्यांचे कडे विमाकृत करण्यात आलेली नाही आणि म्हणून ते विमा दावा मंजूर करण्यास बाध्य नाहीत. तक्रारकर्त्याने गाडी क्रं- MH-31/CQ-6862 ची विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली नाही.
11. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याची फसवणूक करण्या मागे सर्व विरुध्दपक्षांचे संगनमत होते कि नाही हा एक सखोल तपासाचा भाग आहे, हा प्रश्न ग्राहक मंचाच्या मर्यादित अधिकार क्षेत्रात केवळ कागदोपत्राच्या आधारावर निर्णयान्वित करता येणार नाही, म्हणून केवळ या मुद्दावर सदरची तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालविण्या योग्य नाही, तक्रारकर्त्याने त्याच्या कथीत फसवणूकीसाठी योग्य ती दाद मागण्यासाठी सक्षम न्यायालयाकडे जाणे योग्य राहिल. गाडीच्या विम्या दाव्या संबधी विचार केला असता ही वस्तुस्थिती आहे की, ज्या गाडीचा विमा दावा तक्रारकर्त्याने दाखल केला होता, ती गाडी विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने विमाकृतच केलेली नव्हती आणि ज्या गाडीचा विमा उतरविण्यात आला होता, त्याचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर हा
अपघातग्रस्त गाडीच्या इंजिन नंबर आणि चेसीस नंबर पेक्षा वेगळा आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने योग्य प्रकारे विमा दावा नाकारलेला आहे, सबब ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री आशिष गोविंदराव सोमकुवर यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) इरोज मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर-2 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.