जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 317/2008. प्रकरण दाखल तारीख - 25/09/2008 प्रकरण निकाल तारीख – 31/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य सौ.राधा शामराव पवार, रा.रा.मालेगांव ता.अर्धापुर जि. नांदेड. अर्जदार. विरुध्द. सहायक अभियंता, गैरअर्जदार. विज वितरण कंपनी, अर्धापुर ता.अर्धापुर जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार तर्फे वकील - अड.व्ही.व्ही.नांदेडकर. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, ग्राहक क्र. 550080239670 अन्वये गैरअर्जदार यांचेकडुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे. गैरअर्जदार यांनी अचानकपणे अर्जदार यांना रु.10,000/- कंपाऊडींग आणि रु.4,660/- देयक असे एकुण रु.14,660/- चे बिल दिले. त्याबद्यल अर्जदार यांनी सदरील देयका बाबत दि.29/02/2008 चौकशी केली असता, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. सदरील बिल न भरल्यास त्यांचा विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. अर्जदार यांचा विद्युत वापर हा अत्यंत कमी असुन घरगुती वापर आहे. ऑगष्ट 2003 ते डिसेंबर 2007 या काळात 1972 युनीट पोटी रु.17,550/- भरले आहे व विज पुरवठा खंडी होऊ नये म्हणुन अर्जदार यांनी रु.14,660/- भरले आहेत. अर्जदारास विज कंपनी घरगुती बिल हे टेरीक प्रमाणे देणे क्रमप्राप्त आहे. अर्जदार यांचा वापर हा घरगुती वापर असुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अवाजवी बिल देऊन सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदार यांनी अशी मागणी केली आहे की, विज कंपनीच्या अशा बेबंद कारभाराविरुध्द योग्य तो निर्णय घेवुन त्यांना न्याय द्याव व त्यांना देण्यात आलेले रु.14,660/- देयक रद्य होऊन मिळावी. या प्रकरणांत गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारचा अर्ज हा कायदयाच्या चौकटीत बसणारा नाही. अर्जदाराने विज वितरण कंपनीच्या अधिका-या विरुध्द तक्रार करुन त्यांना निष्कारण गोवलेले आहे. अर्जदार हा ग्राहक होऊ शकत नाही. अर्जदाराचा विज पुरवठा हा व्यवसायीक स्वरुपाचा होता, त्यामुळे अर्जदार ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) (ड) (II) नुसार ग्राहक होवु शकत नाही. म्हणुन त्यांची तक्रार खारीज करावी अर्जदाराची तक्रार काल्पनीक मुद्यांवर अधारीत आहे. सदर प्रकरणांत अर्जदाराने क्लेम व प्रेयर क्लॉज हा पृथकरित्या दिलेला नाही, अर्जदाराचा अर्ज हा अपरिपक्व व चुकीचा आहे. अर्जदाराने वेळो वेळी सदरील अर्ज देवुन विनंत्या केल्या आणि दि.25/02/2008 रोजी दिलेल्या वाढीव बिल दिल्यापासुन विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली, हे अर्जदाराचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. ऑगष्ट 2003 ते डिसेंबर 2007 या काळात 1972 युनिटपोटी रु.17,550/- भरले आहे व दहशतीखाली रु.14,660/- अडवणुकीने वसुल केले आहे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराची विजेची जोडणी व्यवसायीक कारणासाठी घेतली असल्या कारणांने अर्जदाराला दिलेला विज पुरवठा व त्यासंबंधी दिलेली बिले व रक्कमांची वसुली व्यवसायीक दराने करण्यात येते, त्यामुळे अर्जदाराला घरगुती दराने बिले द्यावी, हा अर्जदाराचा आग्रह चुकीचा आहे. दि.01/01/2008 रोजी अर्जदार यांच्या जागेत विज वितरण कंपनीच्या उडन दस्त्याने भेट दिली व तेथे त्यांना असे आढळुन आले की, मिटरची परिस्थिती चांगली नव्हती मिटर टर्मिनल कव्हरला कोणतेही सिल नव्हते व मिटरच्या उजवीकडील बाजुस लावलेले कंपनीचे सिल हताळलेले होते व तेथे त्यांनी व्यक्ती समक्ष अक्युचेक मिटरने मिटर तपासलेले असता ते 84.66 टक्के मंद गतीने चालत असल्याचे आढळुन आले. सदर परिस्थितीचा पंचनामा करण्यात आला त्यावेळेस तेथे अर्जदाराचे पती उपस्थित होते त्यांनी पंचनाम्यावर सही केलेली आहे. सदर बाब विजेचा अनधिकृत वापर व विज चोरी या सदरामध्ये येत असल्या कारणांने कंपनीच्या प्रचलित नियमानुसार केलेल्या विज चोरीचे असेसमेंट करणेकामी चालु दरानुसार गणीत मांडले असता, विज चोरीची एकुण रक्कम रु.4,660/- आली व एक किलोवॅट पर्यंत क्षमतेचे व्यवसायीक वापर होत असल्या कारणाने अर्जदाराला विज चोरीचे देयक रु.4,660/- देणेत आले आणि तडजोड रक्कम रु.10,000/- देण्यात आलेले आहे. अर्जदाराने विजेच्या मिटरची छेडछाड करुन त्याला संथ गतीने चालण्यास भाग पाडलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने वापरलेले सर्व युनिटसची नोंद मिटरवर होवु दिलेली नाही, याचा उद्येश अर्जदाराचा स्वतःचा फायदा करुन घेण्याचा होता. अर्जदार विजेचा गैरवापर करुन विज वितरण कंपनीचे नुकसान करीत आहे. अर्जदाराने संपुर्ण तडजोडीची रक्कम भरल्यामुळे त्यांच्या विरुध्द फौजदारी फीर्याद दाखल करण्यात आलेली नाही. गैरर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवेत कमतरता केलेली नाही म्हणुन अर्जदार यांचा अर्ज रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे म्हणणे, शपथपत्र याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली काय?. नाही. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी या अर्जासोबत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेले विज देयक दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले विज देयक याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2– अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत परंतु प्रत्यक्षात अर्जदार यांचे पती दवाखाना चालवत आहेत आणि सदर व्यवसायासाठी अर्जदारयांचे पती विज पुरवठयाचा वापर करीत आहेत. त्यामुळे सदरचे प्रकरण हे व्यवसायीक स्वरुपाचे आहे, असे गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे मध्ये नमुद केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणेसोबत दि.01/01/2008 रोजी अर्जदार यांचे जागेत दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे भरारी पथकाने भेट दिली त्यावेळी मिटरची परिस्थिती चांगली नव्हती. मिटर टर्मिनल कव्हरवर कोणतेही सिल नव्हते व मिटरचे सिल हाताळलेले होते. सदर व्यक्ति समक्ष अक्युचेक मिटरने मिटर तपासले असता तो 84.66 टक्के संथ गतीने चाल असल्याचे आढळुन आले तसेच त्याच्या उजव्या जागेचे कंपनीचे सिलही हाताळलेले आढळले दिसल्या त्या सर्व परिस्थितीचा पंचनामा करण्यात आला. सदरचा पंचनामा गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेले आहे. सदर पंचनाम्याचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमुद केलेले सर्व गोष्टीचे विश्लेषन दिलेले आहे. सदर पंचनाम्यावर अर्जदार यांचे पती श्री.एस.बी.पवार याची सही आहे. सदर सर्व परिस्थितीचा विचार करता, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विज वापर नियमबाहय केलेला आहे, असे स्पष्ट दिसुन येत आहे आणि सदरची वस्थुस्थितीमुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी अनुक्रमे दिलेले रु.10,000/- व रक्कम रु.4,660/- चे बिलही भरले आहे. सदरचे बिल अर्जदार यांनी अंडर प्रोटेस्ट भरलेले आहे असे कुठेही नमुद केलेले नाही अगर सदरचे बिल भरण्यापुर्वी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना सदर बिल आम्ही अंडर प्रोटेस्ट भरत आहे असे कळविलेले नाही. त्यामुळे आता अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी दिलेले विज बिलाची रक्कम परत मागता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी दिलेले बिल भरलेले आहे व त्याबाबत बिल भरते वेळी कोणताही आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र आणि त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे म्हणणे व शपथपत्र आणि त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्यात येतो. 2. दावा खर्च संबंधीतांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |