जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.376/2008. प्रकरण दाखल दिनांक –02/12/2008. प्रकरण निकाल दिनांक –02/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. बालाजी दशरथ कल्याणे (कल्याणकर) वय वर्षे सज्ञान, व्यवसाय शेती, रा. मुगट ता. मुदखेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. ग्रामीण वीभाग नांदेड तर्फे गैरअर्जदार कार्यकारी अभिंयता, विद्युत भवन, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.दिलीप मनाठकर. गैरअर्जदार तर्फे - अड.विवेक नांदेडकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित नांदेड यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदार हे आपल्या मुगूट ता. मुदखेड येथील शेत जमीन गट नंबर 532 क्षेञफळ 7 हेक्टर 59 आर चे मालक असून शेतीच्या उत्पन्नावरच त्यांचा जिवनचरिञ अवलंबून आहे. त्यांचे शेतातील बोअर वर विहीरीसाठी गैरअर्जदार यांचेकडून 1995 मध्ये विज पूरवठा ग्राहक क्र.550060004978 द्वारे विज मिटरसाठी घेतला आहे. त्यावर ते बागायती पिक घेतात. अर्जदाराच्या जमिनीवरुन खांब लावून विज तार ओढलेली आहे. अर्जदाराने वर्ष,2007-08 या वर्षात या जमिनीच्या क्षेञफळापैकी काही भागावर ऊसाचे पिक लावलेले आहे. ते फेब्रवारी 2008 पर्यत परिपक्व होत आले होते. दि.27.02.2008 रोजी दुपारच्या वेळेस विज वाहीनी तारेतून घर्षन होऊन जाळ झाला व उभ्या ऊसाचे पिकास आग लागली. आगीमूळे अर्जदाराच्या जमिनीतील 5 एकर ऊसाचे पिक पूर्णतः जळून गेले. हया घटनेस गैरअर्जदार सर्वस्वी जबाबदार आहेत. सदरील घटना घडण्यापूर्वी अर्जदाराने ब-याच वेळा कंपनीच्या अधिका-यांना सूचना दिली होती. विज वाहीनी तारा हया खूप लोंबल्या आहेत त्या दूरुस्त करणे आवश्यक आहे. परंतु गैरअर्जदारांनी त्यांचेकडे लक्ष दिले नाही. घटना दि.27.02.2008 रोजी घडल्यानंतर अर्जदाराने पोलिस स्टेशन, मुदखेड येथे गून्हा नंबर 37/2008 नोंदविला. पोलिसांनी दि.28.02.2008 रोजी घटनास्थळ पंचनामा केला, अर्जदाराने महसूल खात्याला त्यांच दिवशी म्हणजे दि.27.02.2008 रोजी घटनेची माहीती दिली. महसूल खात्याने दि.28.02.2008 रोजी नूकसानीची पाहणी करुन पंचनामा केला. गैरअर्जदारांना दि.28.02.2008 रोजी घटनेची माहीती दिली त्यांचे अधिका-याने जमिनीवर येऊन नूकसानीची पाहणी केली व नूकसान भरपाई देण्याचे मान्य केले. परंतु अद्यापही त्यांनी नूकसान भरपाई दिली नाही. म्हणून दि.27.06.2008 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस दिली. अर्जदाराचार 5 एकर ऊस क्षेञफळावर ऊस होता. त्यांचे कमीत कमी उत्पन्न 50 टन धरले तरी 250 टन पिक येणार होते. त्यासाली ऊसाचा भाव रु.850/- टन होता, याप्रमाणे रु.2,12,500/- चे अर्जदाराचे नूकसान झालेले आहे व त्यावर 18 टक्के व्याज मिळावे , तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.10,000/- गैरअर्जदार यांचे कडून मिळावेत म्हणून मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे प्रकरण हे काल्पनिक मूददयावर आधारीत आहे व अवास्तव रक्कमेची मागणी करणारे असून अर्जदाराने वर्ष,2007-08 या वर्षात ऊस पिक घेतले याबददल त्यांना काही माहीती नाही. तसेच दि.27.02.2008 रोजी स्पार्कीग होऊन जाळ झाला व ऊसाचे पिकास आग लागली या बददलही त्यांना माहीती नाही. अर्जदाराचे 2 हेक्टर मधील ऊसाचे पूर्ण नूकसान झाले हे म्हणणे चूक व खोटे आहे. तसेच सदरील घटना घडण्यापूर्वी गैरअर्जदार यांना विज वाहीनी तारा खाली लोंबल्या आहेत व ते दूरुस्त करणे जरुरीचे आहे असे सांगितले हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. पोलिस स्टेशनला तक्रार दिली, पंचनामा झाला, तहसील कार्यालयाने पंचनामा केला या सर्व गोष्टी गैरअर्जदार नाकारतात. दि.28.02.2008 रोजी अर्जदाराने दिलेलया अर्जाशी गैरअर्जदारांचा कोणताही संबंध नाही. त्यामूळे त्यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. गैरअर्जदार यांचे अधिका-यानी जमिनीवर येऊन पाहणी केली व नूकसान भरपाई देण्याचे म्हणणे मान्य केले हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार यांनी कायदेशीर नोटीस दिली हे ही त्यांना मान्य नाही. अर्जदाराने जे प्रति एकर 50 टन उत्पन्न दाखवलेले आहे हे त्यांचे म्हणणे खोटे आहे.गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही व अर्जदारास झालेल्या नूकसानीस गैरअर्जदार जबाबदार नाहीत त्यामूळे त्यांचा अर्ज खर्चासह फेटाळावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द नाही. होते काय ? 2. किती रक्कम मिळण्यास पाञ आहेत ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार हे मुगूट येथील शेत गट नंबर 532 यामधील 7 हेक्टर 53 आर या शेतीचे मालक असल्याबददल त्यांनी गांव नमूना नंबर 7 दाखल केला आहे व त्या क्षेञफळातील 4 एकर मध्ये ऊस वर्ष,2007-08 साली घेतला याबददल गांव नमूना नंबर 12 दाखल केला आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक नंबर 550060004978 याद्वारे गैरअर्जदार यांचे ग्राहक असल्याबददलचे विज देयक दाखल केलेले आहे. दि.27.02.2008 रोजी त्यांचे शेतातील गैरअर्जदार यांनी लावलेल्या खांबावरील लूझ तारा एकमेकास घर्षन होऊन स्पार्कीग झाली व आगीची ठिणगी ऊसावर पडल्यामूळे आग लागली याबददलची फिर्याद पोलिस स्टेशन मुदखेड येथे दाखल केली तो अर्ज प्रकरणात दाखल केला आहे. तसेच नूकसान भरपाई बददलची सूचना तहसिल मुदखेड यांना अर्जाद्वारे देण्यात आली. हे दोन्ही अर्ज या प्रकरणात दाखल आहेत. पोलिसांनी जायमोक्यावर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व शेत गट नंबर 532 मुगूट येथे विज वाहीनीतील ताराच्या घर्षनामूळे ऊस जळाला, त्यामूळे रु.1,70,000/- चा पंचनामा केलेला आहे.यानुसार दूस-या दिवशी दि.28.02.2008 रोजी तलाठी कार्यालय, मुदखेड यांनी पाच पंचासमक्ष अर्जदाराचा गट नंबर 532 मधील 2 हेक्टर ऊस ताराचे स्पार्कीग होऊन जळाला व याबददल रु.1,70,000/- नूकसान झाल्या बददलचा पंचनामा केला आहे. हे दोन्ही पंचनामे या प्रकरणात दाखल आहेत. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांने घटना घडण्याच्या पूर्वी गैरअर्जदारांना विज वाहीनीच्या तारा खाली लोंबत असून त्यांची दूरुस्ती करावी अशी सूचना दिल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदारांना नूकसान भरपाई मागण्यासाठी अर्जदाराने दि.28.02.2008 रोजी सहायक अभिंयता ग्रामीण नांदेड यांना अर्ज दिला तो अर्ज त्यांचे कार्यालयाला मिळाला परंतु हा अर्ज मिळाल्यानंतर गैरअर्जदारांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी केली काय किंवा या बाबत काय कारवाई केली यांचा कोणताही उल्लेख केलेला नाही. याशिवाय अर्जदाराने नूकसान भरपाई मिळण्यासाठी दि.27.07.2008 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस दिली. ही नोटीस गैरअर्जदार यांना मिळाल्याबददल आर.पी.ऐ.डी. ची पावती अर्जदाराने दाखल केलेली आहे. जर गैरअर्जदार यांची जबाबदारी येत नसेल तर हया कायदेशीर नोटीसला सविस्तर उत्तर देणे गरजेचे होते परंतु असे न करता गैरअर्जदार गप्प बसले. यांस त्यांची मूक संमती होती असे समजावे काय ? गैरअर्जदार यांनी आपली जबाबदारी पूर्णरित्या नीभावली नाही व शेतक-याच्या नूकसानीवर कोणतीही कारवाई न करता त्यांचेकडे दूर्लक्ष केले असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केली आहे. मूददा क्र. 2 ः- गैरअर्जदार यांचेकडे कोणतीही चूक नव्हती असा कोणताही पूरावा समोर आलेला नाही. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात 7 हेक्टर 59 आर या क्षेञफळामधील काही भागात ऊसाची लागवड केली होती असे म्हटले आहे व तक्रार अर्जात 5 एकराचा उल्लेख केलेला आहे परंतु त्यांनी दाखल केलेल्या 7/12 पाहिला असता त्यावर 4 एकराची नोंद आहे. महसूल कार्यालय व पोलिस पंचनामा यात ही अंदाजे पाच एकर ऊसाचे नूकसान रु.1,70,000/- झाले हे गृहीत धरलेले आहे. अर्जदारांचा ऊस जळाला व त्यांचे नूकसान झाले याबददल काही संशय राहीला नाही. परंतु त्यांनी 50 टन एकरी उत्पन्न दाखवले हे जास्तीत जास्त आहे. नूकसानीसाठी कमीत कमी उत्पन्न एकरी 40 टन जर गृहीत धरले तर 4 x 40 टन = 160 टन उत्पन्न त्यांना झाले असते. त्या वेळचा ऊसाचा भाव वर्ष,2007-08 चा हा रु.850/- होता, याप्रमाणे 160 x 850 = रु.1,36,000/- चे उत्पन्न झाले असते. म्हणजे एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. शिवाय प्रकरण दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.28.11,2008 पासून त्यावर 9 टक्के व्याज मिळण्यास ते पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचा ऊस जळून झालेल्या नूकसानी भरपाई बददल रु.1,36,000/- व त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजे दि.28.11.2008 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदार यांना दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |