::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 20/03/2018)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून निवासी वापराकरीता क्रमांक 7612079392 चे विद्युत मीटर घेतले असून त्यांचा ग्राहक क्रमांक 464200005542 हा आहे. तक्रारकर्ता हे मे,2016 पर्यंत विरुध्दपक्षांकडे वीज देयकांचा भरणा नियमीतपणे करीत होते. विरुध्द पक्षाने जून,2016 मध्ये तक्रारकर्त्याकडील सदर मीटर दोषपूर्ण दाखवून रु.300/- चे विज देयक दिले. तक्रारकर्त्याने त्याबाबत विरुध्द् पक्षांकडे ऑनलाईन तक्रार केली. तरीसुध्दा विरुध्द् पक्षांनी सदर विजदेयक सुधारणा करुन दिले नाही व ऑगस्ट,2016 मध्ये सदर वीज मीटर हे चालू असतांना सुध्दा मीटरची स्थिती ही दोषपूर्ण दाखवून रु.930/- चे विजदेयक दिले. तक्रारकर्त्याने ऑनलाईन तक्रार तसेच दिनांक 6/12/2016 व दिनांक 8/9/2017 रोजी विरुध्द पक्षांकडे तक्रार देवूनही सदर अर्जावर कोणतीही कार्यवाही न करता विरूध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याकडील विजपूरवठा खंडीत करुन तक्रारकर्त्याकडील मीटर काढून नेले. तक्रारकर्त्याची मुलगी ही इयत्ता 10 वी ची विद्यार्थीनी होती व तक्रारकर्त्याकडील विजपूरवठा खंडीत केल्यामुळे तीला कमी गूण प्राप्त झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले आहे. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्दपक्षांविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्दपक्षांनी तक्रारकर्त्यांप्रती अनुचीत व्यापार पध्दती अवलंबिलेली आहे असे घोषित करावे, विरूध्दपक्षांनी तक्रारकर्त्यांस नुकसान भरपाईदाखल रु.50,000/- तसेच मानसीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.20,000/- व विरूध्द पक्षांच्या गैरकृत्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलीला इयत्ता10 वी त 10 ते 15 टक्के गुण कमी प्राप्त होवून झालेल्या नुकसानाबददल नुकसान भरपाईदाखल रु.20,000/- विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांला द्यावा तसेच तक्रारकर्त्याचा विद्युत पूरवठा विद्यूत मीटर लावून पुर्ववत सुरु करुन द्यावा, असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल केले असून विशेष कथनामध्ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे मीटर हे दोषपूर्ण नव्हते ही बाब तक्रारकर्त्यासदेखील मान्य आहे. तक्रारकर्त्याला जास्त वापराचे किंवा जास्त रकमेचे विजदेयक दिले नाही. मार्च 2016 पर्यंत व त्यानंतरसुध्दा तक्रारकर्त्याच्या वापरानुसार विजदेयक देण्यांत आले, परंतु संगणकीय प्रणालीतील चुकीमुळे एप्रील 2016 च्या विजदेयकात चुकीमुळे मीटरचा शेरा फॉल्टी असा नमूद झाल्याने विजदेयकात मीटर स्टेटस फॉल्टी असे नमूद झाले. तक्रारकर्त्याला एप्रील 2016 ते जूलै,2016 चे विजदेयक देण्यांत आले. त्यानंतरविरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याकडे जाऊन चौकशी केली व विजमीटरची ॲक्युंचेक पध्दतीने तपासणी केली असता मीटर बरोबर असतांना सुध्दा संगणकीय प्रणालीत मीटर स्टेटस हे चुकीने फॉल्टी असे नमूद झाले. ही चूक लक्षात येताच संगणकीय प्रणालीत तक्रारकर्त्याच्या विजमीटरचे स्टेटस दुरुस्त केले व तक्रारकर्त्याला ऑगस्ट,2016 पासून सदर चूक दुरुस्त करून विजदेयक देण्यांत आले. तक्रारकर्त्याने चुकीचा अर्थ काढून सदर देयकाचा भरणा केला नाही.विरुध्द पक्षाने ऑगस्ट,2016 मध्ये तक्रारकर्त्याला दुरुस्त देयक देवूनही तक्रारकर्त्याने त्याचा भरणा केला नाही व त्यामुळे वीज देयकाची थकीत रक्कम वाढत गेली. तक्रारकर्त्याने वीज देयकाची रक्कम न भरल्यामुळे विरुद्ध पक्ष क्र. २ यांनी तक्रारकर्त्यास विज कायदा २००३ चे कलम 56 नुसार दिनांक 22/9/2016 रोजी 15दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली. परंतु तक्रारकर्त्याने सदर नोटीस घेण्यांस नकार दिला व विजदेयकाचासुध्दा भरणा केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याकडील विजपूरवठा तात्पूरता खंडीत करावा लागला. मात्र त्यानंतरसुध्दा 15दिवसांत तक्रारकर्त्याने थकीत विजदेयकाचा भरणा न केल्यामुळे नोव्हेंबर,2016 मध्ये तक्रारकर्त्याकडील विजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यांत आला व त्यामुळे तक्रारकर्ता व विरुद्ध पक्ष यांच्यात ग्राहकिय संबंध नाहीत.विरुध्दपक्षांनी नियमानुसार कारवाई केली असल्यामुळे तक्रारकर्त्यांस कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. आज रोजी तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक नाही तरी विरुद्ध पक्ष कंपनीचे कार्य हे वीज वितरण करण्याचे आहे जर तक्रारकर्त्याने महा.वीज नियामक मंडळ चे नियमाप्रमाणे विरुद्ध पक्षांकडे नवीन वीज जोडणी करीता अर्ज सादर केल्यास तक्रारकर्त्यास वीज पुरवठा देण्यास विरुद्धपक्षांना हरकत नाही अन्यथा तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 चे लेखी म्हणणे, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद आणी तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्दपक्षांनी तक्रारकर्त्या प्रति न्युनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? : होय
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. तक्रारकर्त्याने त्याचेकडील ग्राहक क्रमांक 464200005542 व मीटर क्रमांक 7612079392 चे विद्युत मीटर हे फॉल्टी नव्हते असे तक्रारकर्त्याने वि.प.कडे केलेल्या दिनांक 6/12/2016 व दिनांक 8/9/2017 च्या अर्जात नमूद आहे. गैरअर्जदार यांनीदेखील त्यांच्या लेखी उत्तरात, संगणकीय प्रणालीतील चुकीमुळे एप्रील 2016 च्या विजदेयकात मीटरचे स्टेटस फॉल्टी असे नमूद झाले व त्यानुसार एप्रील 2016 ते जूलै,2016 चे विजदेयकामध्ये मीटरचा शेरा “फॉल्टी” असा नमूद असलेले देण्यांत आले असे कबूल केलेले आहे. तसेच त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याकडे जाऊन चौकशी केली व विजमीटरची ॲक्युचेक पध्दतीने तपासणी केली असता मीटर योग्य असूनही संगणकीय प्रणालीत मीटर स्टेटस हे चुकीने फॉल्टी असे नमूद झाले आहे असे निदर्शनांस आले. त्यामुळे मीटरमध्ये दोष नसूनही केवळ चुकीने मीटरची स्थिती देयकांमध्ये फॉल्टी अशी दर्शविली हे उभय पक्षांना मान्य आहे ही चूक लक्षात येताच संगणकीय प्रणालीत तक्रारकर्त्याच्या विजमीटरचे स्टेटस दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला ऑगस्ट,2016 पासून सदर चूक दुरुस्त करून विजदेयक देण्यांत आले. मात्र मीटर स्थीतीची चुक दुरुस्त केल्यानंतरदेखील तक्रारकर्त्याने जून,2016 व त्यानंतरचे विजदेयकांचा भरणा केला नाही व सदर विजदेयक थकीत राहिले. वास्तवीकत: तक्रारकर्त्याकडील वीजमीटरमध्ये दोष नसल्याने विरूद्धपक्षांनी तक्रारकर्त्याला दिलेली विजदेयके ही मीटर वाचनानुसारच देण्यांत आली होती व त्यामुळे सदर देयकांचा भरणा करणे तक्रारकर्त्याला बंधनकारक होते, परंतु तक्रारकर्त्याने देयकांचा भरणा न केल्यामुळे सदरवीज देयकाच्या थकबाकी वसुलीकरीता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विज कायद्याचे कलम 56 नुसार दिनांक 22/9/2016 रोजी नोटीस दिली परंतु तक्रारकर्त्याने सदर नोटीस स्विकारण्यांस नकार दिला हे सदर नोटीसवर असलेल्या शे-यावरून सिध्द होते. सदर नोटीस विरुध्द पक्षाने प्रकरणात दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने थकीत देयकांचा भरणा न केल्यामुळे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याकडील विजपूरवठा खंडीत करुन तक्रारकर्त्याकडील मीटर काढून नेले व सदर कृतीस तक्रारकर्ता स्वतः जबाबदार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन की, त्याला सुचना न देताच त्याचेकडील विद्युत मीटर काढून नेले, हे ग्राहय धरण्यायोग्य नाही. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे विजमीटर योग्य असूनही मीटरची स्थिती चुकीने फॉल्टी दर्शविली व सदर चुक त्यांनी मान्यदेखील केली आहे. त्यामुळे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. साहजीकच त्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसीक त्रास सहन करावा लागला असल्याने तक्रारकर्ता त्याबद्दल विरूध्द पक्षांकडून योग्य नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. तक्रारकर्त्याकडील विद्युत मीटर हे कायमसस्वरूपी खंडीत करण्यांत आलेला आहे ,असे असले तरीदेखील नैसर्गीक न्यायतत्वानुसार तक्रारकर्त्याने नियमानुसार विरुध्द पक्षांकडे अर्ज केल्यानंतर तक्रारकर्ता विद्युत मीटर स्थापीत करुन विजपूरवठा सुरु करुन मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.166/2017 अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्त्याने नियमानुसार विरुध्द पक्षांकडे अर्ज केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तरीत्या तात्काळ तक्रारकर्त्याकडे विद्युत मीटर स्थापीत करुन विजपूरवठा सुरु करुन द्यावा.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल तक्रारकर्त्याला रु.3,000/- प्रस्तूत आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30दिवसांचे आंत द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला तक्रारखर्चापोटी रु.2,000/- प्रस्तूत आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30दिवसांचे आंत द्यावेत.
.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 20/03/2018
( अधि.कल्पना जांगडे (कुटे))(अधि.किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष