जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 103/2010. तक्रार दाखल दिनांक : 05/03/2010. तक्रार आदेश दिनांक :15/03/2011. रामचंद्र भागण्णा जिंदम, वय 55 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. ब्लॉक नं.95, महेश नगर, विडी गुरुकुल, ए-ग्रुप जवळ, हैद्राबाद रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द एम्प्लॉईज प्रॉब्लम फंड ऑर्गनायझेशन सब-रिजनल ऑफीस, 165-ए, रेल्वे लाईन्स, सुरवसे टावर्स, सोलापूर. (समन्स हे असिस्टंट प्रॉब्लम फंड कमिशनर, सोलापूर यांचेवर बजावावे.) विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : यु.बी. मराठे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते लक्ष्मी सहकारी बँक लि., सोलापूर येथे नोकरी करीत असून एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड स्कीम, 1952 प्रमाणे ते विरुध्द पक्ष यांचे सदस्य असून त्यांचा खाते क्रमांक एम.एच./30139/29 असा आहे. सन 2008-09 वर्षामध्ये त्यांनी स्वत: रु.3,214/- व बँकेने रु.3,214/- प्रतिमहा प्रमाणे वर्गणी जमा केलेली असून विरुध्द पक्ष यांच्याकडे त्यांचे नांवे रु.3,11,590/- जमा आहेत. तक्रारदार यांनी सन 2005 मध्ये लक्ष्मी बँक लि. एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी, सोलापूर यांच्याकडून घरासाठी रु.1,50,000/- कर्ज घेतलेले आहे. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडील त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या खात्यातून रु.1,50,000/- मिळविण्यासाठी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी दि.16/12/2009 च्या पत्राद्वारे अशाप्रकारे रक्कम काढण्याची तरतूद नसल्याचे कळविले. तक्रारदार यांनी वारंवार भेटी देऊनही रक्कम देण्याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन प्रॉव्हीडंट फंडातील खात्यामधून रु.1,50,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी सोसायटीकडून कर्ज घेतल्यासंबंधी काहीही कागदपत्रे दाखल केली नाहीत. तसेच सदर सोसायटीचे नांव कर्जाची परतफेड करावयाच्या वित्तीय यंत्रणेच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे तक्रारदार यांची विनंती अमान्य करण्यात आलेली आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडील प्रॉव्हीडंट फंडाचे खातेदार असल्याबाबत विवाद नाही. तक्रारदार यांनी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून रु.1,50,000/- मिळण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांचा अर्ज विरुध्द पक्ष यांनी फेटाळला असल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या सोसायटीचे नांव कर्जाची परतफेड करावयाच्या वित्तीय यंत्रणेच्या यादीमध्ये नसल्याचे कारण देऊन तक्रारदार यांची विनंती अमान्य केल्याचे विरुध्द पक्ष यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांनी कर्ज घेतल्याविषयी दी लक्ष्मी को-ऑप. बँक सेवक सहकारी पतपेढी मर्यादीत, सोलापूर यांनी तक्रारदार यांचे नांवे कर्जाचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रारदार यांचे नांवे रु.1,50,000/- कर्ज देय असल्याचे निदर्शनास येते. 6. विरुध्द पक्ष यांचे पत्रानुसार तरतूद क्र.68 बी.बी. अंतर्गत को-ऑप. क्रेडीट सोसायटीला रक्कम देण्याची तरतूद नसल्याचे कारण देऊन तक्रारदार यांचा क्लेम परत केल्याचे निदर्शनास येते. उलटपक्षी, तक्रारदार यांनी दी एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड स्कीम, 1952 चे कलम 68 बी.बी. ही तरतूद मंचाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या सहकारी सोसायटीचे कर्ज परतफेड करण्यासाठी खातेदारास रक्कम देण्याची तरतूद आहे. असे असताना, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या सोसायटीचे नांव कर्जाची परतफेड करावयाच्या वित्तीय यंत्रणेच्या यादीमध्ये नसल्याचे कारण देऊन तक्रारदार यांची मागणी नामंजूर केलेली असून सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. सबब, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.1,50,000/- मिळविण्यास पात्र ठरतात, या अंतीम मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या प्रॉव्हीडंट फंडाचे खात्यामधून रु.1,50,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांना अदा करावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/9311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |