अॅड बी.व्ही.राडकर तक्रारदारांतर्फे
अॅड दिलीप आठवले जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 17/जुलै/2013
प्रस्तुतची तक्रार सदनिकाधारकांनी जाबदेणार कंपनी विरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. जाबदेणार यांनी कोथरुड येथील सर्व्हे नं 82/11, 82/12, 82/32 आणि 82/33 या जमीनीवर विकसन करारान्वये दिनांक 27/2/2004 रोजी बांधकाम सुरु करुन त्या सदनिका बांधल्या आहेत. त्यावर सदनिका धारकांना बंदिस्त वाहनतळ तसेच खुले वाहनळ विक्री करण्याचे जाहिर केले होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून सृष्टी या इमारतीमधील 10 व्या मजल्यावरील इ बिल्डींग मधील सदनिका क्र 37 क्षेत्रफळ 1067 चौ.फुट, त्यालगतची गच्ची क्षेत्रफळ 169 चौ.फुट व जी 4 ही वाहनतळाची जागा त्याचे मोजमाप 120 चौ.फुट एकूण रक्कम रुपये 39,23,200/- या किंमतीस खरेदी केले होते. जाबदेणार यांनी तसा करार दिनांक 22/4/2008 रोजी सब रजिस्ट्रार हवेली नं 4 यांच्या दप्तरी अ.क्र 3299 अन्वये नोंदविला आहे. तक्रारदारांना जाबदेणार यांनी बंदिस्त वाहनतळ देण्याचे कबूल केले होते. परंतू करार नोंदवितांना ‘जी 4’(Open) असे हाताने लिहीले. करारामध्ये खुले वाहनतळाचे क्षेत्र 120 चौ.फुट असे दर्शविले. परंतू प्रत्यक्षात अॅलॉटमेंट लेटर दिनांक 20/8/2009 रोजी तक्रारदारांना देतांना 100 चौ.फुट खुले पार्किंग असे नमूद केले. जाबदेणार यांनी 120 चौ.फुटां ऐवजी 100 चौ.फुट खुले वाहनतळ तेही 20 चौ.फुट कमी देऊन सेवेत त्रुटी निर्माण केली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन सदरची त्रुटी दूर करुन मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच तक्रारदार यांना नुकसान भरपाई दाखल रुपये 3,00,000/- दयावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
2. जाबदेणार यांनी दिनांक 12/1/2012 रोजी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार त्यांनी तक्रारदार यांना 120 चौ.फुट मोकळी वाहनतळाची जागा देण्याचे कबूल केले होते. परंतू दिनांक 20/8/2008 रोजीच्या अॅलॉटमेंट लेटर मध्ये खुल्या पार्किंगचे क्षेत्र 120 चौ.फुटां ऐवजी 100 चौ.फुट असे लिहीले आहे. तक्रारदार यांनी सदर सदनिके संबंधी केलेल्या इतर तक्रारी या चुकीच्या आहेत. तक्रारदार स्वत: कधीही या सदनिकेमध्ये राहिलेले नाहीत व जाबदेणार यांनी सर्व तक्रारींचे निवारण केलेले आहे. सबब सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
3. दोन्ही पक्षकारांची लेखी कथने, दाखल केलेली कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देतांना त्रुटी निर्माण केली आहे काय | होय |
2 | अंतिम आदेश | तक्रार अंशत: मंजूर. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेतली असता असे स्पष्ट होते की संबंधीत पक्षकारांमध्ये झालेल्या करारामध्ये जाबदेणार यांनी तक्रारदार यांना खुले वाहनतळ देण्याचे कबूल केले होते व त्याप्रमाणे कराराच्या शेडयुल 1 मध्ये दुरुस्ती केली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांनी बंदिस्त वाहनतळा संबंधी केलेली तक्रार चुकीची आहे असे म्हणता येईल. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांना त्यांनी 120 चौ.फुट क्षेत्राचे वाहनतळ दिलेले आहे. केवळ अॅलॉटमेंट लेटर मध्ये 100 चौ.फुट असे नोंद केलेले आहे. वास्तविक पाहता जाबदेणार यांनी करारात मान्य केल्याप्रमाणे तक्रारदार यांना 120 चौ.फुट वाहनतळाचे अॅलॉटमेंट लेटर देणे आवश्यक होते. परंतू ते कमी क्षेत्रफळाचे दिल्यामुळे या प्रकरणात ही त्रुटी निर्माण केलेली आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार व पुराव्यानुसार जाबदेणार यांनी सदरचे अॅलॉटमेंट लेटर दिल्यानंतर वाहनतळाचे क्षेत्रफळ वाढवून 120 चौ.फुट असे केलेले होते. त्यासाठी त्यांनी सदर वाहनतळाचे फोटोग्राफ दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांच्या मागणी प्रमाणे जर 120 चौ.फुट वाहनतळ त्यांना दिले असेल तर त्यासंबंधी त्यांना तक्रार करता येणार नाही. परंतू जाबदेणार यांनी तक्रारदार यांना 120 चौ.फुट वाहनतळाचे अॅलॉटमेंट लेटर न दिल्यामुळे सेवेत त्रुटी झाली आहे. सबब तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून 120 चौ.फुट वाहनतळाचे अॅलॉटमेंट लेटर मिळण्यास पात्र आहेत. तसेच सेवेत त्रुटी निर्माण केल्याबद्यल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब वर उल्लेख केलेल्या मुद्यांचा निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना 120 चौ.फुटांचे वाहनतळ
अॅलॉटमेंट लेटर न देऊन सेवेत त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदार यांना 120 चौ.फुटांचे वाहनतळ अॅलॉटमेंट लेटर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावे.
4. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदार यांना सेवेतील त्रुटी बाबत नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात दोन्ही पक्षकारांनी घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक –17 जुलै 2013