निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 कंपनी हे माक्रो ओव्हनचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 त्यांचे दुरुस्ती केंद्र आहे. सा.वाले क्र.3 हे वितरक असून तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला माक्रो ओव्हन दिनांक 21.6.2004 रोजी रु.10,990/- ला खरेदी केला. व सा.वाले क्र.3 यांना माक्रो ओव्हनची किंमत अदा केली. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.3 यांनी माक्रो ओव्हन विक्री करताना तीन वर्षाची वॉरंटी राहील असे आश्वासन तक्रारदारांना दिले होते. तक्रारदारांचे कथना प्रमाणे मे, 2006 मध्ये माक्रो ओव्हन बिघडला व आवश्यक त्या तापमानास पोहोचत नव्हता. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडे तक्रार दिली. परंतु सा.वाले क्र.2 यांनी वॉरंटी कालावधीत दुरुस्ती करणे असतानाही तक्रारदारांकडूनन रु.280/- वसुल केले. तरीदेखील माक्रो ओव्हन दुरुस्त झाला नाही. तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांचेकडे त्याबद्दल पाठपुरावा केला. सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 5.2.2007 रोजी तक्रारदारांचे मुलाकडून रु.1030/- वसुल केले. परंतु माक्रो ओव्हन पूर्णपणे दुरुस्त होऊ शकला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 12.5.2007 रोजी सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस दिली. परंतु त्यास सा.वाले क्र.1 व 2 यांनी प्रतिसाद दिला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व सा.वाले यांनी माक्रो ओव्हन बदलून द्यावा अथवा किंमत रु.10,990/- परत करावी. तसेच नुकसान भरपाई अदा करावी. अशी दाद मागीतली. 2. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये माक्रो ओव्हनला तीन वर्षाची वॉरंटी होती त्यास नकार दिला. तक्रारदारांचा माक्रो ओव्हन वॉरंटी कालावधी संपल्यानंतर दुरुस्त करणे असल्याने तक्रारदारांनी तो खर्च करुन दुरुस्त करुन घेणे आवश्यक होते असे कथन केले. तसेच तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर झाली या आरोपांचा इन्कार केला. 3. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली. व त्यात असे कथन केले की, तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे माक्रो ओव्हन वेळोवेळी दुरुस्त करुन देण्यात आला होता व तो व्यवस्थित चालत होता. 4. सा.वाले क्र.3 विक्रेते यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व त्यात असे कथन केले की, माक्रो ओव्हनमध्ये काही दोष असल्यास सा.वाले क्र.1 उत्पादक त्यास जबाबदार असतील. परंतु सा.वाले क्र.3 केवळ विक्रेते असल्याने उत्पादित वस्तुच्या दोषाबद्दल ते जबाबदार असणार नाही. 5. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्र दाखल केली. तक्रारदार व सा.वाले क्र.1 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. त्यावरुन तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. .क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना माक्रो ओव्हनच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय.सा.वाले क्र.1 व 2 यांनी. | 2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रक्कम रु.5000/- सामनेवाले 1 यांचेकडून. | 3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांनी दिनांक 31.3.2008 चे यादीसोबत मुळची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना दिलेले माक्रो ओव्हनचे बील दाखल आहे. त्यावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला माक्रो ओव्हन सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना दिनांक 21.6.2004 चे बिलाप्रमाणे रक्कम रु.10,990/- रुपयास विक्री केला. सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांचे वकील कथनास नकार दिला नाही. तसेच माक्रो ओव्हनची किंमत प्राप्त झाली नाही असेही कथन केले नाही. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे मे, 2006 मध्ये माक्रो ओव्हन नादुरुस्त झाला व विशिष्ट तापमानास पोहचत नव्हता व बंद पाडत होता. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.2 यांनी दुरुस्त खर्चाची रक्कम मिळाल्याशिवाय दुरुस्ती करण्यास नकार दिल्याने रु.280/- खर्च करुन सा.वाले क्र.2 यांनी तो दुरुस्त करुन दिला. तथापी दिनांक 27.12.2006 रोजी सा.वाले क्र.2 चे तंत्रज्ञ श्री.तुषार यांनी माक्रो ओव्हन तपासला व दुरुस्तीकामी सा.वाले क्र.2 चे दुरुस्त केंद्रात घेऊन गेले. श्री.तुषार यांनी त्यानंतर फेब्रुवारी 2007 मध्ये माक्रो ओव्हनचा पी.सी. बोर्ड बदलून माक्रो ओव्हन पुन्हा परत दिला. परंतु त्या पी.सी.बोर्डमध्ये दोष असल्याने माक्रो ओव्हन चालु शकला नाही. सा.वाले क्र.2 चे तंत्रज्ञांनी दिनांक 5.2.2007 रोजी तक्रारदारांचे मुलाकडून रु.1030/- वसुल केले व माक्रो ओव्हन दुरुस्त झाला असे सांगीतले. परंतु तो दुरुस्त झाला नव्हता व तक्रारदारांनी दिनांक 20.2.207 रोजी सा.वाले क्र.2 यांचेकडे तक्रार नोंदविली. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.2 चे तंत्रज्ञांनी पी.सी.बोर्ड पुन्हा बदलून दिला. तरीदेखील माक्रो ओव्हन चालु शकला नाही. वरील सर्व दुरुस्त्या वॉरंटी काळात असतानाही सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना विनामुल्य दुरुस्ती करुन देण्याचे नाकारले व वेळोवेळी दुरुस्तीच्या खर्चाचे पैसे वसुल केले. व अंतीमतः खर्चाचे पैसे अदा केल्याशिवाय माक्रो ओव्हन दुरुस्त होणार नाही. असे तक्रारदारांना सांगीतले. 7. या संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केले की, माक्रो ओव्हनची वॉरंटीचा कालावधी संपला होता. व तक्रारदारांनी खर्च करुन दुरुस्ती करुन घेणे अपेक्षित होते. तक्रारदारांनी आपल्या कागदपत्रासोबत सा.वाले क्र.1 यांचे लेटरहेडवर सा.वाले क्र.2 यांनी वॉरंटीचे जे पत्र दिलेले आहे ते हजर केले आहे. त्यामध्ये माक्रो ओव्हनचे मॅग्नेट्रॉनला 1+ 2 असे एकूण 3 वर्षे खरेदी तारखेपासून वॉरंटी राहील असे नमुद केले होते. तक्रारदारांचे तक्रारीतील तसेच युक्तीवादातील कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना वरील पत्रा व्यतिरिक्त कुठलीही अन्य वॉरंटीचे पत्र दिले नव्हते. व माक्रो ओव्हन संदर्भात प्रस्तुतचे पत्र हेच वॉरंटी कार्ड समजण्यात यावे असे त्यांना सांगण्यात आले होते. तथापी सा.वाले यांनी आपल्या कैफीयमतीमध्ये तसेच युक्तीवादामध्ये असे कथन केले आहे की, वरील वॉरंटी माक्रो ओव्हनचे मॅग्नेट्रॉनला लागू होती व माक्रो ओव्हनचे इतर भागास लागू नव्हती. सा.वाले यांनी वॉरंटी पत्राचा दुसरा कुठलाही नमुना हजर केलेला नाही. तसेच असा पुरावा दाखल केलेला नाही की, माक्रो ओव्हनचे अन्य भागास केवळ 1 किंवा 2 वर्षाची वॉरंटी होती. सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना माक्रो ओव्हन विक्री केला तेव्हा वॉरंटी कार्ड किंवा पुस्तक दिले नव्हते व तक्रारदारांनी दाखल केलेल्या पत्रा व्यतिरिक्त वॉरंटीचे संदर्भात कुठलेही पत्र किंवा कागद तक्रारदारांना देण्यात आला नव्हता. तक्रारदारांना माक्रो ओव्हन विक्री करताना त्या पत्रातील मजकुराप्रमाणे 3 वर्षाची वॉरंटी राहील असे सांगण्यात आले होते. तथापी तक्रार दाखल झाल्यानंतर सा.वाले यांनी त्या पत्रातील मजकूर माक्रो ओव्हनच्या विशिष्ट भागास लागू होता व इतर भागांना लागू नव्हता असे कथन केले. प्रस्तुतचे सा.वाले यांचे या प्रकारचे वर्तन करुन ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (र) (1) (VII) या प्रमाणे अनुचित प्रथेचा अवलंब केलेला आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. सा.वाले यांनी तक्रारदारांनी दाखल केलेल्या वॉरंटीचा कागद हा माक्रो ओव्हनच्यचा विशिष्ट भागास लागू होता असे कथन केल्यानंतर इतर भागांकरीता नक्की किती काळाची वॉरंटी होती याबद्दल कथन केलेले नाही. यावरुन सा.वाले या संदर्भात संदिग्ध विधाने करीत आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो. या प्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेली वॉरंटी ही पूर्ण 3 वर्षाची असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांचा माक्रो ओव्हन विनाखर्च दुरुस्त करुन देणे आवश्यक होते असाही निष्कर्ष काढावा लागतो. 8. सा.वाले क्र.2 यांनी आपले कैफीयतमध्ये असे कथन केले नाही की, माक्रो ओव्हन कधीच बिघडला नव्हता किंवा तांत्रीक दोष निर्माण झाला नव्हता. याउलट सा.वाले क्र.2 यांनी असे कथन केले की, तक्रारदारांचा माक्रो ओव्हन त्यांचे तक्रारीप्रमाणे वेळोवेळी दुरुस्त करुन देण्यात आला होता. तथापी माक्रो ओव्हनजर व्यवस्थित चालु राहीला असता तर तक्रारदारांना सा.वाले क्र.2 यांचेकडे वारंवार तक्रारी करुन तंत्रज्ञांस बोलाविणे आवश्यक नव्हते. यावरुन तक्रारदारांचे माक्रो ओव्हनमध्ये जून, 2006 नंतर वारंवार दोष निर्माण झाले व सा.वाले क्र.2 यांनी तो वेळोवेळी दुरुस्त करुनही व्यवस्थित चालू शकला नाही ही बाब सिध्द होते. 9. तक्रारदारांनी माक्रो ओव्हन जून, 2004 मध्ये खरेदी केला व मे, 2006 मध्ये तो प्रथम नादुरुस्त झाला या प्रमाणे दोन वर्षानंतर तो प्रथमच नादुरुस्त झाला. माक्रो ओव्हनमध्ये जर मुलभूत दोष असता तर तो दोन वर्षे चालु व्यवस्थित चालू शकला नसता. यावरुन माक्रो ओव्हनमध्ये मुलभुत दोष होता असा निष्कर्ष काढता येत नाही. 10. तथापी वर नमुद केल्याप्रमाणे वॉरंटी कालावधीमध्ये सा.वाले यांनी माक्रो ओव्हन बिनाखर्च दुरुस्त करुन देणे आवश्यक असल्याने व सा.वाले यांनी त्यास नकार दिल्याने त्याच प्रमाणे वॉरंटी कार्डाचे बाबतीत तक्रारदारांची फसवणूक केल्याने सा.वाले क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. 11. तक्रारदारांनी माक्रो ओव्हन बदलून मागीतला आहे किंवा मुळची किंमत परत मागीतली आहे. तथापी प्रकरणातील घटनांचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचा माक्रो ओव्हन विनाखर्च दुरुस्त करुन द्यावा असा आदेश देणे योग्य राहील असे वाटते. त्याचप्रमाणे तक्रारदारांना झालेला मानसिक त्रास व कुचंबणा याबद्दल सा.वाले क्र.1 व 2 यानी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु.5000/- अदा करावी असाही आदेश देणे योग्य राहील असे वाटते. 12. वरील निष्कर्षानुरुप पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 595/2007 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारदारांना विक्री केलेला माक्रो ओव्हन व्यवस्थितपणे बिनाखर्च दुरुस्त करुन द्यावा व दुरुस्त होत नसल्यास त्याच प्रकारचा माक्रो ओव्हन तक्रारदारांना बदलून द्यावा. 3. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारदारांना नुकसान भरपाईबद्दल तसेच तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रु.5000/- अदा करावेत. 4. वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून आठ आठवडयाचे आत करावी.अन्यथा नुकसानीबद्दल द.सा.द.शे. वरील रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज द्यावे. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |