जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 218/2015.
तक्रार दाखल दिनांक : 05/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 12/07/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 07 दिवस
उत्तरेश्वर पि. साहेबराव आवाड, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. आवाड शिरपुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 ते 4
हे कंपनीचे प्रशासकीय व जबाबदार अधिकार.
(1) विद्युत निरीक्षक अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(2) कार्यकारी अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(3) सहायक अभियंता, म.वि.वि.कं., कळंब, जि. उस्मानाबाद.
(4) कनिष्ठ अभियंता, म.वि.वि.कं.,
शिराढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.व्ही. वटाणे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. विरुध्द पक्ष (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये ‘विद्युत वितरण कंपनी’) यांच्या विद्युत वाहिनीमध्ये शॉटसर्कीट होऊन ऊस पीक जळाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा मंचापुढे दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, मयत साहेबराव रघुनाथ आवाड यांचे ते कायदेशीर वारस आहेत. मौजे आवाड शिरपुरा, ता. कळंब येथील गट नं.45 मध्ये 00 हे. 20 आर. क्षेत्राचे ते मालक व कब्जेदार आहेत. त्यांचा ग्राहक क्र.606890083566 असा आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2011-2012 मध्ये ऊस पीक लागवड केले होते आणि ते ऊस पीक गाळपासाठी तयार होते. तक्रारकर्ता हे रांजनी कारखान्याचे सभासद आहेत आणि ऊस पिकापासून त्यांना रु.80,000/- ते रु.1,00,000/- आर्थिक उत्पन्न अपेक्षीत होते. तक्रारकर्ता यांच्या शेजारी असणारे शेतकरी लक्ष्मीबाई आवाड यांचे क्षेत्रातून विरुध्द पक्ष यांची शिराढोण उपकेंद्रातून येणा-या विद्युत वाहिनीद्वारा फिडर गेलेले आहे. त्या फिडरचे खांबाच्या तारेमध्ये झोळ पडत असल्यामुळे माहिती देऊनही विद्युत वितरण कंपनीने दुर्लक्ष केले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.12/2/2012 रोजी लक्ष्मीबाई आवाड यांच्या क्षेत्रातून गेलेल्या शिराढोण फिडरच्या तारेमध्ये स्पार्कींग होऊन गट नं.45 मधील ऊस पीक पूर्णत: जळून खाक झाले. पोलीस स्टेशन, शिराढोण व मंडल अधिका-यांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून ऊस पिकाची नुकसान भरपाई, मशागत खर्च, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व आर्थिक खर्च इ. एकूण रु.2,00,000/- व्याजासह मिळावेत, अशी विनंती
3. विद्युत वितरण कंपनीने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील कथने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी वीज पुरवठा स्वत:चे नांवे करुन घेतलेला नसल्यामुळे ‘ग्राहक’ नात्याने तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांची विद्युत वाहिनी व्यवस्थित होती आणि विद्युत वाहिनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतून गेलेली नाही. त्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ऊस जळीत घटना विद्युत वाहिनीच्या स्पार्कींगमुळे घडलेली नसून नुकसानीस ते जबाबदार नाहीत. पोलीस खाते व मंडळ अधिका-यांनी केलेले पंचनामे विद्युत वितरण कंपनीच्या अपरोक्ष केलेले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दि.13/2/2012 रोजी पंचासमक्ष पाहणी केली असता कोणत्याही खांबावर स्पार्कींगच्या खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच कोणताही फेज कोणत्याही फेजला चिटकलेला किंवा लाईनला आडी पडली नसल्याचे निदर्शनास आले. त्या वाहिनीवरुन तक्रारकर्ता यांना किंवा ग्राहकास विद्युत पुरवठा दिला जात नसल्यामुळे ‘ग्राहक’ नात्याने तक्रार करता येत नाही आणि जिल्हा मंचाला तक्रार निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांचे ऊस पीक कारखान्याने गाळपासाठी नेल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले नाही. ऊस जळीत घटनेबाबत विद्युत निरीक्षकांचा अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती विद्युत वितरण कंपनीने केलेली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये तक्रारकर्ता हे
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 :- दि.12/2/2012 रोजी लक्ष्मीबाई आवाड यांच्या क्षेत्रातून गेलेल्या शिराढोण फिडरच्या तारेमध्ये स्पार्कींग होऊन गट नं.45 मधील ऊस पीक जळून खाक झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार मंचापुढे दाखल केलेली आहे. विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्य करताना तक्रारकर्ता यांना त्यांनी वीज पुरवठा दिलेला नसल्यामुळे, तसेच वीज पुरवठा तक्रारकर्ता यांचे नांवे हस्तांतरीत केला नसल्यामुळे ते ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? या प्राथमिक कायदेशीर मुद्याचा विचार होणे न्यायोचित व संयुक्तिक आहे.
6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) मध्ये ‘ग्राहक’ शब्दाची संज्ञा स्पष्ट करण्यात आलेली असून मोबदला देऊन वस्तु किंवा सेवा खरेदी करणारी व्यक्ती ग्राहक ठरते; तसेच ती व्यक्ती व्यवसायिक/व्यापारी हेतूने वस्तु किंवा सेवा खरेदी करत असल्यास 'ग्राहक' संज्ञेत येऊ शकत नाही. तक्रारदार यांच्या वादविषयाचे स्वरुप पाहता, त्यांनी तक्रारीमध्ये ग्राहक क्रमांक 606890083566 असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापृष्ठयर्थ तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर ग्राहक क्रमांक 606890083566 चे वीज आकार देयक दाखल केलेले आहे. त्या देयकाचे अवलोकन केले असता त्यावर श्री. साहेबराव रघुनाथ आवाड असे नांव नमूद आहे. 7/12 उता-याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे शेतजमीन क्षेत्र स्वतंत्र आहे आणि तक्रारकर्ता यांना शेतीकरिता पाणी नियोजन दर्शवणा-या एक स्वतंत्र विहीर अशा स्तोत्राची नोंद निदर्शनास येते. आमच्या मते, ज्यावेळी तक्रारकर्ता हे तक्रारीमध्ये ग्राहक क्रमांक 606890083566 नमूद करतात आणि त्यांचे पाणी नियोजनाकरिता त्यांच्याकडे स्वतंत्र विहिरीचे स्तोत्र आहे, त्यावेळी त्यांचे नांवे घेण्यात आलेल्या वीज जोडणीचा स्पष्ट उल्लेख तक्रारीमध्ये करणे आवश्यक होते. परंतु तक्रारकर्ता यांनी शेती पंपाकरिता विद्युत वितरण कंपनीकडून स्वतंत्रपणे त्यांचे नांवे वीज जोडणी घेतल्याबाबत वीज आकार देयक किंवा त्यासंबंधीची उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत. तक्रारकर्ता यांनी ग्राहक क्र. 606890083566 चे वीज आकार देयक दाखल केले असले तरी ते देयक त्यांचे पिता मयत साहेबराव रघुनाथ आवाड यांचे नांवे आहे. ऊस जळीत घटना दि.12/2/2012 रोजी घडलेली असून वीज आकार देयक दि.22/7/2014 रोजीचे आहे. तसेच साहेबराव रघुनाथ आवाड यांचे शेतजमीन क्षेत्र एकूण 4 वारसामध्ये हस्तांतरीत झाल्याचे दिसून येते. काहीही असले तरी वर्षानुवर्षे मयत साहेबराव रघुनाथ आवाड यांचे नांवे असणारा वीज पुरवठा कायदेशीर वारसाचे नांवे हस्तांरीत करुन घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, हे सिध्द होते. वीज पुरवठा मयत साहेबराव रघुनाथ आवाड यांचे नांवे आहे आणि ऊस जळीत घटनेच्यावेळी तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून कायदेशीररित्या वीज पुरवठा घेत असल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने ते ‘ग्राहक’ संज्ञेत येणार नाहीत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
7. या ठिकाणी आम्ही आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाच्या ‘हरी प्रसाद /विरुध्द/ मु. एच.बी.व्ही. एन.एल. पंचकुला व इतर’, 1 (2010) सी.पी.जे. 104 (एन.सी.) या निवाडयाचा संदर्भ घेऊ इच्छित आहोत. त्यामध्ये मा. आयोगाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदवले आहे.
Para. 8 : Except for of bare averment of the complainant that he is beneficiary of the said connection, there is no other material to sustain his claim. The complainant did not get connection transferred in his name in the records of the respondents and, therefore, the complainant cannot be treated as beneficiary of the services provided by the OP/respondent.
तसेच मा.छत्तीसगड राज्य आयोगाने ‘ज्युनिअर इंजिनीअर, छत्तीसगड स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड /विरुध्द/ गोवर्धन प्रसाद धुरंदर’, 2010 (3) सी.पी.आर. 139 या निवाडयामध्ये असे नमूद केलेले आहे की,
Para. 4 : It is not dispute that electricity supply connection stands in the name of Taaplal Dhurandhar. It has been admitted by learned counsel for respondent that the said person Taaplal Dhurandhar had died long back in the year 1990 and thereafter complainant was enjoying the electricity through the supply connection, which was standing in the name of a dead person. It is also not in dispute that no application for change in name of the consumer or providing connection in the name of complainant or mutation of his name in place of his father was every made by the complainant. These facts show that the complainant was not a consumer of the appellants. He was simply paying sometimes charges of the electricity already used through the connection standing in the name of a dead person. We do not think that mere use of electricity through a connection in the name of a dead person can confirm the status of consumer on the complainant. We are of the firm view that complainant can not be said to be consumer of the appellants, therefore, his complaint dose not lie under the Consumer Protection Act, 1986.
8. तक्रारीची वस्तुस्थिती व उपरोक्त नमूद न्यायिक प्रमाण पाहता तक्रारीमध्ये उपस्थित वादाच्या इतर मुद्दयांना स्पर्श न करता तक्रारदार हे ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, या एकमेव कारणास्तव तक्रार रद्द करणे न्यायोचित ठरते. आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/17616)