जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 217/2015.
तक्रार दाखल दिनांक : 05/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 12/07/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 07 दिवस
सुनिल पि. अच्युत आवाड, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. आवाड शिरपुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 ते 4
हे कंपनीचे प्रशासकीय व जबाबदार अधिकार.
(1) विद्युत निरीक्षक अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(2) कार्यकारी अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(3) सहायक अभियंता, म.वि.वि.कं., कळंब, जि. उस्मानाबाद.
(4) कनिष्ठ अभियंता, म.वि.वि.कं.,
शिराढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.व्ही. वटाणे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. विरुध्द पक्ष (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये ‘विद्युत वितरण कंपनी’) यांच्या विद्युत वाहिनीमध्ये शॉटसर्कीट होऊन ऊस पीक जळाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा मंचापुढे दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, मौजे आवाड शिरपुरा, ता. कळंब येथील गट नं.45 मध्ये 00 हे. 20 आर. क्षेत्राचे ते मालक व कब्जेदार आहेत. त्यांचा ग्राहक क्र.606890510391 असा आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2011-2012 मध्ये ऊस पीक लागवड केले होते आणि ते ऊस पीक गाळपासाठी तयार होते. तक्रारकर्ता हे रांजनी कारखान्याचे सभासद आहेत आणि ऊस पिकापासून त्यांना रु.80,000/- ते रु.1,00,000/- आर्थिक उत्पन्न अपेक्षीत होते. तक्रारकर्ता यांच्या शेजारी असणारे शेतकरी लक्ष्मीबाई आवाड यांचे क्षेत्रातून विरुध्द पक्ष यांची शिराढोण उपकेंद्रातून येणा-या विद्युत वाहिनीद्वारा फिडर गेलेले आहे. त्या फिडरचे खांबाच्या तारेमध्ये झोळ पडत असल्यामुळे माहिती देऊनही विद्युत वितरण कंपनीने दुर्लक्ष केले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.12/2/2012 रोजी लक्ष्मीबाई आवाड यांच्या क्षेत्रातून गेलेल्या शिराढोण फिडरच्या तारेमध्ये स्पार्कींग होऊन गट नं.45 मधील ऊस पीक पूर्णत: जळून खाक झाले. पोलीस स्टेशन, शिराढोण व मंडल अधिका-यांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून ऊस पिकाची नुकसान भरपाई, मशागत खर्च, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व आर्थिक खर्च इ. एकूण रु.2,00,000/- व्याजासह मिळावेत, अशी विनंती
3. विद्युत वितरण कंपनीने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील कथने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे त्यांची विद्युत वाहिनी व्यवस्थित होती आणि विद्युत वाहिनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतून गेलेली नाही. त्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ऊस जळीत घटना विद्युत वाहिनीच्या स्पार्कींगमुळे घडलेली नसून नुकसानीस ते जबाबदार नाहीत. पोलीस खाते व मंडळ अधिका-यांनी केलेले पंचनामे विद्युत वितरण कंपनीच्या अपरोक्ष केलेले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दि.13/2/2012 रोजी पंचासमक्ष पाहणी केली असता कोणत्याही खांबावर स्पार्कींगच्या खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच कोणताही फेज कोणत्याही फेजला चिटकलेला किंवा लाईनला आडी पडली नसल्याचे निदर्शनास आले. त्या वाहिनीवरुन तक्रारकर्ता यांना किंवा ग्राहकास विद्युत पुरवठा दिला जात नसल्यामुळे ‘ग्राहक’ नात्याने तक्रार करता येत नाही आणि जिल्हा मंचाला तक्रार निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांचे ऊस पीक कारखान्याने गाळपासाठी नेल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले नाही. ऊस जळीत घटनेबाबत विद्युत निरीक्षकांचा अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती विद्युत वितरण कंपनीने केलेली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे ‘ग्राहक’ आहेत काय ? होय.
2. विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
3. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे
.
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून शेती प्रयोजनार्थ विद्युत पुरवठा घेत असल्याबाबत विद्युत आकार देयक अभिलेखावर दाखल करण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठयाची सेवा घेत असल्यामुळे ते विद्युत वितरण कंपनीचे ‘ग्राहक’ आहेत, असे या मंचाचे मत असून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्र.2 :- तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर 7/12 उतारा, तक्रारदार यांचे नांवे वीज आकार देयक, पोलीस घटनास्थळ पंचनामा व तलाठी पंचनामा दाखल केलेला आहे. त्या 7/12 उता-याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे नांवे 00 हे. 24 आर. शेतजमीन क्षेत्र असून तक्रारकर्ता यांचे क्षेत्रामध्ये एक विहीर अशी नोंद निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या विहिरीवरील विद्युत पंपाकरिता विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा दिल्याचे ग्राह्य धरावे लागते. पोलीस घटनास्थळ पंचनामा व तलाठी पंचनाम्यानुसार तक्रारकर्ता यांचे 20 आर. क्षेत्रातील ऊस पीक जळाल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने तक्रारकर्ता यांच्या वादकथनाप्रमाणे त्यांच्या शेजारी असणारे शेतकरी लक्ष्मीबाई आवाड यांचे क्षेत्रामध्ये शिराढोण उपकेंद्रातून येणारी विद्युत वाहिनीद्वारा शिराढोण फिडर गेलेली असून तारेमध्ये स्पार्कींग होऊन जमीन गट नं.45 मधील ऊस पीक जळाल्याचे नमदू केलेले आहे. उलटपक्षी विद्युत वितरण कंपनीच्या प्रतिवादाप्रमाणे विद्युत वाहिनी व्यवस्थित होती आणि विद्युत वाहिनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतून गेलेली नाही. त्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई देण्याकरिता ते जबाबदार नाहीत.
7. तक्रारकर्ता यांचे वादकथन व पोलीस घटनास्थळ पंचनाम्याचे अवलोकन केले असता ऊस जळीत घटनेकरिता कारणीभूत असणारे विद्युत तारांमधील घर्षन हे तक्रारकर्ता यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये घडल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नाही किंवा त्याबाबत तक्रारकर्ता यांनी योग्य व उचित पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही हे स्पष्ट करतो की, तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षन होऊन ठिणग्या पडलेल्या नाहीत किंवा तेथे निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळालेले नाही. इतर शेतक-यांच्या शेतजमिनीतील विद्युत तारांमध्ये घर्षन निर्माण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतील ऊस पीक जळण्याशी थेट संबंध येणार नाही, असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्ता यांच्या हद्दीपर्यंत विचार करण्याचा झाल्यास तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीत असणा-या विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत तारांतील घर्षनामुळे ऊस पीक जळाल्याचे सिध्द होत नाही. प्रस्तुत तक्रारीतील वस्तुस्थितीशी सुसंगत असणारा मा. महाराष्ट्र राज्य आयोगाचा ‘उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण), महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ /विरुध्द/ श्री. विश्वनाथ बाजीराव घाडगे’, अपिल क्र.1816/2005 हा निवाडा आम्ही विचारात घेत असून त्यामध्ये मा. आयोगाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदवलेले आहे.
(4) In the given circumstances, though the Complainant is a consumer, i.e. in respect of supply of energy to his field, no sort of service deficiency in supply of energy to his well connection could be alleged in the instant case. From the facts which remain undisputed, supra, it can be seen that the fire broke out in the adjacent field due to different reason altogether and which has nothing to do with authorized supply of energy in the said field. If the fire broke out in the field of Complainant causing damage to the Complainants crop there is no nexus between the energy supplied by the Opposite Party to the Complainants connection. There is no nexus between the service which required to be provided by the original Opposite Party to the Complainant and damage caused to the sugar crop.
8. तक्रारीमध्ये नमूद वस्तुस्थिती व उपरोक्त निरीक्षण विचारात घेतले असता विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत नाही आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/17616)