जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 12/2011
तक्रार दाखल दिनांक – 19/01/2011
तक्रार निकाली दिनांक – 30/11/2012
सौ.मंगलाबाई हिंमतराव पाटील. ----- तक्रारदार
उ.व.38 वर्षे, धंदा- घरकाम.
रा.प्लॉट नं.176, नाटेश्वर सोसायटी,
वाखारकर नगर,धुळे.
विरुध्द
(1) मॅनेजर,एकलव्य गॅस एजन्सी, ----- विरुध्दपक्ष
के.डी.मिस्तरी शॉपींग कॉम्प्लेक्स,
80 फुटी रोड,धुळे.
(2) शशिकांत शिवसन नाईक.
उ.व.सज्ञान,धंदा-व्यापार.
(3) अमोल शिवाजीराव चौधरी.
उ.व.सज्ञान,धंदा-व्यापार.
दोघे रा.द्वारा एकलव्य गॅस एजन्सी,
के.डी.मिस्तरी कॉम्प्लेक्स,धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षः श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एम.बी.पवार.)
(विरुध्दपक्षा तर्फे – गैरहजर.)
निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके. – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली, सेवेत त्रृटी केली म्हणून, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्या विरुध्दपक्ष गॅस एजन्सीच्या सन 21-11-1996 पासून ग्राहक असून, त्यांचा ग्राहक क्र.609067 असा आहे. त्यांनी नियमानुसार डिपॉझीटची रक्कम भरल्या नंतर, विरुध्दपक्ष यांनी त्यांचे नांवे एक रेग्युलेटर व एक गॅस सिलेंडरची नोंदणी केली असून त्यासाठी त्यांना गॅस सिलेंडरच्या नोंदीचे कार्ड दिलेले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी दि.17-07-2000 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे रितसर रक्कम भरुन आणखी एक गॅस सिलेंडर घेतलेले आहे.
(3) तक्रारदार गॅस संपल्यामुळे दि.10-01-2011 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी गेल्या असता, विरुध्दपक्ष यांनी गॅस देण्याचे नाकारले आणि तक्रारदारांचे नांवे असलेले गॅस सिलेंडरची मुळ कागदपत्रे कोणीतरी त्यांचे एजंसीत दाखल करुन ते गॅस कनेक्शन इतरत्र ट्रान्सफर करुन घेतल्याचे सांगितले.
(4) तक्रारदारांची विरुध्दपक्षाकडील गॅस कनेक्शन बाबतची मुळ कागदपत्रे सुमारे 2010 पुर्वी हरविली आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडून गॅस ट्रान्सफरची माहिती मिळाल्या नंतर दि.26-08-2011 रोजी आझाद नगर पोलिस स्टेशन, धुळे यांचेकडे गॅसची मुळ कागदपत्रे हरविल्या बाबत अर्ज केला आहे. तसेच तहसिलदार धुळे यांचेकडेही दि.09-09-2011 रोजी अर्ज करुन विरुध्दपक्षाकडील त्यांचा गॅस पुरवठा पूर्ववत होणे बाबत विनंती केली आहे.
(5) वास्तविक तक्रारदारांची गॅस बाबतची मुळ कागदपत्रे हरविल्यानंतर, ती सापडलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याचा दुरुपयोग करुन तक्रारदारांची खोटी सही करुन जरी विरुध्दपक्षाकडील गॅस कनेक्शन इतरत्र ट्रान्सफर करण्याचा अर्ज केला तरी विरुध्दपक्ष यांनी त्या व्यक्तीकडून रेग्युलेटर व सिलेंडर जमा करणे आवश्यक होते. परंतु विरुध्दपक्ष यांनी तसे न करता व तक्रारदारांच्या सहीची शहानिशा न करता सदरचे गॅस कनेक्शन ट्रान्सफर केले आहे.
(6) तक्रारदार यांचेकडे विरुध्दपक्ष यांचे गॅस रेग्युलेटर व दोन गॅस सिलेंडर असूनही गॅस सिलेंडर भरुन मिळत नसल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांच्या गॅस ट्रान्सफर बाबत चौकशी करणे आवश्यक असतांना तसे न करता त्यांनी तक्रारदारांचा गॅस पुरवठा बंद केला आहे आणि व्यापारी प्रथेचा दुरुपयोग करीत आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(7) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांचे गॅस कनेक्शन पुर्ववत करुन देण्याचा आदेश व्हावा, अज्ञात व्यक्तीच्या नांवे इतरत्र ट्रान्सफर केलेले सदरचे कनेक्शन रद्द करण्यात यावे असा आदेश व्हावा, तक्रारदारास विरुध्दपक्षाकडून मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी शेवटी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(8) तक्रारदार यांनी आपल्या कथनाचे पृष्टयार्थ शपथपत्र तसेच दस्तऐवजाच्या यादीनुसार एकूण चार कागदपत्रे पुराव्यासाठी दाखल केली आहेत. त्यात, तक्रारदार हिचे नांवे सदर गॅस कनेक्शन असल्याबाबतचे विरुध्दपक्ष यांनी दिलेल्या पत्राची छायांकीत प्रत, तक्रारदार हिचे नांवे सदर गॅस कनेक्शन असल्या बाबत रजि.सर्टिफीकेटची छायांकीत प्रत, तक्रारदार हिचे नांवे सदर गॅस कनेक्शन असल्याबाबत गॅस कार्डची छायांकीत प्रत, तक्रारदार हिचे नांवे दुसरे सिलेंडर असल्याबाबत विरुध्दपक्षांच्या सर्टिफीकेटची छायांकीत प्रत यांचा समावेश आहे.
(9) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना या न्यायमंचाच्या नोटिसीचे रजिष्टर्ड पोष्टाद्वारे पाठविलेले पाकीट “ Refused ” अशा पोष्टाच्या शे-यासह परत आले आहे (नि.नं.12/1, 18/1 व 18/2). त्यामुळे विरुध्दपक्ष यांना या न्यायमंचाच्या नोटिसीचे ज्ञान झाले आहे असे समजण्यात येत आहे. त्यामुळे नोटिसीचे ज्ञान होऊनही विरुध्दपक्ष सदर कामी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे स्वतःचे बचावपत्रही दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(10) तक्रारदारांची कैफीयत व दाखल कागदपत्रे पाहता तसेच त्यांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकले नंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार विरुध्दपक्ष यांच्या ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार त्यांचे मुळ गॅस कनेक्शन पुर्ववत सुरु करुन मिळण्यास व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | ःहोय. |
(क)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(11) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी नियमानुसार डिपॉझीटची रक्कम भरुन विरुध्दपक्ष यांचेकडून गॅस कनेक्शन घेतले असून त्यांचा ग्राहक क्र.609067 असा आहे व त्यासाठी त्यांना एक गॅस रेग्युलेटर आणि दोन गॅस सिलेंडर विरुध्दपक्ष यांनी दिलेली आहेत हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे तक्रारदार या विरुध्दपक्ष यांच्या ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदार गॅस संपल्यामुळे दि.10-01-2011 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी गेल्या असता, विरुध्दपक्ष यांनी गॅस देण्याचे नाकारले आणि तक्रारदारांचे नांवे असलेले गॅस सिलेंडरची मुळ कागदपत्रे कोणीतरी त्यांचे एजंसीत दाखल करुन ते गॅस कनेक्शन इतरत्र ट्रान्सफर करुन घेतल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांना त्यांची गॅस संबंधिची मुळ कागदपत्रे हरविल्याचे लक्षात आले आणि त्यांनी दि.26-08-2011 रोजी आझाद नगर पोलिस स्टेशन, धुळे यांचेकडे गॅसची मुळ कागदपत्रे हरविल्या बाबत अर्ज केला आहे. तसेच विरुध्दपक्ष यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे गॅस कनेक्शन पुर्ववत सुरु करण्याची विनंती केली आहे. तसेच तहसिलदार धुळे यांचेकडेही दि.09-09-2011 रोजी अर्ज करुन विरुध्दपक्षाकडील त्यांचा गॅस पुरवठा पूर्ववत होणे बाबत विनंती केली आहे. परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांचे गॅस कनेक्शन पुर्ववत सुरु करुन दिलेले नाही.
(13) कोणावरही अन्याय होऊ नये व प्रकरणाची संपूर्ण सत्य परिस्थिती न्यायमंचा समोर यावी यासाठी विरुध्दपक्ष यांनी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी मार्फत न्यायमंचा समोर हजर होणे अत्यंत आवश्यक होते किंबहूना ते त्यांचेवर बंधनकारक आहे. असे असतांना या न्यायमंचाच्या नोटिसीचे ज्ञान होऊनही विरुध्दपक्ष यांनी नोटिस घेण्याचे नाकारले आहे व जाणीवपुर्वक स्वतःचे बचावपत्र दाखल करण्याचे टाळले आहे. यावरुन त्यांची अत्यंत बेपर्वा वृत्ती व मनमानी कामकाज पध्दती प्रथमदर्शनीच दिसून येते.
(14) एखाद्या ग्राहका कडून अशा पध्दतीने मुळ कागदपत्रे हरविणे, गहाळ होणे अथवा चोरी जाणे ही सर्वसाधारण घटना आहे, त्यासाठी तक्रारदारा सारख्या महिलेचा फार मोठा दोष आहे अथवा हलगर्जीपणा आहे अस म्हणता येणार नाही. तक्रारदार महिला नियमितपणे ज्यावेळी विरुध्दपक्ष यांचेकडे गॅस सिलेंडर मिळण्यासाठी गेल्या आणि त्यांना विरुध्दपक्षाकडून त्यांचे नांवे असलेले गॅस कनेक्शन अज्ञाताचे नांवे ट्रान्सफर झाले बाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा अशा अनपेक्षीत घटनेने काही सूचेनासे होणे अथवा आपल्या संमती शिवाय खरोखरीच अज्ञाताने असे केले असेल तर आता पुढे काय करावे, असा प्रश्न तक्रारदारास पडणे साहजीक आहे व त्या संभ्रमावस्थेत काही वेळ जाणे सहज शक्य आहे. त्यामुळे काळी काळा नंतर तक्रारदारांनी त्यांची मुळ कागदपत्रे हरविल्या बाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिल्या नंतर व विरुध्दपक्षास गॅस कनेक्शन मिळण्याची विनंती केल्यानंतर, विरुध्दपक्ष यांनी तक्रारादारांची फसवणूक झाली आहे हे लक्षात घेऊन त्यांना योग्य पध्दतीने मार्गदर्शन करणे, त्यांचे नांवे असलेले गॅस कनेक्शन आता कोणाचे नांवे व कुठे ट्रान्सफर झाले आहे याची सविस्तर माहिती देणे हे विरुध्दपक्षाचे कर्तव्य होते. परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास काहीही सहकार्य न करता एकप्रकारे त्यांना कार्यालयातून हाकलून लावले आहे.
(15) वास्तविक पाहता जरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदारांची मुळ कागदपत्रे सापडल्यानंतर बेकायदेशीरपणे तक्रारदारांची खोटी सही करुन त्यांचे नावे असलेले गॅस कनेक्शन इतरत्र ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला त्यावेळी विरुध्दपक्षाने त्यांचे कार्यालयातील दस्तऐवज तसेच संगणकीय नोंदीमधील तक्रारदारांची सही पडताळून पाहणे आवश्यक होते. एवढेच नव्हे तर गॅस कनेक्शन ट्रान्सफर करतेवेळी गॅस एजन्सी ग्राहकास दिलेले गॅसच्या नोंदीचे मुळ कार्ड, रेग्युलेटर व गॅस सिलेंडर जमा करुन घेत असते. मात्र सदर प्रकरणी विरुध्दपक्षाने असे का केले नाही याचा बोध होत नाही. कारण तक्रारदारकडे आजही विरुध्दपक्ष यांचेकडील गॅसच्या नोंदीचे मुळ कार्ड तसेच एक रेग्युलेटर आणि दोन सिलेंडर नियमानुसार आहेत. विरुध्दपक्षाच्या अशा बेजबाबदार व असहकार्याच्या भूमिकेमुळे तक्रारदारांना जीवनावश्यक वस्तुपासून वंचित व्हाले लागले आहे त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. या सर्व बाबीवरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रृटी असल्याचे स्पष्ट होते.
(16) उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता, विरुध्दपक्ष यांनी पुनःश्च कोणतीही डिपॉझीटची रक्कम न स्वीकारता तक्रारदारांना तातडीने त्यांचे पुर्वीचे गॅस कनेक्शन ज्या कंपनीचे होते त्याच कंपनीचे व तेवढयाच सिलेंडरच्या नोंदीचे (गॅस रेग्युलेटर व गॅस सिलेंडर ताब्यात न देता) त्यांचे गॅस एजन्सीद्वारे सुरु करुन देणे व त्या बाबतची आवश्यक कागदपत्रे देणे न्यायोचित होईल असे आम्हास वाटते. तसेच विरुध्दपक्ष यांनी कथीत ट्रान्सफर केलेल्या जोडणीचा शोध घेऊन व ते रद्द करुन त्या जोडणीची डिपॉझीटची रक्कम तक्रारदारांचे गॅस जोडणीसाठी स्वतःकडे वर्ग करुन घेणे योग्य होईल. त्यासाठी विरुध्दपक्ष यांना तक्रारदारांचे वादातील पुर्वीचे गॅस कनेक्शन ज्या गॅस एजंसीकडे व ज्याचे नांवे ट्रान्सफर केले आहे ते रद्द करण्याविषयी संबंधीत व्यक्तीकडे, गॅस एजन्सीकडे, त्या गॅसच्या कंपनीकडे व आवश्यकता भासल्यास पोलिसांकडे पत्रव्यवहार अथवा कार्यवाही करण्याचे कायदेशीर मार्ग मोकळे आहेत.
(17) तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून गॅस कनेक्शन पुर्ववत सुरु करुन मिळावे, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.20,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. परंतु आमच्या मते तक्रारदार गॅस कनेक्शन पुर्ववत सुरु करुन मिळण्यास तसेच शारीरिक, मानसिक त्रासासाठी नुकसानीपोटी रु.1,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(18) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन न्यायाचे दृष्टीने हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत.
(1) तक्रारदारांकडून कोणतेही शुल्क न आकारता, तक्रारदारास दोन घरगुती गॅस सिलेंडरच्या वापराच्या नोंदीची जोडणी द्यावी (गॅस रेग्युलेटर व गॅस सिलेंडर ताब्यात न देता) आणि तक्रारदाराच्या नांवे त्या बाबतची कागदपत्रे करुन द्यावी. तसेच नियमानुसार गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा.
(2) तक्रारदारांना मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे.
दिनांकः 30-11-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.