--- आदेश ---
(पारित दि. 16-01-2007 )
द्वारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार श्री. रविंद्र शंकरप्पा अनवाने यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1 अर्जदार यांच्या मुली हया वर्ग 9 व 10 मधे शिकत आहेत. त्यांच्या उज्वल भवितव्याकरिता अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 1, 2 व 3 हे डायरेक्टर असलेल्या एकलव्य प्रकाशन प्रा.लिमीटेड औरंगाबाद यांचेकडून स्वयं अभ्यास कार्यक्रमा अंतर्गत शिकवणीसाठी प्रकाशित साहित्य हे गैरअर्जदार क्रं. 4 व 5 यांचेकडून मागविले.
2 अर्जदार यांनी त्यांच्या दोन मुलींसाठी दोन व तीन वर्षाचा अभ्यासक्रम निवडला होता त्यासाठी रु.18,900/- ही रक्कम धनादेशाद्वारा गैरअर्जदार क्रं. 4 व 5 यांना देण्यात आली होती व गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी ती रक्कम वटविलेली आहे.
3 गैरअर्जदार क्रं.1 ते 5 यांनी कबूल केल्याप्रमाणे कोणतेही अभ्यासक्रमाचे साहित्य पाठविले नाही ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्युनता आहे.
4 अर्जदार यांनी मागणी केली आहे की, रु. 1,79,900/- ही रक्कम गैरअर्जदार क्रं. 1 ते 5 यांनी एकत्रित व संयुक्तपणे अर्जदार यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी तसेच ग्राहक तक्रारीचा खर्च गैरअर्जदार यांच्यावर लादण्यात यावा.
5 गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांना दि. 27.11.06 रोजी विद्यमान न्याय मंचाचा नोटीस प्राप्त झाला. तरी सुध्दा ते विद्यमान न्यायमंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांचे विरोधात प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश दि. 27.12.06 रोजी पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रं. 4 व 5 यांनी नि.क्रं. 5 वर त्यांचे लेखी बयान दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 4 व 5 हे त्यांच्या लेखी बयानात म्हणतात की, गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी अभ्यासक्रमाचे साहित्य न पाठविलयामुळे तेच सेवेमधील न्युनतेसाठी जबाबदार आहेत.
6 अर्जदार यांनी पावती क्रं. 4125 दि. 14.12.05 द्वारा रु. 10,500/- तर पावती क्रं. 4126 दि. 14.12.05 द्वारा रु. 8,400/- ही रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली दिसून येते. गैरअर्जदार क्रं. 4 व 5 यांनी सुध्दा या म्हणण्यास हरकत घेतलेली नाही. अर्जदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या पावत्या हया गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांच्या एकलव्य प्रकाशन प्रा.लि. यांच्या आहेत. अर्जदार यांचेकडून गैरअर्जदार यांना रु. 18,900/- ही रक्कम मिळाली याबाबत वाद नाही.
7 गैरअर्जदार क्रं. 4 व 5 यांनी गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांचेसाठी पैसे घेतल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी रु. 18,900/- ही रक्कम अर्जदार यांचेकडून मिळून सुध्दा त्यांना अभ्यासक्रमाचे कोणतेही साहित्य पुरविल्याचे दिसून येत नाही.
अश्या स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी रु.18,900/- ही रक्कम अर्जदार यांना मिळेपर्यंत दि. 14.12.05 पासून 12% व्याजाने द्यावी.
2 गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी शारीरिक व मानसिक त्रासासाठी अर्जदार यांना रु.5000/- ही रक्कम द्यावी तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- द्यावेत.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी आदेशाच्या तारखेपासून एका महिन्याचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.