जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 62/2011
तक्रार दाखल दिनांक – 06/04/2011
तक्रार निकाली दिनांक – 04/01/2013
श्री.सुरेश हिरामण महाजन. ----- तक्रारदार
उ.वय.-35 वर्षे, धंदा-व्यापार.
रा.कस्तुरबा इंटरप्रायझेस,मार्केट यार्ड,
दुकान नं.5,दोंडाईचा,ता.शिंदखेडा.जि.धुळे.
विरुध्द
इफको टोकीयो ----- विरुध्दपक्ष
जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
नोटीसीची बजावणी,
इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
डी.डी.सी.सी.बँक,गरुड बाग शाखेच्या जवळ,
धुळे.यांच्यावर करावी.
न्यायासन
(मा.अध्यक्षः श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.बी.पी.पवार.)
(विरुध्दपक्षा तर्फे – वकील श्री.डी.एन.पिंगळे.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्या- श्रीमती.एस.एस.जैन.)
------------------------------------------------------------------
(1) तक्रारदार यांचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने चुकीच्या कारणाने नाकारुन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे दोंडाईचा ता.शिंदखेडा,जि.धुळे येथील राहणार असून त्यांचे कस्तुरबा इंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. तक्रारदारांनी सन 2008 साली महिंद्रा व महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप कार महिंन्द्रा ऑटो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन रक्कम रु.7,00,000/- ला विकत घेतली आहे. तक्रारदाराने दि.01-06-2010 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीचा दि.05-05-2010 ते दि.04-05-2011 या मुदतीसाठी रक्कम रु.4,78,225/- आय.डी.व्ही. चा कॉप्रेंहेन्सीव्ह पध्दतीचा विमा काढलेला आहे व त्यासाठी रक्कम रु.14,696/- चा प्रिमीयम भरलेला आहे.
(3) तक्रारदाराने कर्जाचे हप्ते हस्ती को-ऑप बँक लिमीटेड, दोंडाईचा मार्फत वेळोवेळी भरलेले आहेत. शेवटचा हप्ता मार्च 2011 अखेर जमा केलेला आहे. तक्रारदाराने बोलेरो कारचे रजिस्ट्रेशन आर.टी.ओ. धुळे यांचेकडे दि.06-05-2008 रोजी केलेले असून गाडीचा रजिस्ट्रेशन नं.एम.एच.18-डब्ल्यु 3330 आहे. आजही सदरची गाडी तक्रारदाराचे नांवे आहे. सदर गाडीच्या कर्जाचे रु.3,00,000/- तक्रारदाराकडे घेणे निघत आहेत. तक्रारदाराने दि.28-05-2010 रोजी रु.100/- च्या स्टॅम्पवर सदर बोलेरो कार श्री.जमील अहमद अन्सारी यांना रक्कम रु.4,60,000/- ला विकल्याची सौदा पावती केलेली आहे. मात्र सदर व्यवहार आर.टी.ओ. ऑफीसर धुळे येथे पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तक्रारदार हाच कायदेशीर दृष्टया सदर गाडीचा मालक आहे. श्री.जमील अहमद व तक्रारदार यांचे प्रेमाचे, सलोख्याचे संबंध असल्याने दोघांमध्ये व्यापारा निमित्त आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने, सदर गाडी श्री.जमील अहमद हे सुध्दा वापरत होते.
(4) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, दि.30-10-2010 रोजी सदर बोलेरो कार श्री.जमील अन्सारी यांचे आजोबा फरहाद अन्सारी हे चालक शकील अन्सारी यांना घेवून भिवंडी येथे गेले होते. त्यावेळी सदर कार अबुजी कॉम्प्लेक्स इमारतीच्या आवारात, पटेल नगर, भिवंडी येथे पार्क केली होती. दुस-या दिवशी दि.31-10-2010 रोजी सकाळी 7.00 वाजता गाडीचा चालक गाडी पार्कींग केलेल्या जागेवर गेला असता, त्यास सदर गाडी मिळून आली नाही. शोध घेवूनही कार मिळून न आल्याने भिवंडी शांतीनगर पोलिस स्टेशनला कार चोरुन नेल्याची फीर्याद गु.र.नं.आय 357/2010 प्रमाणे दाखल केली आहे.
(5) पोलिसांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर चौकशी करुनही कार मिळून आली नाही. म्हणून वरिष्ठ पोलिस, शांतीनगर पोलिस स्टेशन यांचेकडून जा.क्र.6778/2010 दि.16/12/2010 अन्वये गु.र.नं.आय 357/2010 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे सदर गुन्हयाची अ वर्गात समरी मंजूरी होणे बाबत अहवाल मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, 4 थे न्यायालय, भिवंडी येथे पाठविला आहे. तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने विरुध्दपक्ष विमा कंपनीला क्लेम फॉर्म भरुन नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावेळी विमा कंपनीच्या अधिका-यांनी पोलिस चौकशीचे सर्व सही शिक्क्याचे कागदपत्रे दाखल करुन घेतली. तसेच तक्रारदार, श्री.जमील अन्सारी व गाडीवरील चालक शकील अन्सारी यांचे जाब जबाबही नोंदवून घेतले. त्यानंतरही तक्रारदाराने विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या अधिका-यांच्या मागणी प्रमाणे सर्व कागदपत्रांची प्रत्येक वेळी पुर्तता केलेली आहे. त्यानंतर सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.12-03-2011 रोजी तक्रारदारास रजिष्टर नोटीस पाठवून त्याने दाखल केलेला क्लेम नं.31880091 मंजूर करता येत नाही असे कळविले आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने Deficiency in Services केली आहे. तक्रारदाराने 31 मार्च 2011 अखेर नियमितपणे कर्जाचा मासिक हप्ता रु.12,415/- वेळोवेळी भरलेला आहे. मात्र विरुध्दपक्ष विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारल्याने एप्रिल 2011 पासून कर्जाचे हप्ते तक्रारदार फेडू शकत नसल्याने त्याचेवरील कर्जाचा बोझा वाढत असून, आर्थिक नुकसान होत आहे.
(6) तक्रारदार यांनी शेवटी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून रक्कम रु.5,00,000/- नुकसान भरपाईपोटी मिळावे, तसेच सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे अर्ज दाखल तारखे पासून व्याज मिळावे, मानसिक त्रासाबद्दल योग्य ती रक्कम मिळावी व सदर अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
(7) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.नं.6 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार नि.नं.6/1 वर खबर, नि.नं.6/2 वर फीर्याद, नि.नं.6/3 वर समरी वर्ग अहवाल नक्कल, नि.नं.6/4 वर बोलेरो जीप गाडीची रजिस्ट्रेशन सर्टिफीकेटची नक्कल, नि.नं.6/5 वर ड्रायव्हींग लायसन्स, नि.नं.6/6 वर विमा पॉलिसीची नक्कल, नि.नं.6/7 वर श्री.शकील अन्सारी यांच्या जबाबाची नक्कल, नि.नं.6/8 वर श्री.जमील अहमद यांच्या जबाबाची नक्कल, नि.नं.6/9 वर श्री.सुरेश महाजन यांच्या जबाबाची नक्कल, नि.नं.6/10 वर विमा कंपनीने क्लेम नाकारल्याबद्दलचे पत्र, नि.नं.18 वर आर.टी.ओ. चे सर्टिफीकेट इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(8) विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपले म्हणणे नि.नं.9 वर दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक्रारदार यांची तक्रार ही खोटी, चुकीची व लबाडीची असून ती विरुध्दपक्ष यांना कबूल व मान्य नाही असे म्हटले आहे.
(9) विरुध्दपक्ष विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, सदरची तक्रार ही बेकायदेशीर असून ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदी सदरील तक्रारीस लागू नाहीत. तक्रारदार श्री.सुरेश महाजन व जमील अन्सारी यांच्यात वाहन नं.एम.एच.18 डब्ल्यु 3330 महिंद्रा जीपची सौदा पावती दि.28-05-2010 रोजी झालेली असून सदर वाहन तक्रारदाराचे ताब्यात होते व आहे.
(10) श्री.सुरेश महाजन यांनी घेतलेल्या पॉलिसीची वैधता दि.05-05-2010 ते दि.04-05-2011 पर्यंत आहे. सदर वाहन दि.31-10-2010 रोजी चोरीस गेलेले आहे. त्याबाबत जमील अहमद यांनी एफ.आय.आर.क्र.357/10 दाखल केलेला आहे. सदर वाहन तक्रारदाराने दि.28-05-2010 रोजी श्री.जमील अन्सारी यांना सौदा पावतीनुसार ताब्यात दिलेले असून त्यानुसार तक्रारदार यांची फायनान्स घेणेकामी रकमेबाबतीत आजपासून जबाबदारी नाही, तसेच देणे फीटेपावेतो श्री.जमील अन्सारी जबाबदार राहतील.
(11) जमील अन्सारी यांचे जबाबात सदरचे वाहन त्यांच्या कब्जातून चोरीस गेलेले आहे व त्या बाबत फीर्याद दिलेली आहे, असे नमूद आहे. तसेच सौदा करार झालेपासून सदरचे वाहन त्यांच्याच ताब्यात असल्याबाबत जबाब विरुध्दपक्ष विमा कंपनीस लिहून दिलेला आहे.
(12) तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचा वाहन मालक या नात्याने वाहन चोरीस गेले त्या दिवशी Insurable Interest नव्हता व नाही. तक्रारदार याने वाहन विकल्याने तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचा करार संपुष्टात आलेला असल्याने तक्रारदारास कोणतीही तक्रार विरुध्दपक्ष यांचे विरुध्द दाखल करण्याचा हक्क नाही. शेवटी तक्रार रद्द करुन खर्चापोटी रु.10,000/- देण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनीने केली आहे.
(13) विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.नं.11 वर शपथपत्र तसेच खुलाशा सोबत वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.
(14) तक्रारदारांची कैफीयत, विरुध्दपक्षांचा खुलासा तसेच पुराव्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे व उभयपक्षाचे विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय. |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(15) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत 2008 साली महिंद्रा व महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप कार महिन्द्रा ऑटो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून रक्कम रु.7,00,000/- ला विकत घेतली आहे. तसेच त्यांनी विरुध्दपक्ष विमा कंपनीचा दि.05-05-2010 ते 04-05-2011 या मुदतीसाठी रक्कम रु.4,78,225/- आय.डी.व्ही. चा कॉप्रेहेन्सीव्ह पध्दतीचा विमा काढलेला आहे. तसेच कर्जाचे हप्तेही माहे मार्च 2011 अखेर जमा केलेले आहेत. सदर कारचे रजिष्ट्रेशन आर.टी.ओ.धुळे यांचेकडे दि.06-05-2008 रोजी केलेले आहे. आजही सदरची गाडी तक्रारदारांचे नांवे आहे.
(16) तक्रारदारांनी दि.28-05-2010 रोजी रु.100/- च्या स्टॅम्पवर सदर बोलेरो कार श्री.जमील अन्सारी यांना रक्कम रु.4,60,000/- ला विकल्याची सौदापावती केलेली आहे. श्री.जमील अन्सारी व तक्रारदार यांच्यात व्यापारानिमित्त आर्थिक देवाण होत असल्याने सदर गाडी श्री.जमील अन्सारी हे सुध्दा वापरत आहेत. दि.30-10-2010 रोजी सदर बोलेरो कार श्री.जमील अन्सारी यांचे आजोबा फरहाद अन्सारी हे भिवंडी येथे घेवून गेले होते. त्यावेळी सदर बोलेरो जीप ही दि.31-10-2010 रोजी सकाळी 07.00 वाजता पटेल नगर भिवंडी येथून चोरीस गेली. शोध घेवूनही कार मिळून न आल्याने भिवंडी, शांतीनगर पोलिस स्टेशनला कार चोरुन नेल्याची फीर्याद गु.र.नं.आय 357/2010 प्रमाणे दाखल केली आहे. पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतरही कार मिळून न आल्याने, तक्रारदाराने विरुध्दपक्ष विमा कंपनीला क्लेम फॉर्म भरुन नुकसान भरपाई मागणी केली. त्यावेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीने श्री.जमील अन्सारी, गाडीचा चालक शकील अन्सारी यांचे जाब-जबाबही नोंदवून घेतले व पोलिस चौकशीचे सर्व कागदपत्रेही दाखल करुन घेतले. त्यानंतरही प्रत्येक वेळी विमा कंपनीने मागीतलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुनही दि.12-03-2011 रोजी रजिष्टर नोटिस पाठवून क्लेम मंजूर करता येत नाही असे विमा कंपनीने कळविले. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई न मिळाल्याने तसेच कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्याने त्याचा कर्जाचा बोझा वाढत असून त्याचे आर्थिक नुकसान होत आहे असे नमूद केले आहे.
(17) विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या खुलाशात असे कथन केले आहे की, तक्रारदार श्री.सुरेश महाजन व श्री.जमील अन्सारी यांच्यात बोलेरो कारची दि.28-05-2010 रोजी सौदा पावती झालेली असून सदर वाहन तक्रारदाराचे ताब्यात होते व आहे. सदरचे वाहन दि.31-10-2010 रोजी चोरीस गेलेले आहे. त्याबाबत श्री.जमील अन्सारी यांना एफ.आय.आर.357/2010 दाखल केलेला आहे. सदर वाहन तक्रारदाराने दि.28-05-2010 रोजी श्री.जमील अन्सारी यांना सौदा पावतीनुसार ताब्यात दिलेले असून त्यानुसार फायनान्सच्या रकमेबाबत देणे फीटे पावेतो श्री.जमील अन्सारी जबाबदार आहेत. सौदा करार झालेपासून सदरचे वाहन श्री.जमील अन्सारी यांचे ताब्यात असल्याबाबतचा जबाब त्यांनी विमा कंपनीस लिहून दिलेला आहे. तक्रारदार याने वाहन विकल्याने तक्रारदार व विमा कंपनी यांचा करार संपुष्टात आलेला असल्याने तक्रारदारास विरुध्दपक्ष यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्याचा हक्क नाही. तक्रारदार व विमा कंपनी यांचा वाहन मालक या नात्याने वाहन चोरीस गेली त्या दिवशी Insurable Interest नव्हता व नाही. सदरची तक्रार ही बेकायदेशीर असून ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदी या तक्रारीस लागू होत नाहीत, असे शेवटी नमूद केले आहे.
(18) वरील सर्व बाबीचा विचार करता सदर बोलेरो जीप ही तक्रारदाराने श्री.जमील अन्सारी यांना विकली आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरते. तक्रारदार यांनी तक्रारीत सौदा पावती केल्याचे नमूद केलेले आहे. परंतु सदर गाडीचा व्यवहार आर.टी.ओ.कार्यालयात पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तक्रारदार हेच कायदेशीर दृष्टया सदर गाडीचे मालक आहेत, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केलेले आहे. आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ त्यांनी नि.नं.18 वर आर.टी.ओ. यांचे दि.29-11-2012 चे प्रमाणपत्र जोडलेले आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता सदर बोलेरो जीप ही अद्यापपावेतो तक्रारदार श्री.सुरेश महाजन यांचे नावावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे जरी सौदा पावती केलेली असली तरी वाहन तक्रारदार यांचे नांवावर असल्याने वाहन विक्रीचा व्यवहार पूर्ण झालेला नाही.
(19) विमा कंपनीने आपल्या म्हणण्याचे पृष्टयार्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
· M/s Complete Insulations (p) Ltd. Vs New India Assurance Company Ltd. : AIR 1996 Supreme Court 586
· G.Govindan Vs New India Assurance Co.Ltd. & Ors. : C.A.No.1816 of 1982 (S.C.)
· National Insurance Company,Ltd. Vs Capt.Surat Singh Kanwar. : Appeal No.55/2008.Date of Decision 17/06/2009 (H.P.State Commission,Shimla.)
(20) उपरोक्त न्यायनिवाडयांचे बारकाईने अवलोकन केले असता, यामध्ये वाहन खरेदी करणा-याने वाहन हस्तांतरीत झाल्याबाबतचे विमा कंपनीस कळविलेले नाही, त्यामुळे त्यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे. परंतु सदर तक्रारीत वाहन हस्तांतरीत झालेले नाही. त्यामुळे सदरील न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणी तंतोतंत लागू होत नाहीत असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार विमादावा मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. त्यामुळे विमा कंपनीने विमा दावा न देवून सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(21) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांनी विमा कंपनीकडून रक्कम रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी, सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासाबद्दल योग्य ती रक्कम मिळावी आणि सदर अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. विमा कंपनीने दि.12-03-2011 रोजी विमा दावा नाकारलेला आहे. सदर बाबीचा विचार करता विमा कंपनी रक्कम रु.47,8225/- व त्यावर विमा दावा नाकारल्याचे तारखे पासून म्हणजे दि.12-03-2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज देण्यास जबाबदार आहे. विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याने तक्रारदार यांना मानसिक त्रास होणे साहजीक आहे. म्हणून तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(22) मुद्दा क्र. ‘‘क’’ - उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,धुळे. यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत,
(1) तक्रारदारास रक्कम 4,78,225/- (अक्षरी रु.चार लाख अठ्ठयाहत्तर हजार दोनशे पंचवीस मात्र) दि.12-03-2011 पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.दे.9 टक्के व्याजासह द्यावे.
(2) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) दयावेत.
धुळे.
दिनांकः 04-01-2013.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.