(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून ट्रॅक्टर दुरुस्तीचा क्लेम मंजूर होवून तो क्लेम श्रीराम ट्रॅक्टर एजन्सी यांचेकडे जमा करुन अर्जदार यांना त्यांचा ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याचे आदेश व्हावेत किंवा अपघाती ट्रॅक्टरचे दुरुस्तीसाठी होणारा खर्च रक्कम रु.3,56,836/-व त्यावर 18टक्के व्याज मिळावे, ट्रॅक्टर दुरुस्तीचे क्लेमपासून ते तक्रार अर्जाचा निकाल लागेपावेतो प्रतीदिवस रु.1000/- याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी पान क्र.37 लेखी म्हणणे(मराठी), पान क्र.38 लगत लेखी म्हणणे(इंग्रजी) व पान क्र.43 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय- होय. 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय- होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय- होय. 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय- होय. 5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांनी पान क्र.50 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.51 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार यांचे विमा पॉलिसीबाबतचे कथन मान्य केलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत विमापॉलिसी सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.7 लगतचे विमा सर्टिफिकेट यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अपघातानंतर सामनेवाला यांचे सर्व्हेयर श्री.एस.व्ही.देशमुख यांनी सर्वे केलेला आहे. परंतु अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहनात दोन प्रवासी होते. अपघातग्रस्त वाहनाची क्षमता फक्त एकच प्रवासी म्हणजे चालक एवढीच होती. अपघाताचेवेळी एक प्रवासी जास्त होता त्यामुळे विमा पॉलीसीचा अटी व शर्तींचा भंग झालेला आहे सेवा देण्यात कमतरता केलेली नाही” असे म्हटलेले आहे. परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.12 लगत पोलीसांकडील फिर्याद, पान क्र.13 लगत क्राईम डिटेल फॉर्म व पान क्र.15 लगत सामनेवाला यांचेकडील मोटार क्लेम फॉर्म ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. पोलिसांकडील दाखल कागदपत्रानुसार अपघाताचेवेळी ट्रॅक्टरमध्ये चालकापेक्षा फक्त एकच प्रवासी जास्त होता असे दिसून येत आहे. तक्रार अर्ज कलम 4 मधील कथनानुसार अर्जदार यांचा मुलगा कै.योगेश पाडेकर व अर्जदार यांचा भाचा नवनाथ बनसोडे असे दोघे जण एकत्र ट्रॅक्टर घेवून चालले होते. म्हणजेच अन्य व्यक्ती ही अर्जदार यांची नातेवाईक होती. प्रवासी भाडयाचे पैसे घेवून प्रवास करणारे कोणतेही प्रवासी ट्रॅक्टरमध्ये नव्हते. सामनेवाला यांनी पान क्र.47 लगत फायनल मोटार सर्वे रिपोर्ट दाखल केलेला आहे. या सर्वे रिपोर्टनुसार व पोलीसांचेकडील कागदपत्रानुसार समोरुन येणा-या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे अपघात झाला आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे म्हणजे केवळ एक जादा व्यक्ती ट्रॅक्टरमध्ये बसल्यामुळे अपघात झालेला नाही असेही दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अयोग्य व चुकीचे कारण देवून अर्जदार यांचा विमाक्लेम नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी या कामी पान क्र.47 लगत जो मोटार फायनल सर्वे रिपोर्ट दाखल केलेला आहे त्यामध्ये अपघातग्रस्त वाहनाचे पोटी एकूण देय रक्कम रु.2,16,000/- दर्शवलेली आहे. हा सर्वे रिपोर्ट चुकीचा आहे किंवा अयोग्य आहे हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणतीही योग्य ती कागदपत्रे या कामी दाखल केलेली नाहीत. पान क्र.47 चे सर्वे रिपोर्टचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,16,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. पान क्र.7 चे विमापॉलीसीचा विचार होता अर्जदार यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे असे दिसून येत आहे. सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना रक्कम रु.2,16,000/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळाली नाही तसेच अर्जदार यांना कर्जाऊ रकमेवर व्याज भरावे लागत आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार करता अर्जदार हे आर्थीक नुकसानीपोटी पान क्र.47 ची सर्वे रिपोर्टची तारीख दि.26/06/2010 पासून दोन महिन्यान्यानंतर म्हणजे दि.27/08/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इंन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल. 2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी. सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी या कामी पान क्र.52 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.1) मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांचेसमोर रिव्हीजन पिटीशन क्र.2656/2006 निकाल ता.18/08/10 ओरीएंटल इन्शुरन्स कं. विरुध्द बी.ए.नागेश 2) मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांचेसमोर रिव्हीजन पिटीशन क्र.288/2005 निकाल ता.29/01/10 न्यु इंडिया अँश्युरन्स कं. विरुध्द श्री पवनकुमार ठक्कर 3) ए.आय.आर. 1999 सर्वोच्च न्यायालय. पान 3252. ओरीएंटल इन्शुरन्स कं विरुध्द सोनीचेरीयन परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुतचे तक्रार अर्जामध्ये समोरुन येणा-या ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झालेला आहे. याचा विचार होता सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत. मंचाचे वतीने याकामी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1) 4(2010) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 315. नॅशनल इन्शुरन्स कं. विरुध्द पी.डी.प्रजापती 2) 2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 23. नॅशनल इन्शुरन्स कं. विरुध्द कमल सिंघल 3) 2011 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 445. न्यु इंडिया इन्शुरन्स कं विरुध्द डॉ. एम.एम कृष्णा अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व मंचाचे वतीने आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसाचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,16,000/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवरती दि.27/8/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/-द्यावेत. |