तक्रार क्र. : CC/2019/264
दाखल दिनांक : 27-11-2019
निर्णय दिनांक : 11-11-2022
अर्जदार / तक्रारदार : प्रभाकर श्रावणजी श्रीसाट
वय ७३ वर्षे, धंदा – सेवानिवृत्त
रा. अस्मिता स्टेट बॅंक कॉलनी, भक्तीधाम
मंदिराजवळ, बडनेरा रोड, अमरावती
// विरुध्द //
गैरअर्जदार /विरुध्दपक्ष : 1 इफेक्ट्स प्रिन्टर्स अॅन्ड सेल्स्
प्रोप्रा. कैलास निमावत
१/१ शास्त्री नगर, मालटेकडी रोड,
अमरावती जि. अमरावती.
2 दर्याव प्रिंटींग अॅन्ड बाईंडींग
प्रोप्रा. विजय दर्यावसिंग ठाकूर
गांधी चौक, अमरावती
गणपूर्ती :- मा. श्रीमतीएस.एम. उंटवाले, अध्यक्ष
मा. श्रीमती शुभांगी कोंडे, सदस्या
तक्रारदार यांचे तर्फे :- अॅड. आर.के. देशमुख
विरुध्दपक्ष क्र.1 यांचे तर्फे :- एकतर्फा आदेश
विरुध्दपक्ष क्र.2 यांचे तर्फे :- स्वतः
::: आ दे श प त्र:::-
(आदेश पारीत दिनांक ११/११/२०२२)
मा. सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे, यांनी निकाल सांगितला :-
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीचे विवरण येणे प्रमाणे.
1) तक्रारदाराचे कथन आहे की, त्याला नारायणी गिता या धार्मीक ग्रंथाच्या १००० प्रती भक्तांना मोफत वाटण्याकरीता छापवयाच्या होत्या. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 हे प्रिंटींग अॅन्ड सेल्स व बाईंगडींगचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने प्रथम विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेकडे दि. ३०.१.२०१० रोजी जावुन हस्तलिखीत ग्रंथाच्या १००० प्रती प्रिंटींग व बाईंगडींग करुन देण्यास सांगितले असता त्यांनी असमर्थता दर्शवुन विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रारदाराला सदरच्या कामाकरीता घेवुन गेले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला ग्रंथाच्या प्रती छापण्याकरीता एकमुस्त रक्कम अंदाजे रुपये २,११,०००/- तसेच मल्टीकलर प्रिंटींगचे रुपये ५०,०००/- वेगळे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 चे सहमतीवरुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेशी तक्रारदाराने ग्रंथाच्या प्रती छापण्याचा व्यवहार केला व रक्कम रुपये ११,०००/- अॅडव्हान्स म्हणुन दिले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला सर्वसाधारण २० महिन्यात काम पुर्ण करुन देण्याचे ठरले होते.
तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना मागणी प्रमाणे वेळोवेळी कामाकरीता खालील प्रमाणे रक्कमा दिल्या.
1. रुपये ११,०००/- दि. ३०.१.२०१० रोजी नगदी अडव्हान्स
2. रुपये १,००,०००/- दि. २०.२.२०११ रोजी नगदी
3. रुपये १५,०००/- दि. २४.४.२०११ रोजी नगदी
4. रुपये ५०,०००/- दि. २०.९.२०१२ रोजी नगदी
5. रुपये २०,०००/- दि. १६.१.२०१३ रोजी नगदी
6. रुपये १०,०००/- दि. २०.५.२०१३ रोजी चेकव्दारे
7. रुपये २०,०००/- दि. २८.५.२०१३ रोजी वि.प. 1 चे खात्यात जमा
8. रुपये २०,०००/- दि. २९.५.२०१३ रोजी वि.प. 1 चे खात्यात जमा
असे एकूण रुपये २,४६,०००/- विरुध्दपक्ष यांना दिले आहे. परंतु त्यांनी पावती दिली नाही. परंतु त्या रक्कमा विरुध्दपक्ष क्र. 2 समक्ष विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारदाराने दिले. तक्रारदाराने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेशी संपर्क साधुन काम करुन देण्याबाबत विचारणा केली परंतु विरुध्दपक्षाने वेळोवेळी उडवाउडवीचे उत्तरे दिली. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना रजिस्टर पोष्टाव्दारे सुचनापत्र पाठविले तसेच दि. २१.९.२०१७ रोजी पोलिस आयुक्त अमरावती यांचेकडे तक्रार दिली होती. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 1 ने काम करुन न दिल्याचे कळविले. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे कामाची कोणतीही दखल घेतली नाही व आज पर्यंत ग्रंथाच्या प्रती छापुन तक्रारदाराला दिल्या नाही किंवा त्याची रक्कमही परत केली नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाची अनुचित व्यापारी प्रथा व सेवेतील त्रुटी विरुध्द दाद मागण्यास तक्रारदाराला आयोगासमोर यावे लागले.
3) तक्रारदाराची प्रार्थना आहे की, दोन्ही विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रक्कम रुपये ४,५०,०००/- व त्यावर द.सा.द.शे. १५ टक्के व्याज तक्रार दाखल तारखे पासुन देण्याचे निर्देश आयोगाने द्यावे. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारदाराला दोषपुर्ण सेवा दिली आहे असे आयोगाने घोषीत करावे व इतर न्यायोचित दाद तक्रारदाराला आयोगाने द्यावे.
4) तक्रारदाराने तक्रारी सोबत निशाणी क्र. २ ला एकूण (१०) दस्त दाखल केले. त्यावर त्याची तक्रार आधारीत असल्याचे दिसुन येते.
5) तक्रारीचे सुचनापत्र विरुध्दपक्ष क्र. 1 यांना प्राप्त होवुनही ते अथवा त्यांचे तर्फे कोणीही प्रतिनिधी हजर न झाल्याने विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारीत झाला.
6) विरुध्दपक्ष क्र. 2 ने लेखी जबाब निशाणी क्र.11 ला दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील संपूर्ण कथन मान्य केले. तसेच नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या ग्रंथाच्या प्रती छापण्याचे काम करुन दिले नाही व पैसे सुध्दा परत केले नाही. तक्रारदारास झालेल्या नुकसानीस विरुध्दपक्ष क्र. 2 जबाबदार नाही. कारण विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी या कामाबाबत तक्रारदाराकडून कोणतीही रक्कम घेतलेली नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा स्वतंत्र व्यवसाय असुन विरुध्दपक्ष क्र. 1 चे व्यवसायासोबत त्यांचा काहीही संबंध नाही. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारदाराचे काम करुन देण्याचे कबुल केले नव्हते व रक्कमही स्विकारली नाही त्यामुळे तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र.2 चा ग्राहक नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
7) तक्रारदाराची तक्रार, त्यासोबत दाखल सर्व दस्तं, विरुध्दपक्ष क्र.2 चा लेखी जबाब, तक्रारदाराचा पुरावा व युक्तीवाद, विरुध्दपक्ष क्र.2 चा युक्तीवाद विचारात घेता आयोग खालील मुद्दे न्यायनिर्णयाकरीता चौकशीला घेत आहे. त्याचे निष्कर्श विरुध्द बाजुस खालील दिलेल्या कारणांसह नोंदवित आहोत.
अ.क्र. मुद्दे निष्कर्श
i) तक्रारदाराने हे सिद्ध केले का की
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व
तक्रारदाराला द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे ? .. अंशतः होय
ii) तक्रारदाराने हे सिद्ध केले का, तो
मागतो त्या अनुतोषास पात्र आहेत ? अंशतः होय
- अंतिम आदेश व हुकूम काय ? खालीलप्रमाणे
मुद्दा क्रमांक 1 करिता कारणें ः-
7) तक्रारदाराच्या युक्तीवादाचे व दस्तांचे अवलोकन केले असता वादातीत मुद्दा तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या माध्यमातुन विरुध्दपक्ष क्र. 1 कडे ज्या ग्रथांच्या १००० प्रती छापण्यास दिल्या होत्या त्याकरीता रक्कम स्विकारुन विरुध्दपक्षाने त्या दिल्या नाही. तक्रारदाराने त्याच्या कथना पृष्टयर्थ दस्त क्र. 7 विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला श्री नारायणी गीता ग्रथांची १००० प्रती छापण्याकरीता लागणारे खर्चाचे अंदाजपत्रक दि. २७.८.२०१२ चे रक्कम रुपये २,९३,०५०/- चे दाखल आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या बॅंक खात्यात रक्कम रुपये २०,०००/- दोनदा दि. २८.५.२०१३ व दि. २९.५.२०१३ रोजी जमा केल्याचा दस्त क्र. 8 पान क्र. ३० वर दाखल आहे. तक्रारदाराचा युक्तीवाद आहे की, त्याने ग्रंथांच्या प्रति छापण्याकरीता विरुध्दपक्ष क्र. 1 ला एकुण रक्कम रुपये २,४६,०००/- दिले मात्र त्यांनी कोणतीही रक्कमेची पावती दिली नाही. सदर बाबी पृष्टयर्थ तक्रारदाराने दस्त क्र. 1 ला विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला दि. ३.१०.२०१९ रोजी वकीला मार्फत पाठविलेली नोटीस आहे. तसेच दस्त क्र. 2 दि. १७.७.२०१९ रोजी तक्रारदाराने स्वतः विरुध्दपक्ष क्र. 2 ला पाठविलेले पत्र आहे. दस्त क्र. 3 पोलिस आयुक्त अमरावती यांचे कडे विरुध्दपक्षा विरुध्द दि. २१.९.२०१७ रोजी केलेली तक्रार आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वेळोवेळी दि. ६.९.२०१६ व दि. ५.९.२०१८ रोजी केलेला पत्र व्यवहार आहे. 8) आयोगाच्या मते सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र. 1 हे हजर झाले नाही त्यांनी आपला लेखी आक्षेप नोंदवला नाही. करीता तक्रारीतील संपुर्ण कथन त्याला मान्य असल्याचे गृहीत धरण्यास वाव आहे असे आयोगास वाटते. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या जबाब युक्तीवादावरुन त्याने तक्रारीतील सर्व व्यवहार हा त्याच्या माध्यमातुन व त्याच्या समक्ष झाला हे कबुल कल्याचे दिसते. तक्रारदाराला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी स्विकारलेल्या रक्कमांच्या पावत्या दिल्या नसल्या तरी त्या विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या समक्ष विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराकडून दिल्याचे मान्य केले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराचे ग्रथांच्या प्रती छापण्याचे काम केले नाही व त्याची रक्कमही परत दिली नाही हे सुद्धा विरुध्दपक्षाच्या युक्तीवादावरुन दिसते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 हा तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 1 च्या व्यवहारातील साक्षीदार होतात असे म्हणता येईल. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराकडून ग्रंथाच्या प्रती छापण्याच्या करीता रक्कम स्विकारुन ते काम पुर्ण न करुन देवुन व तक्रारदाराला त्याची रक्कम परत न करुन अनुचित व्यापारी प्रथा व सेवेत त्रुटी केली आहे असे आयोग ठरविते.
9) सदर प्रकरणी तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 यांना झालेल्या व्यवहाराकरीता जबाबदार ठरविले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची भेट विरुध्दपक्ष क्र. 1 शी करवुन दिली असली तरी प्रत्यक्षात व्यवहार हा विरुध्दपक्ष क्र. 1 व तक्रारदार मधील आहे. त्याचा करीता कोणताही मोबदला विरुध्दपक्ष क्र. 2 ने स्विकारलेला नाही तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 हा तक्रारदाराचे काम करुन देण्यास असमर्थ होता हे तक्रारदाराने स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र. 2 ला तक्रारदाराला कोणतीही सेवा देणे नव्हते तो विरुध्दपक्ष क्र. 2 चा ग्राहक नाही त्यामुळे तो तक्रारदाराला जबाबदेही ठरणार नाही. करीता मुद्दा क्र. 1 ला तक्रारदाराचे लाभात अंशतः होकारार्थी निष्कर्श नोंदवित आहे.
कारणें मुद्दा क्रमांक 2 करिताः-
10) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र. 1 ची अनुचित व्यापारी प्रथा व सेवेतील त्रुटी सिद्ध झाल्याने तो खालील अनुतोषास पात्र आहे. तक्रारदाराने प्रार्थने मध्ये विरुध्दपक्षाकडून एकुण रक्कम रुपये ४,५०,०००/- मागणी केले आहे त्याचे विवरण तक्रारीचे परिच्छेद क्र. 8 मध्ये दिसुन येते त्यानुसार तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 ला वेळोवेळी ग्रंथाच्या प्रती छापण्याकरीता दिलेली एकुण रक्कम रुपये २,४६,०००/- परत देण्यास विरुध्दपक्ष क्र. 1 जबाबदार आहे. तसेच एखाद्या श्रद्धाळू व्यक्तीने मोठया श्रद्धेने ईतर भक्तांना मोफत वाटण्याकरीता ग्रंथाच्या प्रति मोठी रक्कम देवुन छापण्याकरीता देणे त्या वाटणार म्हणुन लोकात चर्चा होणे, मात्र प्रत्यक्ष तसे न घडणे ही बाब त्याच्या श्रद्धेला ठेच पोहोचणारी तसे मानसीक व शारिरीक त्रास देणारी होईल करीता त्याकरीता तक्रारदाराने परिच्छेद क्र. 8 मध्ये काढलेली रक्कम रुपये २,००,०००/- कसे निष्पन्न केले याबाबत खुलासा केला नाही. करीता तक्रारीचे स्वरुप पाहता आयोग रक्कम रुपये ३,०००/- व तक्रार दाखल करणेकरीता दस्त गोळा करावे लागले, प्रकरणाचा खर्च करावा लागला करीता रक्कम रुपये २,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 कडून देय ठरविते. तक्रारदाराने प्रार्थनेमध्ये एकुण रक्कम रुपये ४,५०,०००/- वर द.सा.द.शे. १५ टक्के व्याज मागणी केले. परंतु शारिरीक, मानसिक, आर्थिक व तक्रार खर्चावर आयोगास व्याज देता येत नाही. त्यामुळे आयोग विरुध्दपक्ष क्र. 1 ने ज्या रक्कमेचा व्यवहारात स्विकार केला ती रुपये २,४६,०००/- त्याचा उपभोग विरुध्दपक्ष क्र. 1 ने स्वतःकरीता घेतला त्यावर तक्रार दाखल दिनांका पासुन रक्कम प्रत्यक्ष देईस्तोवर द.सा.द.शे. ८ टक्के व्याज विरुध्दपक्ष क्र. 1 ने द्यावे असे आयोग ठरविते. याव्दारा मुद्दा क्र. 2 ला अंशतः होकारार्थी निष्कर्ष नोंदवुन खालील प्रमाणे अंतीम आदेश.
आदे श
1) तक्रार अंशतः मंजूर.
2) विरुध्दपक्ष क्र. 1 ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला
व तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असे आयोग घोषीत
करते.
3) विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला ग्रंथाच्या प्रति छापण्याकरीता
वेळोवेळी स्विकारलेली एकूण रक्कम रुपये २,४६,०००/-, व
त्यावर तक्रार दाखल दिनांकापासुन द.सा.द.शे. ८ टक्के व्याज
प्रत्यक्ष रक्कम देईस्तव द्यावयाचे आहे.
4) विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला आर्थिक, शारिरीक, मानसिक
हाणीची नुकसान भरपाई रुपये ३,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये
२,०००/- द्यावयाचा आहे.
5) विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द तक्रार नामंजूर.
6) तक्रारदारांच्या इतर मागण्या नामंजुर.
7) विरुध्दपक्ष क्र. 1 ने आयोगाच्या आदेशाचे पालन आदेश
उपलब्ध तारखे पासुन ४५ दिवसाच्या आत करावयाचे आहे.
8) आदेशाची पहिली प्रत विनामुल्य दोन्ही पक्षकारांना देण्यात यावी.
(श्रीमती शुभांगी कोंडे) (सौ. एस.एम. उंटवाले)
मा. सदस्या मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती.
SRR