ग्राहक तक्रार क्र. 12/2014
अर्ज दाखल तारीख : 10/01/2014
अर्ज निकाल तारीख: 28/05/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 19 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) हनुमंत धर्मा दरेकर,
वय.40 वर्षे, धंदा- शेती,
रा.आंबेवाडी, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) युको बँक शाखा उस्मानाबाद
तर्फे – मा. शाखाधिकारी, युको बँक, गणेशनगर,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद, ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.ए.बेलुरे.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.एस.रणदिवे.
न्यायनिर्णय
मा.सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1. अर्जदार हनूमंत दरेकर हे मौजे आंबेवाडी ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष यांचे विरुध्द तक्रार दखल केलेली आहे.
2. अर्जदार यांना मौजे बोरगांव राजे ता.जि. उस्मानाबाद येथे गट क्र.5 क्षेत्र 1 हे. 0 आर ऐवढी जमीन आहे. त्यांनी विरुध्द पक्षकार (संक्षिप्त रुपात युको बँक) यांचे कडून रु.5,00,000/- पीक कर्ज घेतले होते व त्याचा बोजा फेरफार सातबारा वर घेतला.
3. अर्जदारास कृषी समृध्दी योजनेअंतर्गत कर्जासाठी रकम रु.5,00,000/- गरज असल्याने बँकेकडे कर्जाची मागणी केली त्यावेळी बँकेने प्रस्तावाला मान्यता दिली. बँकेने अर्जदाराच्या हक्कात गहाण खत करण्यासाठी दुय्यम निबंधक उस्मानाबाद यांना पाच लाखाचा बोजा चढविण्यासाठी गहाणखत करण्याबाबत पत्र दिले व त्याप्रमाणे दि.20/05/2013 रोजी रक्कम रु.2,500/- च्या स्टॅम्पवर गहाण खत करुन घेतले व त्यासाठी रु.7,500/- खर्च केला तत्पूर्वी बँकेच्या आदेशानुसार अॅड. ए.एस.रणदिवे यांनी वर नमूद मिळकतीचा शोध अर्ज दि.15/05/2013 रोजी देऊन शोध घेतला व तसा रिपोर्ट बँकेच्या कार्यालयात दाखल केला त्यासाठी रक्कम रु.3,000/- खर्च आलेला आहे.
4. त्याप्रमाणे बँकेने 20/4/2013 तलाठी सज्जा महालंगी यांना रु.5,00,000/- चा बोजा चढविण्यासाठी पत्र दिले त्याप्रमाणे तलाठी सज्जा महालंगी येथे रुपये पाच लाखाचा वर नमूद मिळकतीवर बोजा चढविणेबाबत दि.20/05/2013 रोजी अर्ज दिला त्याची पोच बँकेस दिलेली आहे असे असतांना बँके अर्जदारास कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत त्याचा त्रास अर्जदारास सहन करावा लागत आहे त्यास सर्वस्व बँक जबाबदार आहे.
5. बँकेने अर्जदाराचे हक्काने रक्कम रु.1,38,780/- दि.08/06/2013 रोजी दिले. उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. अर्जदाराने बँकेत जाऊन कर्ज रक्कमेची मागणी केली परंतू बॅंक आज देतो उद्या देतो असे म्हणून टाळाटाळ करीत आहे. शेवटी दि.09/01/2014 रोजी कर्ज रक्कम देण्यास इन्कार केला व पुर्वीच्या कर्जाची अर्जदारास रक्कम भरण्यास सांगितले अशा प्रकारे अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन बँकेने शेतकरी ग्राहकाची लूट करुन विनाकारण शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिलेला आहे त्यास बँक जबाबदार आहे. अर्जदाराने बँकेला संपूर्ण फाईलची पुर्तता करुनही कर्ज वाटप केलेले नाही त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रारी मार्फत बँकेने मंजूर केलेले कर्ज पाच लक्ष अर्जदारा-याच्या खात्यावर जमा करावेत किंवा हातोहात द्यावेत असा आदेश करावा तसेच अर्जदारास आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.1,00,000/- व खर्चापोटी रक्कम रु.10,000/- अर्जदारास बँकेने द्यावा अशी विनंती केलेली आहे.
ब) 1. युको बँकेने त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार पुर्णत: खोटी, काल्पनिक, खोटया मजकूरावर आधारीत आहे ती नामंजूर करण्यात यावी. अर्जदारास कृषी समृध्दी योजने अंतर्गत रक्कम रु.5,00,000/- मंजूर केलेले होते.
2. सदर अटी व शर्तीनुसार दि.08/06/2013 रोजी रक्कम रु.1,38,780/- कृषी समृध्दी योजने अंतर्गत शेतीमध्ये माती टाकण्यासाठी अदा केली होती, रक्कम दिल्यावर बँकेने अर्जदाराच्या शेतामध्ये स्थळ पाहणी केली असता अर्जदार घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेचा गैरमार्गाकरीता अवलंब केल्याचे दिसून आले. सदर रक्कम शेतामध्ये माती टाकण्यासाठी दिले असता सदर रकमेचा माती टाकण्यास वापर केला नसल्याचे दिसून आले व तसे अर्जदारास कळवले अर्जदार ग्राहक नाही. बँके विरुध्द दाद मागण्याचा अधिकार नाही. डि.आर.टि. न्यायालयात दाखल करणे गरजेचे होते.
3. त्यानंतर अर्जदार यांनी बँकेस राहिलेल्या रकमेची मागणी केल्यावर अर्जदार यांना तुम्ही पुर्वी घेतलेल्या रकमेचा दुरुपयोग केल्याचे सांगून अर्जदारास मंजूर केलेल्या रकमेसाठी शर्ती व अटीचा भंग केल्यामुळे उर्वरीत रक्कम देण्यास इन्कार केला आहे. सदर माहिती अर्जदाराने मंचासमोर लपवून ठेवल्याने अर्जदारास तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी मागितलेली रक्कम रु.1,00,000/- खोट्या आशयाची आहे ती नामंजूर व्हावी. शेवटी तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती युको बँकेने केलेली आहे.
क) अर्जदाराने तक्रारी सोबत फेरफार नक्कल सातबारा, गहाण खत इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत. अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराला बँकेने दिलेल्या कर्जाच्या पहिल्या हप्त्याच्या
अटी व शर्तीचा भंग केला का ? होय.
2) बँकेने सेवा देण्यास कसुर केला का ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) मुद्दा क्र. 1 व 2 :
1. बँकेने अर्जदारास कृषी समृध्दी योजने अंतर्गत कर्ज मंजूर केलेले होते आणि त्याच्या कर्जाचा पहिला हप्ता शेतामध्ये माती टाकण्यासाठी म्हणून दिलेला होता. सदर हप्ता हा अर्जदार यांना मिळाला परंतू अर्जदाराने त्याचा उपयोग माती टाकण्यासाठी केलेला नसून त्या पैशाचा गैरवापर केला असे दिसते कारण बँकेने घेतलेली सदर हरकत अर्जदाराने त्या हरकतीने समर्थन केलेले दिसून येत नाही. बँकेच्या अटी व शर्तीचे पालन अर्जदाराने केलेले नसल्याने अटी व शर्तीचा भंग केलेला असल्याने बँकेने अर्जदाराला उर्वरीत कर्ज दिलेले नाही. बँकेने दिलेल्या कर्जाच्या पहिल्या हप्त्यामध्ये अर्जदाराने शेतात माती टाकून घेतली याचा सबळ पुरावा अभिलेखावर दाखल नाही त्यामुळे याचाच अर्थ असा होतो की अर्जदार यांनी बँकेने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे आणि असे असतांना बँकेने अर्जदाराला देण्यात योणा-या सेवेत त्रुटी केली ही बाब संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी व मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्यूलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.