जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 68/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
पुजा पि.भास्कर शिंदे
वय 11 वर्षे धंदा शिक्षण .तक्रारदार
अ.पा.क्र.भास्कर महादेव शिंदे
रा.पिंपळवंळी ता.पाटोदा जि.बीड
विरुध्द
1. मा.शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद, बीड सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
मुंबई विभाग कार्यालय,
स्टेरलिंग सिनेमा बिल्डींग, दुसरा मजला,
65, मुरजबान रोड,फोर्ट, मुंबई 400 001
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डी.जी.भगत
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः-अँड.आर.एस.थिंगळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची मुलगी पुजा ही श्री स्वामी अमृत भारती विद्यालय, पिंपळवाडी ता.पाटोदा जि.बीड येथे शैक्षणीक वर्ष 2009-2010 मध्ये शिक्षण घेत होती. ती दि.27.5.2010 रोजी दुपारी 4 वाजता आंबेचे झाडावरुन पडली. त्यामुळे तिच्या शरीराच्या भागाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्यानंतर तिला डॉ.बेद्रे हॉस्पीटल अंमळनेर येथे तात्काळ नेण्यात आले. त्यांनी पुजाला दिशा डायग्नोस्टीक बीड येथे चेकअप करिता नेण्यात आले होते, त्यानंतर रिपोर्ट घेऊन लाईफलाईन बीड येथे दि.25.5.2010 ते 04.06.2010 मध्ये अँडमिट करण्यात आले होते. या कालावधतील वैद्यकीय खर्च रु.34,978/- आलेला आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे.
राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना 2008-2009 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सदरील योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला अपघातामुळे नुकसान झाल्यास विद्यार्थ्यास शासनातर्फे नुकसान भरपाई रु.50,000/- देण्यात येते.
सदर योजने अंतर्गत नूकसान भरपाई मिळण्यासाठी मूदतीत श्री स्वामी अमृत भारती विद्यालय पिंपळवंडी मार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे योग्य त्या कागदपत्रासह प्रस्ताव दि.10.06.2010 रोजी पाठविला.
तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला क्र.1 यांना राजीव गांधी योजने अंतर्गत नूकसान भरपाई मिळण्यासाठी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन माहीती दिली नाही. सामनेवाला क्र.2 कडे नूकसान भरपाई अर्ज पाठविला आहे. त्याचेकडून अद्यापपर्यत कोणताही खुलासा आलेला नाही.
सामनेवाला क्र.2 यांनी दि.31.12.2010 रोजी अपघाता संबंधीत तारीख नाही असे म्हणून विमा पत्रातील अटीनुसार दावा अपात्र आहे असे सागितले. त्यानंतर तक्रारदारांनी शाळे मार्फत पून्हा दि.08.01.2011 रोजी अपघात हा दि.25.5.2010 रोजी झालेला आहे. तसा अर्ज पालकांनी शाळेकडे केलेला तो आपणाकडे दिलेला आहे. मात्र अपघाताची दिनांक नजरचुकीने दि.25.5.2010 रोजीच्या ऐवजी दि.26.5.2010 अशी नोंदवीण्यात आली. अशा स्वरुपाचा खुलासा करणारे पत्र पाठविले असता सामनेवाला क्र.2 यांनी जुना आजार म्हणून विमा पत्रातील अटीनुसार भरपाई देण्यास अपात्र असे दि.4.2.2011 रोजीचे पत्राद्वारे कळविले. पुजाला कोणताही जुना आजार नाही. सामनेवाला यांचे कारण हे योग्य नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 व 2कडून वैयक्तीक व संयूक्तीकरित्या खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास हक्कदार आहे.
अ. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षायोजना विम्याचीरक्कम रु.50,000/-
ब. शारीरिक व मानसिक त्रासाबददल,प्रवास व इतर
खर्चाबददल रु.20,000/-
क. पत्रव्यवहाराचा खर्च रु.1,000/-
ड. प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-
इ. मेडीकल हॉस्पीटलचे बील रु.34,948/-
एकूण रु.1,10,948/-
सदर रक्कमेवर सामनेवाला यांनी 18 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास हक्कदार आहे. परंतु तक्रारदार कोर्ट फि अभावी त्यांची तक्रार रु.1,00,000/-पर्यतच सिमित करीत आहे.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला क्र.1व 2 यांनी रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, त्यावर 18 टक्के तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही व त्यांनी त्यांचा खुलासा दाखल केला नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.30.11.2011 रोजी एकतर्फा तक्रार चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.24.10.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. पुजा हिला डिसचार्ज कार्डावरुन जूना आजार असल्याने ती दावा मिळण्यास अपात्र आहे. या कारणाने दावा नाकारला ओ तो योग्य आहे. त्यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही.त्यामुळे तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.भगत व सामनेवाले क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.आर.एस.थिंगळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता पुजा ही दि.25.5.2010 रोजी आंब्याचे झाडावरुन पडली आहे. पंरतु दावा पाठविताना सदर दाव्यात दि.26.5.2010 रोजीचा उल्लेख होता.तसेच तक्रारीत देखील घटनेची दि.27.5.2010 अशी आलेली आहे.या बाबत तक्रारदाराचे म्हणणे की, घटनेच्या दिनांकाचे संदर्भात नजरचुकीने सदरच्या दिनांक टाकली आहे परंतु त्यादिवशी घटना घडली त्यादिवशी पुजाला डॉ.बेद्रे यांचे दवाखान्यात नेले होते. त्यांनी पेशंट पुजाला बिड येथे चेकअपसाठी पाठवले व त्या बाबतची रेफर लेटर दिलेले आहे. घटनेची दि.26.5.2010, 27.5.2010 नसून तो दि.25.5.2010 आहे व शपथपत्रासोबत तशी पुरशीस दिलेली आहे. विमा कंपनीने दाखल केलेली कागदपत्रे पाहत असताना त्यात 26.5 अगोदरच्या उपचाराचे कागदपत्र दिसत असल्याने जूना आजार म्हणून अपात्र असे कारण नमूद करुन दावा नाकारला आहे.
या संदर्भात विमा कंपनीने डिसचार्ज कार्डावरुन सदरचा निष्कर्ष घेतलेला आहे.
चूक निश्चितपणे तक्रारदाराकडून झालेली आहे व घटनेच्या दिनांकाची चूक झाल्याने विमा कंपनीने सदरचा निष्कर्ष काढलेला आहे.
विमा कंपनीने सदर विमापत्र दाखल केलेले आहे व ते पाहता वैयक्तीक अपघात मृत्यूसाठी रु.30,000/-, कायम स्वरुपी अपंगत्वासाठी रु.50,000/- तसेच अंशतः अपंगत्वासाठी रु.20,000/- व वैद्यकीय खर्च रु.2,000/- अशी जोखीम रक्कम विमापत्रात आहे.
तक्रारदारांनी पुजाचा वैद्यकीय खर्चाची मागणी केलेली आहे. पुजेला सदर अपंगत्वापासून कायमचे किंवा अंशतः अपंगत्व आल्याचे बाबतची तक्रार नाही. त्यामुळे वैद्यकीय खर्च बाबत विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
वरीलप्रमाणे अपघाताचे दिनांकामध्ये चूक ही तक्रारदाराची झाल्याने व त्या कारणावरुन सामनेवाला यांनी सदरचा दावा नाकारल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट न झाल्याने मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही. तसेच तक्रारदाराच्या खर्चाची रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना वैद्यकीय
खर्चा बददल रक्कम रु.2,000/- (अक्षरी दोन हजार फक्त) आदेश
मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.02.05.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र. 2 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड