(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून स्नेहल प्लास्टीक इंडस्ट्रीजसाठी दि.26.09.2004 पासून वीज पुरवठा घेतलेला आहे. वीज पुरवठा देताना वीज वितरण कंपनीने व्यंकटेश इंजिनिअरींग इंडस्ट्रीज यांनी (2) त.क्र.300/05 वापरलेले आणि 36566 युनिट रिडींग असलेले जुने मीटर बसविले. दि.23.02.2005 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी केली असता त्यांना मीटर 37.032% मंदगतीने चालत असल्याचे आढळून आले म्हणून त्यांनी मीटर, पंचनामा करुन जप्त केले. मीटर जप्तीच्या वेळेस मीटरचे सर्व सील व्यवस्थित होते. त्यानंतर दि.25.02.2005 रोजी मीटरची तपासणी केली असता मीटर 87.74% मंदगतीने चालत असल्याचे आढळले. दि.23.03.2005 रोजी वीज वितरण कंपनीने त्यास रक्कम रु.1,24,214/- चे असेसमेंट देयक आणि रु.3,80,000/- चे कंपाऊंडींग देयक असे एकूण रु.5,04,214/- चे देयक दिले. त्याने दि.19.07.2005 रोजी गैरअर्जदारांनी त्याला फॉल्टी मीटर दिले असून सदर देयक दुरुस्त करुन देणेबाबतचा अर्ज दिला. परंतू गैरअर्जदारांनी अर्जाची दखल घेतली नाही. त्यानंतर गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दि.26.08.2005 रोजी त्याचा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसुचना न देता बेकायदेशीररित्या खंडीत केला. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी चुकीचे देयक देऊन व वीज पुरवठा खंडीत करुन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दि.23.03.2005 रोजी दिलेले असेसमेंट बिल रदद करावे आणि नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने वीज पुरवठा औद्योगिक कारणासाठी घेतलेला असून तो वीजेचा वापर व्यापारी तत्वावर निव्वळ नफा मिळविण्यासाठी करत आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार या प्राथमिक मुद्यावर फेटाळण्यात यावी. त्यांचे सातारा फिरते पथक, सातारा यांनी तक्रारदाराच्या स्नेहल प्लास्टीक इंडस्ट्रीज वाळुज, एम.आय.डी.सी.येथील मीटरची तपासणी केली असता मीटर 37.032% स्लो असल्याचे आढळले, म्हणून दि.25.02.2005 रोजी तक्रारदाराचे समक्ष मीटर पुन्हा तपासले असता मीटर 87.74% स्लो चालत असल्याचे आढळले. तक्रारदाराने मीटरच्या आतमध्ये तीनही सी.टी.सेकंडरी वायर्समधे रेजीस्टर जोडलेले आढळले यापैकी आर व वाय फेजच्या सी.टी. सेकंटरी वायर्स मधील जोडलेले रेजीस्टर्स पी.सी.बी. ला जोडलेले व ‘बी’ फेजच्या सी.टी. सेकंडरी मधील जोडलेला रेजीस्टर पी.सी.बी. पासून अलग झालेला आढळला. त्यामुळे दि.23.02.2005 रोजी झालेल्या तपासणीत टॉर्क टेस्टमधे ‘बी’ फेजवर मीटर स्टॉप आढळले. तक्रारदारास बिल रिवॉईज करुन दिलेले असून तक्रारदाराने रु.93,926/- चे बिल भरलेले आहे. तक्रारदार वीज चोरीच्या अनुषंगाने दिलेल्या असेसमेंट बिलाची रक्कम भरण्यास तयार आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास कुठल्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून त्याची तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. (3) त.क्र.300/05 दोन्ही पक्षाच्या वतीने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून स्नेहल प्लास्टीक इंडस्ट्रीज या औद्योगिक कारणासाठी व निव्वळ नफा मिळविण्यासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. त्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) नुसार ग्राहक होत नाही असा प्राथमिक मुद्या वीज वितरण कंपनीच्या वतीने उपस्थित करण्यात आला. व्यापारी कारणासाठी सेवा घेणारी व्यक्ती अथवा संस्था ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (1) (ड) मधील व्याख्येनुसार “ग्राहक” होत नाही. तक्रारदाराने प्लास्टीक इंडस्ट्रीजसाठी म्हणजे व्यापारी कारणासाठी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली आहे. प्लास्टीक इंडस्ट्रीज ही स्वयंरोजगारासाठी चालविली जात नसून त्या ठिकाणी अनेक कामगार काम करीत असतात आणि हा व्यवसाय मोठया प्रमाणावर नफा कमवण्यासाठीच केला जातो. त्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून व्यापारी कारणासाठी सेवा घेतल्याचे स्पष्ट दिसून येते. म्हणून तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2 (1) (ड) मधील व्याख्येनुसार “ग्राहक” होत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार या मंचात चालण्यास अयोग्य आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |