तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. सुभाष एम.गिते.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. एस.एन. तांदळे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराने सन 1994 साली सामनेवालेकडून पिठाच्या गिरणीसाठी विज जोडणी घेतलेली आहे. तक्रारदाराचे विज मापक क्रं.393027 होता. तक्रारदाराने विज देयके नियमित भरलेली आहेत. कधीही त्यांच्याकडे थकबाकी राहिलेली नाही.
जवळपास एक वर्षापूर्वी तक्रारदाराने सामनेवालेकडे तोंडी तक्रार केली होती की, सदरचे विज मापक हे दोषयक्त आहे व चुकीचे वाचन दाखवत आहे. सामनेवालेंनी चौकशी करुन सदरचे इलेक्ट्रीक विज मापक बदलून दिले. त्याचा विज मापक क्रमांक 392484 आहे. सदर मापकाचे वाचनाप्रमाणे आलेली देयके तक्रारदाराने भरलेली आहेत.
तारीख 09/03/2010 रोजी सामनेवालेंनी दिलेल्या देयकाची काळजीपूर्वक पाहणी केली असता तक्रारदारांना चुकीचा मापक नंबर दिलेला आहे, असे दिसते. सदरचा नंबर हा जुन्या विज मापकाचा होता. त्यांनी सामनेवालेकडे त्याबाबत चौकशी केली असता सामनेवालेंनी चुक दुरुस्ती करुन देण्याचे आश्वासन दिले.
अचानकपणे तारीख 05/07/2010 रोजी सामनेवालेने तक्रारदाराच्या पिठाच्या गिरणीला भेट दिली आणि तक्रारदाराचा विज पुरवठा खंडित केला. त्याबाबत विचारले असता सामनेवालेंनी काहीही सांगितले नाही आणि तक्रारदारांना दुसरे दिवशी नोटीस दिली आणि रक्कम रु. 72,555/- चे फरकाचे देयक दिले. तक्रारदाराने सदरची रक्कम भरली नाही तर सामनेवाले हे तक्रारदाराविरुध्द फिर्याद दाखल करणार, अशी सुचना सामनेवालेंनी दिली. तक्रारदाराने कोठेही विज मापकास हात लावला नाही. तेव्हा पासून सदरची पिठाची गिरणी आजतागायत बंद आहे. तक्रारदार आणि त्याचे कुटूंब पूर्णपणे सदर पिठाच्या गिरणीवर अवलंबून होते. गिरणी बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचण येवू लागली व उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे रुपये 20,000/- चे नुकसान झालेले आहे.
तारीख 15/07/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवालेंना नोटीस पाठवली आणि विज जोडणी करुन देण्याची मागणी केली परंतू सामनेवालेने खोटी फिर्याद दाखल करण्याची धमकी दिली व तक्रारीची दखल घेतली नाही.
विनंती की, सामनेवालेने विज जोडणी जोडून दयावी, असे निर्देश समनेवालेंना दयावेत. तसेच तक्रारदाराविरुध्द खोटी केस दाखल करु नये, असे निर्देश सामनेवालेंना दयावेत. सदरची नोटीस सामनेवालेंनी मागे घ्यावी. नुकसानीदाखल रक्कम रु. 25,000/- तक्रारदारांना मानसिक त्रासाचे व तक्रारीच्या खर्चाचे देण्यात यावेत.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा निशाणी-9 तारीख 08/10/2010 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवालेने नाकारलेले आहेत.
तारीख 05/07/2010 रोजी विदयुत कंपनीच्या लोकल भरारी पथकाने तक्रारदाराच्या पिठाच्या गिरणीतील विदयुत मिटरची पाहणी व तपासणी केली असता तक्रारदार हे मिटर बायपास करुन विज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे सामनेवालेने विज चोरीच्या फरकाचे बिल रक्कम रु. 72,555/- चे दिले, ते बरोबर आहे. भरारी पथकाने वायर जप्त केली व पंचनामा केलेला आहे व फौजदारी केस दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रारदाराच्या नोटीसला उत्तर देण्याचे कारण नाही. तक्रारदार हेच विज चोरीचे बिल भरण्यास जबाबदार आहेत. तक्रारदाराचा विज पुरवठा कंपनीच्या नियमाप्रमाणे बिल न भरल्यामुळे बंद केला आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही, त्यामुळे तक्रारदारांना तक्रार दाखल करता येत नाही. विज चोरीची केस चालविण्याचा अधिकार या मंचास नाही. तक्रार परिपालनीय नाही ती खारीज करण्यात याची व सामनेवाले यांना खर्चाची रक्कम रु. 5,000/- देण्यात यावेत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले गैरहजर, त्यांचा युक्तिवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने पिठाच्या गिरणीसाठी विज जोडणी घेतलेली आहे. तक्रारदाराचे हल्लीचे विज मापक क्रं. 392484 हे आहे.
तारीख 05/07/2010 रोजी सामनेवाले यांच्या भरारी पथकाने तक्रारदाराच्या पिठाच्या गिरणीच्या विज मापकाची तपासणी केली असता विज मापकातून विज पुरवठा होत नसून तो वायर टाकून बायपासने घेण्यात येत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी जागेवरच पंचनामा केलेला आहे व वायर जप्त केलेली आहे. तसेच तक्रारदारांना रक्कम रु. 72,555/- चे देयक दिलेले आहे. तसेच तक्रारदाराविरुध्द फौजदारी तक्रार दाखल केलेली आहे, ती अदयाप प्रलंबित आहे.
यासंदर्भात सामनेवालेंनी घटनास्थळाचा पंचनामा, फिर्याद, प्रोव्हीजनल असेसमेंट सिट तारीख 07/07/2010 चे दाखल केलेले आहे. सदर भरारी पथकात श्री जी डी चौरे, उप कार्यकारी अभियंता, परळी उपविभाग यांच्यासोबत एम एस ई बी चे कर्मचारी व अधिकारी होते. याबाबत वरील कागदपत्रांच्या संदर्भात सामनेवाले यांनी श्री जी. डी. चौरे, उप कार्यकारी अभियंता यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे, त्यामुळे कागदपत्रे व शपथपत्रे यांच्या संदर्भात तक्रारदाराच्या तक्रारीत किंवा त्याच्या शपथपत्रात किंवा लेखी युक्तिवादात कोणतेही आव्हान दिलेले नाही किंवा वरील बाब नाकारलेली नाही. तक्रारदाराने तक्रारीत तारीख 05/07/2010 रोजी सामनेवालेच्या अधिका-यांनी विज मापकाची तपासणी केली, असे विधान केलेले आहे, त्यामुळे तारीख 05/07/2010 रोजीच्या कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने विज चोरी केलेली असल्याचे निदर्शनास आल्यावरुन सामनेवालेने तक्रारदारांना फरकाचे व विज चोरीचे देयक रक्कम रु. 72,555/- चे दिलेले आहे व तक्रारदाराविरुध्द फौजदारी केस केलेली आहे.
यासंदर्भात विज चोरीची केस असल्याने सदरची तक्रार ही न्याय मंचात चालू शकत नाही, अशी सामनेवालेची जोरदार हरकत आहे. याबाबत विज कायदा-2003 चे कलम-135 प्रमाणे कार्यवाही झालेली असल्याने तक्रारदारांना सदर कार्यवाही बाबत त्यांची बाजु मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व त्यानुसार त्या कार्यवाहीचा जो अंतिम निकाल लागेल त्याप्रमाणे तक्रारदारांना कार्यवाही करता येईल. सदरची फिर्याद ही सक्षम न्यायालयापुढे न्यायासाठी प्रलंबित असल्यामुळे यासंदर्भात न्याय मंचास कोणतेही मत प्रदर्शीत करु इच्छीत नाही. त्यामुळे सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केला ही बाब तुर्तास या ठिकाणी स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. सामनेवालेच्या खर्चाबाबत आदेश नाही.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड