(घोषित दि. 29.06.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचें ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 30 वर्षाच्या भाडेतत्वावर दुकान घेतले असून वीज मीटर हे जागा मालकाच्या नावाने आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ते वीजेचा वापर करीत असल्यामुळे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व सदरील दुकानाच्या मिळकतीवर त्यांचा चरितार्थ अवलंबून असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करु शकतात अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत असताना देखील गैरअर्जदार यांनी ऑगस्ट 2012 मध्ये त्यांना 19839.25 रुपयाची थकबाकी दर्शवून वीज बिल आकारले. याबाबत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे विचारणा केली असता जुन्या मालकाच्या नावे असलेली थकबाकीची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. अर्जदारास त्या पुढील काळात देखील मागील थकबाकी दाखवत वाढीव रकमेचे बिल देण्यात आले. याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदार वीज बिलाचा भरणा करण्याची सतत मागणी करीत असून ते न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देत असल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी मागिल थकबाकी बिल रद्द करावे व या चुकीच्या वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश देण्याची विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी दिलेली वीज बिले, गैरअर्जदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीची प्रत इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहे.
वीज पुरवठा खंडीत करु नये म्हणून अर्जदाराने दिलेल्या अंतरिम अर्जावर दिनांक 02.02.2013 रोजी सुनावणी घेण्यात आली. अर्जदाराने 4,000/- रुपये भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश मंचाने पारित केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे ग्राहक नसल्याचे म्हटले आहे. मूळ ग्राहक मोहमंद इब्राहिम यांनी त्यांच्या नावे दुस-या ठिकाणी वीज पुरवठा घेतला होता ज्याचा ग्राहक क्रमांक 524010000954 असा होता. मोहमंद इब्राहीम यांनी या ग्राहक क्रमांकाचे वीज बिल भरले नसल्यामुळे दिनांक 31.03.1998 रोजी त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मोहमंद इब्राहीम यांच्या नावे (ग्राहक क्रमांक 524010082233) अर्जदाराच्या दुकानात वीज पुरवठा घेतला असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्या नावे असलेली थकबाकी रक्कम 19839.25 वीज बिलात समाविष्ट करण्यात आली जी योग्य आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता व पुरवठयाच्या इतर अटी विनीयम 2005 नुसार त्यांनी अर्जदाराच्या नावे आकारलेली थकबाकी रक्कम योग्य आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की, अर्जदार यांनी मोहमंद इब्राहिम यांच्या मालकीचे दुकान भाडयाने घेतले आहे. त्या ठिकाणी असलेले वीज मीटर हे मूळ मालक मोहमंद इब्राहीम यांच्या नावे असून अर्जदार हे वीज वापर करीत आहेत त्यामुळे वीज कायदा 2003 नुसार अर्जदार हे ग्राहक आहेत. अर्जदाराने वीज बिलाच्या प्रती मंचात दाखल केल्या आहेत. या वीज बिलाचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराच्या दुकानात देण्यात आलेला वीज पुरवठयाचा ग्राहक क्रमांक 524010042233 असा आहे. गैरअर्जदार यांनी ऑगस्ट 2012 मध्ये दिलेल्या वीज बिलात 19839.25 रुपये थकबाकी दखविली आहे. गैरअर्जदार यांच्या जवाबानुसार मोहमंद इब्राहिम यांच्या नावे अन्य ठिकाणी असलेल्या वीज बिलाची रक्कम वसूल न झाल्यामुळे ऑगस्ट 2012 च्या वीज बिलात ही रक्कम समाविष्ट केली आहे. गैरअर्जदार यांनी कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांची यादी दाखल केली आहे. त्याचे निरीक्षण केल्यावर मोहमंद इब्राहिम यांचा 524010000954 या ग्राहक क्रमांकाचा वीज पुरवठा दिनांक 31.03.1998 रोजी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला असल्याचे स्पष्ट होते. या ग्राहक क्रमांकावर 19839.25 रुपये थकबाकी होती. ही थकबाकीची रक्कम गैरअर्जदार यांनी मोहमंद इब्राहिम यांच्या नावे असलेल्या 524010082233 या ग्राहक क्रमांकावर ऑगस्ट 2012 च्या वीज बिलात समाविष्ट केलेली दिसून येते.
थकबाकी वसुलीबाबत वीज कायदा 2003 मधील कलम 56 हे खालील प्रमाणे आहे.
Subsection (2)of section 56 of Electricity Act 2003 provides that not withstanding anything contained in any other law for the time being in force, no sum due from any consumer under the section shall be recoverable after a period of two years from the date when such sum became first due unless such sum has been shown continuously as arrears of charges for Electricity supplied and the licensee shall not cut off the supply of Electricity.
म्हणजेच मागील दोन वर्षापासून जर वीज बिलात थकबाकी दाखविण्यात आली नसेल तर ती वसूल करण्याचा अधिकार वीज कंपनीस नाही.
गैरअर्जदार यांनी दिनांक 31.03.1998 रोजीची थकबाकी रक्कम अर्जदाराच्या ऑगस्ट 2012 च्या वीज बिलात समाविष्ट केली आहे. जी कायद्यातील तरतुदी नुसार नसल्याचे स्पष्ट होते. वीज कायद्यातील तरतुदी नुसार गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले 19839.25 रुपये थकबाकीचे बिल चुकीचे असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2012 च्या वीज बीलामध्ये आकारलेली थकबाकी 19839.25 रुपये तसेच त्यावर पुढील वीज बिलात आकरण्यात आलेले व्याज रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी वरील प्रमाणे रक्कम कमी करुन अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 1500/- 30 दिवसात द्यावे.