तक्रारदारातर्फे :- अँड. अरुण जगताप.
सामनेवालेतर्फे :- अँड. एम.आर. गर्जे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार ही शिवाजीनगर, बीड येथे राहत असून सध्या पती उद्योगधंदयासाठी औरंगाबाद येथे असल्यामुळे औरंगाबाद येथे राहते. तक्रारदाराने स्वत:चे घर किरायाने दिलेले आहे. सदर घरासाठी तक्रारदाराने सामनेवालेकडून घरगुती विज जोडणी घेतलेली असून त्याचा मिटर नं. 576010161486 आहे.
तक्रारदाराने जानेवारी-2009 ते मे-2009 पर्यंत नियमित विज देयके भरलेली आहेत.
जून-2009 मध्ये सामनेवालेने तक्रारदारांना विज चोरी व दंडापोटी एकूण रक्कम रु. 17,723/- चे देयक दिले. सदरचे देयक भरले नाही तर विज पुरवठा खंडित करु अशी धमकी दिली. तसेच तक्रारदाराचे विज मिटर बदलून नवीन विज मिटर बसविले.
तक्रारदार औरंगाबाद येथे राहत असल्याने व पडदासिन स्त्री असल्यामुळे तक्रारदाराने वरील देयक भरले.
ऑगस्ट-2009 मध्ये रक्कम रु. 15,530/- चे, सप्टेंबर-09 मध्ये 16,650/- चे व ऑक्टोबर-09 मध्ये रु. 17,710/- ची देयके तक्रारदारांना देण्यात आलेली आहेत. सदरची देयके ही, सामनेवालेचे कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी यांनी तक्रारदाराच्या घरी भेट न देता, मिटरचे वाचन न घेता दिलेली आहे.
तक्रारदाराने जून-2009 मध्ये रक्कम रु. 17,723/- चे देयक भरले. तक्रारदाराकडे पूर्वीची कोणत्याही देयकाची थकबाकी राहिलेली नाही. आजरोजी विज मापकाचे वाचन 663 युनिट असून त्याप्रमाणे तक्रारदार बिले भरण्यास तयार आहे.
विनंती की, सामनेवालेने ऑगस्ट-2009 ते ऑक्टोबर-2010 पर्यंतची दिलेली विज देयके रद्द करुन ती दुरुस्ती करुन देण्यात यावी.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 01/12/2010 रोजी निशाणी-16 अन्वये दाखल केला. खुलाशात त्यांनी त्यांच्या विरुध्दचे सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. विज चोरीचे व तडजोडीचे देयक तक्रारदाराने भरलेले आहे. तसेच ग्राहकास एप्रिल-2008 पासून जी फॉल्टी देयके देण्यात आलेली होती ती कमी करुन त्यास सरासरी युनिटप्रमाणे विभागून देण्यात आली. तक्रारदाराकडून 2010 पर्यंत त्यांचेकडील थकीत विदयुत देयक रु. 26871/- मधून 12808/- कमी करुन देण्यात आलेले आहे. सदरची रक्कम तक्रारदाराने भरणे आवश्यक आहे.
भरारी पथक यांना असलेल्या विदयुत कायदा-2003 च्या कलम-151 च्या अधिकाराप्रमाणे त्यांनी तक्रारदाराच्या घरातील मिटर नं. 10686857 ची तपासणी केली असता फिरते पथक यांना प्राथमिक तपासणीत असे आढळून आले की, तक्रारदार ही विजेची अनाधिकृतपणे चोरी करत होती. त्याच वेळी त्या ठिकाणी पंचनामे सविस्तर नोंदीसह तयार करण्यात आले. तक्रारदारांना विदयुत कायदयाप्रमाणे विज चोरीची रक्कम रु. 7,263/- व तडजोड रक्कम रु. 10,000/- चे देयक दिले व ते भरण्यासंबंधी सुचना दिली. त्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम भरलेली आहे.
तक्रारदाराने जाणुन-बुजून खरी माहिती लपवून खोटी तक्रार मंचात दाखल केलेली आहे. ती खर्चासह खारीज करुन मानसिक त्रासाबाबत रक्कम रु. 10,000/- तक्रारदाराने सामनेवालेंना देण्याबाबत आदेश व्हावेत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, दुरुस्ती देयक यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. अरुण जगताप व सामनेवालेचे विद्वान अँड. एम.आर. गर्जे यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवालेकडून घरगुती वापरासाठी विज जोडणी घेतलेली आहे. सदर जोडणीला तक्रारीत नमूद असलेले विज मिटर बसविलेले आहे, ही बाब सामनेवालेंना मान्य आहे. परंतू तक्रारदाराच्या घरातील विज जोडणीची पाहणी सामनेवालेच्या भरारी पथकाने केली असता त्यांना तक्रारदार विज चोरी करीत असल्याचे आढळून आल्यावरुन त्यांनी तक्रारदारांना त्याच स्थळी पंचनामा करुन विज चोरीचे देयक व दंडाचे देयक दिलेले आहे. सदरचे देयक तक्रारदाराने भरलेले आहे. सदरचे देयक तक्रारदाराने नाराजीने किंवा तक्रार कायम ठेवून भरले असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे नाही व सदर देयकाबाबत तक्रारदाराच्या तक्रारीत मागणीही नाही.
तक्रारदाराने सप्टेंबर-2009, ऑगस्ट-2009 ते ऑक्टोबर-2010 या कालावधीची देयके ही विज मापक वाचनाप्रमाणे देण्यात आलेली नसल्याकारणाने रद्द करुन मागितलेली आहेत. तथापि, सामनेवालेने तक्रारदारांना या कालावधीतील देयके दुरुस्ती करुन दिलेली आहेत व तक्रारदाराचे एकूण देयक रु. 2,6871/- मधून रक्कम रु. 12,608/- कमी करुन रक्कम रु. 14,263/- चे देयक तक्रारदारांना तारीख 18/8/10 रोजी भरण्यासाठी देण्यात आलेले आहे. त्याबाबतचे दुरुस्ती देयकाची प्रत सामनेवालेंनी दाखल केलेली आहे. सदर देयकासंदर्भात सामनेवालेंचा अर्ज तारीख 12/8/2010 निशाणी-12 वर तक्रारदाराचा खुलासा देण्याबाबत आदेश पारीत झाला. परंतू सदर देयकासंदर्भात तक्रारदाराने कोणताही खुलासा दिलेला नाही. याचा अर्थ तक्रारदारांना देयक दुरुस्ती करुन मिळालेले आहे व ते मान्य आहे.
तक्रारदारांना देयक दुरुस्ती करुन दिलेले असल्याने तक्रारदाराच्या तक्रारीचे प्रथमदर्शनी निराकरण झालेले असल्याने तक्रार निकाली करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार निकाली करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही्.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड