निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 19/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 09/12/2013
कालावधी 10 महिने. 09 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर पिता एकनाथराव सपाटे. अर्जदार
वय 45 वर्षे,धंदा शेती. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.विटा (बु.) ता.पाथरी जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा राज्य विद्युत वितरण कंपनी म. अॅड.एस.एस.देशपांडे.
विभागीय व मंडळ कार्यालय, जिंतूररोड, परभणी.
2 कनिष्ठ / सहाय्यक अभियंता.
महावितरण उपविभाग पाथरी.
ता.पाथरी जिल्हा परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे विटा (बु.) ता.पाथरी जि.परभणी येथील रहिवाशी असून त्याला व भावाला व कुटूंबातील इतर सदस्यांना मौजे विटा (बु.) आनंदनगर शिवारात गट क्रमांक 64/65 मध्ये शेत जमीन आहे. व कुटूंबातील इतर सदस्यांना गट क्रमांक 123 मध्ये शेत जमीन आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, मौजे विटा (बु.) येथील आनंदनगर शिवारातील गट क्रमांक 64/65 मधील गैरअर्जदाराच्या डि.पी. वरुन अर्जदार, त्याचे भाऊ रामकिशन इतर 5 व्यक्ती ( भागीरथीबाई, एकनाथराव, राधाबाई, रामकिशन, ऋशिकेश, सुधाकरराव, धर्मराज सुधाकरराव ) ने विद्युत कनेक्शन घेतले आहे सदरील डि.पी. वरुन इतर कोणाचेही कनेक्शन नाही या सर्व 7 व्यक्तीकडे गैरअर्जदाराची कोणतेही थकबाकी नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदरील डि.पी. वरुन विद्युत कनेक्शन गैरअर्जदाराकडून घेतले होंते, सदरचा विद्युत पुरवठा हा अर्जदाराने व इतर सदस्यांनी बोअरसाठी घेतले होते, परंतु सदर बोअरचे पाणी कायमस्वरुपी आटले व या 7 जोडण्याचा व त्या डि.पी.चा काहीही उपयोग राहिला नाही, त्यामुळे अर्जदाराने व त्याच्या भावाने ( विटा बु.) येथील गट क्रमांक 90 मधून ( गोदावरी नदीपासून – पाथरी ) पाईप लाईनव्दारे या गट क्रमांक 64/65 करीता पाणी पुरवठा घेतला, त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, आनंद नगर शिवारातील डि. पी. बंद करुन जर विटा (बु.) येथील शिवारातील अर्जदाराच्या गट क्रमांक 123 मध्ये डि.पी. बसवल्यास त्याचा सर्वांना उपयोग होणार आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने व त्याच्या कुटूंबातील इतर सदस्याने दिनांक 19/07/2012 रोजी गैरअर्जदारास अर्ज देवुन त्याचे सदरील असलेले सर्वाचा विद्युत पुरवठा बंद करावा सदर डि.पी. वर इतर कोणाचेही विद्युत पुरवठा नसले कारणाने सदर डि.पी. कायम स्वरुपी बंद करावी, म्हणून अर्ज दिला होता, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून त्यानंतर अर्जदाराने व इतर भावाने पुन्हा एकदा दिनांक 11/10/2012 रोजी गट क्रमांक 64/65 येथील डि.पी. वरील जोडण्या गट क्रमांक 123 मध्ये स्थलांतरीत करुन द्यावे, म्हणून अर्ज केला. त्या अर्जावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश केले की, Please submit necessary estimate with consent and cost त्या प्रमाणे अर्जदाराने व इतर व्यक्तिींनी सर्व सहकार्याची तयारी दर्शवुन व आवश्यक खर्च भरण्याची तयारी दर्शवुन गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठपुरावा केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराना व इतर सदस्यांना सदर गट क्रमांक 64/65 मधील डि.पी. चा काहीही उपयोग राहिला नाही व त्याना विना कारण विद्युत देयके भरावे लागत आहे, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराना 1 व 2 आदेश करावा की, मौजे विटा (बु) येथील आनंद नगर शिवारातील गट क्रमांक 64/65 मधील डि.पी. व त्यावरील अर्जदार व त्याच्या कुटूंबीयांच्या नावे असलेले सर्व जोडण्या मौजे विटा ( बु) येथील गट क्रमांक 123 मध्ये स्थलांतरीत करुन द्यावी व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. द्यावे.
अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दिले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्राच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास केलेला अर्ज, प्रल्हाद सपाटे यांचा अर्ज, 7/12 उतारा, गट क्रमांक 123 चा 7/12 उतारा, रामकिशन सपाटे याची 2000/- ची पावती, भागीरथीबाई याची 4300/- ची पावती, राधाबाई यांची 4450/- ची पावती, ऋशिकेश सपाटे याची पावती, धर्मराज सुधाकरची पावती, तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 9 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये अर्जदाराचे नाव सुधाकर उर्फ सुदाम असल्याचे शपथपत्र, प्रल्हाद सपाटेचे कोटेशन कॉर्म, सुदाम एकनाथची 5000/- रु. ची पावती व 7/12 उतारा. तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 11 वर 6 कागदपत्रे जोडले आहेत. ज्यामध्ये, प्रल्हाद सपाटेचे शपथपत्र, भागीरथी सपाटेचे शपथपत्र, रामकिशन सपाटेचे शपथपत्र, राधाबाई सपाटेचे शपथपत्र, ऋशिकेश सपाटेचे शपथपत्र धर्मराज सपाटेचे शपथपत्र, दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी निवेदन सादर न केले मुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब नि.क्रमांक 9/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. अर्जदाराचे व त्याच्या कुटूंबातील इतर सदस्याचे मोजे विटा (बु.) ता.पाथरी जि. परभणी येथे आनंद नगर शिवारात गट क्रमांक 64/65 मध्ये गैरअर्जदाराचे डि.पी. वरुन शेतीसाठी विद्युत पुरवठा घेतला होता व सदरचा विद्युत पुरवठा बंद करुन सदरची डि.पी. पी.डी. करावी या बाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील व 4/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. व सदरची डि.पी. मौजे विटा (बु.) ता.पाथरी येथील गट क्रमांक 123 मध्ये स्थलांतरीत करुन द्यावी अशी विनंती केली होती ही बाब देखील सदरील कागदावरुन सिध्द होते. अर्जदाराचे व इतर 7 लोकांचे मौजे विटा (बु.) ता.पाथरी जि.परभणी येथील गट क्रमांक 64/65 मधील असलेल्या गैरअर्जदाराचे डि.पी. चा बोअर आटल्यामुळें काहीही उपयोग राहिला नाही व सदरचे कनेक्शन बंद करुन सदरची डि.पी. बंद करावी व मौजे विटा (बु.) येथील गट क्रमांक 123 मध्ये स्थलांतरीत करुन द्यावी व तसे केल्यास अर्जदाराचा व इतर 7 लोकांचा फायदा होईल व तसेच सदरच्या डि.पी. वर फक्त 7 लोकांचा विद्युत पुरवठा होता ही बाब नि.क्रमांक 11 वर दाखल केलेल्या 11/1 ते 11/6 वरील शपथपत्रा वरुन सिध्द होते.
अर्जदार व इतर 7 लोक सदरची डि.पी. च्या स्थलांतरासाठी लागणारा खर्च करण्यास तयार असतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदाराची दखल घेतली नाही , यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे व अर्जदारास मानसिकत्रास दिला आहे. कारण त्या डि.पी. चा अर्जदारास व इतर 7 लोकांना डि.पी.चा काहीही उपयोग न राहिल्यामुळे गैरअर्जदाराने सदरची डि.पी. बंद करुन अर्जदारास गट क्रमांक 123 मध्ये स्थलांतरीत करुन विद्युत पुरवठा देणे आवश्यक होते. तसेच गैरअर्जदाराचे आद्य कर्तव्य आहे की, त्याने आपल्या ग्राहकाचे हित जोपासले पाहिजे, निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने आदेश तारखे पासून 45 दिवसांच्या आत मौजे
विटा (बु.) ता.पाथरी जि.परभणी येथील आनंद नगर शिवारामधील गट क्रमांक
64/65 मधील असलेल्या डि.पी. वरुन अर्जदार व त्याच्या इतर कुटूंबीयांचे
विद्युत जोडणी बंद करुन अर्जदार व त्याच्या कुटूंबीयास मौजे विटा (बु.)
ता.पाथरी येथील गट क्रमांक 123 मध्ये अर्जदाराचे सहकार्य घेवुन डि.पी.
स्थलांतरीत करुन त्यांना विद्युत पुरवठा देण्यात यावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.