जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/132 प्रकरण दाखल तारीख - 12/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 10/09/2009 समक्ष – मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील. अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते सदस्य श्रीमती.शारदाबाई भ्र.हणमंतराव पांगरेकर, वय वर्षे 60, व्यवसाय घरकाम, अर्जदार. रा. गाडीपुरा, नांदेड. विरुध्द. 1. उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, उपविभागीय कार्यालय, वजीराबाद, नांदेड. गैरअर्जदार. 2. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. बर्की चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.इरफान अलीखॉन. गैरअर्जदारा तर्फे वकील - एकतर्फा निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, अर्जदार हे ग्राहक क्र.500010738156 द्वारे गैरअर्जदार यांचेकडुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे. बिल जास्त येऊ नये म्हणुन काटकसरीने ते विजेचा वापर करतात व त्यांना 35 ते 55 युनिट महिना बिल येते. त्यांनी दि.18/04/2008 ते 03/10/2008 या कालावधीचे विजेचे देयक दाखल केलेले आहे. त्यात मिटर रिडींग प्रमाणे एप्रिल 2007 ला 40 युनिट, मे 2007 ला 143 युनिट, जुलै 2007 ला 163 युनिट, सप्टेंबर 2007 ला 44 युनिट, ऑक्टोंबर 2007 ला 30 युनिट, असा विजेचा वापर दाखविण्यात आलेला आहे. अर्जदार यांनी शेवटचे दि.30/10/2008 रोजीचे रु.3,160/- भरल्याचे म्हटले आहे. अर्जदार यांची तक्रार दि.03/12/2008 चे विद्युत देयकाबद्यल आहे. अर्जदार यांनी विद्युत देयकाच्या वापरासंबंधी खालील तक्ता दाखल केलेला आहे. अ.क्र. | विज देयक दिनांक | एकुण रुपये | भरण्यात आलेली रक्कम | युनिट | चालु रिडींग | मागील रिडींग | एकुण विज वापर | 1 | 3/12/08 | 9120/3010 | | 0 | 357 | 357 | 0 | 2 | 7/1/09 | 3590 | - | 531 | 888 | 357 | 0 | 3 | 27/1/09 | 100 | - | - | - | - | - | 4 | 7/2/09 | 4590 | - | 427 | 1315 | 888 | 427 | 5 | 6/3/09 | 5570 | - | 226 | आरएनए | 1313 | 226 | 6 | 6/5/09 | 7550 | - | 226 | -/- | 1313 | 226 |
दाखविलेले आहे. त्यांनी गैरअर्जदाराकडे अनेक वेळा तक्रार केली व त्यांना विजेचे बिल जास्त येत असल्या कारणाने दि.27/01/2009 रोजी मिटर तपासणीसाठी रु.100/- भरलेत तरी देखील मिटर विषयीचा अहवाल किंवा मिटर त्यांना बदलुन देण्यात आलेले नाही तसे गैरअर्जदार यांनी दि.05/11/2007 रोजी जुने मिटर काढुन नविन मिटर लावलेले आहे. यानंतर देखील गैरअर्जदार यांनी खोटी व चुकीची देयके देणे चालुच ठेवले आहे. दि.03/10/2008 चे रु.9,330/- चुकीचे देयक जे मिटर फॉल्टी म्हणुन दिले होते ते कमी करुन रु.3,160/- करुन देण्यात आले होते व ती रक्कम अर्जदाराने भरले आहे दि.03/12/2008 चेही विद्युत देयक रु.9,120/- देण्यात आले. त्यानंतर ते कमी करुन रु.3,010/- चे देण्यात आले. म्हणजे असे गैरअर्जदार चुकीची बिले देत राहीले व नंतर तक्रार केल्यावर कमी करुन देण्यात आले. अर्जदाराची मागणी आहे की, दि.03/12/2008 पासुन दि.06/05/2009 पर्यंतचे विद्युत देयके रद्य करण्यात यावे तसेच चालु देयक एकुण विज वापर करुन देण्याचा आदेश करण्यात यावे व जुने मिटर बदलुन नविन मिटर बसविण्याचे आदेश करण्यात यावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.55,000/- व दावा खर्चाबद्यल रु.12,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस देण्यात आली ती तामील झाली व ते हजर राहीले नाही पुढे संधी असतांना आपले म्हणणे दिले नाही. म्हणुन एकतर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र व यासोबत दाखल केलेले दस्तऐवज तसेच वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी आपल्या तक्रारीत दि.03/12/2008 ते 06/05/2009 या विषयीच्या बिलांचा वाद ती चुकीची बिले असल्या कारणाने तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दि.03/12/2008 चे रु.9,120/- चे देयक गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ते दुरुस्त करुन रु.3,010/- चे दिले असे म्हटले आहे. पण हे विज बिल भरल्याचे सांगितले नाही किंवा त्याचा पुरावाही दाखल केला नाही. दि.03/12/2008 च्या विद्युत देयकातील प्रोगेसिव्ह रिडींग दिसते व मागच्या महिन्यात रिडींग न घेतल्यामुळे असे युनिट दाखविण्यात आलेले आहेत ते पुढच्या महिन्यात जास्तीचे युनिट झालेले असणार यानंतर दि.07/01/2009 चे बिलात सरासरी वापर 172 दाखविण्यात आलेले आहे या वेळेसही रिडींग घेतल्याचे दिसत नाही. कारण फेब्रुवारी 2009 च्या बिलात मागील रिडींग 888 व चालु रिडींग 1315 असे प्रोग्रेसिव्ह रिडींग दिसते यामध्ये अर्जदार यांनी मिटर तपासणीसाठी रु.100/- भरल्याची पावती दाखल केलेली आहे. अर्जदारांनी वादग्रस्त बिला विषयी जे म्हटले आहे ते पाहण्यासाठी एकही विजेचे बिल अर्जदारांनी दाखल केलेले नाही. या उलट ज्या विद्युत देयका विषयी त्याची तक्रार नाही व काही अंशी असल्यास ती दुरुस्त करुन देण्यात आलेले आहे, त्या बिलाचा वाद नसतांना दि.18/04/2008 ते 03/10/2008 चे देयके दाखल केलेले आहे ही बिल दाखल करण्याचीही गरज नव्हते व ज्या वादग्रस्त बिलाची गरज होती नेमके तीच बिल या प्रकरणांत दाखल नाहीत. अर्जदारांनी त्यांच्या तक्रारअर्जातील तक्त्यामध्ये रिडींगसह व तारखेसह व रक्कमेसह विद्युत देयकाचा उल्लेख केलेला आहे, त्यामध्येही ही सर्व विद्युत बिले त्यांना मिळाली आहेत व त्याच आधारावर त्यांनी तक्रारअर्जातील तक्ता तयार केलेला आहे. मिटर फॉल्टी आहे हे जरी सिध्द झालेच तर मिटर बदलण्याचा आदेश करता येईल पण असा कुठलाही पुरावा समोर न आल्यामुळे तक्रार ही स्वच्छ हाताने केली गेल्याचे दिसत नाही. यामध्ये अर्जदार देखील काही तरी चुक लपवित आहेत. त्याप्रमाणे अर्जदारांनी त्यांच्या मते शेवटचे बिल रु.3,160/- दि.03/10/2008 ला भरलेले आहेत व त्यानंतर आजपर्यंत विजेचे बिल भरल्याचा पुरावा दिला नाही. त्यामुळे ते स्वतः डिफॉल्टर आहेत. गैरअर्जदारांनी तरी देखील त्यांचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरु ठेवलेला आहे, असे असतांना अर्जदार यांची नैतीक कर्तव्य आहे की, त्यांनी विद्युत देयके नियमितपणे भरले पाहीजे व विज वापराचे बिल भरायचे नाही आणि तक्रार करायची असे अपेक्षित नाही. गैरअर्जदार या प्रकरणांत गैरहजर राहील्यामुळे नेमके त्यांचा बचाव समजु शकत नाही. अर्जदाराने मिटर तपासणीसाठी दि.27/01/2009 रोजी फिस भरल्याची पावती दाखल केली आहे व पुढे काय झाले हेही स्पष्ट होत नाही. गैरअर्जदारांनी तक्रार केल्यावर जे बिल दुरुस्त केले ते बिल अर्जदारांनी भरणे अपेक्षित होते पण दि.03/12/2008 चे बिल रु.3,010/- देखील अर्जदारांनी भरले नाही याचा अर्थ त्यांना बिल भरण्याची इच्छा दिसत नाही. अर्जदार हे स्वतः डिफॉल्टर आहेत, अशा स्थितीत त्यांनी तक्रार करणे कायदयास धरुन होणार नाही. अर्जदारांनी जे वादग्रस्त बिलाचा उल्लेख केला त्या विषयी योग्य तो पुरावा व बिल न सादर केल्यामुळे पुराव्या अभावी त्यांची तक्रार खारीज करण्यत येते आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य. गो.प.निलमवार. लघूलेखक. |